Wednesday, August 26, 2009

अंदमान चे ’काळे पाणी’...........

सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.
अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.
इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.
संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे .
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.
दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.
नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे.

संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

ने मजसी ने परत मातृभूमीला

Wednesday, August 19, 2009

निवेदन एक कला....

निवेदन एक कला....

मागचे पोस्ट हे गाण्याच्या मागे जी व्यवस्था लागते त्याबद्द्ल लिहिले तेव्हा आता हे प्रत्यक्ष एका गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल. बर्‍याच वेळेला आपण गाण्याचे कार्यक्रम ’बघतो’ नुसते ’ऎकत’ नाही. आजकाल स्टेज डेकोरेशन, कपडे, निवेदन या सगळ्याला महत्व आलेले आहे. बहुतेक वेळेला कुठलीतरी एक थीम घेउन गाणी बसवतात. कधी प्रेमावर तर कधी पावसावर तर कधी विरहावर तर कदी एखाद्या गायक/संगीतकाराची गाणी असतात. ह्या सगळ्या गाण्यांना एका सूत्रात बांधणारी एक महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक. बर्‍याच वेळेला दोन निवेदक असतात (स्त्री व पुरूष). निवेदकाचे काम खूप महत्वाचे असते.

निवेदकाला कार्यक्रमातील सगळी गाणी जोडावी लागतात. यासाठी अधून मधून विनोद, कधी गाण्याबद्द माहिती तर कधी काही कविता असे सागावे लागते. प्रेक्षकांना गाणी ऎकताना खूप वेळ माहिती ऎकणे कंटाळवाणे होते त्यामुळे थोडक्यात पण इंटरेस्ट वाटेल असे बोलणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा काळ, कल्पना आणि वेग या तिन्ही गोष्टी संभाळणे आवश्यक असते. मधे मी एक कार्यक्रम बघितला त्यातल्या निवेदकाने ’वेदनेशिवाय जे ऎकावे वाटते ते निवेदन’ अशी सुट्सुटीत व्याख्या केली होती.
आमच्या इथे असच एक कार्यक्रम बसवला होता (हॊशी) त्याचे हे निवेदन व गाण्याच्या लिंक्स देत आहे. तुम्हाला गाण्याचा एक प्रोग्रॅम बघितल्याचे समाधान वाटेल हे नक्की. या कर्यक्रमात गायकांना त्याच्या आवडीची गाणी म्हणायला परवानगी होती त्यामुळे ती जोडणे हे फार कॊशल्याचे काम होते कारण खूप वेगळ्या विषयावरची गाणी एकत्र गुंफायची होती. हे अवघड काम सोपे केले सॊ. देवयानी गोडसे यांनी. माझाही थोडाफार हातभार होताच. तर बघूया हा कार्यक्रम....

नमस्कार मंडळी. आजच्या माझे गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमात आपली गायक मंडळी घेउन आली आहेत आपल्या आवडीची गाणी. कुणी पसंती दिली आहे आपल्या आवडत्या गायकाला, कुणी त्यातल्या काव्याला तर कुणी चालीला. कार्यक्रमाची सुरूवात करू या एका अभंगाने....
सकल मराठी जनांची मायमाउली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा. या आपल्या माउलीला भेटायला दर वर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठूनामाचा गजर. चला तर आपणही सामील होऊ या या गजरात. संत एकनाथ महाराजांचा अभंग आपल्या दमदार आवाजात सादर करत आहेत.........माझे माहेर पंढरी.....

पंढरीची वारी म्हटली की हमखास पावसाची आठवण होते. या पुढचे गाणे आहे पावसावरचे.
दाटून आलेले आभाळ, वार्‍याची गोड शिरशिरी आणि मनाला धुंदी आणणारा तो मृदगंध हे सगळे आपल्याला पहिल्या पावसाची आठवण करून देते. असे हे सुंदर क्षण अनुभवताना आपली आवडती व्यक्ती बरोबर हवी असे साहजिकच वाटते. अगदी हेच भाव पुढील गाण्यातून सादर केले आहेत......अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले....

या गाण्यात तिच्या मनातले भाव तुम्ही ऎकलेत आता विरहाच्या नुसत्या कल्पनेने त्याची काय परिस्थिती झाली हे बघूया.
प्रेमात गुंतलेले दोन जीव एकमेकांसाठीच जगत असतात. अधून मधून विरहाचे क्षणही येतात पण ते प्रेमाची गोडी अजूनच वाढवतात. आपल्या शिवाय तिचे दिवस कसे सरतील असा गोड प्रश्न त्याला पडलाय. खरे तर दोघांची परिस्थिती तीच आहे पण तिच्याकडून प्रेमाची कबुली घेण्यातली मजा आही ऒरच. संदीप खरे यांची ही सुंदर कविता सादर होत आहे. यातले शब्द आणि चाल तुम्हाला नकीच ठेका धरायला लावतील. कसे सरतील सये....

आपल्या संस्कृतीत लोककलेचा वारसा फार मोठा आहे. मायमराठीचा ठळक्पणे सांगता येणारा लोककलेचा प्रकार म्हणले लावणी. लावण्याचा भावाविष्कार करते ती लावणी. शृंगाररसाची धिटाईने मांडणी करते ती हिच लावणी आणि ऎकणार्‍याला आपल्या तालावर थिरकायला लावते ती पण लावणीच. मध्यंतरी या लावणीला कठिण काळातून जावे लागले पण त्यातून बाहेर पडून पुन्हा लोककलेचा मानाचा तुरा म्हणून ती आता ऒळखली जाते.
अशीच एक नखरेल लावणी आपल्या भेटीला घेउन येत आहे ......रेशमाच्या रेघांनी....

यानंतर पंढ्रीची मायमाउली पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. संत मंडळींना या माउलीला भेटायला प्रत्यक्ष देवळात जावे लागते असे नाही. विठ्ठ्लाच्या रूपाने भारलेल्या वातावरणातच भक्तांना त्याचा साक्षात्कार होतो. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून विठूनामाचा महिमा सादर करत आहोत.....अबीर गुलाल उधलीत रंग............

कुठलाही मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऋतु हिरवा मधील गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. मग आपला कार्यक्रम तरी त्याला अपवाद कसा असणार? वीणेच्या स्वरसाजाचे स्वभाव सांगणारे गाणे यानंतर सादर होत आहे. आपण आपल्या भावना नेहेमी शब्दातून व्यक्त करतो आणि संवाद साधतो. पण संवादासाटी खरेच शब्दांची आवश्यकता असते का? तुम्ही जर कधी वीणा ऎकली तर लक्षात येईल की वीणेचे स्वर नानाविध भाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. कधी तराणा, कधी नखरेल खटका तर कधी सुंदर ताना. मग हे स्वर आपल्या मनाला भिडतात आणि सहजच शब्देविणु संवादु साधला जातो.
बा. भ. बोरकरांच्या कवितेतून सादर झालेले हे विचार सादर होत आहेत पुढच्या गाण्यातून..... झिनीझिनी वाजे बीन

सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगॊळीने सध्या मराठी तरूणाई वर मोहिनी घातली आहे. सरळ सोपे आणि म्हणूनच आपलेसे वाटणारे शब्द, अधी डोलायला लावणारे तर अधी व्याकूळ करणारे. याच जोडीचे एक विरहगीत आता आपल्या पुढे येत आहे. संसारत रूसवे फुगवे, अबोला हे तर नेहेमीचेच पण हे जर एका मर्यादेबाहेर गेले तर कधी कधी ताटातुटीचे क्षण ही येउ शकतात. अशावेळी एकटेपणा प्रकर्षाने जाणवतॊ. नकळतच आपण आपल्या मनाशी कबुली देतो. आपल्या सुरेल आवाजात ही कबुली देत आहेत.
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो..........

यानंतर शेवटचे गाणे सादर करण्यापूर्वी वादकांची ऒळख झाली.

आता वळू या कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्याकडे. ग्रामीण बाजाची गाणी म्हणजे आपल्या साहित्यातला अनमोल ठेवा. ग्रामीण भागातले बोलणे, वागणे अगदी मोकळं. कसं बोलू काय बोलू असे भिडस्त प्रश्न नाहीत. सगळा कारभार कसा खुल्लम खुल्ला. अशा प्रकारची गाणी देण्यात दादा कॊंडके यांचा फार मोठा वाटा आहे. या गाण्यातला तो व ती म्हणजे खेड्यातली जिवंत तरूणाई.
आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील तिखी नोकझोक खास गावरान ठसक्यात सादर होत आहे पुढ्च्या गाण्यातून...
अग हिल हिल पोरी तुला..
.


Wednesday, August 12, 2009

गाणे ऎकताना.........

गाणे ऎकताना.........

गाणे कसे ऎकावे किंवा कुठले ऎकावे याबद्दल हे पोस्ट नाही. आजकाल गाण्याचे अनेक प्रोग्रॅम्स आपण ऎकतो. कार्यक्रम बर्‍याच वेळा वेळेवर सुरू होत नाही. मग आज नीट ऎकू आले नाही किंवा तबलाच फार जोरात होता अशा काहीतरी कॉमेंटस होतात. जो माणूस पॆसे खर्च करून कार्यक्रम बघायला जातो तो काही अपेक्षेने जातो. आणि ते बरोबरही आहे. आमच्या घरी हॊशी कार्यक्रमांच्या बर्‍याच प्रॅक्टीस होतात. माझा सहभाग अर्थात पडद्यामागचा असतो. ते कार्यक्रम बसवताना माझ्या माहितीत थोडीफार भर पडली ती तुमच्याशी शेअर करत आहे.

गाणे ऎकताना काही मंडळी शब्द ऎकतात काही तालाला महत्व देतात तर काही सूरांवर प्रेम करतात. या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचण्याची आवश्यकता असते तेव्हाच कार्यक्रम यशस्वी होतो. यासाठी माइक्स, स्पिकर्स, ऍम्प्लिफायर व फीडबॅक स्पीकर्स ची गरज असते. आणि हे सगळे मॅनेज करण्यासाठी ज्याला चांगला ’कान’ आहे असा साउंड टेक्निशिअन आवश्यक असतो. नेहेमी प्रोग्रॅम बसवताना गायक, वादक भरपूर असतात पण साउंड टेक्निशिअनचे काम करायला फार कमी मंडळी पुढे येतात. तसे बघितले तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

माइक हे गायक, वादक याच्यासाठी वापरतात. ते बरोबर अंतरावर लावले नाहीत तर नीट आवाज येत नाही. स्पिकर्स हे प्रेक्षकांसाठी असतात. हॉलच्या कपॅसिटीच्या प्रमाणे स्पिकर्स लावावे लागतात. कमी किंवा जास्त कपॅसिटीचे लावले तर व्यवस्थित ऎकू येत नाही. फीडबॅक स्पीकर्स हे गायक व वादकांसाठी असतात. मोठ्या हॉलमध्ये स्पीकर्स मधून प्रेक्षकांना आवाज पोचतो पण तो परत गायकाकडे पोचेपर्यंत मधे थोडा वेळ जातो आणि लॅग - विलंब येतो हे टाळण्यासाठी फीड्बॅक स्पीकर्स वापरत्तात. माइक चे बरेच प्रकार असतात. त्यात रिमोट व रेग्युलर मायक्रोफोन्स जास्त वापरले जातात. रेग्युलर मायक्रोफोन्सच्या वायर्स जनरली रंगीत किंवा नंबर लिहिलेल्या असतात. साउंड टेक्निशिअन रंगांवरून अथवा नंबरवरून कुठला माइक कुणाचा हे लक्षात ठेवतो आणि त्याच्या सहाय्याने आवाज कमी जास्त करतो. जेवढे माइक जास्त तेवढे जास्त लक्ष द्यावे लागते. या सगळ्या माइक्स च्या वायर्स एका ऍम्प्लिफायर ला जोडतात. त्याचे एक आउट्पुट स्पीकर्स ला व दुसरे फीडबॅक मॉनिटर ला देतात.

खाली एक बेसिक सिस्टीम दाखवली आहे.
एकामागोमाग दोन प्रोग्रॅम्स असतील तर मधे सेटींग ला वेळ कमी मिळतो. सिस्टीम सेट झाली की आवाजाचे टेस्टींग करावे लागते आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्या गोष्टी करताना शक्यतो सभागृह रिकामे असावे लागते. या सगळ्या गोष्टींना वेळ लागला की प्रेक्षकांना जास्त वाट बघायला लागते. कधी कधी नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होतात. वायर्स कुणी हलवल्या किंवा त्या एकमेकात अडकल्या तर स्पिकर्स मधून जोरात आवाज येतो. फीडबॅक च्या समोरून माइक नेला तर जोरात आवाज येतो की लोकांना कानावर हात ठेवावे लागतात. आता पुढचा कार्यक्रम बघताना, ऎकताना हे सगळे फॅक्टर्स तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि कार्यक्रमाची मजा घ्याल असे वाटते.

Sunday, August 9, 2009

धर्माची गोष्ट

धर्माची गोष्ट

तुमच्या हिंदू धर्मात इतके देव कसे? तुम्ही दगडाच्या स्टॅच्यू ची पूजा कशी करता? तुमच्या देवांची तर चक्क फॅमिली असते ना? ते आपल्यासारखे दागदागिने कसे घालतात? तुमचा कृष्ण प्ले बॉय होता का? इंडिया मध्ये सगळे हिंदूच असतात का? तुमच्या राजांना एवढ्या राण्या (बायका) कशा असतात ? तुम्ही कुठले पुस्तक फॉलो करता? (बायबल, कुराण सारखे), शिवलिंगामागे काय कल्पना आहे? तुमच्याकडे सती प्रथा अजून आहे का? आणि अनटचेबल्स असतात का? अरे हो किती प्रश्न...जगात लोकांना हिंदू देव देवतांबद्द्ल आणि आपल्या धर्माबद्द्ल एवढे प्रश्न असतील असे भारताबाहेर राहिल्याशिवाय लक्षात येत नाही. इतर काही माहिती असो वा नसो या गोष्टीत फार इंटरेस्ट. शाळात, नोकरीच्या ठिकाणी, प्रवासात अनेक लोक तुम्हाला सतत असे प्रश्न विचारून कोड्यात टाकत असतात.

आपण आपल्या देशात आपल्या माणसात असतो तेव्हा मुले वाढताना त्यांच्यावर आजूबाजूच्या गोष्टीमुळे आपोआप संस्कार होत असतात. सण वार, मित्र मंडळी, घरातले वातावरण या सगळ्याचा त्यांच्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. आजकाल चे युग आहे ग्लोबलायझेशन चे. त्यामुळे जगभर आपली मंडळी विखुरली आहेत. मुले बाहेरच्या जगात वेगवेगळ्या संस्कृति मध्ये मिसळत आहेत. अनेक सणवार तिथे साजरे केले जातात. इतर मुलेही त्यात सामील होतात. साहजिकच आपल्या मुलांना प्रकारच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते. भारताबाहेर रहाणार्‍या मुलांना बरेच वेळा संस्कार वर्ग, हिंदू धर्माबद्दल लेक्चर्स किवा इंटरनेट अशा ठिकाणातून मुले आपली मते बनवत असतात. आजकालचे पालक वेळ नाही या नावाखाली मुलांना एखाद्या संस्कार वर्गात घालतात व आपली जबाबदारी संपली असे म्हणतात. खरे तर आपला धर्म कळायला घराच्या बाहेर जायला लागावे ही नामुश्कीची गोष्ट आहे. या गोष्टी घरातून, मोठ्यांच्या वागणूकीतून मुले नकळत शिकत असतात.

आजकाल मुले काहीही अडले की गुगलबाबाचा आधार घेतात. या विषयावर हजारो साईट्स उपलब्ध आहेत पण त्यातल्या उपयुक्त किती हे बघितले तर फार कमी साईटस सापडतात. आपला धर्म खूप जुना आहे. अनेक लोकांचे चांगले विचार एकत्र होऊन तो तयार झाला आहे. काळानुसार, प्रांतानुसार त्यातील बंधने कमी झाली आहेत. त्यात अनेक चांगल्या लोकांचे विचार एकत्रित आहेत म्हणून तो अजूनही टिकला आहे.

हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म हा एक मुद्दा लोकांना पटत नाही. आजकालच्या पिढीला सगळ्या गोष्टींचे प्रूफ हवे असते आणि ही गोष्ट अजून झालेली नाही. लॉजिकली त्याचे बरेच स्पष्टीकरण देतात पण सायन्स ने अजून त्याचे सर्वाना समजेल असे प्रूफ दिलेले नाही. तुम्ही जोपर्यंत सगळ्यांना समजेल असे प्रूफ देत नाही तोवर लोक ते ग्राह्य धरत नाहीत. फिलॉसॉफी चा आधार घेउन बरेच स्पष्टीकरण दिले जाते पण सामान्य लोकांना ते समजणे अवघड असते. त्यामुळे आमचा हा विश्वास आहे किंवा आम्ही हे मानतो असे म्हटले तर समोरचा थोडा शांतपणे ऎकतो. श्रद्धा हा सगळ्या धर्माचा पाया आहे. (अंधश्रद्धा नव्हे). तसे इजिप्त चे जुने लोक ही आफ्टर लाईफ वर खूप विश्वास ठेवायचे.

दुसरा एक गॆरसमज म्हणजे हिंदू धर्मात खूप देव आहेत असे नेहेमी बाहेरच्या लोकांना वाटते कारण ते ठिकठिकाणी मंदिरे बघतात आणि त्यात अनेक वेगवेगळ्या मूर्ती असतात. आपल्याला पटेल, आवडेल अशा रूपात आपण देव बघू शकतो पण शेवटी सगळे एकच देव मानतात हे लोकांना पटत नाही कारण इतर धर्मात बहुधा एक देव मानतात. आणि त्यांना हा फ़्रीडम नाही.

बाकी आपल्याकडे आणि इतर धर्मातही चांगले वागण्यासाठी नियम करून दिलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली जातात. आपल्याकडे जसे हवे त्या देवाची पूजा करता येते तसे धार्मिक पुस्तक ही अमूक एकच वापरा असे बंधन नाही. हे बंधन नसणे बाहेरच्या लोकांना पटकन पटत नाही. गीता वाचली नाही तरी हिंदू माणूस हिंदूच रहातो. देवळात जाणे, पूजा करणे, उपास तापास व्रत वॆकल्ये या गोष्टी म्हणजे एक रस्ता आहे आपल्या धर्माने दाखवलेला, तॊ रस्ता घ्यायचा का आपला स्वतःचा हे तुम्हीच ठरवायचे असते.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की मुलांना लहानपणापासून शाळेत मॊरल सायन्स हा विषय शिकवला पाहिजे. त्यात इतर धर्माबद्दल माहिती दिली पाहिजे. म्हणजे मुले इतर धर्माचा आदर करतील व त्यांना माहिती पण होईल. गॆरसमज दूर होतील. हया विषयाला आपल्या शाळेत फार कमी महत्व दिले जाते. त्यांनी त्या काळी दूर दृष्टीने अशा बर्‍याच सूचना केल्या होत्या पण त्याला कमी महत्व मिळाले नाहीतर आज वेगळा भारत बघायला मिळाला असता.

भारतात इतके धर्म एकत्र नांदू शकतात कारण हिंदू धर्म खूप सहनशील आहे. आजकाल धर्माच्या आडून सगळी भांडणे होतात. जी गोष्ट लोकांना एकत्र आणायला उपयोगात यायला हवी तीच आज लोकांना एकमेकांविरूद्ध करते आहे, आणि याला कुणी कंट्रोल करू शकत नाही. आमचा धर्म सगळ्यात चांगला असे म्हणण्याऎवजी आमचा धर्म आमच्यासाठी चांगला असे जर म्हटले तर काही प्रमाणात परिस्थिती बदलेल. यासाठी लहानपणापासून बरोबर गोष्टी शिकवण्याची गरज आहे.

हिंदू धर्म हा खूप जुना आहे. बाकीचे धर्म अजून नवीन आहेत कदाचित हळूहळू त्यांच्यातही बदल होईल. आपल्या धर्मात अनेक देवांची उपस्थिती पाहून काही मंडळी विचारतात की मग आमचा अल्ला, आमचा येशू तुमच्या धर्मात कुठे बसतो? मला वाटते मुलांनी जर आपल्या धर्माबद्दल बेसिक माहिती घेतली, (ईंटरनेट वरून, कुणा वडिलधार्‍याकडून किंवा पुस्तकातून) तर अशा प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाईल, तुम्हाला काय वाटते?