Thursday, April 29, 2010

सिनेमा बघताना......

सिनेमा बघताना......

काल नेटफ्लिक्स कडून आलेला सिनेमा बघत होते. नंतर सहज मनात विचार आला, किती सोपे झाले आहे आता सिनेमा बघणे. पूर्वी महिन्यातून एखादा सिनेमा (बर्‍याच वेळेला गरी कुणीतरी बघून मग परवानगी दिलेली असे) बघत असू. त्यावेळेस ३ रू वगॆरे बाल्कनीचे तिकीट असे. आधी ऍडव्हान्स बुकींग करून बहुतेक वेळेला सिनेमा बघितला जाई. ब्लॅक तिकीट वाले बाहेर ऒरडताना दिसत (तो सुद्धा रेट फार नसे) त्यावेळेस त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाई. नंतर हळुहळु तिकीटचे भाव वाढत गेले. आणि सिनेमाचे प्रकार पण वाढत गेले.

नंतर दूरदर्शन वर सिनेमा बघायला सुरूवात झाली. त्यावेळेस मजा वाटायची, छोट्या पडद्यावर का होईना पण घरी बसून सिनेमे बघता येऊ लागले. हळूहळू ब्लॅक ऍन्ड व्हाईट वरून रंगीत चित्रपट बघायची सोय झाली. नंतर व्हिडिऒ कॅसेट चा जमाना आला. आता तर वेळे चेही बंधन राहिले नाही. आपल्या सवडीनुसार सिनेमे बघता येऊ लागले. यापाठोपाठ डी व्हि डी चे पदार्पण झाले. चांगल्या प्रतीचे सिनेमे दिसू लागले पण यामुळे पायरसी चा प्रॉब्लेम सुरू झाला जो अजूनही चालू आहे. अमेरिकेत ६ महिने पर्यंत कुठलाही नवीन अमेरिकन सिनेमा बघता येत नाही ( सापडल्यास जबर शिक्षा असते). इंडियन स्टोअर मध्ये मात्र लगेच पायरेटेड डि व्हि डी बघता येते.
मधल्या काळात मल्टीप्लेक्स मुळे लोक परत थोडे थिएटर मध्ये जाऊन सिनेमे बघू लागले. पण त्यासाठी पॆसे जास्त लागतात. यानंतर लॅपटॉप वर सिनेमे डाऊनलोड करून बघणे सुरू झाले. यात अनलिमिटेड सिनेमे बघू शकत्तो. विमानातून निघालो की थोड्याच वेळात पटापट लॅपटॉप्स उअघडून सगळी युवा जनता आपले आवडते सिनेमे बघताना दिसतात. आजकाल विमानात पण पर्सनल टी व्ही असतात. टि व्ही चे पण स्क्रीन साईज वाढले, क्वालिटी सुधारली. होम थिएटरचा जमाना आला. घरी सिनेमा बघत्ताना थिएटर इफेक्ट मिळू लागले. टी व्ही वर स्पर्धा वाढल्याने सिनेमांमध्ये चॉईस करता येउ लागला. डि व्हि डि प्लेअर चे अनेक प्रकार आले त्यात सोनी ब्लू रे वर तर इंटरनेट वरून यू ट्यूब वरचे सिनेमे बघता येऊ लागले. त्यावरून नेटफ्लिक्स पण बघता येते. नेटफ्लिक्स वाले आपल्याकडे घरी पोस्टाने सिनेमे पाठवतात आपला बघून झाला की पोस्ट बॉक्स मध्ये ठेवा काम खतम....बाहेर जायला नकॊ याशिवाय डायरेक्ट डाउनलोड करून ही सिनेमे बघता येतात. अजून काय पाहिजे..........

हे सगळे पाहिले की वाटते की आता पुढे काय? पूर्वॊ आपण ३ रू त महिन्यातून एखादा सिनेमा बघत असू. आता इतके ऑपशन्स झाले आहेत ....कुठलीही भाषा, नट, देश या सगळ्या सीमा पार करून सिनेमा आपल्यापर्यंत पोचतो आहे. आता यानंतर नवीन काय सुविधा काढ्तील? माणसाची भूक खरेच मोठी आहे.

Monday, April 26, 2010

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही पुस्तके वाचली की ती आपल्याला आवडतात. कधी त्यातल्या साहित्यामुळे, कधी पुनःप्रत्ययामुळे, कधी त्यातल्या व्यक्तिरेखेमुळे तर कधी आपले व लेखकाचे विचार कुठेतरी जुळतात म्हणून. एकाच पुस्तकातले प्रत्येकाला वेगळेच काहीतरी भावते. सध्य़ा मराठी पुस्तकांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी अनुवादित पुस्तकांची क्वालिटी इतकी चांगली नव्हती हल्ली ती खूपच सुधारली आहे. मी जास्त करून मराठीच वाचते. माझे स्वतःचे कलेक्शन ही बर्‍यापॆकी झाले आहे. अगदी विमानात प्रवास करताना पण मी साप्ताहिक सकाळ, त्यातले शब्द्कॊडे पसंत करते. इंग्लीश पुस्तकांकडे हात जरा कमीच जातो. याला कारण माझा आळस असेल किंवा सध्य़ा सोपेपणाने मिळणारी मराठी पुस्तके असतील. अमेरिकेत आल्यापासून तर लायब्ररीमध्ये मनसोक्त पुस्तके मिळतात पण मी मात्र मराठीला चिकटून आहे. इथे आमच्या छोट्या गावात आता मराठी पुस्तकांची लायब्ररी पण सुरू केली आहे त्यामुळे अजून वाचनाची चंगळ. अशीच काही आवडलेली पुस्तके तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न. बघा कदाचित तुम्हालाही ती आवडतील.

या वर्षी भारतात सुट्टीवर आले असताना नेहेमीप्रमाणे पुस्तक खरेदी झाली स्वतःसाठी आणि लायब्ररीसाठी. त्यातच ’किमयागार’ हे अच्युत गोडबोले यांचे पुस्तक आणले. या पुस्तकाची प्रस्तावना आणि पहिला भाग वाचतानाच, ’अरे मला हेच म्हणायचे होते’ असे बरेच वेळा झाले आणि भराभर पुढचे वाचत गेले. विशेष करून देवळे आणि त्यातील राजकारण, भारतीय लोकांचे आमच्या वेदात सगळे आहे म्हणून बढाया मारणे याचा इथे सतत अनुभव येतो. लोकसंख्या व गरिबी ही कारणे सतत पुढे करणे भारतात चालू असते पण साधारण त्याच परिस्थितीत युरोप मध्ये नोबल लॉरेटस होऊ शकले हे कसे? आपल्या देशात हुशारीला कमी नाही. इथे ही नोबेल प्राइज विनर तयार व्हावेत.

हे पुस्तक संशोधकांवर लिहिले आहे.कुणीतरी शास्त्रज्ञांवर पुस्तक लिहिले आहे हे पाहून फार बरे वाट्ले. आपण शाळॆत असताना काही नावे वाचतो, त्यांच्या शोधांबद्दल अभ्यास करतो व नंतर त्यावर काही करत नाही. बरे अभ्यासाच्या पुस्तकात फारच थोडी नावे असतात (सिग्नेचर). या पुस्तकात या संशोधकांबद्दल बरीच माहिती आहे. त्यांनी घे्तलेले कष्ट, त्या वेळचे सामाजिक जीवन, धार्मिक आडकाठ्या , लोकांचे स्वभाव या सगळ्याचे छान वर्णन आहे. आपण सायन्स परत शिकतो आहोत असे अधून मधून वाटते. लेखकाने बर्‍याच पुस्तकांचे दाखले दिले आहेत. त्यांनी वाचलेले सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवले आहे. प्रत्येक संशोधकाचा शोध व त्याविषयी माहिती सांगितली आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते की मनुष्य स्वभाव हा सगळीकडे सारखा असतो. कुठल्याही देशात धर्म हा आडकाठी बनतो या ना त्या रूपाने. (एंजल ऍंड डेमन्स पाहिला असेलच.)

किमयागार या पुस्तकात भॊतिक शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जीवशास्त्र या सगळ्या क्षेत्रातल्या काम केलेल्या लोकांबद्दल माहिती मिळेल. प्रश्न निर्माण होणे आणि ते सोडवणे हे काम त्या मानाने सोपे होते पण ते लोकांना समजावून सांगणे फार अवघड होते या लोकांना . विचार करा सुरूवातीला ’पृथ्वी स्वतःभोवती फिरते’ हे मान्य करायला लोकांना किती कठिण गेले असेल. कारण ते धर्माच्या विरूद्ध होते. शास्त्रज्ञांनी केलेली मेहेनत, प्रयोगांसाठी केलेले कष्ट, यांचे या पुस्तकात चांगले वर्णन केले आहे. वर फेकलेला दगड खाली येणे आणि चंद्राने पृथ्वीभोवती फिरणे हे गुरूत्वाकर्षण या एकाच नियमांचे अविष्कार आहेत हे न्यूटन ने लोकांना कसे पटवले असेल याची कल्पना येते. स्टीफन हॉकिंग ने स्वतःच्या व्याधीवर मात करून केलेले संशोधन याबद्दलही छान माहिती आहे.

आपल्याकडे एखाद्या छोट्या मुलाला शाहरूख खान किंवा सचिन ही नावे पटकन येतील पण त्याच्या या हिरोंना जो टी व्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो त्या माणसाचे नाव माहित असतेच असे नाही. याच टी व्ही वर जर एखादा प्रोग्रॅम शोधांबद्दल दाखवला तर कितीतरी सोपे पणाने ही नावे सगळ्यांपर्यंत पोचतील. मिडिया हा आजकालचा सर्वात महत्वाचा घटक आहे. बी बी सी वर अशा खूप डॉक्युमेंटरीज असतात ज्यात या लोकांच्या शोधांबद्द्ल माहिती दिलेली असते. या जर शाळेत दाखवल्या तर नक्कीच फायदा होईल. अनुवंशिकतेसाठी मेंडेलने केलेले वाटाण्यावरचे प्रयोग, डी एन ए चे मॉडेल मुलांकडून करवून घेउन त्याच्यावर बी बी सी ने केलेली फ़िल्म अशा अनेक गोष्टी यात आहेत. वर्गात नुसती थिअरी शिकवताना जोडीने अशा फ़िल्म्स दाखवल्या तर ते मुलांच्या मनावर पटकन ठसते. बी बी सी किंवा हिस्टरी चॅनेल्स यावर अशा छान फिल्म्स असतात त्या शाळेत दाखवल्या गेल्या पाहिजेत काही नाही तर फ्री पिरियड मध्ये.

गंमत म्हणजे किमयागार या नावाची ७-८ पुस्तके इंटरनेट वर दिसली. हे नाव लेखकाना फार आवडते असे दिसते.

Friday, April 16, 2010

ऎश इन द एअर.....

ऎश इन द एअर.....

हे टायटल वाचून तुमचा गॆरसमज होईल की हे ऎश्वर्या राय बद्दल आही आहे का? ही वेगळीच ऎश आहे. गेल्या आठवड्यात आइसलंड ला व्होल्कॅनो इरप्ट झाला आणि ’ऎश इन द एअर’ अशा बातम्या पेपरात दिसू लागल्या. युरोपमधल्या फ्लाईटस कॅन्सल झाल्या आणि लोकाना हळूहळू त्याचे गांभीर्य कळू लागले. जोपर्यंत आपला त्याच्याशी संबंध येत नाही तोवर जनरली आपण ते वाचतो आणी सोडून देतो. असे बरेच उद्रेक निसर्गात होतात पण ते आपल्यापासून दूर असतात, आपला संबंध येत नाही त्याच्याशी. पूर्वी अलास्कात अशा प्रकारची बातमी वाचली होती आणि हे विमानांना हानिकारक असते असे वाचलेही होते. अलास्कात विमाने तशी कमी जातात पण आता युरोप ची सगळी हवाई यंत्रणा थंडावली म्हटल्यावर त्याची चर्चा जोरात सुरू आहे.

आपण आता कलियुगात आहोत आणि आता प्रलय होणार हे सगळीकडे आपण ऎकत असतो. सर्व धर्म त्याबद्दल वेग्वेगळ्या तर्‍हेने बोलत असतात. गेल्या काही महिन्यातल्या बातम्या बघितल्या तर हेति , चायना, मेक्सिको, ईंडोनेशिया इथले भूकंप, आताचे बंगालमधले वादळ, अमेरिकेतील वादळे, ग्लेशिअर ची मूव्हमेंट होऊन लोक मरणे, खाणीतील दुर्घटना हे सगळे काय दर्शवतात? नॆसर्गिक आपत्ती या पाठोपाठ येत आहेत आणि माणूस किती छोटा आहे हे सिद्ध करत आहेत असे वाटते. माणसाने इतकी प्रगती केली पण काही गोश्टी त्याच्या हाताबाहेर अजूनही आहेत हे जाणवते. कधी कधी वाटते निसर्ग माणसाला चॅलेंज देतो की आहे का तुमच्याकडे यावर उत्तर? कदाचित या असल्या आपत्तींमध्ये पुढील अनेक शोधांची बीजे दडली असतील.

chk this link about this volcano

Saturday, April 10, 2010

अनंतहस्ते ...३ (उदयपूर, चितोडगड)

Click on the pictures to enlarge them


उदयपूरमध्ये शिरल्या जाणवली स्वच्छता. ’प्लॅस्टीक निषिद्ध क्षेत्र’ अशा बर्‍याच पाट्या दिसल्या. लोक सिरियसली हा नियम पाळताना दिसतात. टूरिझम साठी महत्वाची गोष्ट. भरपूर लेक्स या गावाला लाभली आहेत. बोगन व कण्हेर सगळीकडे फुललेली दिसते. सध्या टूरिस्ट प्लेस मध्ये टॉप चा मान या सिटी ने मिळवला आहे. हे शहर छोटे आहे पण इतिहास व ऎतिहासिक वस्तू नी भरलेले आहे.

सिटी पॅलेस हा इथला मुख्य अजेंडा होता. त्याच कॅंपस मध्ये लेक पिचोळा, लेक पॅलेस, जगदीश मंदिर व क्रिस्ट्ल गॅलरी बघता येते. सकाळी सकाळी तिथे पोचलो. तिकीटे काढून गाईड मिळवण्यात बराच वेळ घातला. आम्हाला डिटेल बघायचे होते. इथले बरेच गाडीवाले, गाईड्स गोर्‍यांच्या मागे असतात. मला वाटले त्यापेक्षा गाईडस कमी होते. आमचा गाईड एक सरदारजी होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आम्ही गेलो त्याच्या दुसर्‍या दिवशी तिथे एक फंक्शन होते त्याची तयारी चालली होती. सरकारी तनखे बंद झाल्यावर इथल्या लोकांनी हॉटेल्स बनवली आणि लग्नाला वगॆरे हे महाल भाड्याने देतात. त्यामुळॆ त्यांची बरीच देखभाल होते आणि पॆसा पण भरपूर मिळतो. १५ लाख रू भाड्यात इथे लग्न करता येते. (बाकी खर्च वेगळा)

सिटी पॅलेस हा महाराजा उदयसिंग ने बांधला व नंतर त्यात अनेक राजांनी भर घातली. ते बघताना जाणवते. पण बाहेरून मात्र एक सलग वास्तू वाटते. या महालात बर्‍याच गमती जमती आहेत. महाराणा प्रतापची सगळी कहाणी जिवंत करणारी शस्त्रे, पेंटींग्ज आहेत. हल्दीघाटीच्या लढाईची बरीच चित्रे आहेत. राण्यांचे महाल, वेगवेगळ्या काचांचे नमुने (बेल्जिअम जास्त), मध्येच खॊटे दरवाजे, आरशाचा भास वाटणारे दरवाजे, झरोके, राण्यासाठी छोटे तलाव, बाहेरून दिसणार नाही अशा काचांच्या खिडक्या. चालायची तयारी मात्र हवी. हे सगळे बघताना आपण इतके जिने उतरतो व इतके चढ्तो की बस. बहुतेक सगळे जिने भिंतीत काढले आहेत. पायर्‍या उंच व कमी जास्त उंचीच्या. हे सगळॆ म्हणे सिक्युरिटी साठी केले होते. इथले राजे खूप उंच होते म्हणून पायर्‍या उंच पण आपले पाय मात्र शेवटी बोलायला लागतात. पेटींग्ज ही खूप बघायला मिळतात. मोर चॊकात खूप छान झरोखे आहेत. सगळे काम काचेचे. अजूनही सगळे चांगल्या अवस्थेत आहे. या पॅलेसच्या चॊथ्या मजल्यावर चक्क मोठी मोठी झाडे व तलाव आहे. तिथे म्हणे एक टेकडी होती ती तशीच ठेवून या लोकांनी बाग केली. बाहेरून मात्र काही कळत नाही पॅलेसचा एक भाग वाटतो. काय काय आयडिआज करतील माहित नाही. मध्ये एका ठिकाणी एकात एक दरवाजांच्या चॊकटी दिसतात..आपल्याला वाट्ते की आपण आरशात बघत आहोत अशा तर्‍हेने ते बांधले आहे. त्या मानाने राणीच्या महालात विशेष काही बघायला मिळाले नाही. खाली शस्त्रागार आहे. सगळीकडे कमानी भरपूर दिसतात. कमानी मुळॆ सगळ्या देखाव्याला एक शोभा आली आहे.

खालच्या चॊकात काही दुकाने आहेत अर्थात आमचा मोर्चा तिकडे वळला. यातील गोष्टी थोड्या महाग आहेत पण क्वालिटी छान आहे. आमची थोडीफार खरेदी झाली.

हा पॅलेस लेक पिचोलाच्या काठावर आहे. रात्री लाईट्स मध्ये हे सगळे पॅलेस छान दिसतात आम्ही ते मिस केले, तुम्ही करू नका. नंतर बोट राईड ने लेक मध्ये फिरून आलो. मध्ये जगदीश्वर मंदिर ला उतरलो ती जागाही हॉटेल मध्ये बदलली आहे. तिथली बाग आणि बाथरूम्स अप्रतिम. लेक पॅलेसही बाहेरून बघितला. आजकाल फक्त चेक इन केले तरच त्याच्या आत जात येते. पाण्यात त्याचे प्रतिबिंब छान दिसते. आजूबाजूला बरेच महाल हॉटेल मध्ये कन्व्हर्ट केलेले दिसत होते. हवा छान होती. त्यानंतर आम्ही क्रिस्ट्ल म्युझिअम पाहिले. त्यात भरपूर क्रिस्ट्लच्या गोष्टी आहेत पण खूप छान गोष्टी एकत्र पाहिल्या की काही वाटेनासे होते तसे थोडे झाले आणि पोटात कावळे ऒरडत होते त्यामुळे जरा भरभर पाहिले हे म्युझिअम. इथे ३ च्या सुमारास चहा स्टाईल मध्ये मिळतो. या म्युझिअम मध्ये ऒडिऒ मशिन देतात आणि आपले आपण सगळे बघू शकतो. क्रिस्टल बेड , खुर्च्या, ग्लसेस, बाटल्या, देव, दिवे काय नाही तिथे. याचे तिकीट भरपूर आहे. नंतर आम्ही पोट्पूजा केली आणि विंटेज कार म्युझिअम पाहिले. पॅलेस परिसरात उठेही रिझनेबल खाण्याची सोय नाही. सगळे फाईव्ह स्टार.

बाहेर फिरताना सध्याच्या राजाचे दर्शन झाले. एखादा साधारण तरूण असावा असा तो वाटला. त्याने सॊर उर्जेवर बरेच काम केले आहे व त्याबद्द्ल त्याला जर्मनीत ऍवॉर्ड दिले आहे. हे कुटुंब मागच्या बाजूला रहाते. आणि हॉटेल व म्युझिअम मधून भरपूर पॆसा कमावते. त्यांचे जुन्या गाड्यांचे म्युझिअम जवळच आहे. या सगळ्या विंटेज कार्स चालू स्थितित आहेत. प्रत्येकाला वेगळे गॅरेज. प्रत्येक गाडी हि अधून मधून रस्त्यावर काढून चालवतात. खुप मोठा पसारा आहे. आमच्यातील पुरूष वर्ग ह्या गाड्या बघायला गेला व आम्ही आरामात जेवण करून शॉपिंगचे प्लॅन्स केले. काही गाड्यांना अर्ध्या बाजूला गॉगल ग्लास लावली आहे (बायकांसाठी). काहीत शिकारीसाठी बदल केले आहेत. एका गाडीत ऑटोमॅटिक ऑईल चेंज ची सोय आहे. तर बग्गीला अनफॊल्ड होणारा जिना आहे. जी अजून समारंभात वापरतात) एका गाडीत इंग्लंड मधील टॅक्सी सारखे पार्टीशन व मागे स्पीकरची सोय आहे ड्रायव्हरशी बोलायला. प्रत्येक गाडीची काहीतरी स्पेशालिटी आहे. काही गाड्यांचे तर ओरिजिनल पेंटस ही आहेत. कॅडिलॅक, शेव्हरले, फरारे या गाड्याही आहेत.

त्यानंतर सहेलियोंकी बाडी बघायला गेलो. इथे एक छान बाग आहे व त्यात नॅचरल फोर्स व चालणारी कारंजी आहेत. पूर्वी मेडस इथे अंघोळीला, देवपूजेला येत. आम्हाला हा स्पॉट काही विशेष भावला नाही. मध्ये एंपोरियम ला थांबलो पण तिथे विशेष शॉपिंग केले नाही आम्हाला लोकल मार्केट हवे होते.
त्यानंतर रात्री ’अपणी ढाणी’ चा प्रोग्रॅम होता. गावाबाहेर एका टेकडीवर खेड्यातले वातावरण , घरे, जादूचे प्रयोग, नाच, कठपुतली दुकाने करून ठेवली आहेत ज्यायोगे सर्व वयाच्या लोकांना काहीतरी करमणूक मिळेल. गेल्यावर वेलकम ड्रिंक व पापड दिला. मग राजस्थानी स्टाईल नाच पहिला. नाचणारी साधीच होती पण छान नाचत होती. तिथेच एक बर्थ डे पार्टी चालली होती त्यांचा जरा दंगा चालला होता. हवा एकदम मस्त होती. नंतर जेवणासाठी जमिनीवर सोय केली होती. साधेपणा आणि स्वच्छता लक्षात येत होती. खास राजस्थानी पदार्थ पत्रावळीवर वाढत होते. बाजरीचा खिचडा व तूप, चुट्टा चुरमा, बाजरी भाकरी मका भाकरी, दाळ बाटी आणि तूप, सॅलड, गट्टेकी सब्जी, कढी, शेवेची भाजी ....किती खाल तुम्ही...सगळे पदार्थ छान होते. एक संपेपर्यंत दुसरा हजर. शेवटी जिलबी आणली व सगळ्यांना आग्रहाची भरवली गेली. १०-१० जिलब्या भरवत होते --- समोरचा खाणारा वाटला तर. तिथे वाढायला २च लोक होत पण इतके छान मॅनेज करत होते की बस. एकंदर पोटाची वाट लागली. पण मजा आली. आजकाल पुण्याच्या बाहेर पण असे एक ठिकाण चालू झाले आहे. रात्री हॉटेलच्या गच्चीत बसून थोड्या गप्पा मारल्या. मस्त चांदणे होते. एकंदर राजस्थानी लोककला व खानपान याचा चांगला नमुना बघायला मिळाला.
दुसर्‍या दिवशी सकाळी जगदीश मंदिर बघायला गेलो. हे सिटी पॅलेसच्या अगदी जवळ आहे. एकदम चढ्या पायर्‍या आहेत. देवळावर कोरीव काम अतिशय सुंदर आहे. त्याच्या जवळच हाथी पोळ मध्ये लोकल बाजार बघायला मिळाला. तुम्हाला जर बांधणी व इतर छोट्या गोष्टी घ्यायच्या असतील तर हा बाजार छान आहे. आम्ही पर्सेस, मोजडी, बांधणीचे मटेरियल शोपिसेस, बांगड्या, कानातली अशी बरीच खरेदी केली आधीच हा बाजार दाखवला असता तर बरे झाले असते. बांधणीचे भरपूर नमुने बघायला मिळाले. शेवटी एक बॅग येताना वाढली.
दुपारी चेंज म्हणून इडली सांबार चा समाचार घेउन चितोड्गड ला निघालो. रस्ता ठीक होता. गडावर पोचण्यापूर्वी लांबूनच चितोडगड ची भिंत दिसते. इथे वर जाताना बरीच गेट्स लागतात. शत्रूला अडवण्यासाठी पूर्वी बरीच गेट्स बांधत असावेत. वरती पोचल्यावर प्रथम गाईड घेतला. हा जरा वयस्क पण खूप माहिती सांगणारा गाईड होता. आपण नुसता किल्ला पाहिला तर काही कळणार नाही. प्रथम एक गोलाकार भिंत दिसली ती जुनी बॅंक होती. मुसलमानांनी तोडमोड केल्यावर त्यातले काही चांगले मंदिराचे अवशेष याच्या बांधकामात वापरलेले दिसतात. राणीचा जुना महाल पाहिला. अगदी खूप पडझड झाली आहे पण कल्पना येते. वरच्य़ा मजल्याच्या छतावरची नक्षी दिसते. या मंदिरातून एक भुयार तळ्यापर्यंत जाते त्यातून राण्या जात असत. त्या तळ्याजवळ पूर्वी जोहार केला असे सांगतात. शत्रू कडून हार होणार असे समजले की रजपूत स्त्रिया एकत्रित पणे स्वतःला जाळून घेत त्याला जोहार म्हणत. आणि पतीबरोबर चितेवर ज्या अग्निप्रवेश करत त्यांना सती म्हणत. असे काही करायचे म्हणजे केवढे धॆर्य पाहिजे...

त्यानंतर मीरा मंदिर पाहिले. त्याचीही मुसलमानांनी बरीच तोडफॊड केली आहे. पहाताना आमच्या आसपास काही मुसलमान ही होते. माझ्या मनात नेहेमी येते, जेव्हा गाईड सांगतो की मुसलमानांनी एवढी मंदिरे पाडली, मूर्त्या तोडल्या, हे ऎकल्यावर त्या लोकांना काय वाटत असेल? त्यानंतर विजयस्तंभ बघितला. हा राणा कुंभाच्या काळात १० वर्षे बांधत होते. खिलजी च्या विरूद्ध लढाई जिंकल्यावर हा बांधला. त्यावर खूप हिंदू देवतांची चित्रे कोरली आहेत. शस्त्रांची पण चित्रे आहेत. ९ मजले आपण वरपर्यंत जाउ शकतो..पायर्‍या जरा उंच आहेत. हे स्ट्रक्चर या गडावर एकदम प्रॉमिनंट आहे. याच्या बाहेर गाईड मधील गाणे सगळ्यांना आठवत असेलच. या स्तंभाच्या दर मजल्याला बाल्कनीज आहेत. एकूण छान स्ट्र्क्चर आहे फक्त जरा जास्त काम केलेले वाटले. रेड स्टोन व मार्बल वापरला आहे. याच्या बाजूला एक महादेवाचे छान मंदिर आहे. जवळच जोहार केलेली जागा दाखवतात.

याच गडावर किर्ती स्तंभ आहे जो विजयस्तंभाहून जुना आहे. त्यावर जॆन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत व जॆन आर्किटेक्चर आहे. हा स्तंभ विजयस्तंभापेक्षा डेलिकेट वाटतो.

सगळ्यात शेवटी पद्मिनी महाल पहायला गेलो. ही राणी काश्मिरहून आणलेली होती. दिसायला अतिशय सुंदर. तिला गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून एक जलमहाल बांधला आहे. पूर्वी आजूबाजूला खूप पाणी होते तळ्यात आता अगदीच कमी आहे. अशी एक कथा सांगतात , या राणीला बघण्याची अल्लाउद्दीन खिलजी ने गळ घातली तेव्हा दुसर्‍या महालाच्या आरशातून त्याला राणी दा्‍खवली. ती तिथे पायर्‍यांवर बसली होती. मागे वळून पाहिले तर ती पायरी दिसत नाही. (फिजिक्स्च्या तत्वाचा वापर करून). यात खरे किती माहित नाही पण गाईडस अगदी रंगवून ही गोष्ट सांगतात. ही सगळी स्टोरी गाईड च्या या गाण्यात शेवट्च्या २ कडव्यात दाखवली आहे. अर्थात स्टोरी माहित नसेल तर काही कळणार नाही. http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU

त्यानंतर किर्ती स्तंभाच्या जवळ सुंदर सूर्यास्त पाहिला. अगदी पिक्चर पर्फेक्ट. संध्याकाळी लाईट ऎंड साउंड शो पाहिला. त्या सगळ्या पडक्या भिंती, महाल या शोमध्ये सगळा इतिहास आपल्या पुढे जिवंत करतात. दर वेळॆला मेवाडचे राजे प्राण पणाला लाउन लढायचे पण मुसलमानांना मिळायचे नाहीत आणि हरले तरी खूप शॊर्य दाखवून हरायचे. मेवाडच्या लोकांना मारवाडच्या लोकांबद्द्ल खूप चीड आहे. ( जयपूर, मानसिंग व जोधाबाई) आमचा गाईड खूप चिडून बोलत होता. ते ऎकून इथे जोधा अकबर ला का विरोध झाला असेल ते समजते. पूर्वी मला वाटायचे उगाच नाटक करतात पण मेवाड वाल्यांना मारवाड वाल्यांबद्द्ल खरेच राग आहे. त्या राजांची कहाणी, मीराबाईची गोष्ट व पद्मिनीची कहाणी छान सागितली आहे. नंतरचा इतिहास मात्र फारसा सांगत नाहीत (महाराणा प्रताप नंतर...ते जरा खटकले)

रात्री हा सगळा इतिहास डोक्यात घोळवत परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या एका मित्राकडे भेटायला गेलो. त्याच्या मते उदयपूर मध्ये इतरही अनेक जागा बघण्यासारख्या आहेत. गप्पा, छान ब्रेकफास्ट खाल्ला व अहमदाबादला निघालो. ६-७ दिवस कसे गेले कळलेच नाही. इतके कोरीव काम पाहिले की झोपल्यावर छतावर कोरीव कामच दिसे. खूप चाललो, चढ उतार ही खूप झाले एकंद्रीत ट्रीप मस्त झाली. या उदयपूर मध्ये ऒपन ड्रेनेज हा प्रकार मात्र सगळीकडे खटकत होता. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा. अजून एक गोष्ट मनात आली महाराष्ट्रात इतके गड किल्ले आहेत पण एकही धड अवस्थेत नाही. एकतर मुस्लीमांना ते कधी शरण जात नसत त्यामुळॆ सतत लूट तॊडफॊड होऊन किल्ल्यांवर काही शिल्लक राहिले नाही. आता जसे आहेत त्याच्यावर टूरिझम च्यासाठी काही तरी केले पाहिजे. राजस्थान च्या लोकांनी मात्र आपले किल्ले शिल्लक ठेवले आणि आतले सामानही. आता यातले चांगले काय व वाईट काय हा प्रश्न वेगळा आहे.

Monday, April 5, 2010

अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)
अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)

(फोटोवर क्लिक केल्यास मॊठे दिसतील)

दुसर्‍या दिवशी सकाळी माउंट अबू सोडले. घाट उतरताना रस्ता खूप छान होता. वाटेत बरीच वानरसेना काही खाद्य मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला बसली होती. एका ठिकाणी पाटी होती ’माकडांना खायला घालू नका’ आणि त्याशेजारीच ३-४ माकडे बसली होती. कोणीतरी म्हटले, ’काय पाटीशेजारीच बसली आहेत’, (काय करणार अजून माकडांना वाचता येत नाही ना..) लोकांना कितीही सांगितले कि माकडांना खायला घालू नका तरी लोक ऎकत नाहीत त्यामुळे ही सगळी सेना अशी खाण्याची वाट बघत बसते. घाट उतरल्यावर हवा बदललेली जाणवली.

पुढचा मुक्काम राणकपूर येथे होता. हे ५००-६०० वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे. त्यात १४४४ खांब आहेत. प्रत्येक खांब दुसर्‍याहून वेगळा आहे. असे म्हणतात कि हे खांब मोजता येत नाहीत. बहुतेक जिथे जिथे खांब असतात तिथे असेच सांगतात कि हे खांब मोजता येत नाहीत...कारण काही कळत नाही. हे मंदिर अरवली च्या जंगलात एका छोट्या गावात आहे.जाताना घाट बर्‍यापॆकी अवघड होता. बाजूला जंगल. पावसाळ्यात हा भाग खूप छान दिसतो. हे देउळ इतक्या आत का बांधले असावे असा आम्ही विचार करत होतो, तिथल्या पुजार्‍याने सांगितले की लोकल लोकांनी बांधले आहे. राणा कुंभाच्या काळात हे देउळ बांधले असे म्हणतात. आम्ही पोचल्यावर कळले की इथे फोटॊ काढता येतात. बरे वाटले. ज्या लोकांनी शॉर्ट्स, स्कर्ट घातले होते त्यांना अडवले. पूर्ण कपडे रेंट वर मिळण्याची सोय होती ते घालून आत जाउ दिले. ही माहिती इंटरनेट वर ठेवायला पाहिजे. बरेच गोरे पांढर्‍या कफ्न्या घालून हिंडत होते. मला व्हॅटिकन सिटी ची आठवण झाली. तिथेही असेच अडवले होते आणि पर्यायी व्यवस्था काही नव्हती.
आत गेल्यावर एक गाइड घेतला..एक १३-१४ वर्षाची मुलगी होती. चांगली माहिती दिली. तिथे ३ कुटुंब आहेत. वर्मा, शर्मा व पुरोहित. त्यातलेच लोक गाईड चे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत. बघा टूरिझम मुळे निदान काही लोकांची उपजिविकेची सोय झाली आहे. या देवळाच्या आर्किटेक्ट्चा पुतळा एका खांबावर आहे. हे त्या गाईडने सांगितले म्हणून कळले. कोरीव काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खांब, छतावरचे ३ डी काम, मधले चॊक फारच सुंदर ...हे बघू का ते असे चालले होते. आतमध्ये मार्बल मुळे गार वाटत होते. आपल्याला एक फूल काढायचे म्हटले तर सिमेट्रीकल काढता येत नाही, इथली डिझाईन्स कशी केली असतील हा प्रश्न पडतो. या लोकांनी इतक्या पूर्वी ते मार्बल नेले, कोरीव काम केले आणि मुसलमानांपासून जपले......ग्रेट. पूर्वीच्या राजे लोकांच्या मध्ये स्पर्धा असेल कोण किती चांगल्या वास्तू बांधतो त्यामुळे आज आपण इतकी चांगली मंदिरे बघू शकतो. इथली ३-४ डिझाईन्स प्रसिद्ध आहेत. एक १०८ साप व त्याच्या एकमेकात गुंतलेल्या शेपट्या....


एका ठिकाणी ५ धडे व एकच चेहेरा त्याला आहे..हे पुन्हा जोडताना त्याचा ऍंगल चुकला आहे. पूर्वी कुठुनही पाहिले तरी तो चेहेरा त्या शरीराचा वाटे. कारागिरांनी इथे बर्‍याच करामती केल्या आहेत.... बरे त्या

मनाने गाजावाजा कमी...लोकांची प्रसिद्धी साठी केवढे ्प्रयत्न चालतात त्यामानाने इथे साधेपणा जाणवला. लोक इथे दान देतात. पुण्यातून आम्ही आलो म्हटल्यावर रांका जुवेलर्स चे खूप कॊतुक करत होते त्यांची इथे बरीच मदत आहे. पण आश्चर्य म्हणजे गवगवा नाही (आजकालच्या मी पणाच्या काळात.) आमची बरीच फोटॊग्राफी झाली. अर्थात प्रत्यक्ष आणि फोटॊ यात खूप फरक पडतो.
नंतर पोट्पूजेसाठी बाहेरील खानावळ गाठली. इथे जेवण फुकट पण स्वच्छ्तेचे २५ रू चार्ज करतात. साधे पण चांगले जेवण होते. शिस्त होती. पानात टाकू नका असा आग्रह होता. तिथून बाहेर पडल्यावर dari काम बघण्यासाठी थांबलो. सरकार या लोकांना ही कला चालू ठेवण्यासाठी मदत करते. एका खेड्यात ८०-९० घरात हे का चालते. नॆसर्गिक रंग व हाताने विणलेल्य़ा सतरंज्या बघण्यासारख्या होत्या. इथे थोडी खरेदी झाली. एकंदर मांडणी चांगली होती त्या जागेची. एक सतरंजी विणण्यामागे किती कष्ट असतात हे बघितले.

आम्ही गेलो ते होळी नंतरचे दिवस. राजस्थानात महिनाभर हा उत्सव चालतो. आपल्याकडे जशी गणपतीची वर्गणी गोळा करतात तशी इथे होळीची. इथले आदिवासी लोक दगड, काटेरी झुडुपे लावॊन रस्ते अडवतात. आणि १०-२० रू. मागून घेतात. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर कटकट वाटायला लागली. या गोष्टी कडे पोलिस पूर्ण दुर्लक्ष करतात. आपण गाडी दगडांपासून वाचवण्यासाठी पॆसे देत जातो....हा सिझन सोडून जाणे हा सोपा उपाय, कारण ते काही बदलणार नाहीत. इथे नव्यानेच डोंगर खोदून रस्ते केले आहेत त्यामुळे रस्ते अडवायला दगड भरपूर. या सगळ्या गोंधळात आमचे टाइम टेबल चुकायला लागले...स्पीड कमी पडू लागला. या सगळ्यात कुंभळगड चा विचार सोडावा लागला. ही जागा बघण्याचे फार मनात होते. रोहन यांच्या ब्लॉगवर वाचले होते आणि फोटो ही बघितले होते. पण या होळी च्या अडवणूकीमुळे विचार बदलला. (मुलीची तब्येत ही जरा बिघडली). चितोडगड बघणार आहोत मग हा नाही बघितला तरी चालेल असे ड्रायव्हरचे म्हणणे ...मला मात्र रूखरूख लागली इतक्या जवळ जाउन त्या होळी वाल्यांमुळे बघता आला नाही म्हणून.

या पुढचा मुक्कम होता प्रसिद्ध हल्दी घाटीचा. या बद्दल आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले असते त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करू शकत होता. महाराणा प्रताप ची लढाई , चेतक घोडा या सगळ्याबद्द्ल एक फिल्म दाखवतात. तिथे एक म्युझिअम आहे - बघण्यासारखे आहे. प्रत्यक्ष युद्धाचे चित्र मॉडेल रूपात मांडले आहे. पन्ना दाईची गोष्ट व इतर काही प्रसंग छान उभे केले आहेत. चेतकची समाधी बघता येते. इथे आल्यावर कळले की चेतक ही घोड्याची जात आहे घोड्याचे नाव नाही.चेतक व नाटक अशा २ जाती होत्या. चेतक घोड्याला लढताना हत्तीची सोंड लावत म्हणजे समोॠन येणारा हत्ती त्याला इजा करत नसे. त्यामुळे इथल्या चित्रात नेहेमी चेतकला हत्तीची सोंड दिसते.
इथे एक डोंगरात घाटी दाखवतात. तिथली माती पिवळी दिसते ज्यामुळे हे नाव पडले पण खरी घाटी जरा वेगळी कडेच आहे. आमच्यापॆकी एकाने पूर्वी ही जागा बघितली असल्याने त्यांच्या हे लक्षात आले. तिथे जवळच जुना रस्ता व घाटी दिसते. लोकांना काहीतरी बघायला मिळावे म्हणून ही नवीन घाटी दाखवतात...हा खोटेपणा करण्याचे खरे म्हणजे काहीच कारण नाही. असो.
हल्दी घाटीचे अजून एक वॆशिश्ट्य म्हणजे इथे गुलाबाची खूप लागवड होते. हा प्रदेश इतका रुक्ष दिसतो कि इथे गुलाब होत असतील हे वाटत नाही. आम्ही गुलकंद व सरबताची खरेदी केली. तिथेच त्यांची साधी मशिनरी होती (एक मोठा रांजण , गॅस इ) या गोष्टी नेट वर असल्याने माहित होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणायचा आपको तो सब पहलेसे पता हॆ..(थॅंक्स टू ट्रिप ऍडव्हायझर रिव्ह्यूज...)

हल्दी घाटीतून निघून उदयपूरला पोचेपर्यंत रात्र झाली. तिथे रामप्रसाद व्हिला त चेक इन केले. हॉटेल छान आहे फक्त लिफ्ट नाही. आमच्या रूम्स ३र्‍या मजल्यावर होत्या. बाजूला टेरेस व समोर लेक आणि त्यामागे टेकडी...छान सिट्यूएशन होती. कुणाचे तरी घर कन्व्हर्ट केले आहे हॉटेल्मध्ये. सगळीकडे मार्बल, कमानी, डेकोरेशन छान होते. रात्री समोरच्या टेकडीचा रस्ता लाईटेड दिसे. एकंदर रात्री दमून आल्यावर गच्चीत थांबले की छान देखावा दिसायचा.

(क्रमशः)