Wednesday, December 30, 2009

शुभेच्छा....

नव वर्षाच्या शुभेच्छा....

२००९ संपत आले आणि २०१० ची आपण सगळेच वाट बघतोय. खरे पाहिले तर कालगणने चा एक कालखंड संपून पुढचा सुरू होतो एवढेच. लोकांना मात्र खूप उत्साह असतो. लहान मोठे सगळेच त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात.

एक वर्षाचा काल हा बर्‍याच गोष्टींचे मापन करतो. मग तो सिनेमाचा ऑस्कर/ फिल्म फेअर चा सोहळा असो, मुलांचे शॆक्षणिक वर्ष असो, विश्व सुंदरी स्पर्धा असो अथवा अगदी टॅक्स भरणे असो आपण पुन्हा नवीन उत्साहाने या सगळ्यात भाग घेतो. ना खूप मोठा ना अगदी छोटा असा हा कालखंड सगळ्या गोष्टींचे मापन करायला वापरला जातो. अमेरिकेत आल्यावर ’टाइम झोनशी ’ पहिल्यांदा संबंध आला. पुण्यातले लोक आमच्या सकाळी(३१ डिसे) नवीन वर्षाच्या पार्ट्या करत असतात. सुरूवातीला खूप विचित्र वाटायचे. अजूनही इकडे दिवस तिकडे रात्र हे पटकन पटत नाही विशेषतः अशा वेळी. पहिल्यांदा लोकांना ही गोष्ट लक्षात आली तेव्हा किती विचित्र वाटले असेल ना? आणि ज्याने सांगितले असेल त्यावर लोकांना विश्वास ठेवायला खूप दिवस लागले असतील. आजकाल टी व्ही वाले शक्य तिथली न्यू इयर सेलिब्रेशन्स दाखवायला सुरूवात करतात. हवाई व त्यापुढ्ची आयलंडस सगळ्यात शेवटी न्यू इयर साजरे करतात.

यावर्षी म्हणे न्यू इयर इव्ह ला ब्ल्यू मून दिसणार आहे म्हणजे चंद्र निळा नाही दिसणार (आजकाल अवतार मुळे लोकांना निळे बघायची सवय लागली आहे) एका महिन्यात २ दा पॊर्णिमा आली की त्याला ब्लू मून म्हणतात म्हणे( याहू उअवाच किंवा गूगल उवाच) असो. आपण आपले चांदणे व त्यात चमकणारा बर्फ एंजॉय करावा. न्यूयॉर्क ला या वर्षी १२ वाजता जो बॉल ड्रॉप होणार तो म्हणे ग्रीन असणार. हा पण ग्रीन म्हणजे हिरवा नाही तर एनर्जी एफिशिअंट. ब्लू म्हणजे निळा नाही ग्रीन म्हणजे हिरवा नाही. २०१० मध्ये रंगांचे काही खरे दिसत नाही. आपण मात्र न्यू इयर चे फायर वर्क्स व त्यातल्या रंगांचा आनंद घ्यावा हे खरे.

मंडळी आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो.

अमेरिकेत येउन बघता बघता १० वर्षे झाली. त्या निमित्ताने केलेले हे शुभेच्छापत्र......
या आधीची शुभेच्छापत्रे इथे बघता येतील.

Friday, December 25, 2009

तुमचे स्केल काय हो?

आमच्या घरी गाण्याचे बरेच हॊशी कार्यक्रम बसवले जातात. कधी मराठी मंडळासाठी, कधी म्युझि्‍क ग्रुप साठी तर कधी नुसतेच जमून गाणी म्हणतात. बर्‍याच वेळेला नवीन कुणी जॉईन होते. गाणे म्हणण्याचा आग्रह होतो आणि मग हो नाही करत गाण्याला सुरूवात होते. त्या आधी कुणीतरी विचारते, "तुमचे स्केल काय?" बहुतेक वेळेला "माहित नाही" हेच उत्तर येते. नाहीतर तुम्हीच सांगा असे उत्तर येते. सुरूवातीला मलाही हे स्केल प्रकरण कळत नसे.

आपण नेहेमी रेडिऒवर किंवा रेकॉर्ड वर जी गाणी ऎकतो ती खूप हाय स्केल वर असतात. साधारण गायकाला त्या पट्टीत गाता येत नाही. म्हणून आपली पट्टी किंवा स्केल शोधणे महत्वाचे आहे. पेटी वर आपण नेहेमी काळ्या पांढ्र्‍या पट्ट्या बघतो. त्या मद्र, मध्य व तार अशा ३ सप्तकात विभागलेल्या असतात. स्केल शोधताना तुम्ही ज्या काळ्या किंवा पांढर्‍या पट्टीच्या वरचे व खालचे सूर सहज म्हणू शकता ती तुमची पट्टी. ती सूर ट्राय करून शोधावी लागते. त्यामुळॆ काळी १, काळी ४, पांढरी ६ अशा स्केल्स असू शकतात. थोडक्यात काळी १ हा तुमचा ’सा’ धरून पुढ्चे सूर वाजवावे लागतात. आपल्या संगीतात हार्मोनिअमची ही खसियत आहे की कुठलीही की ही ’सा’ म्हणून वापरता येते आणि त्यानुसार रेफरन्स बदलत जातात.पांढरी १
काळी ४


आता साथ करणार्‍याने प्रॅक्टीस एका स्केल वर केली आणि गाणार्‍याने अचानक स्केल बदलले तर त्याची गडबड होते. कारण आपले डोळॆ ठराविक रेफरन्स ने सेट झालेले असतात. हे सारेगामा वाले किती गाणी किती वेगवेगळ्या स्केलवर वाजवतात, कमाल आहे.

अर्थात असे प्रश्न निर्माण झाले की त्याच्यावर उपाय ही काढतात. स्केल चेंजर म्हणून एक हार्मोनिअमचा प्रकार मिळतो त्यात कीज स्लाईड करण्याची सोय असते. की बोर्ड वर ट्रान्सपोज नावाचे बटण वापरून हे करता येते. त्यामुळे इंटर्नली चेंज होतो व वाजवणार्‍याला सोपे जाते. गाणे म्हणणार्‍याला पण स्लो स्पीड वर गाणे म्हणायचे झाले(प्रॅक्टीस साठी) तर विंडोज मिडिया प्लेअर वर तशी सोय असते. जरज निर्माण झाली की तशी तशी सॉफ्ट्वेअर्स लिहिली जातात.

हे सगळे कळायला आमच्या घरी होणार्‍या प्रॅक्टीसचा मला असा खूपच फायदा झाला हे नक्की.

Monday, December 21, 2009

अवतार-एक ३ डी फिल्म

लोकांना आकर्षित करायचे तर काहीतरी वेगळे हटके करण्याची या सिनेमावाल्यांची चढाऒढ लागलेली असते. कधी गोष्टीत नाविन्य, कधी नट नटी खास , कधी गाणी छान तर कधी लोकेशनच्या नावावर गर्दी खेचली जाते. फॅंटसी असलेले चित्रपट पण नेहेमी चांगले चालतात. मला नेहेमी वाटते जे सध्या शक्य नाही ते कल्पनेने उभे करण्यात माणसाला खूप मजा येते. बरे कुठेही कशीही भरारी मारा - एकदा फॅंटसी म्हणल्यावर लॉजिक वगॆरे दूर असते. सध्या असाच एक सिनेमा आला आहे आणि मंडळीनी त्याला, त्याच्या स्पेशल इफेक्ट्स ला पसंती दिली आहे. अवतार बद्द्ल तुम्ही नेट वर, पेपरात सगळीकडे वाचले असेलच. मला स्वतःला असे सिनेमे बघायला आवडत नाही पण त्यामागचे तंत्र मत्र नक्कीच आवडते.

काल माझ्या लेकिने हा सिनेमा पाहिला आणि तिला आवडला. स्पेशल इफेक्ट्स छान आहेत. निळा रंग खूप वापरला आहे (मला सावरिया आठवला). दुसर्‍या प्लॅनेट वर वस्ती, वेगळी माणसे आणि जाता जाता एखादा संदेश. बोलता बोलता ती म्हणाली, "आम्हाला गॉगल्स दिले होते". म्हणजे हा ३ डी वाला सिनेमा आहे तर! मला हे माहित नव्हते. मी आतापर्यंत २-३ वेळा असे छोटे सिनेमे किंवा डिस्ने मधल्या फिल्म्स बघितल्या आहेत. असे सिनेमे आपल्याला त्याचा एक भाग बनवून घे्तात. आपण ३ डी गोष्टी समोर पडद्यावर बघतो आणि नकळत त्याचा घटक बनतो. आणि हो गॉगल्स काढून पाहिले तर एकदम ब्लर पिक्चर दिसते. गॉगल घालून बघा असे सांगितले की माझ्यासारखे लोक नक्कीच काढून एकदा तरी बघणार. नको म्हटले कि ती गोष्ट का करावीशी वाटते माहित नाही. बरे वयानुसार ही गोष्ट काही कमी होत नाही बरका..

थोडीशी याबद्दल माहिती वाचली आणि अरे, इतके दिवस हे आपल्या लक्षात कसे आले नाही असे वाटले. आपले दोन्ही डोळॆ एकच गोष्ट वेगवेगळ्या ऍगल वरून, अंतरावरून बघतात. आपला मेंदू यातील अंतर ऍंगल यांचा अभ्यास करून आपल्याला व्यवस्थित ३ डायमेनशनल चित्र दाखवतो. आता या प्रकारच्या सिनेमात २ वेगवेगळे प्रोजेक्टर्स एकच चित्र थोड्या वेगळ्या ऍगलने दाखवतात. त्यामुळे नुसत्या डोळ्याने पाहिले तर ब्लर दिसते. गॉगल असे बनवलेले असतात की दोन्ही डोळॆ वेगवेगळ्या प्रतिमा बघत्तात आणि प्रत्येक डोळा एकच प्रतिमा कॅप्चर करू शकतो. म्हणजे मेंदूला नेहेमीप्रमाणे दोन प्रतिमा वेगवेगळ्या अंतरावरून मिळतात व त्याचे नेहेमीप्रमाणे काम चालते. आपल्याला ३ डायमेन्शनचा अनुभव येतो.

आता म्हणे पुढे जाउन अशी थिएटर्स बनवणार आहेत की ज्यात गॉगल्स घालावे लागणार नाहीत. थोड्याच दिवसात आपण घरबसल्या असे सिनेमे बघू शकू कारण सायंटिस्ट ऑलरेडी यावर काम करत आहेत.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात...आजकालच्या नवीन नवीन गोष्टी पाहिल्या की मला वाटते हॊस ही शोधाची जननी आहे असा त्यात बदल करावा लागेल.कधी कधी वाटते माणसाला आहे त्यापेक्षा पुढचे मिळवण्याची हॊस नसती तर हे काही घडले नसते. आपण कदाचित अजून ब्लॅक ऍड व्हाइट पिक्चर्स बघत असतो.

Friday, December 18, 2009

जजमेंट....
गेल्या रोड ट्रीप मध्ये मॆत्रिणिकडे राहिलो होतो तिने एक पत्त्याचा डाव शिकवला. मजा आली खेळायला. आता ख्रिसमस व विंटर हॉलिडेज आहेत. सगळे जमले की खेळता येईल असा हा खेळ आहे. सुरूवातीला वाचून वाटेल की, अरे यात काहीच स्किल नाही पण खेळून पहा मजा येईल.

खेळाडू ४ हून जास्त असतील तर २ डाव घ्या. जोकर काढून टाका.
१. प्रत्येकी १० पाने वाटा.
२. हुकुम इस्पिक ठरवा.
३. ज्याने वाटले असेल त्याच्या पुढच्या माणसाने सांगायचे की तो किती हात करणार. (१० पेक्षा कमी)
४. त्यानंतर प्रत्येकाने किती हात करणार ते सांगायचे. शेवटच्या माणसाने आतापर्यंतच्या हातांची बेरीज करून स्वतःचे हात सांगायचे. त्याला एकच बंधन आहे की त्याचे हात मिळून संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्त झाली पाहिजे.
५. त्यानंतर नेहेमी प्रमाणे खेळून प्रत्येकाने आपण सांगितले तेवढेच हात करायचे (हे फार अवघड आहे)
६. ज्यांनी सांगितले तेवढेच हात केले त्यांना + मार्क व ज्यांचे कमी जास्त होतील त्याना - मार्क.

उदाहरणार्थ: ६ खेळाडू --- पाने प्रत्येकी १० -- हुकुम इस्पिक
हात
१ ला खेळाडू - ३
२ रा खेळाडू - २-
३ रा खेळाडू - २-
४ था खेळाडू - १
५ वा खेळाडू - १
आता ६ वा खेळाडू १ सोडून कितीही हात सांगू शकेल ( ३+२+२+१+१+ १ सोडून काहीही) म्हणजे टोटल संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्ती होते आणि कोणीतरी हरतेच.

वाटून उरलेली पाने दाखवू नयेत. दोन डाव असतील तर २ एक्क्यापॆकी १ला मोठा समजावा.

पुढ्च्या डावात ११ पाने प्रत्येकी वाटावी. हुकुम बदाम ठेवावा व हात बोलावेत
नंतर १२ पाने - चॊकट (हातांची बेरीज १२ पेक्षा कमी वा जास्त)
१३ पाने - किलवर(हातांची बेरीज १३ पेक्षा कमी वा जास्त)
व १४ पाने - नोट्रम्स असे खॆळावे.(हातांची बेरीज १४ पेक्षा कमी वा जास्त)

मार्क लिहून शेवटी ज्याला जास्त + मिळतील तो जिंकला.

Wednesday, December 16, 2009

रोड ट्रीप...

अमेरिकेत आल्यावर बर्‍याच ठिकाणी हिंडून आलो. नेहेमीची ठिकाणे - नायगारा(भारतीयांचा पहिला चॉईस) - लास व्हेगास आणि ग्रॅंड कॅनिअन - फ़्लोरिडा - कॅलिफोर्निया - कोलोरॅडो -हवाई - अलास्का - काही नॅशनल पार्कस वगॆरे. आमचा नेहेमीचा पॅटर्न म्हणजे विमान प्रवास व तिथे गेल्यावर गाडी घेउन एक आठवडा फिरणे व आजूबाजूची ठिकाणे बघणे.. आमची फ़ॅमिली तिघांचीच असल्याने हा फॉर्म्युला सोईचा वाटतो. यातील २-३ ठिकाणी ड्राईव्ह करूनही गेलो होतो.

२ आठवड्यापूर्वी मी व माझ्या मुलीने रोड ट्रीपचा अनुभव घेतला. २००० मॆल व ८ स्टेट्स असे आम्ही दोघीच फिरून आलो. इलिनॉय-इंडियाना-केंटुकी-टेनसी-नॉर्थ कॅरोलिना-व्हर्जिनिया-वेस्ट व्हर्जिनिया-ओहायो व परत असा आम्ही रोड प्लॅन केला. वाटेत मॆत्रिणी, नातेवाईक यांना भेटलो. १-२ ठिकाणी हॉटेल मध्ये राहिलो. यापूर्वी स्मोकी माउंटन ला जाताना टेनेसी पर्यंत याच रस्त्याने गेलो होतो. पुढचा भाग आमच्यासाठी नवीन होता. पहिले प्लॉनिंग गुगल मॅप्स वरून झाले. साधारण दर ५-६ तासांनी आम्ही ब्रेक घेत होतो. हॉटेल बुकिंग केली. थोडेफार खाद्यपदार्थ बरोबर घेतले. थंडी असल्याने सामान भरपूर होते. पण गाडी असल्याने काही प्रश्न नव्हता.
अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला नाही म्हणून मी नेहेमी ऒरडत असते. पण गाडी घेउन फिरायचे असेल तर हाय वेज , हॉटेल्स, पेट्रोल पंप्स आणि रस्त्यांची कंडिशन फार छान केलेली आहे. गुगल मॅप्स चे सॉफ्ट्वेअर भन्नाट आहे. हवेने साथ दिली तर या रस्त्यावरून प्रवास म्हणजे सुख आहे. घाट पण अतिशय छान आहेत.

आम्ही पहिल्या दिवशी इंडियानातून प्रवास करून केंटकी त शिरल्या शिरल्या लुइव्हिल इथे राहिलो. बुकिंग करताना या गावाबद्दल फारशी माहिती नव्हती. एकंदर गाव खूप बिझी व अपस्केल दिसत होते. आमच्या हॉटेल मध्ये छान माहिती पूर्ण पुस्तक ठेवले होते. लुइव्हिल हे गाव ऒहायो नदीच्या काठावर वसले आहे. पूर्वी नदीला इथे रॅपिडस असल्याने शिप्स ना पुढे जाता येत नसे. सामान उतरवून ते पुढे नेउन परत शिप्स मध्ये ठेवावे लागत असे. त्यामुळे इथे गाव वसवायची गरज पडली. हे गाव अमेरिकेच्या सदर्न व नॉर्थ पार्ट च्या बरोबर मध्यावर आहे. फ्रान्सच्या लुई द १६ च्या नावावरून हे नाव दिले आहे कारण इथल्या आर्मीला त्याची मदत होती. या गावात व आजूबाजूला आम्हाला खूप घोडे व कुरणे दिसली. इथली केंटकी डर्बी (रेस) फेमस आहे. चर्चिल डाउन्स मधील रेसेस खूप गर्दी खेचतात. त्यामुळे इथे भरपूर घोडे बघायला मिळाले. पावसाळी वातावरणात हिरवी कुरणे व त्यावर घोडे छान दिसत होते. इथल्या डाउनटाउन मध्ये खूप म्युझिअम्स व आर्ट गॅलरीज आहेत. महंमद अलीच्या बद्द्ल इथे एक म्युझिअम आहे. बेसबॉल बद्दल एक म्युझिअम आहे व अनेक आर्ट गॅलरीज. २-३ दिवस काढून इथे यायला पाहिजे. वायनरीज खूप दिसल्या. बरबन व्हिस्की इथे मोठ्या प्रमाणावर बनते. त्याच्या पण टूर्स होत्या. इथल्या एका काउंटी वरून हे नाव पडले आहे. आपल्याकडे या नावाची बिस्कीटस बनतात.(?) एकंदर हे गाव खूप लाइव्हली वाटले. आम्हाला वाटेत खूप ट्रक्स लागले. अवजड गोष्टी व फ़ेड एक्स चे भरपूर ट्रक्स दिसले. या गावाजवळ यु पी एस चे इंटरनॅशनल सेंटर आहे त्यामुळे भरपूर फेड एक्स ची वाहतूक दिसली. मी रस्त्यात खूप ट्रक्स बघून सारखा विचार करत होते की इथून एवढे काय घेउन जातात? तीन हाय वेज (इटर स्टेट)जवळ असल्याने व शिपिंग सेंटर असल्याने कार्गोची खूप वहातूक इथून होते.

अधून मधून आमच्या काही मॆत्रिणि फोन वर आमची खबर घेत होत्या. दोघीच जाताय, प्रदेश नवीन, गाडी लहान व पाउस असल्याने त्याना काळजी वाटत होती. आता अमेरिकेत खूप लोक असे हिंडतात मॆलोन मॆल, पण मला वाटते आमचा हा मायलेकींचा पहिलाच मोठा प्रवास(रोड ट्रीप) असल्याने काळजी वाटणे साहजिक होते. त्यातल्या त्यात नवर्‍याला कमी काळजी वाटत होती ही जमेची(?) बाजू.

नंतर आम्ही नॉक्सव्हिल येथे एका मॆत्रिणिकडे राहिलो. वाटेत खूप डोंगर भेटले आम्ही मिडवेस्ट मधून गेल्याने आम्हाल त्याचे कॊतुक आमच्याकडे नावाला डोंगर दिसत नाही. हे डोंगर फार उंच नाहीत त्यामुळे जवळचे वाटतात. अधून मधून ट्नेल्स पण काढलेली आहेत. आत्ता झाडी विशेष नव्हती तरी रस्ता फारच सिनिक होता फॉल कलर्स च्या वेळी इथून परत जायला पाहिजे. घाटात ट्रक्सचा स्पीड वाढला तर कंट्रोल करता यावे म्हणून साईडला चढ करून ठेवले होते. त्यावर गेले की स्पीड कमी होतो व ट्रक कंट्रोल करता येतो. महाबळेश्वर ला जसे खूप डोंगर दिसतात एकामागोमाग तसे इथे दिसतात. फरक एवढाच कि ते आपल्या बर्‍याच जवळ असतात. माझी मॆत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप गप्पा झाल्या. पत्ते खेळलो. घरचे जेवण मिळाले. तिच्या लेकीने आमची छान व्यवस्था ठेवली होती. दुसर्‍या दिवशी पुढे निघालो.

यापुढचा टप्पा जरा लांबचा होता. वाटेत दरड कोसळल्याने रस्ता बदलावा लागला. आम्ही जवळ डायरेक्शन्स ठेवल्या होत्या व आवश्यक तिथेच जी पी एस लावत होतो. काही ठिकाणी वाटेत पाट्या लावलेल्या होत्या, अमूक अमूक रस्ता घ्या त्याप्रमाणे गेलो. वेळ थोडा जास्त लागला पण पोचलो बरोबर. आम्ही सगळा प्रवास दिवसा केला त्यामुळे प्रदेश नीट बघता आला आणि एक दोन ठिकाणी रस्ता शोधायची वेळ आली तेव्हा दिवस असल्याचा फायदा झाला. बर्लिग्ट्न ला पोचलो. तिथे २-३ दिवस काकांकडे राहिलो. रिटायरमेंट होम मधली रहाणी कशी असते याचा थोडा अनुभव आला. खूप छान व्यवस्था ठेवली आहे. बर्लिंग्टन हे रेल्वे मुळे महत्व प्राप्त झालेले गाव आहे. पूर्वी इथे कॅरोलिना रेल्वेज ला जी दुरूस्ती लागे त्यासाठी सोय केली होती. नंतर रेल्वे ने हे गाव इतर बर्‍याच गावांना जोडले गेले. गोल्ड्न टो सॉक्स इथे बनतात (नुकतेच घेतले असल्याने लक्षात आले.) इतरही फॅक्टरी आउट्लेट्स होती. हेन्स चे आउट्लेट होते. थोडेफार शॉपिंग झाले. माझ्या लेकीच्या २-३ मॆत्रिणि जवळच्याच युनिव्हर्सिटीत होत्या. ती त्यांना भेटून आली. जरा आईपासून सुटका.

परत येताना वेस्ट व्हर्जिनिआत चार्ल्सटन इथे राहिलो. हे गाव छान आहे डोंगराच्या कुशीत वसलेले पण कोल माइन्स असल्याने सगळीकडे बराच धूर दिसत होता. हा रस्ता पण घाटाचा, बाजूला नदी होती. डोंगरात बर्फ होते त्यामुळे अजून छान दिसत होते. काही झाडावर बर्फाचे गोळे पडून ते कापसाच्या झाडासारखे वाटत होते. एव्हरग्रीन्स वर बर्फ पडून ती झाडॆ खूप मस्त दिसत होती. आमच्या भागात झाडांचे एकदम खराटे होतात थंडीत त्यामुळे हे वेगळे लॅंडस्केप बघायला छान वाटत होते. सगळ्या रस्त्याला ख्रिसमस डेकोरेशन केले आहे असे वाटत होते. माझ्या लेकीलाही सिन सिनरी, डोंगर एंजॉय करताना पाहून छान वाटत होते. ४-५ तास ड्राईव्ह करूनही ती फ्रेश आणि नेचर वर खूष होती. खरोखर अधून मधून अशा रोड ट्रीप्स केल्या पाहिजेत.

या गावात शिरताना आमचा जी पी एस जरा वेडा झाला. सेटींग आपोआप नो टोल रॊड वर गेले आणि आम्ही छोट्या रस्त्याने बराच प्रवास केला. थोड्याच वेळात आमच्या लक्षात गडबड आली व परत सेट केले. असे गफले अधून मधून होत होते पण आम्ही दोघी त्याने फार डिस्टर्ब झालो नाही. एक दोनदा मला जरा काळजी वाटली पण लेक निवांत होती. आजकालची तरूण पिढी बर्‍याच शांत डोक्याने, बॅलन्स्ड गाडी चालवते असे म्हणायला हरकत नाही. डायरेक्शन सेन्स चांगला असला की प्रवासात खूप कॉन्फ़िडन्स येतो हे नक्की. काही वेळा २ हायवेज बरोबर जात असले की गुगल चे एक्झिट नंबर चुकायचे पण आम्ही घरातून निघताना मॅप बघितलेला असायचा त्याचा फायदा व्हायचा. वाटेत १-२ ठिकाणी गॅस स्टेशन वर रस्ता बरोबर आहे याची खात्री करून घेतली. तिथल्या मुली एकदम हेल्पिंग नेचरच्या होत्या. ऍक्सेंट मात्र सदर्न च्या जवळ जाणारा. आपल्याकडे द्र ४० मॆलावर भाषा बदलते म्हणतात तसे इथे २-३ स्टेट नंतर ऍक्सेंट जरा बदलतो, रेस्टॉरंटस बदलतात. आम्हाला चिक फिले, क्रॅकर बॅरल रेस्टॉरंटच्या च्या खूप पाट्या लागल्या. रस्त्याने जाताना आम्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्स बघत होतो. त्या स्टेट ची महत्वाची गोष्ट नंबर प्लेट वर टाकलेली असते. अर्थात ह्या पाट्या काही वर्षांनी बदलतात.. बघायला मजा आली.अगदी कॅल्लिफोर्निया, फ्लोरिडा पासूनच्या गाड्या बघितल्या. आम्ही हिंडलो त्या स्टेटस च्या नं प्लेटस चे नमुने....
शेवट्च ट्प्पा होता सिनसिनाटी येथे. तिथे जाताना इंटर स्टेट ऎवजी हाय वे घेतला. त्यामुळे गर्दी कमी होती आणि चक्क स्पीड लिमिट चांगली होती. त्यामुळे वेळेवर पोचलो. तिथे भावाकडे मुक्काम परत गप्पा थोडे शॉपिंग करून सकाळी परत घरी यायला निघालो. शेवट्च्या दिवशी हवा अतिशयखराब होती. स्नो एव्हढा नव्हता पण विंडी खूप होते. गाडी खूप हलत होती. अधून मधून व्हाइट आउट होत होते. वेळ आली तर मधे थांबायचे असे आम्ही ठरवले होते पण तशी वेळ आली नाही.आम्ही व्यवस्थित परतलो.

२००० मॆल जाउन आलो असे काही वाटत नव्हते. ८ स्टेटचे वेलकम बॊर्ड्स बहितले. खूप नद्या क्रॉस केल्या. एकंदर आमची रोड ट्रीप स्मरणीय झाली. थोडे थ्रिल, थोडी मजा, गावाचे ऎतिहासिक महत्व, लोकांच्या गाठी भेटी आणि निसर्गाच्या सानिध्यात अशी ही ट्रीप झाली. वाटेत भरपूर पाउस लागला, स्नो झाला, विंडी हवामान होते दरडी कोसळल्या होत्या , भरपूर घाट होते पण त्याने आमचा प्रवास कुठे थांबला नाही. फार सुंदर प्रवासाची व्यवस्था करून ठेवली आहे या लोकांनी.

Saturday, December 12, 2009

ऎकावे असे काही........

ऎकावे असे काही........

या पूर्वीच्या पोस्ट मध्ये (डिजीटल युग) ’टेड’ ची एक लिंक दिली होती. नंतर वेळ झाल्यावर ती साईट परत व्हिजिट केली आणि एक खजिनाच सापडला.

आजकाल पूर्वीसारखे भाषण ऎकण्याचे प्रसंग फारसे येत नाही. आपण पुस्तके खूप वाचतो, टि व्ही बघतो पण भाषण ऎकण्याची मजा वेगळीच. टेड च्या मंचावर तुम्ही टेक्निकल, एंटरटेनमेंट व डिझाईन या तिन्ही एरियातील विचार लोकांकडून ऎकू शकता. वेगळ्या देशातील, वेगवेगळ्या विषयावरचे विचार घरबसल्या तुम्ही ऎकू शकता. ग्लोबलायझेशनमुळे माणसे आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, साहजिकच वेगवेगळ्या कल्चर चा क्लॅश होतो. इतर कल्चर्स समजून घेतल्याशिवाय आपण भारताबाहेर राहिलो तर प्रॉब्लेम्स येउ शकतात. यातील भाषणे अतिशय मुद्देसूद विचारपूर्वक मांडलेली वाटली. सर्व वयोगटातील माणसे यात बोलतात. तुम्हीपण ऎकून बघा. प्रत्येकाच्या आवडीचे त्यात नक्कीच काहीतरी मिळेल.

शशी थरूर, पट्नाईक यांची लिक जरूर पहा.

Sunday, November 29, 2009

डिजीटल युग....

डिजीटल युग....

आपण सध्या डिजीटल क्रांती मध्ये आहोत. रोज नवीन डिझाईन्स निघत आहेत. फोन आले, मोबाइल आले त्यात कॅमेरे आले. गाणी ऎकता येतात. खूप गोष्टी साठवता येतात. खाली दिलेली लिंक एका मित्राने पाठवली आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. अगदी कमी गोष्टी वापरून या मुलाने काय काय साधले आहे...ग्रेट...आणि मुख्य म्हणजे भारतात जाउन त्याचा चांगला उपयोग करायचा त्याचा मानस आहे.

Got this from one of our friend.

Please chk this link. Its really cool.

Monday, November 23, 2009

गेल्या आठ्वड्यातील कोड्याचे उत्तर...

सूर ताल
गेल्या आठ्वड्यातील कोड्याचे उत्तर...
उभे शब्द
१. या रागाची सुरूवात माळवा प्रांतात झाली असे म्हणतात. (४)..... मालकंस
२. साथीच्या सर्व वाद्यात हे वाद्य खूपसे आपल्या आवाजाच्या जवळ वाजते.(३).. सारंगी
३. हा स्वर प्रत्येक रागात असतोच (१)... सा
५. तबल्याचा १० मात्रांचा ताल (४)..झपताल
७. एक राग किंवा मातीचा प्रकार (४)...मुलतानी
८. गाणे शिकताना बहुतेक वेळेला सुरूवातीला हा राग शिकवतात (२)..भूप
९. एक ’सुगंधित’ राग .(३)...मारवा
११. कल्याण थाटाचा एक राग(३)...यमन
१३. हे वाद्य अक्रोड किंवा मेपल च्या लाकडापसून बनवतात (३)..संतूर
१४ तीन वेळा तालाचे सायकल पूर्ण करून समेवर येणे(३).... तिहाई

आडवे शब्द
४. या वाद्यात चक्क पाणी वापरले जाते(५)....जलतरंग
६. या तालाच्या मात्रा विषम आहेत(३)....रूपक
१० ही संभाळणे हे तबलजीचे मोठे काम असते(२)..लय
१२ कर्नाटक शास्त्रीय संगीतात हिचे महत्व कमीच(२)... तान
१३ गाण्याच्या साथीला ही हवीच(४)....संवादिनी
१४ तबल्याचा एक बोल(२)...तिन
१५ मॆफिलीचा शेवट बहुतेक वेळेला या रागाने होतो.(३)...भॆरवी
१६ अंतर्‍याच्या आधी ही येते(३)..अस्थाई

Thursday, November 19, 2009

सूर ताल

सूर ताल

गेली २-३ वर्षे म्युझिक सोसायटी मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहे. २५ हून जास्त कलाकारांचे कार्यक्रम बघितले. बर्‍याच मोठ्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या वाद्ये ऎकली. आपोआपच थोड्या गोष्टी शिकले. त्यांनाच एका कोड्यात गुंफलय. बघा सुटतय का? उत्तर पुढील आठवड्यात....
उभे शब्द
१. या रागाची सुरूवात माळवा प्रांतात झाली असे म्हणतात. (४)
२. साथीच्या सर्व वाद्यात हे वाद्य खूपसे आपल्या आवाजाच्या जवळ वाजते.(३)
३. हा स्वर प्रत्येक रागात असतोच (१)
५. तबल्याचा १० मात्रांचा ताल (४)
७. एक राग किंवा मातीचा प्रकार (४)
८. गाणे शिकताना बहुतेक वेळेला सुरूवातीला हा राग शिकवतात (२)
९. एक ’सुगंधित’ राग .(३)
११. कल्याण थाटाचा एक राग(३)
१३. हे वाद्य अक्रोड किंवा मेपल च्या लाकडापसून बनवतात (३)
१४ तीन वेळा तालाचे सायकल पूर्ण करून समेवर येणे(३)

आडवे शब्द
४. या वाद्यात चक्क पाणी वापरले जाते(५)
६. या तालाच्या मात्रा विषम आहेत(३)
१० ही संभाळणे हे तबलजीचे मोठे काम असते(२)
१२ कर्नाटक शास्त्रीय संगीतात हिचे महत्व कमीच(२)
१३ गाण्याच्या साथीला ही हवीच(४)
१४ तबल्याचा एक बोल(२)
१५ मॆफिलीचा शेवट बहुतेक वेळेला या रागाने होतो.(३)
१६ अंतर्‍याच्या आधी ही येते(३)

Monday, November 16, 2009

आमचा तिकीट प्रपंच...

आमचा तिकीट प्रपंच...

अमेरिकेत आल्यावर मराठी मंडळ, इंडिअन असोसिएशन किंवा काही म्युझिक इंटरेस्ट ग्रुप्स इथे आपण एकदा तरी डोकावतोच. हे आपल्या सगळ्याना जवळचे वाटते. अर्थात त्यापासून दूर रहाणारे पण बरेच. आमचा त्यात बर्‍यापॆकी सहभाग असतो. कधी नाटकाच्या निमित्ताने, कधी गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर कधी नुसतेच प्रेक्षक म्हणून. माझा सह्भाग पडद्यामागे असतो. आता कार्यक्रम म्हटला की वर्गणी, हॉल बुकिंग, जेवण, कार्यक्रम ही कामे वेगळ्या वेगळ्या कमिटीत विभागली जातात आणि व्यवस्थित पारही पडतात. या सगळ्यात अजून एक काम असते म्हणजे तिकीट विक्री. आम्ही गेली काही वर्षे दर कार्यक्रमाची तिकीटे तयार करत असू. आता तुम्ही म्हणाल तिकीटे काय - इंटरनेट वर ऑर्डर दिली की रेडिमेड तिकीटे मिळतात किंवा डॉलर शॉप मध्ये टोकन्सचा रोल मिळतो पण नाही.....

साधारण कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार तिकिटाचे डिझाईन ठरवले जाई. इथे दर वर्षी ३ अंकी नाटक सादर होते. नाटकाच्या विषयानुसार चित्र निवडून आम्ही तिकिटावर वापरत असू. गणपति व संक्रांत यातल्या कार्यक्रमानुसार तिकीटाचे डिझाईन ठरवत असू. सुरूवातीला मराठी फॉन्ट चा प्रॉब्लेम होता. सॉफ्ट्वेअर वापरून त्याची जेपीजी फाईल तयार करून मग ती वापरावी लागे. तिकिटाचा साईज तसा लहान त्यामुळे त्यात सगळे बसवणे हि एक कसरत असे. सर्व डिझाईन तयार झाल्यावर जर त्यात बदल सुचवला तर परत बरेच मागे जाउन बदल करावा लागे. आता युनिकोड मुळे हे काम बरेच सोपे झाले आहे. म्युझिक प्रोग्रॅम्स साठी पण अशीच तिकीटे बनवली आहेत.

१. कार्यक्रमाच्या थीम प्रमाणे डिझाईन व मजकूर ठरवणे
२. मजकूर व डिझाईन छोट्या साइजमध्ये बसवणे (शक्यतो वॅलेट मध्ये तिकीट बसावे). वर्ड, पेंट ब्रश याचा वापर करून शेवटी जेपीजी फाइल बनवणे. डिझाईन फायनल झाल्यावर कनेक्ट करून एक पिक्चर बनवणे.
३. तिकीट नंबर सगळे घालत बसायला नको म्हणून एक एक्सेल शीट तयार करणे. त्यात फ़ॉर्म्युला घालणे. ऑटो नंबर जनरेटर वापरून तिकिट नंबर घालणे सोपे पडते. एका पानावर साधारण १० तिकिटे तयार होतात. याचा फायदा म्हणजे हवी तेवढीच तिकीटे छापता येतात.
४. प्रिंटींग
५. घरीच डॉटेड लाइन करून (परफ़ोरेशन्स) बुकलेट तयार करणे. विथ कव्हर

आता तुम्ही म्हणाल कशाला एवढी कटकट करायची? पण ही ज्याची त्याची हॊस असते. आपल्याला हवा तो लोगो त्यात घालता येतो. आणि हवे ते डिझाईन घालता येते. अर्थात या गोष्टी अगदीच कमी लोकांच्या लक्षात येतात पण....

काही नमुने देत आहे. करून बघा एखादा प्रयोग.........


Tuesday, November 10, 2009

खरेच गरज आहे का?

खरेच गरज आहे का?

आजकाल सेवाभावी संस्था बर्‍याच वेळेला काही ना काही कारणाने पॆसे जमवत असतात. कधी नॅचरल कलॅमिटीज तर कधी शाळेला मदत तर कधी निराधार मुलांना मदत. आता हे पॆसे जमवताना खूप वेळा लोकांना नाही म्हटले तरी प्रेशर येते. बरे ही मदत प्रत्यक्ष हवी तिथे जाते का नाही हे बर्‍याच वेळेला समजत नाही. विश्वासावर सगळे चालू असते. काही सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने हे काम चालू असते. आता आपण शक्य असेल तर दुसर्‍याला मदत करावी हे सगळ्यांनाच वाटते पण ती आपल्याला हवी तिथे करण्याची सोय हवी. सोशल प्रेशर खाली करायला लागू नये. प्रत्येकाने हवे तिथे जाउन मदत केली की करणार्‍यालाही बरे वाटते.

अमेरिकेतून अशी मदत करणार्‍या कॆक संस्था आहेत. बरे भारतातील लोकांशी बोलताना नेहेमी अमेरिका विरोधी सूर जास्त दिसतो. असे असले तरी मदतीची अपेक्षा असतेच. तुमच्याकडे लोकसंख्या कमी म्हणून सगळे शक्य असा एक सूर असतो आणि हे करायलाच पाहिजे असेही बर्‍याच लोकांचे म्हणणे असते. जेव्हा नॅचरल कलॅमिटीज येतात तेव्हा शक्य तेवढी मदत केली पाहिजे पण आता भारतात शाळा, निराधार मुले यांना मदतीची खरंच गरज आहे का? सध्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवण्याची क्षमता मला वाटते आता देशाकडे नक्की आहे.

शहरांपासून जरा दूर गेले की हे प्रॉब्लेम्स दिसतात. शाळा, दवाखाने यांच्या अपुर्‍या सोई...अगदी पुण्याच्या जरा बाहेर गेले की हे चित्र दिसते. आता वेगवेगळे बिजिनेसेस, काही मोठी देवळे , आणि काही ट्रस्टस यांच्याकडे एवढा पॆसा आहे कि तो नक्कीच पुरा पडेल. कमी आहे ती फक्त नियोजनाची. आता नवीन सरकार, नवीन विचाराची माणसे आली आहेत ती हे काम पुढे नेउ शकतील आणि जास्तीत जास्त लोकांच्या मूलभूत गरजा भागवतील असे वाटते. देशाबाहेर राहिले की हे नेहेमी जाणवते अरे आपल्या देशात जर एवढी लोकसंख्या आहे तर तिचा उपयोग करून घ्यायला हवा. बाकी प्रगती होत आहे तर या गोष्टीकडे पण सरकार ने लक्ष दिले पाहिजे. आपल्या कडे पॆसा आहे, धान्य आहे, स्किल आहे. या गोष्टी फक्त व्यवस्थित पणे सगळ्या लोकांपर्यंत पोचायला हव्यात.

Thursday, November 5, 2009

आउट इन द ओपन......

अमेरिकेत आल्यावर इथले रहाणे, खाणे याची सवय व्हायला फार वेळ लागला नाही. मुलीची शाळा पण चांगली होती. सॊदी अरेबिया सारख्या ठिकाणाहून येउनही ती पटकन रूळली.( दोन्ही कल्चर मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे) मित्र मंडळ, फिरणे, वगॆरे व्यवस्थित चालले होते. एकंदर इथला फ्रीडम बघून छान वाटत होते.

अशात एकदा शाळेत बॉंब ठेवल्याची बातमी आली. शाळेला अशा गोष्टींची सवय असावॊ पण आम्ही फुल टेन्शन मध्ये. त्यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळली व एका मुलाला पकडले. नंतर शाळॆमध्ये एखाद्या मुलाने गोळीबार करणे, एखाद्या ऑफिसमध्ये लोकांना ऒलिस ठेवणे अशा बर्‍याच बातम्या वाचनात येत असत. आणि शेवटी एक ऒळ असे... मारेकर्‍याने स्वतःला मारून घेतले. दोन मॊठ्या युनिव्हर्सिटीत हा प्रकार घडला आणि नाहक अनेक निरपराध मुलांचा जीव गेला. इथल्या लोकल मुलांबरोबर अगदी बाहेर देशातून इथे शिकायला आलेली अनेक मुले यात बळी गेली. इथे बंदूक मिळवणे हा फार अवघड प्रकार नसल्याने अशी मुले हे प्रकार करू शकतात.
बरे त्यातून त्याना काही मिळते असेही नाही कारण शेवटी ती स्वतःला पण गोळी घालून घेतात. अर्थात त्यांची मानसिक अवस्था त्याला कारणीभूत असते बर्‍याच वेळेला.

इथल्या शाळेमध्ये मुलांची संपूर्ण माहिती ठेवलेली असते. अगदी लहानपणापासून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चेकिंग होते. स्किल्स डेव्हलप मेंट, स्पीच डेव्हलपमेंट वगॆरे आणि ठराविक लेव्हल च्या खाली असलेल्या मुलांसाठी वेगळ्या शाळॆची सोय असते याला स्पेशल एड स्कूल्स असे म्हणतात. भारतात मतिमंद, गतिमंद यांच्या शाळा पाहिल्या होत्या. ब्लाइंड स्कूल्स, अपंग मुलांसाठी शाळाही बहितल्या. इथे ज्या मुलांना नेहेमीच्या सूचना समजत नाहीत त्यांना अशा स्पेशल एड शाळेत घालतात. त्यात ऑटिस्टिक मुले असतात, काही बायपोलर असतात ज्यांना मूड स्विंग्ज खूप असतात तर काही स्लो लर्नर असतात. लहान पणी हा फरक तसा खूप धूसर असते. बरीच मुले मेडिसिन वर असतात. ही मुले कधीतरी खूप चिडतात आणि कंट्रोल जातो. त्यांना साभाळण्याचे ट्रेनिंग शिक्षकांना दिलेले असते. ह्या शाळांसाठी सरकार कडून मदत ही होते. त्यांना शक्य तितके नॉर्मल मुलांसारखे ठेवायचा प्रयत्न करतात.

हे सगळे ठराविक वयापर्यंत चालते. त्यानंतर ही मुले स्वतंत्र असतात. ज्यांच्या मागे कुणी काळजी करायला असेल त्यांची काळजी घेतली जाते,, बाकीची मात्र स्वतंत्र रहात असतात. कधी त्यांचे मानसिक संतुलन ढळले की ती चिडतात आणि अशा बातम्या वाचायला मिळतात. अर्थात प्रत्येक घटनेमागे अशीच मुले असतात असे नाही. हे सगळे प्रकार कशाने होतात यावर संशोधन चालू आहे. घटस्फॊट, दारू अशी बरीच कारणे असू शकतात या मेंदूतल्या गडबडीला. नक्की काहीच सांगता येत नाही. भारतात पण अशा प्रकारची मुले असत्तातच ती पण असे काही प्रकार करत असतातच. खून, मारामर्‍या यांच्या बर्‍याच बातम्या येतात. हे सगळे पाहून मला मात्र काही दिवस प्रत्येक मुलाकडे पाहिले की वाटायचे, हा काही मेडिसिन वर तर नसेल, बाय पोलर तर नसेल कारण दिसायला इतर मुलांसारखीच दिसतात. आता हळूहळू सवय झाली आणि आपण काही करू शकत नाही हेही लक्षात आले.

डॉक्टर लोकांना यामागची कारणे शोधण्यात लवकर यश यावे एवढेच आपण म्हणू शकतो.

Monday, November 2, 2009

जादू तुमच्या छोट्यांसाठी.....

लहानपणी आपण खूप वेळा ही जादू केली असेल. परवा कुणालातरी दाखवली आणि तुमच्याशीही शेअर करावीशी वाटली. जी मुले नुकतीच स्पेलिंग शिकली असतील त्यांना शिकवा...खूष होतील.

पत्त्याच्या कॅट मधील एका रंगाची १३ पाने वेगळी काढून खाली दिलेल्या क्रमाने लावा. मग ऒळीने स्पेलिंग प्रमाणे एकाखाली एक पाने घालून १-२-३.....१०-गुलाम,राणी,राजा पर्यंत जा.

3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5

one
two
three
four
five
six
seven
eight
nine
ten
jack
queen
king

वरीलप्रमाणे पाने लावून ढिग हातात धरावा. नंतर ओ एन इ अशी ३ पाने खाली घालावीत व एक्का जमीनीवर ठेवावा. अशा तर्‍हेने सगळी पाने लावावीत.

Saturday, October 24, 2009

मरण इतके सुंदर असू शकते........आजकाल अमेरिकेत सगळीकडे फ़ॉल कलर्स दिसत आहेत. आपण सगळेच नेहेमी ही रंगांची उधळण बघतो. एका लेखकाने हे सुंदर रंग बघून म्ह्टले आहे "मरणही इतके सुंदर असू शकते". हे वाचल्यापासून दर फॉल सिझनला मला हे त्यांचे वाक्य आठवते. किती नेमके वर्णन त्यांनी केले आहे.

अमेरिकेत आल्यापासून गेली ८-१० वर्षे मी हे झाडांनी केलेली रंगांची उधळण बघत असते. दर वर्षी तीच झाडे, पण वेगळी वाटतात. अस्पेन, बीच, मेपल, बर्च, गम ट्रीज. ऒक ही त्यातली काही झाडे ऒळखीची झाली आहेत. बर्निंग बुश ही खूप छान दिसतात एकदम लाल भडक. नेहेमी हिरव्या रंगांची कुठलीतरी छटा दाखवणारी ही झाडे आत्ता मात्र कधी पूर्ण पिवळे , कधी एकाच झाडावर हिरवी पिवळी व केशरी पाने, कधी पूर्ण झाड केशरी अशी वेगवेगळी दिसतात. एव्हरग्रीन सारखी झाडे मात्र हटवादीपणाने आपला हिरवा रंग सोडायला तयार नसतात ऑक्टोबर दुसर्‍या आठवड्यापासून हे रंग दिसायला लागतात. साधारण २ आठवडे ही रंगांची उधळण आपल्याला दिसते. हे दिवस थोडेफार इकडे तिकडेही होतात. त्यानंतर या झाडांचे एकदम खराटे होतात आणि थंडी आली असे जाणवायला लागते.
स्प्रिंग मध्ये झाडांना पालवी आल्यापासून ते उन्हाळा संपेपर्यंत या झाडांची पाने हिरवीगार असतात. तेव्हा पानांचे क्लोरोफिल, सूर्यप्रकाश व पाणी यांच्या सहाय्याने जोमाने अन्न बनविण्याचे काम चालू असते. या वेळेस सुद्धा पानात इतर रंग असतात पण ते क्लोरोफिल च्या मुळे लक्षात येत नाहीत. हिरवा रंग प्रॉमिनंट असतो. उन्हाळा संपला की दिवसाची लांबी कमी होते, सूर्यप्रकाश कमी होतो व हळूहळू फोटो सिंथेसिस पण कमी होते. मग हिरवा रंग मागे पडतो व इतर रंग डोकावतात व शेवटी आपले अस्तित्व दाखवतात. गाजर, केळी, बीट यांचे रंग जसे काही रंगद्रव्यांमुळे बनतात तसेच हे. हे रंग कधी कमी तर कधी जास्त दिसतात. २ आठवड्यात सगळी पाने गळून जातात. मला नेहेमी वाटते हा रंगांचा सिझन चांगला १-२ महिने चालावा. पाउस, उन्हाचे प्रमाण या दोन्हींचा रंगांवर परिणाम होतो. या खाली पडलेल्या पानंचे चांगले खत तयार होते.

इथले टूरिझम डिपार्ट्मेंट या रंगपंचमीचा फायदा घेतल्याशिवाय कसे रहाणार? नॉर्थ ला आधी फॉल येतो. ठिकठिकाणच्या फॉल कलर्स च्या जाहिराती येतात व टूर्स निघतात. कलर्स किती आले आहेत याचे अपडेट इंटरनेट वर उपलब्ध असतात. स्टेट पार्क्स, नॅशनल पार्क्स व काही सिनिक रूटस खरोखर सुंदर आहेत.

स्मोकी माउंटन एरिया मस्त दिसतो या दिवसात. डोंगरावर तिथे भरपूर झाडी आहे. त्यात वेगवेगळ्या रंगांचे
मिश्रण मस्त दिसते. मेन मध्ये अकेडिया नॅशनल पार्क पण या सिझनसाठी प्रसिद्ध आहे.

काही पार्क मध्ये अगदी स्लो स्पीड चा एखादा रोड बनवतात ज्यात दोन्ही बाजूला कलर फुल झाडे असतात. पिवळ्या रंगाचा प्रकाश पडला आहे असे वाटते. मंडळी आपली फोटोग्राफीची हॊस भागवून घेतात. अर्थात फोटॊ काही प्रत्यक्ष दृष्याला न्याय देउ शकत नाहीत. लेकच्या बाजूला प्रतिबिंबामुळे मस्त व्ह्यू दिसतो. आम्ही बर्‍याच ठिकाणी जातो कलर्स बघायला. घराच्या आसपास पण खूप छान रंग दिसतात.

भारतात हिमाचल प्रदेशात थोडेफार रंग दिसतात. बाकी पानगळ म्हणजे पाने वाळतात आणि पडतात कारण आपल्याकडे तापमानात खूप फरक नसतो. यु के मध्ये पिवळा रंग जास्त दिसतो. आजकाल हिंदी सिनेमात बर्‍याच वेळा फॉल कलर ची बॅकग्राउंड वापरतात. त्यामुळे बर्‍याच लोकांना ते माहित झाले आहेत. इथली काही छोटी मुले या पानांमध्ये मनसोक्त खेळताना दिसतात. काही मंडळी पाने वाळवून वॉल हॅंगिंग बनवतात.

अशा या ’जाता जाता’ आपल्याला ’रंगांचा नजराणा’ देणार्‍या झाडांचे मनापासून धन्यवाद.

Wednesday, October 21, 2009

गुगल इट

गुगल हे सर्च इंजिन आपल्या समोर जन्मले आणि बघता बघता इतके मोठे, महत्वाचे झाले कि ’गुगल इट’ हे क्रियापद डिक्शनरी मध्ये समाविष्ट झाले. असे आहे काय या गुगलमध्ये कि त्याने मायक्रोसॉफ्ट ला पण मागे टाकले. तुम्ही, आम्ही सगळे आता इंटर नेट वर सतत वापरत असतो. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण पटकन ती गुगल वर सर्च करतो आणि गंमत म्हणजे पहिल्या ४-५ लिंक्स मध्येच आपल्याला हवी ती माहिती मिळते. इतरही सर्च इंजिन्स आहेत पण यावर पटकन माहिती मिळते. मला वाटते ही ’पटकन माहिती मिळणे’ यामुळे गुगल प्रसिद्ध झाले आहे.

स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीत पी एच डी करणारे दोन स्टुडंटस. त्यांचा रिसर्च होता डिजिटल लायब्ररी वरती. तो करता करता त्यांनी इंटर नेट वरच्य़ा लिंक चा किंवा बॅक लिंक चा अभ्यास केला आणि तो करता करता त्यांच्या डोक्यात या सर्च इंजिन ची आयडिया आली. इंटरनेट वर भरपूर माहिती साठवलेली असते. त्यातून ’हवी ती’ आणि”हवी तेवढीच’ पुरवण्याचे काम हे सर्च इंजिन करते. आधीची सर्च इंजिन्स त्या शब्दाच्या ऑकरन्सेस ला महत्व देत असे ( किती वेळा तो शब्द आला). या मुलांनी मात्र लिंकच्या महत्वानुसार त्यांना क्रमवारी दिली आणि लोकांना लिंक्स पुरवल्या. (एखाद्या शब्दाला कुठल्या व किती लिंक्स जोडलेल्या आहेत) शिवाय सिमिलर पेजेस पण द्यायला सुरूवात केली. ही व अशी मुले खरी आजकालची आयडॉल्स.

आता तुमच्या रोजच्या जीवनातील कोणताही प्रश्न असो, त्याची माहिती गुगल तुम्हाला लगेच पुरवते. रिझर्वेशन, पर्यटन, ऒषधे, आजाराबद्द्ल माहिती, पुस्तके, गाण्यांच्या साइटस, सिनेमा, शेतीबद्दल, खगोलशास्त्र, सायन्स, कुठलाही विषय घ्या ...................सगळे एका क्लिक वर तुम्हाला मिळते.

पुर्वॊ एखाद्या गोष्टीला खूप वेगवेगळे ऑपशन्स आले की मला वाटायचे कशाला एवढे लोक एकच गोष्ट करण्यात वेळ घालवतात. पण त्यामुळे कॉंपिटीशन वाढते आणि ग्राहकांचा फायदा होतो. आता मायक्रोसॉफ्ट चे सर्च इंजिन असताना कशाला गुगल हवे ..पण त्यामुळे आपला फायदा झाला आहे. याहू मेल पेक्षा जी मेल नी वेगळे फ़िचर्स आणले लगेच याहू मेल मध्ये बदल झाला आणि त्यांची सर्व्हिस सुधारली. गुगल अर्थ, गुगल मॅप्स ही सॉफ्ट्वेअर्स तर तुम्हाला ठिकठिकाणी फिरवून आणतात आणि प्लानिंगला मदत करत्तात. गुगल मॅप्स तर फारच अफलातून प्रकार आहे. तुम्हाला जिथे जायचे ते सगळे आधीच तुम्ही व्हरट्यूअली बघू शकता.

एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता ठरवायला आजकाल त्या व्यक्तिच्या गुगल हिटस बघितल्या जातात. अजून काय पाहिजे?

गुगल त्याच्या लोगो मध्ये अधून मधून वेगळी डिझाइन्स प्रेझेंट करते जसे २ ऑक्टोबरला गांधींचे चित्र....महत्वाची व्यक्ति किंवा दिवस हे त्या लोगोत दाखवले जाते. अशा लोगोज साठी ही साईट पहा

तेव्हा आता म्हणायला हरकत नाही जय हो गुगल..

Monday, October 12, 2009

आमची शुभेच्छापत्रे....

दिवाळी २००९ साठी आपणा सर्वांना शुभेच्छा.

चित्रावर क्लिक केल्यास मोठे दिसेल.

आपल्याकडे दर सणाला शुभेच्छा पत्रे पाठवायची पद्धत आता रूळली आहे. विशेषतः नेट वरून आपल्या मित्र मॆत्रिणिंना शुभेच्छा देण्याचे काम खूप सोपे झाले आहे. बरे नुसत्या शुभेच्छा देण्याऎवजी त्याबरोबर छान चित्रे, ऍनिमेशन व बरोबर एखादी ध्वनिफित असे रेडिमेड पॅकेज अनेक साइटस वर उपलब्ध झाले आहे. विनामूल्य तयार ग्रीटींग कार्डस देणार्‍या अनेक साइटस उपलब्ध आहेत.

आम्ही गेली काही वर्षे नियमाने दर सणाला आपले शुभेच्छापत्र तयार करत आहोत. मजा येते. अमेरिकेत राहताना कधी इथल्या गोष्टी आपल्या सणांबरोबर जोडतो तर कधी नुकत्याच केलेल्या ट्रीपचे फोटॊ वापरतो. आपलेच फोटो व आपल्याच चार ऒळी. पूर्वी युनिकोड नसताना जरा जास्त कसरत करावी लागे. वर्ड, पेंट ब्रश व ड्रॉईंग ची टूल्स वापरायची चांगली सवय झाली. एवढे करून बरीच मंडळी ग्रीटींग्ज बघतही नाहीत..इतक्य़ा लोकांची ग्रीटींग्ज असतात सगळे कुठे डाउनलोड करून वाचणार पण आता बर्‍याच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येउ लागल्या आहेत. आता मुद्दाम वाचतात. त्या सगळ्यांचे धन्यवाद.

गेल्या २-३ वर्षातील शुभेच्छापत्रे पुढील लिंक वर दिसतील.
गेल्या काही वर्षातील शुभेच्छापत्रे

Wednesday, October 7, 2009

गुरू-शिष्य परंपरा.कॉम -

आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेला फार महत्व आहे. एखादी कला, विद्या शिकायची असल्यास गुरू लागतोच. गुरूविण कोण दाखविल वाट? असे म्हटलेच आहे. नुसती पुस्तके वाचून किंवा कुणाचे पाहून विद्या मिळवता येत नाही. नाहीतर सगळ्या शॆक्षणिक संस्था बंद पडल्या असत्या. एकलव्य असतो पण एखादाच.

या सगळ्यावर एक चांगला उपाय आता इंटरनेट ने दिला आहे. पाश्चात्य देशात बर्‍याच कॉलेजेस मध्ये अभ्यासाच्या नोटस इंटर नेट वर फार पूर्वीपासून उपलब्ध आहेत. परिक्षा सुद्धा ऒनलाइन देण्याची सोय असते. घरी बसून, नोकरी सांभाळून तुम्ही अभ्यास करू शकता. ड्रायव्हिंग चे कष्ट, त्रास व ताण वाचतो. पेट्रोल बचत होते ती वेगळीच.

काही दिवसापूर्वी पुण्यातल्या पेपर मध्ये या डिस्टन्स लर्निंग बद्दल माहिती आली होती. अगदी खेड्यातल्या मुलांना या गोष्टीचा फायदा होइल हे दाखवून दिले होते. अशा शिक्षणासाठी बर्‍याच माहितीपूर्ण साइट्स ही लोकांनी बनवल्या आहेत. या डिस्ट्न्स लर्निंग साठी एक कॉम्प्युटर, इंटरनेट व वेब कॅम ची गरज आहे. वीज पुरवठा चांगला असणे आवश्यक आहे.

आता ग्लोबलायझेशनमुळे मंडळी जगभर पसरली आहेत. बाहेर देशात तिथल्या कला (आणि बरेच काही) शिकता येतात पण शेवटी जेव्हा आपल्या कडील (इंडिअन) एखादी गोष्ट शिकायची म्हटले की प्रश्न पडतो. साधारण मोठ्या शहरात गाणे, नृत्य व वादन याचे क्लास असतात पण बर्‍याच वेळा राहते घर व क्लासची जागा लांब असते. ड्रायव्हिंग मध्ये फार वेळ जातो. आता ब्लूमिंग्टन सारखे छोटे गाव असले तर हा प्रश्न फारसा येत नाही. बर्‍याच घरात आई व वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे घर, नोकरी व शाळेचा अभ्यास संभाळून मुलांचे क्लासेस संभाळणे फार अवघड जाते. वीक एण्ड त्यात जातो.

आजकाल इंटरनेट चा वापर करून गाणे, पेटी/कुठलेही वाद्य व नृत्य शिकता येते. तुम्हाला त्या त्या विषयातले नामवंत मार्गदर्शक मिळतात. आणि वन ऑन वन ट्रेनिंग मिळते. अजून काय पाहिजे? आता यात थोडे ड्रॉबॅक्स येतात पण ते हळूहळू कमी होत आहेत. गाणे शिकणे सोपे आहे कारण त्यात मेनली आवाज ऎकू येणे महत्वाचे असते. समोरची व्यक्ती दिसली नाही तरी चालते त्यामुळे वेब कॅम हा एक फॅक्टर कमी होतो. थोडासा लॅग येउ शकतो पण त्याची सवय होते. भारतात बर्‍याच वेळा वीज जाणे, नेट मध्ये व्यत्यय हे प्रॉब्लेम्स येउ शकतात पण ते हळूह्ळू कमी होत आहेत. इंटरनेट स्पीड कधी मॅच होत नाही. हे सगळे अधून मधून उदभवणारे प्रश्न असतात. शिकणारा व शिकवणारा यांच्या मध्ये ते अडथळा ठरू शकत नाहीत कारण त्यांना मनापासून शिकायचे असते.

या सगळ्या गोष्टी शिकतान अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे वेळेचे गणित. भारत व अमेरिका, मिडल इस्ट, जपान, ऑस्ट्रेलिया या सगळ्या ठिकाणच्या वेळा व टाइम झोन लक्षात घ्यावे लागतात. एका ठिकाणी सकाळ तर दुसरीकडे संध्याकाळ तर तिसरीकडे अजून वेगळी वेळ. या वेळेनुसार क्लासची वेळ ठरवावी लागते. आमच्या घरात माझी मुलगी व नवरा दोघेजण या सोईचा उपयोग करून आपापले छंद जोपासत आहेत.

काही दिवसांनी एअरपोर्ट वर जशी वेगवेगळी घड्याळे लावलेली असतात तशी भारतातल्या क्लासमध्ये लावावी लागतील आणि एकाच ठिकाणाहून जगभरातली लोक आपल्याला हवी ती कला भारतातल्या गुरूंकडून शिकू शकतील. हा दिवस फार दूर नाही. यालाच गुरू-शिष्य-परंपरा डॉट कॉम म्हणायला हरकत नाही असे वाटते.

Saturday, October 3, 2009

अलास्का - भाग ३

द लास्ट फ़्रंटिअर-
ग्लेशिअर बे नॅशनल पार्क, केचिकन व व्हिक्टोरिआ

ग्लेशिअर बे नॅशनल पार्क हे या क्रूज मधले सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग टिकाण होते. या पार्क मध्ये १६ टायडल वॉटर ग्लेशिअर्स आहेत. ती सगळी इथल्या बे ला मिळतात. इथे जाणार्‍या क्रूज बोटींचा व छोट्या बोटींचा कोटा ठरलेला आहे. आतले प्राणी, मासे, पक्षी यांची विषेश काळजी घेतली जाते. वेगळ्या लांबीची व रूंदीची ही ग्लेशिअर्स आहेत. या भागात स्नो भरपूर पडतो. तो एकावर एक साठत जातो व ग्लेशिअर्स तयार होतात. ग्रॅव्हिटी, डोंगराचा उतार व आतले पाण्याचे प्रमाण यामुळे ही ग्लेशिअर्स पुढे सरकतात. अर्थात समोरून बघताना ती पुढे येताना दिसत नाहित कारण त्याचा स्पीड तसा कमी असतो. मी एवढी ग्लेशिअर्स या ट्रीप मध्ये पाहिली तरी अजून ती पुढे सरकतात असे खरे वाटत नाही.

या ग्लेशिअर बे च्या सुरूवातीला रेंजर चे ऑफिस आहे. २५०-३०० वर्षापूर्वी या बे च्या सुरूवातीपर्य़ंत म्हणे बर्फाची भिंत होती(फार जुनी गोष्ट नाही) ग्लेशिअर्स च्या रिट्रीव्हल मुळे ती मागे सरकत आता ६०-६५ मॆल मागे गेली आहे. सकाळी ६ वाजता छोट्या बोटीतून रेंजर्स क्रूज शिप वर आले. दोन्ही बोटींचा स्पीड साधारण १० नॉटस होता. चालू बोटीत शिडी टाकून ते चढले. इंटरेस्टींग!! सकाळी लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आणि माहिती पण सांगितली. नंतर पी ए सिस्टीम वरून आवश्यक ती कॉमेंटरीही दिली. तिथे पोचेपर्यंत दोन्हीकडे धबधबे, स्नो कॅप वाले डोंगर आणि खाली उतरलेले ढग साथीला होतेच.

मार्जारी ग्लेशिअर समोर बोट बराच वेळ थांबवली. आमची केबिन मिडशिप वर असल्याने अगदी समोर होती. (बाल्कनीचे पॆसे वसूल) ग्लेशिअरच्या बर्‍याच जवळ बोट उभी केली होती. खूप फोटो झाले. हे ग्लेशिअर २५०फूट उंच आहे(पाण्यावर) असे वाटत नव्हते. इथे उंचीचा अंदाज येत नाही. सुंदर निळ्या रंगाची झाक या ग्लेशिअर ला आहे. अधून मधून भेगा दिसतात. बरेच सुळके दिसतात पाठीमागे एवढी मोठी हिमनदी आहे हे खरे वाटत नाही. पण एकदा कल्पना आली की अरे बापरे! असे होते. माझी कन्या रास असल्याने माझ्या मनात आलेला एक विचार मी लगेच नवर्‍याच्या पुढे मांडला की हे सगळॆ एकदम पुढे सरकायला लागले तर? त्याने नेहेमीप्रमाणे हसून घालवले पण नंतर दुपारी मला रेंजर प्रेझेंटेशन मध्ये त्याचे उत्तर मिळाले. ग्लेशिअर कडे बघत असताना मध्येच एकदा एक बर्फाचा कडा ढासळला व पाण्यात पडला. याला काव्हिंग म्हणतात. त्यामुळे बहुतेक सगळी ग्लेशिअर्स रिट्रीट होतात. आजुबाजूला डोंगर असल्याने इथे तो आवाज खूप घुमतो. हे पुढचे कडे केव्हा पडतील हे नकी नसते. कधी खूप वेळ काहीच दिसत नाही. आम्ही तिथे असेपर्यंत २-३ वेळा तरी हे दृष्य पाहिले. बरोबर वहात आलेली माती दगड, झाडे, एखादा प्राणी सगळे पाण्यात पडते. (कॉम्प्रेस्ड मॊड मध्ये असते हे सगळे) हा बर्फ खाली पडल्यावर बरेच लांबवर पाणी येते त्यामुळे बोट अगदी जवळ नेत नाहीत. खाली पडलेले बर्फाचे तुकडे वर उडतात. हे बाहेर पडलेले पाणी मळके दिसते. आम्ही केबिन मधूनच पहाणे सुरूवातीला पसंत केले कारण खूप गार होते. अधून मधून चहा, चकली, वडी असे चालू होते. गरम चहा मस्ट होता. अर्ध्या तासाने बोट पूर्ण ३६० डिग्रीमध्ये वळवली. त्यामुळे दुसर्‍या बाजूचा व्ह्यू दिसला.

याच्या शेजारीच ग्रॅंड पॅसिफिक ग्लेशिअर होते ते इतके काळे दिसत होते कि ते ग्लेशिअर आहे हे खरेच वाटत नव्हते याला कारण म्हणजे वाटेतले खडक, त्याचा चुरा इतका मिक्स झाला आहे की ते एकदम मळकट दिसते. हे ग्लेशिअर कॅनडा व अमेरिका अशा दोन्ही देशांमधून जाते.

नंतर आम्ही बोटीच्या वर गेलो ( एकदम टॉप डेक). थोडासा पाउस येउन गेला होता. हवा एकदम स्वच्छ होती. वर गेल्यावर एकदम पूर्ण ३६० डिग्रीज व्ह्यू दिसतो त्यामुळे या गोष्टी भव्य दिसतात. परत फोटोग्राफी. सगळे जण निःस्तब्द्ध होते व फोटो काढत होते. त्यानंतर आमची बोट जॉन हॉपकिन इनलेट समोर थांबवली. हे ग्लेशिअर म्हणे रोज ५-६ फूट सरकते आणि गेल्या १०० वर्षात बरेच मागे गेले आहे(वितळले आहे). कॅप्टनने अनाउन्स केले "हे ग्लेशिअर बघून घ्या अजून काही वर्षानी ते बरेच मागे जाईल”. नंतर परत गरम पेय हातात घेउन डायनिंग हॉलमधून ग्लेशिअर च्या खाली दिसणारे पाण्याचे प्रवाह, भेगा हे सगळे बघितले. एवढ्या २५००-३००० लोकांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहिल्या ना धक्काबुक्की ना मारामारी. धन्य ते मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग.

अलास्का मध्ये खूप ग्लेशिअर्स आहेत. त्यातले हबार्ड(नॅशनल जिऑग्राफिक चा फाउंडर व पहिला प्रेसिडेंट) ग्लेशिअर सगळ्यात लांब व रूंद आहे. ७६ मॆल लांब व फेस ५-६ मॆल आहे. अर्थात त्यामुळे फार जवळ मोठ्या बोटी नेत नाहीत. कारण काव्हिंग नंतर खूप पाणी तयार होते. अर्थात छोट्या बोटी अगदी जवळ घेउन जाणारे महाभाग ही आहेतच. हे ग्लेशिअर चक्क पुढे पुढे सरकत आहे आणि वाढत आहे. त्याच्यावर सायंटिस्ट नजर ठेवून आहेत. मी अलास्काहून परत आल्यावर याचे वेगवेगळ्या वेळचे फोटो पाहिले आणि हवाईला जाण्यापूर्वी बघितलेल्या व्होल्कॅनो च्या फोटोंची आठवण झाली. तिथे लाव्हा ऍक्च्युअल पुढे सरकताना दिसतो म्हणून आपल्याला तो वहातो असा फील येतो. ग्लेशिअर्स चे वर्षभरानंतरचे फोटो पाहिले की त्याची हालचाल स्पष्ट कळते. ज्या लोकांना पहिल्यांदा हे सगळे कळले असेल त्यांना काय वाटले असेल? जॉन म्यूर त्याची ग्लेशिअल थिअरी तपासायला अलास्का पर्यंत आला होता. त्याची योसेमिटी बद्दलची थिअरी तशी पटते. कॅप्टन कुक चे नाव पण खूप ठिकाणी आहे पण त्याआधी ज्या लोकल्स ना हे समजले असेल त्यांच्या पचनी पडायला जरा अवघड गेले असेल. दुसरी एक गोष्ट मनात आली हवाई मध्ये लाव्हा समुद्राला मिळतो आणि तिथे नवीन जमीन तयार होते, अलास्का मध्ये बर्फ पाण्यात मिसळतो आणि समुद्राचे पाणी वाढते अशा तर्‍हेने निसर्ग दोन्हीचा बॅलन्स तर ठेवत नसेल. (जमीन व पाणी किती प्रमाणात तयार होतात याचा काही मला अंदाज नाही)

दुपारी रेंजरचे प्रेझेंटेशन पाहिले. रेंजर एमिली ने फार छान प्रेझेंटेशन दिले. तिच्याकडचे फोटॊ कलेक्शन अप्रतिम होते. ती तिथेच रहात असल्याने जे काही पूर्ण सूर्यप्रकाशात तिने फोटो काढले होते ते फार सुंदर होते. असे दिवस फार कमी असतात. ’द कॉल ऑफ द वाइल्ड’ ही अतिशय योग्य कविता तिने वाचून दाखवली. फार सुंदर कविता आहे. या पार्क मध्य नोकरी करणे धाडसाचे आहे. ज्याला खरी विल्डरनेस ची आवड आहे तोच करू शकेल. तिने ग्लेशिअर बद्द्ल बरीच माहिती सांगितली. पाण्याचा या ग्लेशिअरच्या पुढे सरकण्यात मोठा वाटा आहे. ग्लेशिअर च्या वरती थोडे पाणी तयार होते सूर्याच्या उष्णतेमुळे हे पाणी फटीतून हळूहळू आत झिरपते व शेवटी तळातून बाहेर पडते अशी चक्क आत एकेमेकांना जोडलेली पाण्यासाटी व्यवस्थित सिस्टीम तयार होते. एकदा काहीतरी मधे अडकून हे सगळे पाणी आतच राहिले त्यामुळे खालचा बर्फ वितळायला लागला व ग्लेशिअरचा मोठा भाग तळापासून सुटला आणि पाण्याला मिळाला त्यामुळे लोकांची धावपळ झाली व त्यांचे बरेच नुकसान झाले हे ऎकल्यावर माझ्या सकाळच्या शंकेचे निरसनही झाले( कन्या राशीला बरोबर शंका येतात असे म्हणायला हरकत नाही). दुपारी सगळे रेंजर्स परत गेले. त्यानंतर व्हेल्स बघितले. अगदी बॊटीच्या जवळून पॅरलल चालले होते. डॉल्फिन्स ही बरेच दिसले इतर पक्षी ही दिसत होते. एखाद्याला व्हेल दिसला की तो ओरडायचा मग सगळ्यांच्या माना तिकडे. असे दृष्य खुपदा दिसे व त्यावर बरेच विनोद ही घडत. एकदा वर जाउन कॅप्टनची केबिन व ब्रिज बघून आलो. तिथेही काही मराठी नावे पाहून बरे वाटले.

संध्याकाळी बोटीवर शॉपिंग केले रोज काहीतरी वेगळा सेल लावत. दुसर्‍या दिवशी सकाळी केचिकन ला स्टॉप होता. केचिकन ला सालमन कॅपिटल म्हणतात. इतका इथे सालमनचा व्यापार चालतो. इथे येण्यापूर्वी मला सालमन मध्ये भरपूर ऒमेगा-३ असते व ४०० डि वर १२ मि बेक केला की तो छान बेक होतो एवढीच माहिती होती. इथे आल्यावर अजून या माहितीत भर पडली. सालमन फिश ऍटलांटिक व पॅसिफिक मध्ये दोन्हीकडे आहेत. सालमन फ्रेश पाण्यात जन्मतात नंतर ते खार्‍या पाण्यात जातात. साधार्ण लाईफ स्पॅन ५-८ वर्षे असतो. शेवट्च्या वर्षी ते अंडी घालतात व नंतर मरतात. असेही म्हणतात की अंडी घालायला ते परत आपल्या जन्म ठिकाणी येतात. कसे येतात यावर रिसर्च चालू आहे. काहींच्या मते ते वासावरून येतात. सालमन च्या अनेक जाती बाजारात दिसतात. आणि फ्रेश डिशेस ही बर्‍याच ठिकाणी मिळत होत्या. पार्सल ची सोय सगळीकडे होती. इथे काही लोकंनी फिशिंग टूर्स ही घेतल्या.

केचिकन मध्ये आम्ही नंतर लंबर जॅक शो बघितला. लाकूड काम करणारे बरेच कसरती, खेळ करून दाखवतात. स्पिरीट साठी बघणार्‍या लोकांना २ ग्रुप्स मध्ये विभागले होते. बरा होता प्रकार. बॅलन्सिंगचा एक प्रकार होता पाण्यात तो मजेशीर होता. इथेच टोटेम पार्क ही बघितले. तिथे जुने जुने टोटेम पोल्स ठेवले आहेत. मृत व्यक्तिच्या स्मृतिसाठी हे बनवत असत. लाकडाच्या उंच खांबावर हाताने कोरलेले माणसांचे चेहेरे आहेत. प्रत्येक पोलची काहीतरी स्टोरी असते. मला इजिप्तच्या ममीज ची आठवण झाली.केचिकन पण छोटे टुमदार गाव आहे. आपल्या हिल स्टेशन सारखे पण झाडी जास्त व स्वच्छता जास्त.

इथेही परत थोडे शॉपिंग झालेच. गरम कपडे व काही भेटी. त्यानंतर बोटीवर परत. संध्याकाळी चॉकलेट बफे होता. इतके चॉकलेट चे प्रकार होते की बघून दमलो. खूप सुंदर डेकोरेशन केले होते. लोकांचे चॉकोलेट खाणे बघायला मजा येत होती. दुपारनंतर समुद्र जरा रफ झाला त्यामुळे मला थॊडा त्रास झाला पण दुसर्‍या दिवशी सगळे ठिक झाले.

आमचा शेवटचा स्टॉप होता व्हिक्टोरिया इथे. हे ब्रिटीश कोलंबिया - कॅनडात येते. संध्याकाळी उअतरलो. हवा एकदम छान होती. तिथले बोटॅनिकल गार्डन बघण्यासारखे आहे पण ते ५ सप्टेंबर नंतर जाणार्‍यांना बघता येत नाही. जाण्यापूर्वी खात्री करून घ्या. आम्ही गावातून फेरी मारली. सगळीकडे मस्त फुले लावली होती. इथली गव्हर्मेंट बिल्डिंग खूप छान आहे. रात्री त्यावर लाइटिंग केले होते तेव्हा अजून छान दिसत होती. रेस्टॉरंट्स युरोपिअन स्टाइल वाटत होती. इथे क्वीन व्हिक्टोरिय़ाचे महत्व आहे त्यामुळे युरोपिअन प्रभाव दिसतो सगळ्या गोष्टीवर. या ठिकाणी अजून जास्त वेळ हवा होता असे नक्की वाटले. रात्री परत येउन पॅकिंग करून बॅगा त्यांच्या ताब्यात देउन टाकल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी क्रुजला बाय करून एक चक्कर पाइक प्लेसला ( फार्मर मार्केट) मारली व छान आठवणी घेउन घरी परतलो.

परत येताना अलास्काला ’लास्ट फ्रंटीअर’ म्हणतात ते किती बरोबर आहे असे वाटले. या स्टेटला दुसर्‍या अमेरिकन स्टेट ची बॉर्डर नाही. खूप मोठे त्याच्या पुढे अमेरिकेचा काही भाग नाही. निसर्गाचा वरदहस्त आहे. प्रत्येक साइट पिक्चर परफेक्ट वाट्ते. रशिया कडून अगदी नगण्य किमतीला अमेरिकेने जरी ते घेतले तरी त्याच्या नेचरचा अभ्यास करून छान टूरिझम डेव्हलप केला आहे. गोल्ड आणि पेट्रोल तर मिळालेच पण लोकांना या सुंदर साईटस च्या जवळ नेण्याचे जे काम टूरिझम च्या माध्यमातून केले आहे ते फार मोठे आहे.

Tuesday, September 29, 2009

अलास्का - भाग २ -

अलास्का- ( इनसाइड पॅसेज, जुनो व स्कॅगवे)

आम्ही इनसाईड पॅसेज वाली क्रूज बुक केली होती. हा अलास्काचा साउथ इस्ट भाग आहे. अजून ३-४ दिवस असतील तर ऍकरेज व डेनाली पार्क ही करता येते. सिऍटल- इनसाइड पॅसेज, जुनो, स्कागवे, ग्लेशिअर बे नॅशनल पार्क, केचिकन, व्हिक्टोरिआ(ब्रिटीश कोलंबिया) व परत सिऍटल असा हा प्रवास होता.

इनसाईड पॅसेज- सिऍट्ल पासून इनसाइड पॅसेज घेतला की रफ समुद्र टाळता येतो त्यामुळे क्रूज शिप्स, कयाक, कार्गो शिप्स हा मार्ग घेतात. दोन्ही बाजूला छोटी बेटे, डोंगर व सुंदर झाडी आहे. हवा बहुधा पावसाळी असते, ढग खाली उतरलेले दिसतात. पाण्याच्या एवढ्या जवळ स्नो व ढग जनरली बघायला मिळत नाही. एकंदर वातावरण मस्त...अधून मधून डॉल्फिन्स, व्हेल्स सी गल्स दिसतात. या पॅसेजने ग्लेशिअर बे ला जाउन टाइड वॉटर ग्लेशिअर्स बघता येतात. निघाल्यापासून २ दिवस सलग बोटीवर होतो. सगळ्या गोष्टी माहित करून घेणे, एंटरटेनमेंट, या मध्ये छान वेळ गेला. सकाळी उठल्यावर २-३ तासांनी दोन्ही बाजूला स्नो कॅप असलेले डोंगर व खाली आलेले ढग दिसत होते. तळाशी झाडी पण खूप होती. अधून मधून धबधबे दर्शन देत होते. एकंदरीत आपण निसर्गाच्या खूप जवळ गेल्यासारखे वाटते. नुसताच सगळीकडे समुद्र दिसत नाही. भरपूर फोटो काढले गेले. थंडी पण फार नव्हती.

जुनो- दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजता जुनोला पोचलो. ही अलास्काची कॅपिटल सिटी. छोटेसे टुमदार गाव आहे. बोट अगदी डोंगराच्या कुशीत थांबल्यासारखी वाटते (इतकी डोंगराच्या जवळ थांबते) जुनो हे पाण्याने व हवाईमार्गाने जोडलेले आहे. गोल्ड रश मध्ये काम केलेल्या जुनो नावाच्या माणसाच्या नावावरून हे नाव पडले. इथे काही मंडळी व्हेल वॉचिंग ला गेली. इथल्या मेंडेनहॉल ग्लेशिअरला ड्राईव्ह करून जाता येते व बघता येते. आम्ही ग्लेशिअर वर हेलिकॉप्टर राईड बुक केली होती. बोटीतून उतरलो तेव्हा रिमझिम पाउस होता त्यामुळे वाटले की आता जाता येणार नाही पण इथे पाउस सतत असतो. व्हिजिबिलिटी नसली तर प्रॉब्लेम येतो. बसने आम्ही टेमस्कॊ हेलिकॉप्टर्स च्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे ६ लोकांचे ग्रुप बनवले. शूज वरून घालायला कव्हर्स दिली त्यामुळे स्नो वर घसरायला होत नाही. माझा हेलिकॉप्टरचा हा पहिलाच अनुभव. अगदी छोटे हेलिकॉप्टर होते. (वजन जास्त असेल तर दीडपट तिकीट पडते.) हेलिकॉप्टरला सगळीकडून काचेच्या खिडक्या. बरेच हालत होते आणि खाली दरी, डोंगर दिसत होते. नाही म्हटली तरी थोडी भिती वाटलीच. हवेतील तपमानाच्या बदलामुळे हेलिकॉप्टर बरेच हलते ही थिअरी माहित होती तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर जरा घाबरायला होतेच. काही लोक म्हणतात कशाला आपलेच पॆसे देउन भिती विकत घ्यायची? पण त्याशिवाय काही चांगल्या गोष्टी बघता येत नाहीत.

खाली ग्लेशिअरचे छान दृष्य दिसत होते. छोटे सुळके, रस्ते, आणि भरपूर स्नो दिसत होता. आमच्याबरोबर अजून ६ हेलिकॉप्टर्स उतरली. चालवणारी सगळी अगदी लहान (२५-३०) मुले होती. तिच माहिती सांगत होती. वरती कडक स्नो होता. चांगली गोष्ट म्हणजे तो घसरत नव्हता. दोन बाजूला डोंगर , मागून आलेले ग्लेशिअर व पुढ्ची दरी ..फार छान स्पॉट होता. वरती निळ्या रंगाच्या छटा मस्त दिसत होत्या. पाणी पण निळे दिसत होते. अधून मधून क्रिव्हासेस दिसत होत्या. त्याच्या आत डोकावले तरी निळया रंगाचे पाणी किंवा निळा रंग दिसत होता. १०० फूट आतपर्यंत बघता येते. पहिल्यांदाच हा निळा रंग स्नोमध्ये बघितला. ही ग्लेशिअर्स तयार होताना आजूबाजूच्या डोंगरातील माती त्यात मिक्स होते त्यामुळे काही ठिकाणी खडी मिक्स झालेली दिसते. आमचा मित्र म्हणाला हिमालयन ग्लेशिअर्स फार सुंदर आहेत, हे मळके आहे...पण आम्ही हिमालयात कुठे ट्रेक करत जाणार? इथे ग्लेशिअर्स रिचेबल आहेत. एका बाजूला मस्त वॉटर फॉल होता. मागच्या बाजूला बर्फाचे छोटे सुळके दिसत होते आणि त्यातूनही निळा रंग डोकावत होता. ही राईड बर्‍या पॆकी महाग होती पण वर्थ इट.

ग्लेशिअर बद्द्ल थोडेसे- ग्लेशिअर म्हणजे बर्फाची नदी. हे मुव्हिंग असतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी भरपूर बर्फ पडतो आणि त्याचे थर एकावर एक साठत जातात, खालचा बर्फ दबला जातो. बर्फाच्या वजनामुळे आतली हवा पण निघून जाते आणि कॉम्प्रेस्ड बर्फाचे थर तयार होतात. असे बरीच वर्ष चालू असते. ग्रॅव्हिटी आणि वजन यामुळे ही ग्लेशिअर्स पुढे सरकतात. खालचा खडक, उतार याचाही परिणाम होतो. दबलेल्या बर्फाचे स्ट्र्क्चर असे तयार होते की निळा रंग ऍबसॉर्ब होत नाही त्यामुळे ही ब्ल्यू शेड आईस वर दिसते. आमचा गाइड असे बरेच काही सांगत होता पण सगळे पांगले व फोटो घेण्यात मग्न झाले. काही ठिकाणी बर्फ आणि दगड यांचे मिक्श्चर होते व अगदी मळकट असे ग्लेशिअर्स ही तयार झालेले पाहिले. ३०-४० मिनिटानी परत गावात गेलो. मग थोडे शॉपिंग झाले. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

स्कॅगवे- इथे आमच्या क्रूजचा सगळ्यात जास्त वेळ स्टॉप होता. सकाळी युकॉन साइट्स बघण्यासाठी बस बुक केली होती. इथे व्हाइट पास रेल्वे खूप लोक पसंत करतात पण त्यात मधे उतरू देत नाहीत आणि ट्रेन राइड चे पॆसेही फार आहेत. आम्ही बस ची टूर घेतली. ही बस युकॉन टेरिटरीत घेउन जाते. आपण बॉर्डर क्रॉस करून कॅनडात जातो त्यामुळे अमेरिकन सिटीझन/ ग्रीन कार्ड सोडून सगळ्यांना व्हिसा लागतो. बॉर्डर वर एक अगदी रुक्ष चेहेर्‍याचा माणूस येउन पासपोर्ट बघून गेला. ही माणसे चेहेरा असा ठेवण्याचे ट्रेनिंग घेतात कि काय कुणास ठाउक? आमचा बस ड्रायव्हर टॉम हाच आमचा गाईड होता. गेली २५ वर्षे तो या रस्त्यावर बस फिरवतो म्हणून खडा न खडा माहिती होती त्याला. त्याला इंडिया ची थोडी माहिती होती. हिमालय, बॉलीवूड, आणि चिकन टिक्का हे परवलीचे शब्द आम्हाला त्याने म्हणून दाखवले व इंडियात तो गेला होता हेही सांगितले. त्याची पूर्ण बस एकदा म्हणे अंबानींनी बुक केली होती. ते खूप श्रीमंत आहेत असेही सांगून झाले. फोटोग्राफीही त्याची छान होती. एकंदरीत बर्‍याच देशांचे पाणी प्यायलेले बिनधास्त व्यक्तिमत्व होते टॉम म्हणजे. इथले ड्रायव्हर्स/ गाईडस स्पेशल स्किल सेट वाले असतात. जोक्स सांगून , माहिती सांगून तुमचा प्रवास अजिबात कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतात. त्याचे स्पेशल ट्रेनिंग घेतात बहुतेक.

अलास्का गोल्ड रश -१८८० च्या सुमारास गोल्ड रश ची सुरूवात झाली. क्लॉंडिके रिव्हर जवळ काही लोकांना सोने सापडले. ही बातमी फार काळ लपून राहिली नाही. अमेरिकेत ती मेडियाने पसरवली. बाहेर देशात ही ती पसरली. लगेच लोकांनी धाव घेतली पण इथे पोचणे सोपे नव्हते. रस्ता अतिशय अवघड (दर्‍या, डोंगर) हवामान अतिशय थंड आणि त्यात लोकांची गर्दी. प्रत्यक्ष जागेपर्यंत फार थोडे पोचले आणि पोचल्यावर कळले बहुतेक सगळे सोने संपलेले होते. सुरूवातीला ज्यांना मिळाले ते श्रीमंत झाले. युकॉन टेरिटरीतून व्हाइट पास किंवा चिलकूट पास पार केल्याशिवाय गोल्ड च्या भागात पोचता येत नसे. हजारो लोकांनी प्रयत्न केले त्यातले थोडे पोचले पण बरेच अर्ध्यातून परत आले, चेंगराचेंगरीत मारले गेले. त्यावेळेस डोंगरातल्या अवघड वाटावरून लोकांना सामान नेणे अतिशय कठिण होते म्हणून इथे रेल्वे (युकॉन व्हाइट पास रेल्वे) सुरू केली. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल मानले जाते. ३००० फूट केवळ २० मॆलात ही ट्रेन चढते. वाटेत पूल, बोगदे बरेच आहेत. रेल्वेचे बांधकाम होईपर्यंत गोल्ड रश थंडावला होता. नंतर टूरिस्ट लोकांचे ते एक आवडते ठिकाण बनले.

आमच्या क्रूजवरूनही बर्‍याच लोकांनी रेल्वेची ही राईड घे्तली. आम्ही मात्र रस्त्याने व्हाइट पास पर्यंत गेलो तिथून कॅनडात प्रवेश केला. वाटेत सुंदर फॉल कलर दिसले. डोंगर, त्यावर उतरलेले ढग आणि तळाशी बर्‍याच वेळा लेक्स पसरलेली. लेक तुत्शी ला तर ४०० मॆलाचा किनारा आहे.एक एमराल्ड लेक ही पाहिले. अक्षरशः पाचूच्या रंगाचे पाणी होते मी फोटो पाहिले होते पण प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास नव्हता. त्या दिवशी आम्ही निसर्गात केवढे रंग बहितले! डोंगरावर एव्हरग्रीन च्या मध्ये अस्पेन ची भरपूर झाडे लावली आहेत. सगळ्या डोंगरावर हिरव्या पिवळ्या रंगाची उधळण होती. डोळॆ अक्षरशः तृप्त झाले. फोटोत तेवढे छान रंग पकडता येत नाहीत. जाताना गोल्ड रश ची कहाणी तोंडी लावायला होतीच. याच रस्त्यावरून पूर्वी सोन्याच्या मागे लोक धावले होते. पूर्वी रस्ते नसताना त्यांना किती अडचणी आल्या असतील याची थोडी कल्पना आली. वाटेत एक अगदी सुरूवातीची गोल्ड माइन दाखवली अगदी जुनाट दिसत होती. मध्ये बंद होती पण आता परत चालू केली आहे. अधून मधून माउंट्न गोटस बायनॉक्युलर मधून बघितले. एवढ्या उंचावर ही जनावरे कशी जातात कुणास ठाउक. कारक्रॉस नावाच्या गावापासून आम्ही परत फिरलो. अगदी छोटेसे गाव पण टुरिस्ट सेंटर मध्ये नकाशे व माहिती इतक्या प्रमाणात होती कि बास. आणि सगळे मोफत. वाटेत एक अगदी छोटे वाळवंट पण पाहिले तेवढेच कसे तयार झाले माहित नाही. लंचला एका घरगुती ठिकाणी थांबलो. फॅमिली बिजिनेस होता. कुठे इंटिरिअर मध्ये राहून बिजिनेस करत होते...आमची खाण्याची सोय मात्र चांगली झाली.

दुपारी ३ पर्यंत परत आलो मग मी व माझी मॆत्रिण शॉपिंग मध्ये घुसलो आणि बरीच खरेदी झाली. शेवट्ची ट्रीप म्हणून बरेच सेल होते. प्रत्येक दुकानात काहीतरी बारीक गोष्ट फ्री देतात त्या आम्ही लहान मुलींसारख्या गोळा केल्या. दोघींचे नवरे बरोबर नव्हते म्हणून अजून मजा आली. परत क्रूजवर जाउन संध्याकाळी प्रोग्रॅम बघितला व पुढ्च्या प्रवासाला लागलो.

Friday, September 25, 2009

अलास्का - भाग १


अलास्का - भाग १ - (तयारी व क्रूज बद्दल)

अमेरिकेत राहून दोन लांबच्या ट्रीप्स करायचे मनात होते. गेल्या वर्षी लग्नाचा २५ वा वाढदिवस हवाईत साजरा केला. दुसरी ट्रीप अलास्काची करायची होती. आम्ही अलास्काला जाण्याचे १ वर्षापूर्वी ठरवले. अलास्का एवढे मोठे स्टेट आहे की सगळ्या गोष्टी बघणे शक्य नव्हते त्यामुळे साधारण काय बघायचे हे ठरवून बुकींग करून टाकले. एखादी गोष्ट ठरवली की ती होते, त्यामुळे आधी जायचे बुकिंग केले नंतर उरलेला रिसर्च केला. यावेळेस क्रूज चा अनुभव घ्यायचा हे ठरले होते. हवाईला जास्त लॅंड वर राहिलो होतो इथे जास्त वेळ पाण्यावर रहायचा अनुभव घेतला.
अलास्का मध्ये ग्लेशिअर्स , सिनरी, वाईल्ड लाईफ़, डेनाली नॅशनल पार्क, नॉर्दर्न लाईट्स, गोल्ड माइन्स अशा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आम्हाल ग्लेशिअर्स बघण्यात मेनली इंटरेस्ट होता. वाईल्ड लाईफ़ पेक्षा सिनरी मध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे आम्ही ग्लेशिअर बे - इनसाईड पॅसेज वाली क्रूज बुक केली. क्रूज बुक करताना रिव्ह्यूज वर भर दिला आणि मित्रांच्या टीप्स ही होत्याच. ही ट्रीप बुक करताना खूप ऑप्शन्स आहेत जसे की वन वे क्रूज मग लॅंड आणि विमानाने परत, बोथ वेज क्रूज, पूर्ण बाय लॅंड किंवा बाय प्लेन, पुढे ट्रेन ऑप्शन पण आहेत. आम्हाला ७-८ दिवसापेक्षा जास्त रजा नव्हती म्हणून आम्ही इनसाईड पॅसेज वाली क्रुज बुक केली. एका ट्रॅव्हल एजंट ने सांगितले की तुम्हाला खूप कंटाळा येईल पण अजिबात आला नाही. ८ दिवस कुठे गेले कळले नाही. जर व्हॅंकूव्हर, स्कॅगवे, (तिथून ग्लेशिअर बघणे)- मग ऍकरेज व पुढे ट्रेन ने डेनाली नॅशनल पार्क करून फ़ेअरबॅंक ला गेलो तर एका दगडात बरेच पक्षी मारता येतात. ( ग्लेशिअर्स, वाईल्ड लाईफ आणि डेनाली पार्क ). बरोबर नकाशा दिला आहे.

अलास्का मध्ये मे ते सप्टेंबर मेन टूरिस्ट सिझन आहे. आमची १३ सप्टेंबर शेवटची क्रूज होती. मला बर्‍याच लोकांनी वेड्यात काढले - इतक्य़ा उशीरा का जाता? उन्हाळ्यात जास्त वेळ डे लाईट असतो. पण मी एकंदर टेंपरेचर ची रेंज पाहिली तर फार फरक नव्हता ५-१० डिग्रीज...आणि मिडवेस्ट मध्ये राहिल्याने थंडीची सवय होतीच त्यामुळे ५५-५९ या टेंपरेचरचा त्रास झाला नाही. इथली हवा तशी लहरी आहे त्यामुळे मदर नेचर वर सगळे अवलंबून त्यामुळे थोडी रिस्क घेतली आणि त्याचा एक फायदा झाला म्हणजे फॉल कलर्स बघायला मिळाले.
आम्ही क्रूज च्या एक दिवस आधी निघायचे ठरवले. त्या दिवशी सिऍटल मध्ये फिरायचे ठरवले होते. माझी एक कॉलेज मेत्रिण आम्हाला सिऍटलला भेटणार होती. ते लोक ह्युस्ट्न हून येणार होते. आमची फ्लाईट ब्लुमिंग्ट्न- शिकागो-सिऍटल अशी होती. निघताना हवा छान होती पण शिकागोला उतरता आले नाही कारण व्हिजिबिलिटी पुअर, मग पिऒरिआला उतरवले. तिथून परत शिकागो तिथून सेंट लुईस व तिथून सिऍटल असे रात्री ११ ला एकदाचे पोचलो. सकाळी ११ ला पोचणार होतो. (१५० मॆलाच्या एरिआत ६ ते ३ पर्यंत फिरत होतो) शिकागोला अक्षरशः दर १/२ मिनिटाला एक विमान उतरत होते आणि एक उडत होते. ३ विमाने एका वेळी पॅरलली उतरत होती. हॅटस ऑफ टॊ कंट्रोल टॉवर पीपल. आश्चर्य म्हणजे सिऍटलला पोचल्यावर कंटाळा न येता एकदाचे पोचलो म्हणून हुश्श झाले. तिथे एका फॅमिली कडे राहिलो.(मॆत्रिणिची मॆत्रिण) बर्‍याच गप्पा झाल्या. सकाळी उठून चहा पोहे खाउन डाउनटाउन बघायला गेलो. थॅंक्यू कांचन(आणि फॅमिली) फॉर पाहुणचार.

सिऍटल डाउन्टाउन छान आहे. एकंदरीत गाव आवडले. खूप मोठे नाही खूप छोटे नाही. आपल्याकडच्या हिल स्टेशन सारखे वाटते. रस्ते चढ उताराचे आहेत. ब्लूमिंग्ट्न मध्ये राहिल्याने अशा जागा जास्त आवडतात कारण ब्लूमिंग्ट्न मध्ये डोंगर अजिबात नाहीत. सिऍटलच्या पावसाळी हवेबद्दल खूप ऎकले होते पण आम्हाला मस्त उन मिळाले. जर तुमच्याकडे २ दिवस वेळ असेल तर सिऍटल च्या आजूबाजूला बघायला माउंट रेनिअर, धबधबा, कूली डॅम अशा अनेक गोष्टी आहेत. सिऍटल नीडल, म्युझिअम्स या एरिआत फिरून क्रूज टर्मिनलला गेलो. उन असेल तर बॅकड्रॉपवर माउंट रेनिअर छान दिसत रहातो. गावात फिरतानाही अधूनमधून पाणी भेटत रहाते.

आता थोडे क्रूजविषयी. १९०१ साली पहिली क्रूज अलास्काला गेली. अर्थात ती साधी होतीच . आम्ही नॉर्वेजिअन क्रूज बुक केली.होती. बर्‍याच क्रूज कंपन्या सतत वेगळ्या तर्‍हेने मार्केटिंग करत असतात. या शिपबद्द्ल २-३ जणांकडून चांगले ऎकले होते त्यामुळे आम्ही हे बुकिंग केले. सिनरीसाठी बाल्कनी वाली केबिन घेतली आणि त्याचा फार उपयोग झाला. सुरूवातीला वाट्ले की जरा जास्त पॆसे देतोय पण इट वॉज वर्थ. आम्ही टर्मिनलवर पोचल्यावर लगेच आमचे सामान त्यांनी ताब्यात घेतले. थंडीसाठी बरेच कपडे घेतेले होते त्यामुळे बॅग्ज जड होत्या - अर्थात ते सगळे कपडे उपयोगी पडले. त्यानंतर व्हिसा पासपोर्ट फॊटॊ सगळॊ नाटके पार पडून आम्ही आत गेलो. ग्रीनकार्ड वाल्यांना व्हिसा लागत नाही असे सांगितले होते पण प्रत्यक्ष तिथे एन्टर झाल्याशिवाय विश्वास बसत नाही. बहुतेक सगळे ’सिटीझन’ होते. सिटीझनशिप घेण्यात हा एकमेव फायदा दिसतो - कुठेही व्हिसा लागत नाही.
शिपवर गेल्यागेल्या ड्रींक ने वेलकम झाले. लगेच मंडळी डायनिंग रूम कडे वळली. बुफे एकदम रिच होता. तोवर सामान केबिन मध्ये येउन पडले होते. आम्ही ९व्या मजल्यावर मिडशिप वर होतो. गेल्यागेल्या त्यांनी एक छोटा मॅप दिला होता. त्यात कुठे काय आहे हे दाखवले होते. तरीसुद्धा पहिले २ दिवस आम्ही चुकत होतोच. बोटीत तुम्ही एकदा आतल्या भागात गेलात की तुमचा डायरेक्शन्चा सेन्स जातो कारण बाहेरचे काही दिसत नाही. तरी प्रत्येक मजल्यावर पाट्या लावलेल्या होत्या. बर्‍याच ठिकाणी माशांचे चित्र होते मासे ज्या दिशेला जात होते तो बोटीचा पुढ्चा भाग असे कन्वेन्शन होते. या चुकामुकीचा एक फायदा झाला म्हणजे चालणे भरपूर व्हायचे. एकंदर २७०० पॅसेंजर्स व ११०० चा क्रू असे हे खटले होते. एखादे छोटे गाव पाण्यावर तरंगते आहे असे वाटायचे.

१०० एक देशांचे लोक कामावर होते. इतक्या नॅशनॅलिटीज एकत्र काम याच इंडस्ट्री मध्ये करत असावेत. इंडिअन क्रू खूप होता. होटेल मॅनेज्मेंट कोर्स केलेली काही मराठी मुले भेटली त्यांना अगदी टेबल पुसणे. डिश उचलणे अशीच कामे होती. कोर्स करताना त्यांना कधी वाटलेही नसेल की असे काम करावे लागेल, पण ५ वर्षात सेव्हिंग भरपूर होते म्हणून काम करत होती. शिवाय जॉब मिळवण्यासाठी एजंटला ५०-६०००० रू मोजले होते. वर्षातले ८- ९ महिने रोज १० तास अशी ड्यूटी असते. फायदा एकच म्हणजे जग बघता येते व वर्षाला १०००० डॉलर्स सेव्हिंग होते. पण अधून मधून सुट्टी नाही मिळत अशी सगळ्यांचीच तक्रार होती. या लोकांचे रहाणे, खाणे हे पण इतरांपेक्षा वेगळे असते. बोटीवर बरीच रेस्टॉरंटस होती. बेसिक तिकीटात ३-४ कव्हर केलेली होतॊ बाकीसठी वेगळा चार्ज होता. एकंदरीने खाण्याचे खूप लाड होते. इंडिअन पदार्थ पण चक्क तिखट बनवायचे. सॅलड्स ची तर चंगळ होती आणि स्वीटस...तुम्ही कंट्रोल करू शकणार नाही अशी छान डेकॊरेट करून ठेवायचे. साधारण प्रत्येक जण २-३ स्वीटस तरी खायचाच. एकेदिवशी चॉकलेट बफे होता. डेकोरेशन वॉज सुपर्ब. लोक वेस्ट मात्र खूप करत होते. क्रूज वाले मेन फायदा ड्रींक्स वर काढतात. लोक सुट्टीच्या मूड मध्ये एवढे पीत होते आणि पॆसे उडवत होते की बस...कुठेही रिसेशनचा मागमूस नव्ह्ता मला वाटले होते की शिप पूर्ण सोल्ड आउट तरी असेल की नाही.... पण इथे बुकिंग फुल होते ...पॆसा उतू जात होता. तसेही ही मंडळी व्हेकेशन वर असली की पॆसे उधळत असतात.

आमची केबिन चांगली होती. ईंटरनेट वर कितीही चित्रे बघितली तरी प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास नसतो. क्लोजेट मध्ये दोन्ही बॅग्ज रिकाम्या झाल्या आणि आमचे ८ दिवसांचे घर सेट झाले. रोज रात्री टॉवेल चे छान प्राणी करून ठेवत. संध्याकाळी एंटरटेनमेंट प्रोग्रॅम असे. कॉमेडी शॊ वाला डेव्हिड खूप मजेशीर होता त्याने अगदी बोटीतल्या साध्या गोष्टींवर भाष्य करून लोकांना पोट दुखेपर्य़ंत हसवले. सोपी गोष्ट नाही. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने अनुभव घेतल्याने लोक रिलेट करू शकत होते. ११०० लोक १ तास नुसती ह्सत होती. शॉवर, जेवण, केबिन , व्हेल वॉचिंग अशा साध्या गोष्टींवर तो कॉमेंट करत होता. आम्ही अजूनही आठवून हसतो.’टेक्सास’ वर प्रत्येक जण कॉमेंट्स करत असे..मला वाट्ते अलास्का टेक्सास हून मोठे आहे म्हणून असेल... बाकीचे व्हेगास स्टाईल प्रोग्रॅम्ही छान होते. डान्सेस छान कोरिऒग्राफी केलेले होते. ज्या दिवशी डान्स प्रोग्रॅम नसे तेव्हा याच मुली ज्युवेलरी शॉप्स मध्ये असत. प्रत्येकाला १० तास काम करावेच लागे. या सगळ्या मागचे प्लानिंग व स्टोरेज याबद्द्ल एक दिवस प्रेझेंटेशन दिले. खूप मोठा पसारा होता. एके दिवशी जगलिंग चा प्रोग्रॅम होता मला वाटले नेहेमीचेच असणार पण त्यांनी खूप वेगळे प्रकार दाखवले. दोनच मुले होती पण सॉलिड एनर्जी होती त्यांच्यात आम्हाला बघूनच दमायला झाले. लाइव्ह पियानो, गाणी व व्हायोलिन संध्याकाळी चालू असे. बाकी जिम, स्विमिंग पूल डान्स क्लब बास्केट बॉल, मोठ्या स्क्रीनवर वी, बोलिंग, ड्युटी फ्री शॉपिंग, कॅसिनो, बार, नाइट क्लब हे सगळे प्रकार होतेच. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काहीतरी मिळायचेच. रोज रात्री दुसर्‍या दिवशीचा प्रोग्रॅम येत अस त्यामुळे प्लॅनिंग सोपे पडे. एकंदरीने छान प्लॅनिंग होते. रूम मध्ये आदल्या दिवशीचे गेम शो, मूव्हीज न्यूज सतत चालू असे. कॅप्ट्न व रेंजर या दोघांची प्रेझेंटेशन्स वर्थ वॉचिंग होती.

परत आल्यावर इथले पाइक प्लेस हे फार्म्रर्स मार्केट पाहिले. खूप छान होते. फुले, फळे , बेकरीज, चीज व माशांचे नाना प्रकार. सगळे फ्रेश. बरेच काही घ्यावेसे वाटत होते पण परत प्रवास करायचा होता म्हणून सिताफळ व अंजीर घेतले.(मिड्वेस्ट मध्ये मिळत नाहीत) हिरवे अंजीर मस्त होते. तुम्ही गेलात तर जरूर भेट द्या या बाजाराला.
आमचा (एन सी एल पर्ल) क्रूजचा पहिला अनुभव तर छान होता.