Wednesday, December 16, 2009

रोड ट्रीप...

अमेरिकेत आल्यावर बर्‍याच ठिकाणी हिंडून आलो. नेहेमीची ठिकाणे - नायगारा(भारतीयांचा पहिला चॉईस) - लास व्हेगास आणि ग्रॅंड कॅनिअन - फ़्लोरिडा - कॅलिफोर्निया - कोलोरॅडो -हवाई - अलास्का - काही नॅशनल पार्कस वगॆरे. आमचा नेहेमीचा पॅटर्न म्हणजे विमान प्रवास व तिथे गेल्यावर गाडी घेउन एक आठवडा फिरणे व आजूबाजूची ठिकाणे बघणे.. आमची फ़ॅमिली तिघांचीच असल्याने हा फॉर्म्युला सोईचा वाटतो. यातील २-३ ठिकाणी ड्राईव्ह करूनही गेलो होतो.

२ आठवड्यापूर्वी मी व माझ्या मुलीने रोड ट्रीपचा अनुभव घेतला. २००० मॆल व ८ स्टेट्स असे आम्ही दोघीच फिरून आलो. इलिनॉय-इंडियाना-केंटुकी-टेनसी-नॉर्थ कॅरोलिना-व्हर्जिनिया-वेस्ट व्हर्जिनिया-ओहायो व परत असा आम्ही रोड प्लॅन केला. वाटेत मॆत्रिणी, नातेवाईक यांना भेटलो. १-२ ठिकाणी हॉटेल मध्ये राहिलो. यापूर्वी स्मोकी माउंटन ला जाताना टेनेसी पर्यंत याच रस्त्याने गेलो होतो. पुढचा भाग आमच्यासाठी नवीन होता. पहिले प्लॉनिंग गुगल मॅप्स वरून झाले. साधारण दर ५-६ तासांनी आम्ही ब्रेक घेत होतो. हॉटेल बुकिंग केली. थोडेफार खाद्यपदार्थ बरोबर घेतले. थंडी असल्याने सामान भरपूर होते. पण गाडी असल्याने काही प्रश्न नव्हता.
अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला नाही म्हणून मी नेहेमी ऒरडत असते. पण गाडी घेउन फिरायचे असेल तर हाय वेज , हॉटेल्स, पेट्रोल पंप्स आणि रस्त्यांची कंडिशन फार छान केलेली आहे. गुगल मॅप्स चे सॉफ्ट्वेअर भन्नाट आहे. हवेने साथ दिली तर या रस्त्यावरून प्रवास म्हणजे सुख आहे. घाट पण अतिशय छान आहेत.

आम्ही पहिल्या दिवशी इंडियानातून प्रवास करून केंटकी त शिरल्या शिरल्या लुइव्हिल इथे राहिलो. बुकिंग करताना या गावाबद्दल फारशी माहिती नव्हती. एकंदर गाव खूप बिझी व अपस्केल दिसत होते. आमच्या हॉटेल मध्ये छान माहिती पूर्ण पुस्तक ठेवले होते. लुइव्हिल हे गाव ऒहायो नदीच्या काठावर वसले आहे. पूर्वी नदीला इथे रॅपिडस असल्याने शिप्स ना पुढे जाता येत नसे. सामान उतरवून ते पुढे नेउन परत शिप्स मध्ये ठेवावे लागत असे. त्यामुळे इथे गाव वसवायची गरज पडली. हे गाव अमेरिकेच्या सदर्न व नॉर्थ पार्ट च्या बरोबर मध्यावर आहे. फ्रान्सच्या लुई द १६ च्या नावावरून हे नाव दिले आहे कारण इथल्या आर्मीला त्याची मदत होती. या गावात व आजूबाजूला आम्हाला खूप घोडे व कुरणे दिसली. इथली केंटकी डर्बी (रेस) फेमस आहे. चर्चिल डाउन्स मधील रेसेस खूप गर्दी खेचतात. त्यामुळे इथे भरपूर घोडे बघायला मिळाले. पावसाळी वातावरणात हिरवी कुरणे व त्यावर घोडे छान दिसत होते. इथल्या डाउनटाउन मध्ये खूप म्युझिअम्स व आर्ट गॅलरीज आहेत. महंमद अलीच्या बद्द्ल इथे एक म्युझिअम आहे. बेसबॉल बद्दल एक म्युझिअम आहे व अनेक आर्ट गॅलरीज. २-३ दिवस काढून इथे यायला पाहिजे. वायनरीज खूप दिसल्या. बरबन व्हिस्की इथे मोठ्या प्रमाणावर बनते. त्याच्या पण टूर्स होत्या. इथल्या एका काउंटी वरून हे नाव पडले आहे. आपल्याकडे या नावाची बिस्कीटस बनतात.(?) एकंदर हे गाव खूप लाइव्हली वाटले. आम्हाला वाटेत खूप ट्रक्स लागले. अवजड गोष्टी व फ़ेड एक्स चे भरपूर ट्रक्स दिसले. या गावाजवळ यु पी एस चे इंटरनॅशनल सेंटर आहे त्यामुळे भरपूर फेड एक्स ची वाहतूक दिसली. मी रस्त्यात खूप ट्रक्स बघून सारखा विचार करत होते की इथून एवढे काय घेउन जातात? तीन हाय वेज (इटर स्टेट)जवळ असल्याने व शिपिंग सेंटर असल्याने कार्गोची खूप वहातूक इथून होते.

अधून मधून आमच्या काही मॆत्रिणि फोन वर आमची खबर घेत होत्या. दोघीच जाताय, प्रदेश नवीन, गाडी लहान व पाउस असल्याने त्याना काळजी वाटत होती. आता अमेरिकेत खूप लोक असे हिंडतात मॆलोन मॆल, पण मला वाटते आमचा हा मायलेकींचा पहिलाच मोठा प्रवास(रोड ट्रीप) असल्याने काळजी वाटणे साहजिक होते. त्यातल्या त्यात नवर्‍याला कमी काळजी वाटत होती ही जमेची(?) बाजू.

नंतर आम्ही नॉक्सव्हिल येथे एका मॆत्रिणिकडे राहिलो. वाटेत खूप डोंगर भेटले आम्ही मिडवेस्ट मधून गेल्याने आम्हाल त्याचे कॊतुक आमच्याकडे नावाला डोंगर दिसत नाही. हे डोंगर फार उंच नाहीत त्यामुळे जवळचे वाटतात. अधून मधून ट्नेल्स पण काढलेली आहेत. आत्ता झाडी विशेष नव्हती तरी रस्ता फारच सिनिक होता फॉल कलर्स च्या वेळी इथून परत जायला पाहिजे. घाटात ट्रक्सचा स्पीड वाढला तर कंट्रोल करता यावे म्हणून साईडला चढ करून ठेवले होते. त्यावर गेले की स्पीड कमी होतो व ट्रक कंट्रोल करता येतो. महाबळेश्वर ला जसे खूप डोंगर दिसतात एकामागोमाग तसे इथे दिसतात. फरक एवढाच कि ते आपल्या बर्‍याच जवळ असतात. माझी मॆत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप गप्पा झाल्या. पत्ते खेळलो. घरचे जेवण मिळाले. तिच्या लेकीने आमची छान व्यवस्था ठेवली होती. दुसर्‍या दिवशी पुढे निघालो.

यापुढचा टप्पा जरा लांबचा होता. वाटेत दरड कोसळल्याने रस्ता बदलावा लागला. आम्ही जवळ डायरेक्शन्स ठेवल्या होत्या व आवश्यक तिथेच जी पी एस लावत होतो. काही ठिकाणी वाटेत पाट्या लावलेल्या होत्या, अमूक अमूक रस्ता घ्या त्याप्रमाणे गेलो. वेळ थोडा जास्त लागला पण पोचलो बरोबर. आम्ही सगळा प्रवास दिवसा केला त्यामुळे प्रदेश नीट बघता आला आणि एक दोन ठिकाणी रस्ता शोधायची वेळ आली तेव्हा दिवस असल्याचा फायदा झाला. बर्लिग्ट्न ला पोचलो. तिथे २-३ दिवस काकांकडे राहिलो. रिटायरमेंट होम मधली रहाणी कशी असते याचा थोडा अनुभव आला. खूप छान व्यवस्था ठेवली आहे. बर्लिंग्टन हे रेल्वे मुळे महत्व प्राप्त झालेले गाव आहे. पूर्वी इथे कॅरोलिना रेल्वेज ला जी दुरूस्ती लागे त्यासाठी सोय केली होती. नंतर रेल्वे ने हे गाव इतर बर्‍याच गावांना जोडले गेले. गोल्ड्न टो सॉक्स इथे बनतात (नुकतेच घेतले असल्याने लक्षात आले.) इतरही फॅक्टरी आउट्लेट्स होती. हेन्स चे आउट्लेट होते. थोडेफार शॉपिंग झाले. माझ्या लेकीच्या २-३ मॆत्रिणि जवळच्याच युनिव्हर्सिटीत होत्या. ती त्यांना भेटून आली. जरा आईपासून सुटका.

परत येताना वेस्ट व्हर्जिनिआत चार्ल्सटन इथे राहिलो. हे गाव छान आहे डोंगराच्या कुशीत वसलेले पण कोल माइन्स असल्याने सगळीकडे बराच धूर दिसत होता. हा रस्ता पण घाटाचा, बाजूला नदी होती. डोंगरात बर्फ होते त्यामुळे अजून छान दिसत होते. काही झाडावर बर्फाचे गोळे पडून ते कापसाच्या झाडासारखे वाटत होते. एव्हरग्रीन्स वर बर्फ पडून ती झाडॆ खूप मस्त दिसत होती. आमच्या भागात झाडांचे एकदम खराटे होतात थंडीत त्यामुळे हे वेगळे लॅंडस्केप बघायला छान वाटत होते. सगळ्या रस्त्याला ख्रिसमस डेकोरेशन केले आहे असे वाटत होते. माझ्या लेकीलाही सिन सिनरी, डोंगर एंजॉय करताना पाहून छान वाटत होते. ४-५ तास ड्राईव्ह करूनही ती फ्रेश आणि नेचर वर खूष होती. खरोखर अधून मधून अशा रोड ट्रीप्स केल्या पाहिजेत.

या गावात शिरताना आमचा जी पी एस जरा वेडा झाला. सेटींग आपोआप नो टोल रॊड वर गेले आणि आम्ही छोट्या रस्त्याने बराच प्रवास केला. थोड्याच वेळात आमच्या लक्षात गडबड आली व परत सेट केले. असे गफले अधून मधून होत होते पण आम्ही दोघी त्याने फार डिस्टर्ब झालो नाही. एक दोनदा मला जरा काळजी वाटली पण लेक निवांत होती. आजकालची तरूण पिढी बर्‍याच शांत डोक्याने, बॅलन्स्ड गाडी चालवते असे म्हणायला हरकत नाही. डायरेक्शन सेन्स चांगला असला की प्रवासात खूप कॉन्फ़िडन्स येतो हे नक्की. काही वेळा २ हायवेज बरोबर जात असले की गुगल चे एक्झिट नंबर चुकायचे पण आम्ही घरातून निघताना मॅप बघितलेला असायचा त्याचा फायदा व्हायचा. वाटेत १-२ ठिकाणी गॅस स्टेशन वर रस्ता बरोबर आहे याची खात्री करून घेतली. तिथल्या मुली एकदम हेल्पिंग नेचरच्या होत्या. ऍक्सेंट मात्र सदर्न च्या जवळ जाणारा. आपल्याकडे द्र ४० मॆलावर भाषा बदलते म्हणतात तसे इथे २-३ स्टेट नंतर ऍक्सेंट जरा बदलतो, रेस्टॉरंटस बदलतात. आम्हाला चिक फिले, क्रॅकर बॅरल रेस्टॉरंटच्या च्या खूप पाट्या लागल्या. रस्त्याने जाताना आम्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्स बघत होतो. त्या स्टेट ची महत्वाची गोष्ट नंबर प्लेट वर टाकलेली असते. अर्थात ह्या पाट्या काही वर्षांनी बदलतात.. बघायला मजा आली.अगदी कॅल्लिफोर्निया, फ्लोरिडा पासूनच्या गाड्या बघितल्या. आम्ही हिंडलो त्या स्टेटस च्या नं प्लेटस चे नमुने....








































शेवट्च ट्प्पा होता सिनसिनाटी येथे. तिथे जाताना इंटर स्टेट ऎवजी हाय वे घेतला. त्यामुळे गर्दी कमी होती आणि चक्क स्पीड लिमिट चांगली होती. त्यामुळे वेळेवर पोचलो. तिथे भावाकडे मुक्काम परत गप्पा थोडे शॉपिंग करून सकाळी परत घरी यायला निघालो. शेवट्च्या दिवशी हवा अतिशयखराब होती. स्नो एव्हढा नव्हता पण विंडी खूप होते. गाडी खूप हलत होती. अधून मधून व्हाइट आउट होत होते. वेळ आली तर मधे थांबायचे असे आम्ही ठरवले होते पण तशी वेळ आली नाही.आम्ही व्यवस्थित परतलो.

२००० मॆल जाउन आलो असे काही वाटत नव्हते. ८ स्टेटचे वेलकम बॊर्ड्स बहितले. खूप नद्या क्रॉस केल्या. एकंदर आमची रोड ट्रीप स्मरणीय झाली. थोडे थ्रिल, थोडी मजा, गावाचे ऎतिहासिक महत्व, लोकांच्या गाठी भेटी आणि निसर्गाच्या सानिध्यात अशी ही ट्रीप झाली. वाटेत भरपूर पाउस लागला, स्नो झाला, विंडी हवामान होते दरडी कोसळल्या होत्या , भरपूर घाट होते पण त्याने आमचा प्रवास कुठे थांबला नाही. फार सुंदर प्रवासाची व्यवस्था करून ठेवली आहे या लोकांनी.

No comments: