Friday, December 30, 2011

काही वाचनीय... दीपस्तंभ

काही वाचनीय... दीपस्तंभ

गेल्या महिन्यात प्रा. शिवाजीराव भोसले यांचे दीपस्तंभ हे पुस्तक वाचनात आले. पेपर मध्ये लिहिलेल्या स्तंभलेखनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तकाचे नाव, प्रस्तावना व आतील मजकूर सगळेच प्रेरणादायी वाटले. समुद्रात वाट चुकलेल्यांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो त्याप्रमाणे या पुस्तकात अशा अनेक लोकांची ओळख करून दिली आहे जे जनजागृति च्या कामात दीपस्तंभासारखे उभे होते. पेशवे कालानंतर धर्माच्या नावावर बराच काळाबाजार चालला होता तो लोकांना दाखवण्याचे काम या लोकांनी केले. अनिष्ट रूढी मोढण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले ते यात दाखवले आहे. गंमत म्हणजे अजूनही जात, धर्म या गोष्टी वापरून आपल्यावर संकटे येत आहेतच. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींची प्रस्तावना लाभली आहे ती पण वाचनीय. आजकाल व्याख्यान संस्क्रृति लोपली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला अजून चांगले वाटले.

शाळेत असताना आपण वरेच वेळा समाजसुधारकांचे कार्य अभ्यासतो पण त्यापुढे जाउन चरित्रे वाचत नाही. या पुस्तकात थोडक्यात चरित्र दिली आहेत. काही मजेदार आठवणी दिल्या आहेत. आपल्याला वाटले तर पुढे जाउन अजून वाचावे. साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, १८ व्या- १९ व्या शतकाचा काळ, बहुतेक सगळे गरिबीतून कसेबसे शिक्षण घेणारे पण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोचणारे. ब्रिटिशांचे एका बाबतीत कौतुक वाटते, जरी ते राज्यकर्ते होते तरी बुदधीला त्यांनी मान दिला. हुशार लोकांना त्याच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यास बोलावले. आणि वेळ आली तर पारितोषकाने गौरवले पण.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोषाचे बरेच खंड संपादित केले आणि आता ते मराठी विश्वकोष या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून झाली.बहुतेक सगऩ्या लोकांनी घर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, ही गोष्ट फार महत्वाची वाटते. शाळेपासूनच जर इतर घर्माबद्दल माहिती झाली तर मुलांना खूप फायदा होईल. १८०० ते १९०० हा काळ असा होता की भारतीय संस्क्रृति, मोगलांचे वर्चस्व व राज्य इंग्रजांचे... सगळ्या गोष्टी धर्माशी निगडीत होत्या. अंधश्रदधातून लोकांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते.

या पुस्तकात आलेल्या समाजसुधारकांचे विचार वेगळे होते, पण प्रत्येकाचे ध्येय एकच होते. सामान्य जनांना जागृत करणे, एकत्र करणे व चांगला समाज तयार करणे. मग ते सर्व धर्मातील मूलतत्वे एकत्र घेउन, एक परमत्त्व सर्वात आहे असे मानणारे ब्राम्हो समाजाचे राजा राममोहन राँय असोत किंवाजातिभेदाला न मानत योग, परमेश्वर चैतन्य यांना मानून आर्य समाजाचा प्रसार करणारे महर्षि दयानंद असोत. बरीच वर्षे देशाबाहेर राहून शिकलेले पण शेवटी भारतातच कार्य करणारे अरविंद योगी असोत. त्यांनी मानवाची पुढची आवृत्ती महामानव सांगितली आहे. matter, mind va supermind अशी त्यांची धारणा होती. प्रत्येकाची कल्पना आणि अभ्यास दांडगा.विश्वेश्वरअय्या यांनी केलेल्या पाण्याच्या प्रश्नांचे व्यवस्थापन आणि काढलेले अनेक कारखाने...एक माणूस किती काम करू शकतो याची कल्पना येते. बहुतेक सगळ्यांना लहानपणी भरपूर पायपीट करावी लागली पण पुढे तब्येतीसाठी फायदाच झाला. दुसरी एक गोष्ट सातत्याने द्सली म्बणजे वहुतेकांना बडोद्याच्या महाराजांनी सहाय्य केले नोकरी किंवा पैसा देउन.
जे क्रृष्णमूर्तींचा थिआँसाँफिकल विचार , स्वामी विवेकानंदांचे विचार, कर्मवीर पाटील यांची रयत शिक्षण संस्था व अगणित वसतिगृहे, शाहू महाराजांचे विचार, साने गुरूजींची तत्वे, या सगळ्याशी या पुस्तकातून ओळख होते.

गुरूदेव रानडे यांनी जी राष्ट्राच्या अवनतीची कारणे दिली आहेत ती आजही पटतात. गुरूदेव टागोरांचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह, काबुलीवालाची गोष्ट, जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेच्या वास्तव्यात घेतलेला श्रमप्रतिष्ठेचा अनुभव, जोतिबा फुले यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण याचे कार्य. साने गुरूजींनी भाषेच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.

हे पुस्तक शाळेत, इंटरनेटवर ठेवले तर जास्त मुलांपर्यंत पोचेल व त्यांना या लोकांची ओळख तरी होइल. पूर्वी लोकांच्या शिक्षणासाठी संत लोक जन्म घेत. हे सगळे आधुनिक संतच म्हणायचे. गंमत ही आहे की एवढी रत्ने जन्मली त्यांनी एवढे काम केले तरी जाति, धर्म यांच्या लढाया वाढत आहेत. धर्म, जाति व अंधश्रद्धेचा पगडा इतका घट्ट का असतो, की जो काढायला हे दीपस्तंभ अपुरे पडावेत.......

Monday, December 5, 2011

जागो मोहन प्यारे....

जागो मोहन प्यारे....

आजकाल जमाना फ्यूजन चा आहे. सगळीकडे मिलावट दिसते. वेस्टर्न गाणी, बँड यांचा मुलांवर खूप प्रभाव दिसतो. अर्थात यात त्यांचा दोष नाही. बाहेर सगळीकडे तेच दिसते, ऐकू येते व मुले अनुकरण करतात. पटकन गायक बनण्यासाठी आजकाल सगळे धडपडत असतात. स्टेज शो चे तर सगळ्यांना आकर्षण - लहान असोत की मोठे.

हे सगळे पहाताना वाटते की आपले संगीत यात हरवून तर जाणार नाही ना... आता तुम्ही म्हणाल की खूप मुले गाणे शिकतात...शिकतात हे खरे आहे पण प्रमाण कमी आहे. पूर्वी शाळेत विषय होता आता फारसा दिसत नाही. भारतात लोकांना शिकणे सोपे आहे पण बाहेरच्या देशात थोडे अवघड जाते. आजकाल स्काईप वरून शिकणे हा एक प्रकार चालू झाला आहे.

आपले संगीत शिकायला गुरू ची आवश्यकता असते. गुरू शिष्य पद्धतीवर आपले शिक्षण आधारित आहे. वेस्टर्न प्रकारात सगळे लिहून दिलेले असते. इथल्या मुलांना शाळेपासून शीट म्युझिक ची सवय असते. शाळेत वाद्य शिकणे आवश्यक असते त्या मुळे प्रत्येक मुलाला थोडीतरी जाण असते. बीट सायकल ची ओळख असते त्यामुळे ताल समजतो. लहानपणापासून बँंड, काँन्सर्ट याची शिस्त अंगात भिनलेली असते. पण गाणे जर लिहिलेले नसेल तर कळत नाही. गेली काही वर्षे इथे राहिल्याने हा फरक जाणवतो.

इथे एक म्युझिक सर्कल च्या कामात असे लक्षात आले की अमेरिकन मुले वाद्याचे कार्यक्रम आवडीने बघतात कारण त्यांना ताल कळतो. आपली मंडळी आम्हाला काही ते शास्त्रीय कळत नाही असे म्हणून यायचे टाळतात. असेच एक कलाकार गेल्या महिन्यात आले होते. त्यांनी शिकागो मधील १५ अमेरीकन मुलांना आपल्या पद्धतीने गाणे शिकवले. ५ राग व बंदिशी या नोटेशन लिहून न देता ही मुले म्हणू शकतात. त्यांना आपली गुरू शिष्य परंपरा थोडीतरी कळली आहे हे नक्की. राग भैरव मधील एक बंदिश शेअर करत आहे.

जागो मोहन प्यारे

ही मुले एक सेमेस्टर शिकली आणि छान म्हणत आहेत अगदी १०० टक्के नाही पण कौतुकास्पद आहे. र,ट आणि च हे उच्चार इथल्या मुलांना जमत नाहीत. म्युझिकल नोटेशनशिवाय म्हणले आहे हे ही कौतुकास्पद. त्यांना कोमल आणि शुद्ध हा समजावणे थोडे अवघडच पण या गुरूंनी ते करून दाखवले. या मुलांवर केलेला प्रयोग बघून इतरांना जर यात इंटरेस्ट वाटला तर काही दिवसांनी हिंदुस्तानी संगीताचे चित्र बदलेले दिसेल कारण एखादी गोष्ट पाश्चात्यांनी सांगितली की आम्हाला पटते. पिकते तिथे विकत नाही हेच खरे.