Monday, December 5, 2011

जागो मोहन प्यारे....

जागो मोहन प्यारे....

आजकाल जमाना फ्यूजन चा आहे. सगळीकडे मिलावट दिसते. वेस्टर्न गाणी, बँड यांचा मुलांवर खूप प्रभाव दिसतो. अर्थात यात त्यांचा दोष नाही. बाहेर सगळीकडे तेच दिसते, ऐकू येते व मुले अनुकरण करतात. पटकन गायक बनण्यासाठी आजकाल सगळे धडपडत असतात. स्टेज शो चे तर सगळ्यांना आकर्षण - लहान असोत की मोठे.

हे सगळे पहाताना वाटते की आपले संगीत यात हरवून तर जाणार नाही ना... आता तुम्ही म्हणाल की खूप मुले गाणे शिकतात...शिकतात हे खरे आहे पण प्रमाण कमी आहे. पूर्वी शाळेत विषय होता आता फारसा दिसत नाही. भारतात लोकांना शिकणे सोपे आहे पण बाहेरच्या देशात थोडे अवघड जाते. आजकाल स्काईप वरून शिकणे हा एक प्रकार चालू झाला आहे.

आपले संगीत शिकायला गुरू ची आवश्यकता असते. गुरू शिष्य पद्धतीवर आपले शिक्षण आधारित आहे. वेस्टर्न प्रकारात सगळे लिहून दिलेले असते. इथल्या मुलांना शाळेपासून शीट म्युझिक ची सवय असते. शाळेत वाद्य शिकणे आवश्यक असते त्या मुळे प्रत्येक मुलाला थोडीतरी जाण असते. बीट सायकल ची ओळख असते त्यामुळे ताल समजतो. लहानपणापासून बँंड, काँन्सर्ट याची शिस्त अंगात भिनलेली असते. पण गाणे जर लिहिलेले नसेल तर कळत नाही. गेली काही वर्षे इथे राहिल्याने हा फरक जाणवतो.

इथे एक म्युझिक सर्कल च्या कामात असे लक्षात आले की अमेरिकन मुले वाद्याचे कार्यक्रम आवडीने बघतात कारण त्यांना ताल कळतो. आपली मंडळी आम्हाला काही ते शास्त्रीय कळत नाही असे म्हणून यायचे टाळतात. असेच एक कलाकार गेल्या महिन्यात आले होते. त्यांनी शिकागो मधील १५ अमेरीकन मुलांना आपल्या पद्धतीने गाणे शिकवले. ५ राग व बंदिशी या नोटेशन लिहून न देता ही मुले म्हणू शकतात. त्यांना आपली गुरू शिष्य परंपरा थोडीतरी कळली आहे हे नक्की. राग भैरव मधील एक बंदिश शेअर करत आहे.

जागो मोहन प्यारे

ही मुले एक सेमेस्टर शिकली आणि छान म्हणत आहेत अगदी १०० टक्के नाही पण कौतुकास्पद आहे. र,ट आणि च हे उच्चार इथल्या मुलांना जमत नाहीत. म्युझिकल नोटेशनशिवाय म्हणले आहे हे ही कौतुकास्पद. त्यांना कोमल आणि शुद्ध हा समजावणे थोडे अवघडच पण या गुरूंनी ते करून दाखवले. या मुलांवर केलेला प्रयोग बघून इतरांना जर यात इंटरेस्ट वाटला तर काही दिवसांनी हिंदुस्तानी संगीताचे चित्र बदलेले दिसेल कारण एखादी गोष्ट पाश्चात्यांनी सांगितली की आम्हाला पटते. पिकते तिथे विकत नाही हेच खरे.

No comments: