Friday, September 25, 2009

अलास्का - भाग १


अलास्का - भाग १ - (तयारी व क्रूज बद्दल)

अमेरिकेत राहून दोन लांबच्या ट्रीप्स करायचे मनात होते. गेल्या वर्षी लग्नाचा २५ वा वाढदिवस हवाईत साजरा केला. दुसरी ट्रीप अलास्काची करायची होती. आम्ही अलास्काला जाण्याचे १ वर्षापूर्वी ठरवले. अलास्का एवढे मोठे स्टेट आहे की सगळ्या गोष्टी बघणे शक्य नव्हते त्यामुळे साधारण काय बघायचे हे ठरवून बुकींग करून टाकले. एखादी गोष्ट ठरवली की ती होते, त्यामुळे आधी जायचे बुकिंग केले नंतर उरलेला रिसर्च केला. यावेळेस क्रूज चा अनुभव घ्यायचा हे ठरले होते. हवाईला जास्त लॅंड वर राहिलो होतो इथे जास्त वेळ पाण्यावर रहायचा अनुभव घेतला.
अलास्का मध्ये ग्लेशिअर्स , सिनरी, वाईल्ड लाईफ़, डेनाली नॅशनल पार्क, नॉर्दर्न लाईट्स, गोल्ड माइन्स अशा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आम्हाल ग्लेशिअर्स बघण्यात मेनली इंटरेस्ट होता. वाईल्ड लाईफ़ पेक्षा सिनरी मध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे आम्ही ग्लेशिअर बे - इनसाईड पॅसेज वाली क्रूज बुक केली. क्रूज बुक करताना रिव्ह्यूज वर भर दिला आणि मित्रांच्या टीप्स ही होत्याच. ही ट्रीप बुक करताना खूप ऑप्शन्स आहेत जसे की वन वे क्रूज मग लॅंड आणि विमानाने परत, बोथ वेज क्रूज, पूर्ण बाय लॅंड किंवा बाय प्लेन, पुढे ट्रेन ऑप्शन पण आहेत. आम्हाला ७-८ दिवसापेक्षा जास्त रजा नव्हती म्हणून आम्ही इनसाईड पॅसेज वाली क्रुज बुक केली. एका ट्रॅव्हल एजंट ने सांगितले की तुम्हाला खूप कंटाळा येईल पण अजिबात आला नाही. ८ दिवस कुठे गेले कळले नाही. जर व्हॅंकूव्हर, स्कॅगवे, (तिथून ग्लेशिअर बघणे)- मग ऍकरेज व पुढे ट्रेन ने डेनाली नॅशनल पार्क करून फ़ेअरबॅंक ला गेलो तर एका दगडात बरेच पक्षी मारता येतात. ( ग्लेशिअर्स, वाईल्ड लाईफ आणि डेनाली पार्क ). बरोबर नकाशा दिला आहे.

अलास्का मध्ये मे ते सप्टेंबर मेन टूरिस्ट सिझन आहे. आमची १३ सप्टेंबर शेवटची क्रूज होती. मला बर्‍याच लोकांनी वेड्यात काढले - इतक्य़ा उशीरा का जाता? उन्हाळ्यात जास्त वेळ डे लाईट असतो. पण मी एकंदर टेंपरेचर ची रेंज पाहिली तर फार फरक नव्हता ५-१० डिग्रीज...आणि मिडवेस्ट मध्ये राहिल्याने थंडीची सवय होतीच त्यामुळे ५५-५९ या टेंपरेचरचा त्रास झाला नाही. इथली हवा तशी लहरी आहे त्यामुळे मदर नेचर वर सगळे अवलंबून त्यामुळे थोडी रिस्क घेतली आणि त्याचा एक फायदा झाला म्हणजे फॉल कलर्स बघायला मिळाले.
आम्ही क्रूज च्या एक दिवस आधी निघायचे ठरवले. त्या दिवशी सिऍटल मध्ये फिरायचे ठरवले होते. माझी एक कॉलेज मेत्रिण आम्हाला सिऍटलला भेटणार होती. ते लोक ह्युस्ट्न हून येणार होते. आमची फ्लाईट ब्लुमिंग्ट्न- शिकागो-सिऍटल अशी होती. निघताना हवा छान होती पण शिकागोला उतरता आले नाही कारण व्हिजिबिलिटी पुअर, मग पिऒरिआला उतरवले. तिथून परत शिकागो तिथून सेंट लुईस व तिथून सिऍटल असे रात्री ११ ला एकदाचे पोचलो. सकाळी ११ ला पोचणार होतो. (१५० मॆलाच्या एरिआत ६ ते ३ पर्यंत फिरत होतो) शिकागोला अक्षरशः दर १/२ मिनिटाला एक विमान उतरत होते आणि एक उडत होते. ३ विमाने एका वेळी पॅरलली उतरत होती. हॅटस ऑफ टॊ कंट्रोल टॉवर पीपल. आश्चर्य म्हणजे सिऍटलला पोचल्यावर कंटाळा न येता एकदाचे पोचलो म्हणून हुश्श झाले. तिथे एका फॅमिली कडे राहिलो.(मॆत्रिणिची मॆत्रिण) बर्‍याच गप्पा झाल्या. सकाळी उठून चहा पोहे खाउन डाउनटाउन बघायला गेलो. थॅंक्यू कांचन(आणि फॅमिली) फॉर पाहुणचार.

सिऍटल डाउन्टाउन छान आहे. एकंदरीत गाव आवडले. खूप मोठे नाही खूप छोटे नाही. आपल्याकडच्या हिल स्टेशन सारखे वाटते. रस्ते चढ उताराचे आहेत. ब्लूमिंग्ट्न मध्ये राहिल्याने अशा जागा जास्त आवडतात कारण ब्लूमिंग्ट्न मध्ये डोंगर अजिबात नाहीत. सिऍटलच्या पावसाळी हवेबद्दल खूप ऎकले होते पण आम्हाला मस्त उन मिळाले. जर तुमच्याकडे २ दिवस वेळ असेल तर सिऍटल च्या आजूबाजूला बघायला माउंट रेनिअर, धबधबा, कूली डॅम अशा अनेक गोष्टी आहेत. सिऍटल नीडल, म्युझिअम्स या एरिआत फिरून क्रूज टर्मिनलला गेलो. उन असेल तर बॅकड्रॉपवर माउंट रेनिअर छान दिसत रहातो. गावात फिरतानाही अधूनमधून पाणी भेटत रहाते.

आता थोडे क्रूजविषयी. १९०१ साली पहिली क्रूज अलास्काला गेली. अर्थात ती साधी होतीच . आम्ही नॉर्वेजिअन क्रूज बुक केली.होती. बर्‍याच क्रूज कंपन्या सतत वेगळ्या तर्‍हेने मार्केटिंग करत असतात. या शिपबद्द्ल २-३ जणांकडून चांगले ऎकले होते त्यामुळे आम्ही हे बुकिंग केले. सिनरीसाठी बाल्कनी वाली केबिन घेतली आणि त्याचा फार उपयोग झाला. सुरूवातीला वाट्ले की जरा जास्त पॆसे देतोय पण इट वॉज वर्थ. आम्ही टर्मिनलवर पोचल्यावर लगेच आमचे सामान त्यांनी ताब्यात घेतले. थंडीसाठी बरेच कपडे घेतेले होते त्यामुळे बॅग्ज जड होत्या - अर्थात ते सगळे कपडे उपयोगी पडले. त्यानंतर व्हिसा पासपोर्ट फॊटॊ सगळॊ नाटके पार पडून आम्ही आत गेलो. ग्रीनकार्ड वाल्यांना व्हिसा लागत नाही असे सांगितले होते पण प्रत्यक्ष तिथे एन्टर झाल्याशिवाय विश्वास बसत नाही. बहुतेक सगळे ’सिटीझन’ होते. सिटीझनशिप घेण्यात हा एकमेव फायदा दिसतो - कुठेही व्हिसा लागत नाही.
शिपवर गेल्यागेल्या ड्रींक ने वेलकम झाले. लगेच मंडळी डायनिंग रूम कडे वळली. बुफे एकदम रिच होता. तोवर सामान केबिन मध्ये येउन पडले होते. आम्ही ९व्या मजल्यावर मिडशिप वर होतो. गेल्यागेल्या त्यांनी एक छोटा मॅप दिला होता. त्यात कुठे काय आहे हे दाखवले होते. तरीसुद्धा पहिले २ दिवस आम्ही चुकत होतोच. बोटीत तुम्ही एकदा आतल्या भागात गेलात की तुमचा डायरेक्शन्चा सेन्स जातो कारण बाहेरचे काही दिसत नाही. तरी प्रत्येक मजल्यावर पाट्या लावलेल्या होत्या. बर्‍याच ठिकाणी माशांचे चित्र होते मासे ज्या दिशेला जात होते तो बोटीचा पुढ्चा भाग असे कन्वेन्शन होते. या चुकामुकीचा एक फायदा झाला म्हणजे चालणे भरपूर व्हायचे. एकंदर २७०० पॅसेंजर्स व ११०० चा क्रू असे हे खटले होते. एखादे छोटे गाव पाण्यावर तरंगते आहे असे वाटायचे.

१०० एक देशांचे लोक कामावर होते. इतक्या नॅशनॅलिटीज एकत्र काम याच इंडस्ट्री मध्ये करत असावेत. इंडिअन क्रू खूप होता. होटेल मॅनेज्मेंट कोर्स केलेली काही मराठी मुले भेटली त्यांना अगदी टेबल पुसणे. डिश उचलणे अशीच कामे होती. कोर्स करताना त्यांना कधी वाटलेही नसेल की असे काम करावे लागेल, पण ५ वर्षात सेव्हिंग भरपूर होते म्हणून काम करत होती. शिवाय जॉब मिळवण्यासाठी एजंटला ५०-६०००० रू मोजले होते. वर्षातले ८- ९ महिने रोज १० तास अशी ड्यूटी असते. फायदा एकच म्हणजे जग बघता येते व वर्षाला १०००० डॉलर्स सेव्हिंग होते. पण अधून मधून सुट्टी नाही मिळत अशी सगळ्यांचीच तक्रार होती. या लोकांचे रहाणे, खाणे हे पण इतरांपेक्षा वेगळे असते. बोटीवर बरीच रेस्टॉरंटस होती. बेसिक तिकीटात ३-४ कव्हर केलेली होतॊ बाकीसठी वेगळा चार्ज होता. एकंदरीने खाण्याचे खूप लाड होते. इंडिअन पदार्थ पण चक्क तिखट बनवायचे. सॅलड्स ची तर चंगळ होती आणि स्वीटस...तुम्ही कंट्रोल करू शकणार नाही अशी छान डेकॊरेट करून ठेवायचे. साधारण प्रत्येक जण २-३ स्वीटस तरी खायचाच. एकेदिवशी चॉकलेट बफे होता. डेकोरेशन वॉज सुपर्ब. लोक वेस्ट मात्र खूप करत होते. क्रूज वाले मेन फायदा ड्रींक्स वर काढतात. लोक सुट्टीच्या मूड मध्ये एवढे पीत होते आणि पॆसे उडवत होते की बस...कुठेही रिसेशनचा मागमूस नव्ह्ता मला वाटले होते की शिप पूर्ण सोल्ड आउट तरी असेल की नाही.... पण इथे बुकिंग फुल होते ...पॆसा उतू जात होता. तसेही ही मंडळी व्हेकेशन वर असली की पॆसे उधळत असतात.

आमची केबिन चांगली होती. ईंटरनेट वर कितीही चित्रे बघितली तरी प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास नसतो. क्लोजेट मध्ये दोन्ही बॅग्ज रिकाम्या झाल्या आणि आमचे ८ दिवसांचे घर सेट झाले. रोज रात्री टॉवेल चे छान प्राणी करून ठेवत. संध्याकाळी एंटरटेनमेंट प्रोग्रॅम असे. कॉमेडी शॊ वाला डेव्हिड खूप मजेशीर होता त्याने अगदी बोटीतल्या साध्या गोष्टींवर भाष्य करून लोकांना पोट दुखेपर्य़ंत हसवले. सोपी गोष्ट नाही. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने अनुभव घेतल्याने लोक रिलेट करू शकत होते. ११०० लोक १ तास नुसती ह्सत होती. शॉवर, जेवण, केबिन , व्हेल वॉचिंग अशा साध्या गोष्टींवर तो कॉमेंट करत होता. आम्ही अजूनही आठवून हसतो.’टेक्सास’ वर प्रत्येक जण कॉमेंट्स करत असे..मला वाट्ते अलास्का टेक्सास हून मोठे आहे म्हणून असेल... बाकीचे व्हेगास स्टाईल प्रोग्रॅम्ही छान होते. डान्सेस छान कोरिऒग्राफी केलेले होते. ज्या दिवशी डान्स प्रोग्रॅम नसे तेव्हा याच मुली ज्युवेलरी शॉप्स मध्ये असत. प्रत्येकाला १० तास काम करावेच लागे. या सगळ्या मागचे प्लानिंग व स्टोरेज याबद्द्ल एक दिवस प्रेझेंटेशन दिले. खूप मोठा पसारा होता. एके दिवशी जगलिंग चा प्रोग्रॅम होता मला वाटले नेहेमीचेच असणार पण त्यांनी खूप वेगळे प्रकार दाखवले. दोनच मुले होती पण सॉलिड एनर्जी होती त्यांच्यात आम्हाला बघूनच दमायला झाले. लाइव्ह पियानो, गाणी व व्हायोलिन संध्याकाळी चालू असे. बाकी जिम, स्विमिंग पूल डान्स क्लब बास्केट बॉल, मोठ्या स्क्रीनवर वी, बोलिंग, ड्युटी फ्री शॉपिंग, कॅसिनो, बार, नाइट क्लब हे सगळे प्रकार होतेच. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काहीतरी मिळायचेच. रोज रात्री दुसर्‍या दिवशीचा प्रोग्रॅम येत अस त्यामुळे प्लॅनिंग सोपे पडे. एकंदरीने छान प्लॅनिंग होते. रूम मध्ये आदल्या दिवशीचे गेम शो, मूव्हीज न्यूज सतत चालू असे. कॅप्ट्न व रेंजर या दोघांची प्रेझेंटेशन्स वर्थ वॉचिंग होती.

परत आल्यावर इथले पाइक प्लेस हे फार्म्रर्स मार्केट पाहिले. खूप छान होते. फुले, फळे , बेकरीज, चीज व माशांचे नाना प्रकार. सगळे फ्रेश. बरेच काही घ्यावेसे वाटत होते पण परत प्रवास करायचा होता म्हणून सिताफळ व अंजीर घेतले.(मिड्वेस्ट मध्ये मिळत नाहीत) हिरवे अंजीर मस्त होते. तुम्ही गेलात तर जरूर भेट द्या या बाजाराला.
आमचा (एन सी एल पर्ल) क्रूजचा पहिला अनुभव तर छान होता.

No comments: