Tuesday, September 29, 2009

अलास्का - भाग २ -

अलास्का- ( इनसाइड पॅसेज, जुनो व स्कॅगवे)

आम्ही इनसाईड पॅसेज वाली क्रूज बुक केली होती. हा अलास्काचा साउथ इस्ट भाग आहे. अजून ३-४ दिवस असतील तर ऍकरेज व डेनाली पार्क ही करता येते. सिऍटल- इनसाइड पॅसेज, जुनो, स्कागवे, ग्लेशिअर बे नॅशनल पार्क, केचिकन, व्हिक्टोरिआ(ब्रिटीश कोलंबिया) व परत सिऍटल असा हा प्रवास होता.

इनसाईड पॅसेज- सिऍट्ल पासून इनसाइड पॅसेज घेतला की रफ समुद्र टाळता येतो त्यामुळे क्रूज शिप्स, कयाक, कार्गो शिप्स हा मार्ग घेतात. दोन्ही बाजूला छोटी बेटे, डोंगर व सुंदर झाडी आहे. हवा बहुधा पावसाळी असते, ढग खाली उतरलेले दिसतात. पाण्याच्या एवढ्या जवळ स्नो व ढग जनरली बघायला मिळत नाही. एकंदर वातावरण मस्त...अधून मधून डॉल्फिन्स, व्हेल्स सी गल्स दिसतात. या पॅसेजने ग्लेशिअर बे ला जाउन टाइड वॉटर ग्लेशिअर्स बघता येतात. निघाल्यापासून २ दिवस सलग बोटीवर होतो. सगळ्या गोष्टी माहित करून घेणे, एंटरटेनमेंट, या मध्ये छान वेळ गेला. सकाळी उठल्यावर २-३ तासांनी दोन्ही बाजूला स्नो कॅप असलेले डोंगर व खाली आलेले ढग दिसत होते. तळाशी झाडी पण खूप होती. अधून मधून धबधबे दर्शन देत होते. एकंदरीत आपण निसर्गाच्या खूप जवळ गेल्यासारखे वाटते. नुसताच सगळीकडे समुद्र दिसत नाही. भरपूर फोटो काढले गेले. थंडी पण फार नव्हती.

जुनो- दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजता जुनोला पोचलो. ही अलास्काची कॅपिटल सिटी. छोटेसे टुमदार गाव आहे. बोट अगदी डोंगराच्या कुशीत थांबल्यासारखी वाटते (इतकी डोंगराच्या जवळ थांबते) जुनो हे पाण्याने व हवाईमार्गाने जोडलेले आहे. गोल्ड रश मध्ये काम केलेल्या जुनो नावाच्या माणसाच्या नावावरून हे नाव पडले. इथे काही मंडळी व्हेल वॉचिंग ला गेली. इथल्या मेंडेनहॉल ग्लेशिअरला ड्राईव्ह करून जाता येते व बघता येते. आम्ही ग्लेशिअर वर हेलिकॉप्टर राईड बुक केली होती. बोटीतून उतरलो तेव्हा रिमझिम पाउस होता त्यामुळे वाटले की आता जाता येणार नाही पण इथे पाउस सतत असतो. व्हिजिबिलिटी नसली तर प्रॉब्लेम येतो. बसने आम्ही टेमस्कॊ हेलिकॉप्टर्स च्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे ६ लोकांचे ग्रुप बनवले. शूज वरून घालायला कव्हर्स दिली त्यामुळे स्नो वर घसरायला होत नाही. माझा हेलिकॉप्टरचा हा पहिलाच अनुभव. अगदी छोटे हेलिकॉप्टर होते. (वजन जास्त असेल तर दीडपट तिकीट पडते.) हेलिकॉप्टरला सगळीकडून काचेच्या खिडक्या. बरेच हालत होते आणि खाली दरी, डोंगर दिसत होते. नाही म्हटली तरी थोडी भिती वाटलीच. हवेतील तपमानाच्या बदलामुळे हेलिकॉप्टर बरेच हलते ही थिअरी माहित होती तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर जरा घाबरायला होतेच. काही लोक म्हणतात कशाला आपलेच पॆसे देउन भिती विकत घ्यायची? पण त्याशिवाय काही चांगल्या गोष्टी बघता येत नाहीत.

खाली ग्लेशिअरचे छान दृष्य दिसत होते. छोटे सुळके, रस्ते, आणि भरपूर स्नो दिसत होता. आमच्याबरोबर अजून ६ हेलिकॉप्टर्स उतरली. चालवणारी सगळी अगदी लहान (२५-३०) मुले होती. तिच माहिती सांगत होती. वरती कडक स्नो होता. चांगली गोष्ट म्हणजे तो घसरत नव्हता. दोन बाजूला डोंगर , मागून आलेले ग्लेशिअर व पुढ्ची दरी ..फार छान स्पॉट होता. वरती निळ्या रंगाच्या छटा मस्त दिसत होत्या. पाणी पण निळे दिसत होते. अधून मधून क्रिव्हासेस दिसत होत्या. त्याच्या आत डोकावले तरी निळया रंगाचे पाणी किंवा निळा रंग दिसत होता. १०० फूट आतपर्यंत बघता येते. पहिल्यांदाच हा निळा रंग स्नोमध्ये बघितला. ही ग्लेशिअर्स तयार होताना आजूबाजूच्या डोंगरातील माती त्यात मिक्स होते त्यामुळे काही ठिकाणी खडी मिक्स झालेली दिसते. आमचा मित्र म्हणाला हिमालयन ग्लेशिअर्स फार सुंदर आहेत, हे मळके आहे...पण आम्ही हिमालयात कुठे ट्रेक करत जाणार? इथे ग्लेशिअर्स रिचेबल आहेत. एका बाजूला मस्त वॉटर फॉल होता. मागच्या बाजूला बर्फाचे छोटे सुळके दिसत होते आणि त्यातूनही निळा रंग डोकावत होता. ही राईड बर्‍या पॆकी महाग होती पण वर्थ इट.

ग्लेशिअर बद्द्ल थोडेसे- ग्लेशिअर म्हणजे बर्फाची नदी. हे मुव्हिंग असतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी भरपूर बर्फ पडतो आणि त्याचे थर एकावर एक साठत जातात, खालचा बर्फ दबला जातो. बर्फाच्या वजनामुळे आतली हवा पण निघून जाते आणि कॉम्प्रेस्ड बर्फाचे थर तयार होतात. असे बरीच वर्ष चालू असते. ग्रॅव्हिटी आणि वजन यामुळे ही ग्लेशिअर्स पुढे सरकतात. खालचा खडक, उतार याचाही परिणाम होतो. दबलेल्या बर्फाचे स्ट्र्क्चर असे तयार होते की निळा रंग ऍबसॉर्ब होत नाही त्यामुळे ही ब्ल्यू शेड आईस वर दिसते. आमचा गाइड असे बरेच काही सांगत होता पण सगळे पांगले व फोटो घेण्यात मग्न झाले. काही ठिकाणी बर्फ आणि दगड यांचे मिक्श्चर होते व अगदी मळकट असे ग्लेशिअर्स ही तयार झालेले पाहिले. ३०-४० मिनिटानी परत गावात गेलो. मग थोडे शॉपिंग झाले. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

स्कॅगवे- इथे आमच्या क्रूजचा सगळ्यात जास्त वेळ स्टॉप होता. सकाळी युकॉन साइट्स बघण्यासाठी बस बुक केली होती. इथे व्हाइट पास रेल्वे खूप लोक पसंत करतात पण त्यात मधे उतरू देत नाहीत आणि ट्रेन राइड चे पॆसेही फार आहेत. आम्ही बस ची टूर घेतली. ही बस युकॉन टेरिटरीत घेउन जाते. आपण बॉर्डर क्रॉस करून कॅनडात जातो त्यामुळे अमेरिकन सिटीझन/ ग्रीन कार्ड सोडून सगळ्यांना व्हिसा लागतो. बॉर्डर वर एक अगदी रुक्ष चेहेर्‍याचा माणूस येउन पासपोर्ट बघून गेला. ही माणसे चेहेरा असा ठेवण्याचे ट्रेनिंग घेतात कि काय कुणास ठाउक? आमचा बस ड्रायव्हर टॉम हाच आमचा गाईड होता. गेली २५ वर्षे तो या रस्त्यावर बस फिरवतो म्हणून खडा न खडा माहिती होती त्याला. त्याला इंडिया ची थोडी माहिती होती. हिमालय, बॉलीवूड, आणि चिकन टिक्का हे परवलीचे शब्द आम्हाला त्याने म्हणून दाखवले व इंडियात तो गेला होता हेही सांगितले. त्याची पूर्ण बस एकदा म्हणे अंबानींनी बुक केली होती. ते खूप श्रीमंत आहेत असेही सांगून झाले. फोटोग्राफीही त्याची छान होती. एकंदरीत बर्‍याच देशांचे पाणी प्यायलेले बिनधास्त व्यक्तिमत्व होते टॉम म्हणजे. इथले ड्रायव्हर्स/ गाईडस स्पेशल स्किल सेट वाले असतात. जोक्स सांगून , माहिती सांगून तुमचा प्रवास अजिबात कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतात. त्याचे स्पेशल ट्रेनिंग घेतात बहुतेक.

अलास्का गोल्ड रश -१८८० च्या सुमारास गोल्ड रश ची सुरूवात झाली. क्लॉंडिके रिव्हर जवळ काही लोकांना सोने सापडले. ही बातमी फार काळ लपून राहिली नाही. अमेरिकेत ती मेडियाने पसरवली. बाहेर देशात ही ती पसरली. लगेच लोकांनी धाव घेतली पण इथे पोचणे सोपे नव्हते. रस्ता अतिशय अवघड (दर्‍या, डोंगर) हवामान अतिशय थंड आणि त्यात लोकांची गर्दी. प्रत्यक्ष जागेपर्यंत फार थोडे पोचले आणि पोचल्यावर कळले बहुतेक सगळे सोने संपलेले होते. सुरूवातीला ज्यांना मिळाले ते श्रीमंत झाले. युकॉन टेरिटरीतून व्हाइट पास किंवा चिलकूट पास पार केल्याशिवाय गोल्ड च्या भागात पोचता येत नसे. हजारो लोकांनी प्रयत्न केले त्यातले थोडे पोचले पण बरेच अर्ध्यातून परत आले, चेंगराचेंगरीत मारले गेले. त्यावेळेस डोंगरातल्या अवघड वाटावरून लोकांना सामान नेणे अतिशय कठिण होते म्हणून इथे रेल्वे (युकॉन व्हाइट पास रेल्वे) सुरू केली. हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल मानले जाते. ३००० फूट केवळ २० मॆलात ही ट्रेन चढते. वाटेत पूल, बोगदे बरेच आहेत. रेल्वेचे बांधकाम होईपर्यंत गोल्ड रश थंडावला होता. नंतर टूरिस्ट लोकांचे ते एक आवडते ठिकाण बनले.

आमच्या क्रूजवरूनही बर्‍याच लोकांनी रेल्वेची ही राईड घे्तली. आम्ही मात्र रस्त्याने व्हाइट पास पर्यंत गेलो तिथून कॅनडात प्रवेश केला. वाटेत सुंदर फॉल कलर दिसले. डोंगर, त्यावर उतरलेले ढग आणि तळाशी बर्‍याच वेळा लेक्स पसरलेली. लेक तुत्शी ला तर ४०० मॆलाचा किनारा आहे.







एक एमराल्ड लेक ही पाहिले. अक्षरशः पाचूच्या रंगाचे पाणी होते मी फोटो पाहिले होते पण प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास नव्हता. त्या दिवशी आम्ही निसर्गात केवढे रंग बहितले! डोंगरावर एव्हरग्रीन च्या मध्ये अस्पेन ची भरपूर झाडे लावली आहेत. सगळ्या डोंगरावर हिरव्या पिवळ्या रंगाची उधळण होती. डोळॆ अक्षरशः तृप्त झाले. फोटोत तेवढे छान रंग पकडता येत नाहीत. जाताना गोल्ड रश ची कहाणी तोंडी लावायला होतीच. याच रस्त्यावरून पूर्वी सोन्याच्या मागे लोक धावले होते. पूर्वी रस्ते नसताना त्यांना किती अडचणी आल्या असतील याची थोडी कल्पना आली. वाटेत एक अगदी सुरूवातीची गोल्ड माइन दाखवली अगदी जुनाट दिसत होती. मध्ये बंद होती पण आता परत चालू केली आहे. अधून मधून माउंट्न गोटस बायनॉक्युलर मधून बघितले. एवढ्या उंचावर ही जनावरे कशी जातात कुणास ठाउक. कारक्रॉस नावाच्या गावापासून आम्ही परत फिरलो. अगदी छोटेसे गाव पण टुरिस्ट सेंटर मध्ये नकाशे व माहिती इतक्या प्रमाणात होती कि बास. आणि सगळे मोफत. वाटेत एक अगदी छोटे वाळवंट पण पाहिले तेवढेच कसे तयार झाले माहित नाही. लंचला एका घरगुती ठिकाणी थांबलो. फॅमिली बिजिनेस होता. कुठे इंटिरिअर मध्ये राहून बिजिनेस करत होते...आमची खाण्याची सोय मात्र चांगली झाली.

दुपारी ३ पर्यंत परत आलो मग मी व माझी मॆत्रिण शॉपिंग मध्ये घुसलो आणि बरीच खरेदी झाली. शेवट्ची ट्रीप म्हणून बरेच सेल होते. प्रत्येक दुकानात काहीतरी बारीक गोष्ट फ्री देतात त्या आम्ही लहान मुलींसारख्या गोळा केल्या. दोघींचे नवरे बरोबर नव्हते म्हणून अजून मजा आली. परत क्रूजवर जाउन संध्याकाळी प्रोग्रॅम बघितला व पुढ्च्या प्रवासाला लागलो.

No comments: