Monday, April 5, 2010

अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)
अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)

(फोटोवर क्लिक केल्यास मॊठे दिसतील)

दुसर्‍या दिवशी सकाळी माउंट अबू सोडले. घाट उतरताना रस्ता खूप छान होता. वाटेत बरीच वानरसेना काही खाद्य मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला बसली होती. एका ठिकाणी पाटी होती ’माकडांना खायला घालू नका’ आणि त्याशेजारीच ३-४ माकडे बसली होती. कोणीतरी म्हटले, ’काय पाटीशेजारीच बसली आहेत’, (काय करणार अजून माकडांना वाचता येत नाही ना..) लोकांना कितीही सांगितले कि माकडांना खायला घालू नका तरी लोक ऎकत नाहीत त्यामुळे ही सगळी सेना अशी खाण्याची वाट बघत बसते. घाट उतरल्यावर हवा बदललेली जाणवली.

पुढचा मुक्काम राणकपूर येथे होता. हे ५००-६०० वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे. त्यात १४४४ खांब आहेत. प्रत्येक खांब दुसर्‍याहून वेगळा आहे. असे म्हणतात कि हे खांब मोजता येत नाहीत. बहुतेक जिथे जिथे खांब असतात तिथे असेच सांगतात कि हे खांब मोजता येत नाहीत...कारण काही कळत नाही. हे मंदिर अरवली च्या जंगलात एका छोट्या गावात आहे.जाताना घाट बर्‍यापॆकी अवघड होता. बाजूला जंगल. पावसाळ्यात हा भाग खूप छान दिसतो. हे देउळ इतक्या आत का बांधले असावे असा आम्ही विचार करत होतो, तिथल्या पुजार्‍याने सांगितले की लोकल लोकांनी बांधले आहे. राणा कुंभाच्या काळात हे देउळ बांधले असे म्हणतात. आम्ही पोचल्यावर कळले की इथे फोटॊ काढता येतात. बरे वाटले. ज्या लोकांनी शॉर्ट्स, स्कर्ट घातले होते त्यांना अडवले. पूर्ण कपडे रेंट वर मिळण्याची सोय होती ते घालून आत जाउ दिले. ही माहिती इंटरनेट वर ठेवायला पाहिजे. बरेच गोरे पांढर्‍या कफ्न्या घालून हिंडत होते. मला व्हॅटिकन सिटी ची आठवण झाली. तिथेही असेच अडवले होते आणि पर्यायी व्यवस्था काही नव्हती.
आत गेल्यावर एक गाइड घेतला..एक १३-१४ वर्षाची मुलगी होती. चांगली माहिती दिली. तिथे ३ कुटुंब आहेत. वर्मा, शर्मा व पुरोहित. त्यातलेच लोक गाईड चे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत. बघा टूरिझम मुळे निदान काही लोकांची उपजिविकेची सोय झाली आहे. या देवळाच्या आर्किटेक्ट्चा पुतळा एका खांबावर आहे. हे त्या गाईडने सांगितले म्हणून कळले. कोरीव काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खांब, छतावरचे ३ डी काम, मधले चॊक फारच सुंदर ...हे बघू का ते असे चालले होते. आतमध्ये मार्बल मुळे गार वाटत होते. आपल्याला एक फूल काढायचे म्हटले तर सिमेट्रीकल काढता येत नाही, इथली डिझाईन्स कशी केली असतील हा प्रश्न पडतो. या लोकांनी इतक्या पूर्वी ते मार्बल नेले, कोरीव काम केले आणि मुसलमानांपासून जपले......ग्रेट. पूर्वीच्या राजे लोकांच्या मध्ये स्पर्धा असेल कोण किती चांगल्या वास्तू बांधतो त्यामुळे आज आपण इतकी चांगली मंदिरे बघू शकतो. इथली ३-४ डिझाईन्स प्रसिद्ध आहेत. एक १०८ साप व त्याच्या एकमेकात गुंतलेल्या शेपट्या....


एका ठिकाणी ५ धडे व एकच चेहेरा त्याला आहे..हे पुन्हा जोडताना त्याचा ऍंगल चुकला आहे. पूर्वी कुठुनही पाहिले तरी तो चेहेरा त्या शरीराचा वाटे. कारागिरांनी इथे बर्‍याच करामती केल्या आहेत.... बरे त्या

मनाने गाजावाजा कमी...लोकांची प्रसिद्धी साठी केवढे ्प्रयत्न चालतात त्यामानाने इथे साधेपणा जाणवला. लोक इथे दान देतात. पुण्यातून आम्ही आलो म्हटल्यावर रांका जुवेलर्स चे खूप कॊतुक करत होते त्यांची इथे बरीच मदत आहे. पण आश्चर्य म्हणजे गवगवा नाही (आजकालच्या मी पणाच्या काळात.) आमची बरीच फोटॊग्राफी झाली. अर्थात प्रत्यक्ष आणि फोटॊ यात खूप फरक पडतो.
नंतर पोट्पूजेसाठी बाहेरील खानावळ गाठली. इथे जेवण फुकट पण स्वच्छ्तेचे २५ रू चार्ज करतात. साधे पण चांगले जेवण होते. शिस्त होती. पानात टाकू नका असा आग्रह होता. तिथून बाहेर पडल्यावर dari काम बघण्यासाठी थांबलो. सरकार या लोकांना ही कला चालू ठेवण्यासाठी मदत करते. एका खेड्यात ८०-९० घरात हे का चालते. नॆसर्गिक रंग व हाताने विणलेल्य़ा सतरंज्या बघण्यासारख्या होत्या. इथे थोडी खरेदी झाली. एकंदर मांडणी चांगली होती त्या जागेची. एक सतरंजी विणण्यामागे किती कष्ट असतात हे बघितले.

आम्ही गेलो ते होळी नंतरचे दिवस. राजस्थानात महिनाभर हा उत्सव चालतो. आपल्याकडे जशी गणपतीची वर्गणी गोळा करतात तशी इथे होळीची. इथले आदिवासी लोक दगड, काटेरी झुडुपे लावॊन रस्ते अडवतात. आणि १०-२० रू. मागून घेतात. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर कटकट वाटायला लागली. या गोष्टी कडे पोलिस पूर्ण दुर्लक्ष करतात. आपण गाडी दगडांपासून वाचवण्यासाठी पॆसे देत जातो....हा सिझन सोडून जाणे हा सोपा उपाय, कारण ते काही बदलणार नाहीत. इथे नव्यानेच डोंगर खोदून रस्ते केले आहेत त्यामुळे रस्ते अडवायला दगड भरपूर. या सगळ्या गोंधळात आमचे टाइम टेबल चुकायला लागले...स्पीड कमी पडू लागला. या सगळ्यात कुंभळगड चा विचार सोडावा लागला. ही जागा बघण्याचे फार मनात होते. रोहन यांच्या ब्लॉगवर वाचले होते आणि फोटो ही बघितले होते. पण या होळी च्या अडवणूकीमुळे विचार बदलला. (मुलीची तब्येत ही जरा बिघडली). चितोडगड बघणार आहोत मग हा नाही बघितला तरी चालेल असे ड्रायव्हरचे म्हणणे ...मला मात्र रूखरूख लागली इतक्या जवळ जाउन त्या होळी वाल्यांमुळे बघता आला नाही म्हणून.

या पुढचा मुक्कम होता प्रसिद्ध हल्दी घाटीचा. या बद्दल आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले असते त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करू शकत होता. महाराणा प्रताप ची लढाई , चेतक घोडा या सगळ्याबद्द्ल एक फिल्म दाखवतात. तिथे एक म्युझिअम आहे - बघण्यासारखे आहे. प्रत्यक्ष युद्धाचे चित्र मॉडेल रूपात मांडले आहे. पन्ना दाईची गोष्ट व इतर काही प्रसंग छान उभे केले आहेत. चेतकची समाधी बघता येते. इथे आल्यावर कळले की चेतक ही घोड्याची जात आहे घोड्याचे नाव नाही.चेतक व नाटक अशा २ जाती होत्या. चेतक घोड्याला लढताना हत्तीची सोंड लावत म्हणजे समोॠन येणारा हत्ती त्याला इजा करत नसे. त्यामुळे इथल्या चित्रात नेहेमी चेतकला हत्तीची सोंड दिसते.
इथे एक डोंगरात घाटी दाखवतात. तिथली माती पिवळी दिसते ज्यामुळे हे नाव पडले पण खरी घाटी जरा वेगळी कडेच आहे. आमच्यापॆकी एकाने पूर्वी ही जागा बघितली असल्याने त्यांच्या हे लक्षात आले. तिथे जवळच जुना रस्ता व घाटी दिसते. लोकांना काहीतरी बघायला मिळावे म्हणून ही नवीन घाटी दाखवतात...हा खोटेपणा करण्याचे खरे म्हणजे काहीच कारण नाही. असो.
हल्दी घाटीचे अजून एक वॆशिश्ट्य म्हणजे इथे गुलाबाची खूप लागवड होते. हा प्रदेश इतका रुक्ष दिसतो कि इथे गुलाब होत असतील हे वाटत नाही. आम्ही गुलकंद व सरबताची खरेदी केली. तिथेच त्यांची साधी मशिनरी होती (एक मोठा रांजण , गॅस इ) या गोष्टी नेट वर असल्याने माहित होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणायचा आपको तो सब पहलेसे पता हॆ..(थॅंक्स टू ट्रिप ऍडव्हायझर रिव्ह्यूज...)

हल्दी घाटीतून निघून उदयपूरला पोचेपर्यंत रात्र झाली. तिथे रामप्रसाद व्हिला त चेक इन केले. हॉटेल छान आहे फक्त लिफ्ट नाही. आमच्या रूम्स ३र्‍या मजल्यावर होत्या. बाजूला टेरेस व समोर लेक आणि त्यामागे टेकडी...छान सिट्यूएशन होती. कुणाचे तरी घर कन्व्हर्ट केले आहे हॉटेल्मध्ये. सगळीकडे मार्बल, कमानी, डेकोरेशन छान होते. रात्री समोरच्या टेकडीचा रस्ता लाईटेड दिसे. एकंदर रात्री दमून आल्यावर गच्चीत थांबले की छान देखावा दिसायचा.

(क्रमशः)

No comments: