Monday, March 29, 2010

अनंत हस्ते कमलावराने....(१)...(अहमदाबाद-माउंट अबू)

’अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ यात थोडासा बदल करून ’बघता किती बघशील दो नयनाने’ असे उदयपूरच्या ट्रीप नंतर म्हणावेसे वाटले.

या वेळी भारतात गेल्यावर माउंट अबू व उदयपूर अशी ६ दिवसांची ट्रीप केली. जाताना तिथली टेंपरेचर्स बघितली होती.(मार्च १ला आठवडा) २८-३० डि सेंटि असल्याने जायचे ठरवले. पुणे-अहमदाबाद-माउंट अबू-उदयपूर- अहमदाबाद अशी ट्रीप प्लॅन केली होती. जाण्यापूर्वी नेहेमीप्रमाणे नेट च्या आधारे रिसर्च करून काय बघायचे याची साधारण आखणी केली. तेव्हा असे लक्षात आले की या भागात बघण्यासारखे इतके आहे की काय बघावे न आय सोडावे ते कळत नव्हते शेवटी नेहेमी प्रमाणे ’सिग्नेचर’ गोष्टींवर भर दिला आणि निघालो. आमचा ५ जणांचा ग्रुप होता. अहमदाबादपासून पुढचे ६ दिवस गाडी दिमतीला होती. अहमदाबाद-अडलज-अक्षरधाम-अंबाजी-माउंट अबू- दिलवाडा टेंपल- रानकपूर- हल्दीघाटी- उदयपूर- चितोडगड - अहमदाबाद असे साधारण फिरलो.

click on the pictures to see enlarged view.

अहमदाबादला उतरल्यावर ड्रायव्हवर गाडी घेउन हजर होता त्याला सांगितले अक्षरधाम व बावडी बघायची आहे. बावडी बद्द्ल महेंद्र यांच्या साईट वर वाचले होते. (महेंद्र ह्या माहिती बद्दल धन्यवाद) आमच्या ड्रायव्हरला या बद्द्ल माहित नव्हते पण मी वाचलेल्य़ा माहितीवर अडलज ला ही बावडी आहे आणि ती बघायचीच आहे असे ठरवले होते. २-३ जणांना विचारून शेवटी ती जागा सापडली. आमचा ड्रायव्हर उदयपूर चा लोकल असून त्याला ही जागा माहित नव्हती हे आश्चर्य. एका उसाच्या रसाच्या दुकानाने आमचे लक्ष वेधले आणि विहिर सोडून सगळ्यांनी रस प्यायला प्राधान्य दिले.. बाहेर उन तापले असल्याने त्याची गरज भासत होती. नंतर विहिर बघायला गेलो. जमिनीखाली ५ मजली अशी चान बांधलेली विहिर आहे आणि त्यावर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. या भागात गेलात तर नक्की बघा. हा स्पॉट अजून खूप जणांना माहित नाही. खरोखर बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात पाणी थोडे वर येते. सर्व बाजूने सुंदर कोरीव काम आहे. फोटोग्राफीला तिथून जी सुरूवात झाली ती पुढचे ६ दिवस चालूच होती.. सॅंड स्टोन वर कार्व्हिंग केलेले आहे. विहीर अष्ट्कोनी आहे. बाजूला देवतांची चित्रे आहेत. साधारण १५०० मधले बांधकाम आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना. लोकांनी वर चढू नये म्हणू बाजूला टोकदार भाले लावले आहेत. गुजरातच्या टूरिझम मध्ये ही विहीर दुर्लक्षित का हे मात्र कळले नाही.

अडलज नंतर अक्षरधाम येथे गेलो. मी व माझ्या मुलीने ते पूर्वॊ बघितले असल्याने (आणि स्वामी नारायण बद्दल विशेष प्रेम नसल्याने) आम्ही बाहेर लॉन वर बसून लोकांचे निरीक्षण करत होतो. बाहेर मॊठे लॉन व खेळायला भरपूर जागा आहे त्यामुळे बच्चे कंपनी भरपूर दिसत होती. खाण्याची सोय होती. एक गोष्ट जाणवली म्हणजे तिथे येणार्‍यात लोअर क्लास चे लोक जास्त होते. अगदी मजूर कामगार ..त्या लोकांसाठी ही एक मोठी सोय आहे..मुलांना छान बाग आहे व भरपूर मोकळी जागा. आत जाताना मात्र भरपूर चेकिंग झाले. पर्स, कॅमेरा सगळे बाहेर. आत जाताना बॉडी चेकींग....त्या अतिरेक्यांनी आपल्या सगळ्या चांगल्या ठिकाणांची अशी वाट लावली आहे. देवळा सारख्या जागेत सुद्धा आता भिती शिरली आहे.

अक्षरधामनंतर माउंट अबूच्या रस्त्यावर थोडेसे बाजूला अंबाजीचे देउळ आहे. पोचण्यापूर्वी एकदम पिक्चर परफेक्ट सनसेट पाहिला. लहानपणी चित्रात काढतो तसे त्रिकोणी डोंगर आणि त्यामागे पिवळे लाल बिंब खूपच छान सूर्यास्त दिसला. सूर्यास्त ही गोष्ट अशी आहे कि वाट पहावी तेव्हा चांगला दिसत नाही पण कधी कधी एकदम सुंदर दिसून जातो. आजूबाजूचे डोंगर खूप छान होते बरेच दगड खाली आले होते. काही सुटले होते आणि कधी खाली पडतील असे वाटत होते. या सगळ्या गोष्टींमुळे रस्ता कंटाळवाणा झाला नाही. अंबाजीचे हे देउळ राजस्थान गुजरात च्या बॉर्डरवर आहे. १२ शक्तीपीठापॆकी हे एक मानले जाते. आत देवीची एक मूर्ती आहे पण पूजा शक्तीचक्राची केली जाते. तिथे थोडा वेळ थांबलो. अंबाजीच्या देवळात जाताना पण भरपूर चेकिंग. आत जाताना दारात ए के ४७ वाला गार्ड दिसला. बिचारे आपले देव, एवढे शक्तिमान, त्यांना पण पहार्‍यात रहावे लागते. हे देउळ खूप छान आहे आतून आणि बाहेरून. रात्री लाइटस टाकतात. वरचे कोरीव काम सुंदर आहे आणि आतली देवीची मूर्ती पण छान आहे. बाहेर स्त्री वर्गासाठी मस्त बाजार आहे. बराच वेळ जाउ शकतो.

अहमदाबाद्पासून रस्ते अतिशय सुंदर आहेत. हाय वेज एकदम मस्त. ही सगळी नरेंद्र मोदींची किमया. आम्ही परतेपर्यंत ’रेंट अ मोदी’ स्कीम असली तर महाराष्ट्रात त्यांना नेउन सुधारणा केली पाहिजे असे सगळ्यांचे मत झाले. आमचा ड्रायव्हर अधून मधून किस्से सांगत होता. पण खरोखर.. राज्यकर्ता करायच्या तर चांगल्या गोष्टी करू शकतो हे इथे पहायला मिळते. रस्त्यावर सगळीकडे भरपूर बोगन वेल आणि कण्हेर. इतके रंग बघितले या दोन फुलांचे की बस. वाटॆत अफूची शेती पण दिसली. ऑफिशिअल शेती आहे. आपल्याकडे न दिसणारी पांगार्‍याची झाडे पण भरपूर पाहिली. मला फॉल कलर्सची आठवण झाली.

जंगल व घाटाचा रस्ता पार करून माउंट अबूला रात्री पोचलो. वाटेत मस्त चांदणे दिसत होते. व्याध अगदी स्पष्ट दिसत होता. पायथ्याशी एक गाव लागले तिथे बरीच एक सारखी अपार्ट्मेंटस दिसली हि सगळी ब्रम्हकुमारीच्या शिष्यांची रहायची जागा. आम्हाला दोघांना नाटकातल्या (कार्टी प्रेमात पडली) ब्रम्हकुमारीची आठवण झाली. आमचा ड्रायव्हर सांगत होता ’’ये बहुत देशोमे फॆली हुई हॆ...इसके बहुत शिष्य हॆ”..वगॆरे. रात्री चेक इन करून बाहेर थंडीत गरम जेवणावर ताव मारला. बाजूला राजस्थानी संगीत चालू होते. गाणार्‍याचा आवाज हाय पीच आणि छान होता. प्रसन्नने त्याचे म्युझिक एंजॉय केले व त्याला बरीच बक्षिसी दिली. आम्ही चाचा इन मध्ये राहिलो होतो नावावरून शंका येत होती पण हॉटेल ठिकठाक होते. इथे बर्‍याच घरांची हॉटेल्स केलेली आहेत. तिथली बाग मस्त होती. रोज ब्रेकफास्ट बरोबर गुलाबाची फुले मिळत असत. खाण्यापेक्षा त्याचा आनंद जास्त.

दुसर्‍या दिवशी सकाळी एक महादेवाचे देउळ बघितले. इथे देवळे अनेक आणि अख्यायिकाही तेवढ्याच. माउंट अबू ही देवांची वस्ती समजली जाते. या शंकराच्या देवळाबाहेर एक माणूस संगमरवरावर कोरीव काम करत होता. एका दिवसात एक फूल तो करत होता. त्याच्या बाजूला जे देवळाचे खांब होते ते सगळे त्याने कोरलेले होते. काय अचिव्हमेंट आहे ना अजून थोड्याच दिवसात तो सांगेल की हे देउळ मी बनवलेल्या खांबापासून बनले आहे. परत कुठे ’मी’ पणा नाही. इथल्या सगळ्या कोरीव कामात तळाशी ग्रास नावाचा प्राणी दिसतो तो पाण्यात असे. त्याच्यावर पाय देउन लोक आत गेले की त्याचा मी पणा कमी होत असे. कमळ लाटा अशी पाण्याशी संबंधित नक्षी सगळीकडे दिसते.

त्या नंतर प्रजापिता ब्रम्हकुमारी पीस पार्क बघितले. पार्क खूप छान आहे. पण ते बघण्यासाठी आधी १० मि. भाषण ऎकावे लागते ते फार बोअर आणि नंतर ते तुमच्या मागे लागतात. कसे काय लोक या पंथांच्या मागे लागतात हे मला न समजलेले कोडे आहे. इथे तर देशो देशीचे लोक येतात. असो आपण दूर रहावे हे खरे. तेवढेच आपल्या हातात. मार्केटिंगचा जमाना आहे हा.........

नंतर गुरू शिखर ला गेलो.हा अरवलीचा हाय्येस्ट पॉइंट. इथे दताचे देउळ आहे. महाराष्ट्राबाहेर दत्ताचे दउळ म्हणून आश्चर्य वाटले. एका दगडाच्या गुहेत हे मंदिर आहे त्याच्या वर अजून बर्‍याच पायर्‍या गेल्यावर शिखराशी पोहोचतो. हवा छान असल्याने आम्ही वरपर्य़ंत गेलो. वरून व्ह्यू मस्त दिसतो. जाताना वाटेत बरीच दुकानेही होती त्यामुळे चढ जरा कमी जाणवला. इ्थे एक ऑब्झरव्हेटरी आहे. बाजूला ऍटेना दिसतात..पाकिस्तानी रेडिऒ इंटरसेप्ट करायला ते वापरतात. तिथे एअर बेस पण आहे. वरती बसून गार हवा खाउन खाली आलो. जाताना कणीस चहा अशी खादाडी चालूच होती. त्यानंतर अगदी खानावळ टाइप जागेत जेवलो आणि दिलवाडा टेंपल मध्ये शिरलो.

इथे बर्‍यापॆकी गर्दी होती. आत कुणाची स्पेशल पूजा चालली होती म्हणून थोडावेळ थांबलो. फोटो काढता येत नाहीत म्हणून एक पुस्तक विकत घेतले. बाहेरून ही देवळे ( ४-५ ) इतकी साधी दिसतात काही कल्पना येत नाही आत काय असेल याची. आत गेल्यावर २५-३० लोकांच्या ग्रुपला एक गाईड(पुजारी) दिला. तो माहिती सांगत होता व वेगवेगळ्या देवळात हिंडवत होता. पहिल्याच देवळात इतके अप्रतिम कोरीव काम होते ्की तिथून हलावेसे वाटेना. साधारण १००० वर्षापूर्वीचे बांधकाम अजून खूप चांगल्या स्थितीत आहे. कमानी, कोरीव मूर्ती सभामंड्प.... हे पहावे का ते कळत नाही. इथे ५ मंदिरे आहेत. एकात पंचधातूची मूर्ती आहे. एकात जेठाणी देवराणी गोष्ट आहे. देवाच्या ठिकाणी तीर्थंकरांच्या मूर्ती पाहून हात जोडताना मात्र आपले देव डोळ्यासमोर येत होते...हे बरोबर नाही, तरीही...सवईचा परिणाम. त्या दिवशी काही स्पेशल पूजा होती म्हणून वरती रंगीत कागद वगॆरे लावून काही ठिकाणी डेकोरेशन केले होते त्याने कोरीव कामाची शोभा कमी होत होती वाढण्याऎवजी.
संगमरवरावरचे ते काम पाहून डोळे दिपले. जमिनी वर झोपून, तिरके सगळ्या बाजूनी लोक ते काम बघत होती. गोरे लोक भरपूर होते. कोरीव काम बघून डोळे दमले शेवटी. इतक्या वर्षापूर्वी केलेले ते कोरीव काम पाहून त्या कारागिरांचे, ते बनवणार्‍या राजाचे, धनिकांचे कॊतुक वाटते. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडी. अशा ठिकाणी संगमरवर आणणे, कारगिर मिळवणे, कोरीव काम करून ते नीट ठेवणे... मुस्लीम आक्रमणापासून वाचवण्यासाठी बाहेरून अगदि सामान्य डिझाइन केले आहे. काय त्रास ना, आधी छान कारागिरी करा आणि ती मुस्लीमांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करा. इतके सुंदर काम, मूर्ति तोडा असे एखादा धर्म कसा सांगतो ते कळत नाही. दिलवाडा टेंपल्स ला त्यामानाने प्रसिद्धी नाही असे वाटले..कदाचित मुद्दामही असेल कदाचित राजकारण असेल.














संध्याकाळी शॉपिंग झाले. ते आवश्यक असते. त्यानंतर थाळी खाउन सगळे आडवे झाले. दुसर्‍या दिवशी उदयपूरला निघायचे होते.
(क्रमशः)

2 comments:

Anonymous said...

खरंच मस्त आहे की नाही ही विहिर? कुणालाच कशी माहिती नाही या बद्दल याचं खरं आश्चर्य वाटतं. अहमदाबादला गेलो की पुन्हा एकदा पहाणार.. :)

Pranav Joshi said...

Namaskar,
Tumcha ha lekh khup chaan ahe. Mala khup interesting ani informative vatla. Tumhi kelele varnanahi surekh ahe.

Me Pranav Joshi. Netbhet ha blog majha ani Salil Chaudhary cha ahe. Aamhi dar mahinyat 1 e magazine publish karto. Tya sandharbaat aaplya shi thode savistar bolaiche hote. Aapla e mail id milala tar tumhala 1 mail pathavun sagle neet samjavta yeil.

Majha id ahe pranav@netbhet.com

Dhanyavad