Saturday, April 10, 2010

अनंतहस्ते ...३ (उदयपूर, चितोडगड)

Click on the pictures to enlarge them


उदयपूरमध्ये शिरल्या जाणवली स्वच्छता. ’प्लॅस्टीक निषिद्ध क्षेत्र’ अशा बर्‍याच पाट्या दिसल्या. लोक सिरियसली हा नियम पाळताना दिसतात. टूरिझम साठी महत्वाची गोष्ट. भरपूर लेक्स या गावाला लाभली आहेत. बोगन व कण्हेर सगळीकडे फुललेली दिसते. सध्या टूरिस्ट प्लेस मध्ये टॉप चा मान या सिटी ने मिळवला आहे. हे शहर छोटे आहे पण इतिहास व ऎतिहासिक वस्तू नी भरलेले आहे.

सिटी पॅलेस हा इथला मुख्य अजेंडा होता. त्याच कॅंपस मध्ये लेक पिचोळा, लेक पॅलेस, जगदीश मंदिर व क्रिस्ट्ल गॅलरी बघता येते. सकाळी सकाळी तिथे पोचलो. तिकीटे काढून गाईड मिळवण्यात बराच वेळ घातला. आम्हाला डिटेल बघायचे होते. इथले बरेच गाडीवाले, गाईड्स गोर्‍यांच्या मागे असतात. मला वाटले त्यापेक्षा गाईडस कमी होते. आमचा गाईड एक सरदारजी होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आम्ही गेलो त्याच्या दुसर्‍या दिवशी तिथे एक फंक्शन होते त्याची तयारी चालली होती. सरकारी तनखे बंद झाल्यावर इथल्या लोकांनी हॉटेल्स बनवली आणि लग्नाला वगॆरे हे महाल भाड्याने देतात. त्यामुळॆ त्यांची बरीच देखभाल होते आणि पॆसा पण भरपूर मिळतो. १५ लाख रू भाड्यात इथे लग्न करता येते. (बाकी खर्च वेगळा)

सिटी पॅलेस हा महाराजा उदयसिंग ने बांधला व नंतर त्यात अनेक राजांनी भर घातली. ते बघताना जाणवते. पण बाहेरून मात्र एक सलग वास्तू वाटते. या महालात बर्‍याच गमती जमती आहेत. महाराणा प्रतापची सगळी कहाणी जिवंत करणारी शस्त्रे, पेंटींग्ज आहेत. हल्दीघाटीच्या लढाईची बरीच चित्रे आहेत. राण्यांचे महाल, वेगवेगळ्या काचांचे नमुने (बेल्जिअम जास्त), मध्येच खॊटे दरवाजे, आरशाचा भास वाटणारे दरवाजे, झरोके, राण्यासाठी छोटे तलाव, बाहेरून दिसणार नाही अशा काचांच्या खिडक्या. चालायची तयारी मात्र हवी. हे सगळे बघताना आपण इतके जिने उतरतो व इतके चढ्तो की बस. बहुतेक सगळे जिने भिंतीत काढले आहेत. पायर्‍या उंच व कमी जास्त उंचीच्या. हे सगळॆ म्हणे सिक्युरिटी साठी केले होते. इथले राजे खूप उंच होते म्हणून पायर्‍या उंच पण आपले पाय मात्र शेवटी बोलायला लागतात. पेटींग्ज ही खूप बघायला मिळतात. मोर चॊकात खूप छान झरोखे आहेत. सगळे काम काचेचे. अजूनही सगळे चांगल्या अवस्थेत आहे. या पॅलेसच्या चॊथ्या मजल्यावर चक्क मोठी मोठी झाडे व तलाव आहे. तिथे म्हणे एक टेकडी होती ती तशीच ठेवून या लोकांनी बाग केली. बाहेरून मात्र काही कळत नाही पॅलेसचा एक भाग वाटतो. काय काय आयडिआज करतील माहित नाही. मध्ये एका ठिकाणी एकात एक दरवाजांच्या चॊकटी दिसतात..आपल्याला वाट्ते की आपण आरशात बघत आहोत अशा तर्‍हेने ते बांधले आहे. त्या मानाने राणीच्या महालात विशेष काही बघायला मिळाले नाही. खाली शस्त्रागार आहे. सगळीकडे कमानी भरपूर दिसतात. कमानी मुळॆ सगळ्या देखाव्याला एक शोभा आली आहे.

खालच्या चॊकात काही दुकाने आहेत अर्थात आमचा मोर्चा तिकडे वळला. यातील गोष्टी थोड्या महाग आहेत पण क्वालिटी छान आहे. आमची थोडीफार खरेदी झाली.

हा पॅलेस लेक पिचोलाच्या काठावर आहे. रात्री लाईट्स मध्ये हे सगळे पॅलेस छान दिसतात आम्ही ते मिस केले, तुम्ही करू नका. नंतर बोट राईड ने लेक मध्ये फिरून आलो. मध्ये जगदीश्वर मंदिर ला उतरलो ती जागाही हॉटेल मध्ये बदलली आहे. तिथली बाग आणि बाथरूम्स अप्रतिम. लेक पॅलेसही बाहेरून बघितला. आजकाल फक्त चेक इन केले तरच त्याच्या आत जात येते. पाण्यात त्याचे प्रतिबिंब छान दिसते. आजूबाजूला बरेच महाल हॉटेल मध्ये कन्व्हर्ट केलेले दिसत होते. हवा छान होती. त्यानंतर आम्ही क्रिस्ट्ल म्युझिअम पाहिले. त्यात भरपूर क्रिस्ट्लच्या गोष्टी आहेत पण खूप छान गोष्टी एकत्र पाहिल्या की काही वाटेनासे होते तसे थोडे झाले आणि पोटात कावळे ऒरडत होते त्यामुळे जरा भरभर पाहिले हे म्युझिअम. इथे ३ च्या सुमारास चहा स्टाईल मध्ये मिळतो. या म्युझिअम मध्ये ऒडिऒ मशिन देतात आणि आपले आपण सगळे बघू शकतो. क्रिस्टल बेड , खुर्च्या, ग्लसेस, बाटल्या, देव, दिवे काय नाही तिथे. याचे तिकीट भरपूर आहे. नंतर आम्ही पोट्पूजा केली आणि विंटेज कार म्युझिअम पाहिले. पॅलेस परिसरात उठेही रिझनेबल खाण्याची सोय नाही. सगळे फाईव्ह स्टार.

बाहेर फिरताना सध्याच्या राजाचे दर्शन झाले. एखादा साधारण तरूण असावा असा तो वाटला. त्याने सॊर उर्जेवर बरेच काम केले आहे व त्याबद्द्ल त्याला जर्मनीत ऍवॉर्ड दिले आहे. हे कुटुंब मागच्या बाजूला रहाते. आणि हॉटेल व म्युझिअम मधून भरपूर पॆसा कमावते. त्यांचे जुन्या गाड्यांचे म्युझिअम जवळच आहे. या सगळ्या विंटेज कार्स चालू स्थितित आहेत. प्रत्येकाला वेगळे गॅरेज. प्रत्येक गाडी हि अधून मधून रस्त्यावर काढून चालवतात. खुप मोठा पसारा आहे. आमच्यातील पुरूष वर्ग ह्या गाड्या बघायला गेला व आम्ही आरामात जेवण करून शॉपिंगचे प्लॅन्स केले. काही गाड्यांना अर्ध्या बाजूला गॉगल ग्लास लावली आहे (बायकांसाठी). काहीत शिकारीसाठी बदल केले आहेत. एका गाडीत ऑटोमॅटिक ऑईल चेंज ची सोय आहे. तर बग्गीला अनफॊल्ड होणारा जिना आहे. जी अजून समारंभात वापरतात) एका गाडीत इंग्लंड मधील टॅक्सी सारखे पार्टीशन व मागे स्पीकरची सोय आहे ड्रायव्हरशी बोलायला. प्रत्येक गाडीची काहीतरी स्पेशालिटी आहे. काही गाड्यांचे तर ओरिजिनल पेंटस ही आहेत. कॅडिलॅक, शेव्हरले, फरारे या गाड्याही आहेत.

त्यानंतर सहेलियोंकी बाडी बघायला गेलो. इथे एक छान बाग आहे व त्यात नॅचरल फोर्स व चालणारी कारंजी आहेत. पूर्वी मेडस इथे अंघोळीला, देवपूजेला येत. आम्हाला हा स्पॉट काही विशेष भावला नाही. मध्ये एंपोरियम ला थांबलो पण तिथे विशेष शॉपिंग केले नाही आम्हाला लोकल मार्केट हवे होते.
त्यानंतर रात्री ’अपणी ढाणी’ चा प्रोग्रॅम होता. गावाबाहेर एका टेकडीवर खेड्यातले वातावरण , घरे, जादूचे प्रयोग, नाच, कठपुतली दुकाने करून ठेवली आहेत ज्यायोगे सर्व वयाच्या लोकांना काहीतरी करमणूक मिळेल. गेल्यावर वेलकम ड्रिंक व पापड दिला. मग राजस्थानी स्टाईल नाच पहिला. नाचणारी साधीच होती पण छान नाचत होती. तिथेच एक बर्थ डे पार्टी चालली होती त्यांचा जरा दंगा चालला होता. हवा एकदम मस्त होती. नंतर जेवणासाठी जमिनीवर सोय केली होती. साधेपणा आणि स्वच्छता लक्षात येत होती. खास राजस्थानी पदार्थ पत्रावळीवर वाढत होते. बाजरीचा खिचडा व तूप, चुट्टा चुरमा, बाजरी भाकरी मका भाकरी, दाळ बाटी आणि तूप, सॅलड, गट्टेकी सब्जी, कढी, शेवेची भाजी ....किती खाल तुम्ही...सगळे पदार्थ छान होते. एक संपेपर्यंत दुसरा हजर. शेवटी जिलबी आणली व सगळ्यांना आग्रहाची भरवली गेली. १०-१० जिलब्या भरवत होते --- समोरचा खाणारा वाटला तर. तिथे वाढायला २च लोक होत पण इतके छान मॅनेज करत होते की बस. एकंदर पोटाची वाट लागली. पण मजा आली. आजकाल पुण्याच्या बाहेर पण असे एक ठिकाण चालू झाले आहे. रात्री हॉटेलच्या गच्चीत बसून थोड्या गप्पा मारल्या. मस्त चांदणे होते. एकंदर राजस्थानी लोककला व खानपान याचा चांगला नमुना बघायला मिळाला.
दुसर्‍या दिवशी सकाळी जगदीश मंदिर बघायला गेलो. हे सिटी पॅलेसच्या अगदी जवळ आहे. एकदम चढ्या पायर्‍या आहेत. देवळावर कोरीव काम अतिशय सुंदर आहे. त्याच्या जवळच हाथी पोळ मध्ये लोकल बाजार बघायला मिळाला. तुम्हाला जर बांधणी व इतर छोट्या गोष्टी घ्यायच्या असतील तर हा बाजार छान आहे. आम्ही पर्सेस, मोजडी, बांधणीचे मटेरियल शोपिसेस, बांगड्या, कानातली अशी बरीच खरेदी केली आधीच हा बाजार दाखवला असता तर बरे झाले असते. बांधणीचे भरपूर नमुने बघायला मिळाले. शेवटी एक बॅग येताना वाढली.
दुपारी चेंज म्हणून इडली सांबार चा समाचार घेउन चितोड्गड ला निघालो. रस्ता ठीक होता. गडावर पोचण्यापूर्वी लांबूनच चितोडगड ची भिंत दिसते. इथे वर जाताना बरीच गेट्स लागतात. शत्रूला अडवण्यासाठी पूर्वी बरीच गेट्स बांधत असावेत. वरती पोचल्यावर प्रथम गाईड घेतला. हा जरा वयस्क पण खूप माहिती सांगणारा गाईड होता. आपण नुसता किल्ला पाहिला तर काही कळणार नाही. प्रथम एक गोलाकार भिंत दिसली ती जुनी बॅंक होती. मुसलमानांनी तोडमोड केल्यावर त्यातले काही चांगले मंदिराचे अवशेष याच्या बांधकामात वापरलेले दिसतात. राणीचा जुना महाल पाहिला. अगदी खूप पडझड झाली आहे पण कल्पना येते. वरच्य़ा मजल्याच्या छतावरची नक्षी दिसते. या मंदिरातून एक भुयार तळ्यापर्यंत जाते त्यातून राण्या जात असत. त्या तळ्याजवळ पूर्वी जोहार केला असे सांगतात. शत्रू कडून हार होणार असे समजले की रजपूत स्त्रिया एकत्रित पणे स्वतःला जाळून घेत त्याला जोहार म्हणत. आणि पतीबरोबर चितेवर ज्या अग्निप्रवेश करत त्यांना सती म्हणत. असे काही करायचे म्हणजे केवढे धॆर्य पाहिजे...

त्यानंतर मीरा मंदिर पाहिले. त्याचीही मुसलमानांनी बरीच तोडफॊड केली आहे. पहाताना आमच्या आसपास काही मुसलमान ही होते. माझ्या मनात नेहेमी येते, जेव्हा गाईड सांगतो की मुसलमानांनी एवढी मंदिरे पाडली, मूर्त्या तोडल्या, हे ऎकल्यावर त्या लोकांना काय वाटत असेल? त्यानंतर विजयस्तंभ बघितला. हा राणा कुंभाच्या काळात १० वर्षे बांधत होते. खिलजी च्या विरूद्ध लढाई जिंकल्यावर हा बांधला. त्यावर खूप हिंदू देवतांची चित्रे कोरली आहेत. शस्त्रांची पण चित्रे आहेत. ९ मजले आपण वरपर्यंत जाउ शकतो..पायर्‍या जरा उंच आहेत. हे स्ट्रक्चर या गडावर एकदम प्रॉमिनंट आहे. याच्या बाहेर गाईड मधील गाणे सगळ्यांना आठवत असेलच. या स्तंभाच्या दर मजल्याला बाल्कनीज आहेत. एकूण छान स्ट्र्क्चर आहे फक्त जरा जास्त काम केलेले वाटले. रेड स्टोन व मार्बल वापरला आहे. याच्या बाजूला एक महादेवाचे छान मंदिर आहे. जवळच जोहार केलेली जागा दाखवतात.

याच गडावर किर्ती स्तंभ आहे जो विजयस्तंभाहून जुना आहे. त्यावर जॆन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत व जॆन आर्किटेक्चर आहे. हा स्तंभ विजयस्तंभापेक्षा डेलिकेट वाटतो.

सगळ्यात शेवटी पद्मिनी महाल पहायला गेलो. ही राणी काश्मिरहून आणलेली होती. दिसायला अतिशय सुंदर. तिला गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून एक जलमहाल बांधला आहे. पूर्वी आजूबाजूला खूप पाणी होते तळ्यात आता अगदीच कमी आहे. अशी एक कथा सांगतात , या राणीला बघण्याची अल्लाउद्दीन खिलजी ने गळ घातली तेव्हा दुसर्‍या महालाच्या आरशातून त्याला राणी दा्‍खवली. ती तिथे पायर्‍यांवर बसली होती. मागे वळून पाहिले तर ती पायरी दिसत नाही. (फिजिक्स्च्या तत्वाचा वापर करून). यात खरे किती माहित नाही पण गाईडस अगदी रंगवून ही गोष्ट सांगतात. ही सगळी स्टोरी गाईड च्या या गाण्यात शेवट्च्या २ कडव्यात दाखवली आहे. अर्थात स्टोरी माहित नसेल तर काही कळणार नाही. http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU

त्यानंतर किर्ती स्तंभाच्या जवळ सुंदर सूर्यास्त पाहिला. अगदी पिक्चर पर्फेक्ट. संध्याकाळी लाईट ऎंड साउंड शो पाहिला. त्या सगळ्या पडक्या भिंती, महाल या शोमध्ये सगळा इतिहास आपल्या पुढे जिवंत करतात. दर वेळॆला मेवाडचे राजे प्राण पणाला लाउन लढायचे पण मुसलमानांना मिळायचे नाहीत आणि हरले तरी खूप शॊर्य दाखवून हरायचे. मेवाडच्या लोकांना मारवाडच्या लोकांबद्द्ल खूप चीड आहे. ( जयपूर, मानसिंग व जोधाबाई) आमचा गाईड खूप चिडून बोलत होता. ते ऎकून इथे जोधा अकबर ला का विरोध झाला असेल ते समजते. पूर्वी मला वाटायचे उगाच नाटक करतात पण मेवाड वाल्यांना मारवाड वाल्यांबद्द्ल खरेच राग आहे. त्या राजांची कहाणी, मीराबाईची गोष्ट व पद्मिनीची कहाणी छान सागितली आहे. नंतरचा इतिहास मात्र फारसा सांगत नाहीत (महाराणा प्रताप नंतर...ते जरा खटकले)

रात्री हा सगळा इतिहास डोक्यात घोळवत परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या एका मित्राकडे भेटायला गेलो. त्याच्या मते उदयपूर मध्ये इतरही अनेक जागा बघण्यासारख्या आहेत. गप्पा, छान ब्रेकफास्ट खाल्ला व अहमदाबादला निघालो. ६-७ दिवस कसे गेले कळलेच नाही. इतके कोरीव काम पाहिले की झोपल्यावर छतावर कोरीव कामच दिसे. खूप चाललो, चढ उतार ही खूप झाले एकंद्रीत ट्रीप मस्त झाली. या उदयपूर मध्ये ऒपन ड्रेनेज हा प्रकार मात्र सगळीकडे खटकत होता. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा. अजून एक गोष्ट मनात आली महाराष्ट्रात इतके गड किल्ले आहेत पण एकही धड अवस्थेत नाही. एकतर मुस्लीमांना ते कधी शरण जात नसत त्यामुळॆ सतत लूट तॊडफॊड होऊन किल्ल्यांवर काही शिल्लक राहिले नाही. आता जसे आहेत त्याच्यावर टूरिझम च्यासाठी काही तरी केले पाहिजे. राजस्थान च्या लोकांनी मात्र आपले किल्ले शिल्लक ठेवले आणि आतले सामानही. आता यातले चांगले काय व वाईट काय हा प्रश्न वेगळा आहे.

2 comments:

Amol said...

अजून एक गोष्ट मनात आली महाराष्ट्रात इतके गड किल्ले आहेत पण एकही धड अवस्थेत नाही. एकतर मुस्लीमांना ते कधी शरण जात नसत त्यामुळॆ सतत लूट तॊडफॊड होऊन किल्ल्यांवर काही शिल्लक राहिले नाही. आता जसे आहेत त्याच्यावर टूरिझम च्यासाठी काही तरी केले पाहिजे. राजस्थान च्या लोकांनी मात्र आपले किल्ले शिल्लक ठेवले आणि आतले सामानही. आता यातले चांगले काय व वाईट काय हा प्रश्न वेगळा आहे.

आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो. - रोहन चौधरी

MAdhuri said...

Rohan thanks for the reply.

मला स्वतःलाही महाराष्ट्रातले गड किल्ले, अवशेष नक्कीच आवडतात. दर ट्रीप ला सिंहगड ला एकदातरी जातोच. रायगड, तोरणा, लोहगड, विसापूर गड, मुरूड जंजिरा बघितले आहेत. रायगडावर जरा तरी माहिती देणारे. लोक आहेत. तिथे एक चांगली फिल्म दाखवतात. जे लोक बाहेर देशातून येतात किंवा महाराष्ट्राबाहेरून येतात त्यांच्यासाठी अगदी छोटे माहिती पत्रक, पाणी खाण्याची सोय केली पाहिजे. व्हिडिऒ शो किंवा कुठल्यातरी रूपात माहिती मिळाली पाहिजे. एखादा छोटासा गडाचा नकाशा असला पाहिजे.
चितोड गड वाले सतत लढत तिथे बरेच अवशेष आहेत पण गाईडस छान आहेत. राजस्थानातले किल्ले बघून फक्त आपल्याकडे टूरिझम दुर्लक्षित राहिला आहे असे वाटते. साधा शनिवार वाडा नीट बघता येत नाही. आजकाल बरेच ग्रुप्स ट्रेक्स करतात पण मला वाट्ते त्या त्या किल्ल्याचा इतिहास अजून चांगल्या रीतीने जास्त लोकांसमोर आला पाहिजे. हे फारसे अवघड नाही.

MAdhuri