Monday, September 10, 2012

लहानपण देगा देवा....

काल टी व्ही वर मेलिँडा गेट्स ची मुलाखत पाहिली. मिळकतीतील बराच हिस्सा त्यांनी दान केला आहे. अमेरिकेतील शिक्षणमान खाली घसरले आहे, मुले काँलेजला कमी प्रमाणात जातात म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात मदत करायचे ठरवले आहे. टीचर चांगली तर मुलांना शिक्षणात रस वाटतो म्हणून त्या दिशेने सुधारणेला सुरूवात केली आहे. टीचर ट्रेनिंग सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मला खरेच कौतुक वाटले, एवढा पैसा दान करणे सोपे नाही. आणि तो बरोबर ठिकाणी दान होतो का नाही हे बघणे फार आवश्यक आहे. गेट्स फाउंडेशन दोन्ही करत आहे.

यावर मैत्रिणिशी बोलत होते. ती एका शाळेत शिकवते. तिच्या वर्गातला एक मुलगा तिच्याशी बोलत होता.


मुलगा - मी जर हा आठवडाभर नीट वागलो तर मला वीक एण्डला माझ्या वडिलांकडे जायला मिळणार.

टीचर - हो का...(तिला कल्पना आली की हा विभक्त कुटुंबातला आहे).

मुलगा - मला ३ डँड आहेत

टीचर - काय (धक्का बसलेला न दाखवता)

मुलगा - मी माझ्या आईकडे रहातो. आई गँरी बरोबर रहाते, म्हणून तो माझा एक डँड. मी, आई, गँरी, सुझान . जँक असे आम्ही रहातो. सुझान व जँक ही गँरी ची मुले आहेत.

टीचर - मग तुझा डँड...

मुलगा - तो दुसरीकडे रहातो. टाँम व बाँब एकत्र रहातात. म्हणून ते माझे अजून २ डँड.... मी,आई, गँरी, सुझान व जँक असे एक घर व मी, डँडी व बाँब हे एक घर आणि मला दोन्हीकडे रहायला आवडते.......

टीचर - वा छान......मग नीट वाग म्हणजे तुला जायला मिळेल तिकडे. ( ती कल्चरल शाँक मध्ये)

हा मुलगा वय वर्षे ६, आणि हे सगळे स्पष्टपणे बोलतोय.....काय हे कल्चर.......आजच्या पुढारलेल्या देशातील....

अमेरिकेत वरेच ठिकाणी हे अगदी काँमन आहे. आई वडील विभक्त, मुले काही दिवस आईकडे काही दिवस वडिलांकडे. अभ्यास हा महत्वाचा नाही..त्यांना आई, वडील भेटणे व त्यांचा सहवास महत्वाचा वाटतो. होम वर्क ला महत्व कमी दिले जाते. मुलांच्या नजरेतून पाहिले तर बरोहर वाटते कारण ५-६ वर्षाच्या मुलांचे विश्व हे आई, बाबा, बहिण, भाउ यात गुंतलेले असते. साहजिकच अभ्यासाकडे कमी लक्ष दिले जाते. मोठेपणी जर घर पक्के नसेल, सतत वेगळ्या घरात रहावे लागले तर मुलांना आवडत नाही. या सगळ्याचा शेवटी शिक्षणावर परिणाम होतो.

मुलांना पटकन स्वताच्या पायावर उभे रहायचे असते व स्वातंत्र्य व स्टेडी आयुष्य हवे असते. मग जेमतेम हायस्कूल करून मुले स्वताच्या पायावर उभी रहातात व काँलेज दूर रहाते. अर्थात या परिस्थितून शिकणारी पण खूप मुले आहेत. हुशार पण आहेत पण जनरल चित्र असे दिसते.....

एक मात्र खरे, सोसायटीत आसा प्रकार बरेच ठिकाणी घडतो म्हणून मुलांना सगळे माहित असते. लपवाछपवी नाही, कोणी हसतही नाही. आपल्याकडे ओपनली कोणी बोलत नाही कारण सोसायटी वेगळी आहे.... आजकाल सगळे प्रकार मात्र चालू असतात. एखाद्याला २ डँड असू शकतात. २ आया असू शकतात. सगळे मान्य आहे.

५-६ वर्षाच्या मानाने केवढी ही गुंतागुंत......आणि आपण म्हणतो लहानपण दे गा देवा.... लहानपण किती सुखाचे...






काही रागातील गाणी

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी भैरवी हे राग घेतले होते.

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

Saturday, September 8, 2012

अंदमान चे ’काळे पाणी’...........




अंदमान चे ’काळे पाणी’...........

सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.

अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.

इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.

संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांनी इथेच लिहिले असे म्हणतात. http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.

दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.

नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे. संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

Tuesday, July 10, 2012

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला.  भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते.  आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल.  इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.

यलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले.  मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट  ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका भरपूर प्रमाणात आहे.

हा पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.

वेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल.  या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून जरूर वाचा.







थर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.


ओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो.
  • गायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते.  साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी  उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.
या एरिआत लहान मोठे आनेक गायजर्स आहेत. एकाच खडकातून निघाले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. स्टीमबोट सगळ्यात मोठा आहे. याची माहिती वाचून जर ते पाहिले तर जास्त मजा येइल. नुसते पाहिले तरी सुंदर आहेत.

हाँट वाँटर स्प्रिंग्ज   हे तयार होताना खाली प्लंबिंग सिस्टीम नसते. खालचे गरम पाणी वर व वरचे खाली असे कन्व्हेक्शन करंट मुळे पाणी उडते. याच्या बाँर्डरला मिनरल्स साठून लेस सारखा पँटर्न तयार होतो. पाणी जेवढे क्लिअर तेवढे जास्त गरम. या गरम पाण्यात वेगवेगळे बँक्टेरिआज, अल्गी वाढतात.  ते पाण्याला विविध रंग देतात. क्तिअर, पिवळा, केशरी, निळा, हिरवा असे मस्त रंग दिसतात.या मायक्रोआँरगँनिझम्स वर इतर प्राणी वाढतात व एक प्रकारची फूड चेन तयार होते.


ग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.


  • मड पाँटस  ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे  दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.
  • फ्युमारोल्स    जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.

या एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.

मँमथ हाँट स्प्रिंग्ज   - हे या पार्क मधले अजून एक थर्मल फिचर आहे. इथले खडक लाइम स्टोन या प्रकाराचे आहेत. पाणी वर येताना त्यात खूप विरघळलेले कँल्शिअम कार्बोनाट असते. वरती आल्यावर कार्बन डायआँक्साइड रिलिज होतो व कँल्शिअम कार्बोनाटचे थर साठतात.स्वच्छ पांढरे ट्रँव्हर्टाइन तयार होते इतके पांढरे की डोळ्याने नुसते बघताना त्रास होत होता. खडकावरून संथ व एका वेगात पाणी वहात असते.  जिथे उतार नसतो तिथे छोटे पूल तयार होउन त्यात पाणी साठते व मस्त निळसर पाणी दिसते. पांढरा पिवळा व केशरी रंग दिसतात. अर्थात हे रंग त्यात वाढणारे बँक्टेरिआ देतात. यातील काही टेरेसेस ड्राय दिसल्या पण इथे कधीही परत त्या लाइव्ह होतात त्यामुळे पुन्हा तुम्ही जाल तर वेगळे चित्र दिसते.  हे बदल यलोस्टोनमध्ये सगळीकडे दिसतात. जमिनीखोली जे बदल होतात, शेकडो छोटे  भूकंप होतात त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो व पाणी वेगळ्या पध्दतिने बाहेर पडते

इथल्या फायरहोल रिव्हर मध्ये  एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.

काँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते.  काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.

लाँगपोल  ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर  पाइन कोन्स ठेवू
शकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात.  किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....

वन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते.  अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.

ग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन
अनेको वर्षापूर्वी ज्वालामुखी व त्यानंतर ग्लेसिएशन या मुळे ही कँनिअन तयार झाली असे म्हणतात. वरेच पेंटर्स इथे जागोजागी तुम्हाला दिसताल. आर्टिस्ट पाँइंट मस्ट सी.  इथला खडक पिवळा दिसते. हा रंग सल्फरचा नसून आयर्न आँक्साइडचा आहे असे जिआँलाँजिस्ट म्हणतात. यावर अजून अभ्यास चालू आहे. या एरिआत अप्पर व लोअर फाँल्स आहेत दोन्हीही न चुकवावे असे. थोडे खाली उतरावे लागते दमछाक होते पण व्ह्यू जबरदस्त. लोआर फाँल पाशी २ छोटी ग्लेशिअर्स पण दिसतात. या सर्व ठिकाणांचे सौंदर्य कँमेरा वंदिस्त करू शकत नाही तेव्हा शक्य तितके डोळ्यात भरून घ्या व मनात साठवा.  पाण्याचा फोर्स व बाजूचा निसर्ग दोन्ही नजर खिळवणारा.

 पूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.




पेट्रीफाइड  फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.



लेक मध्ये असे गरम  पाण्याचे गायझर्स दिसतात.
यलोस्टोन लेक हे लेक भूकंपाचा इफेक्ट ने बनलेले आहे. इतके मोठे आहे की त्याला समुद्र म्हणावे असे वाटते. पूर्ण फोटो काढणे अशक्य. समोर मस्त बर्फाच्छादित शिखरे दिसतात. पाण्याचा रंग सुंदर आहे. या लेक मध्ये बोटिंगची सोय आहे.


याच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.
रंग व पँटर्न्स

टाँवर फाँल
लाव्हाने बनलेले काँलम्स
लोअर फाँल विथ ग्लेशिअर

बायसन कळप
खोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन
हिरवाई
फायरहोल धबधबा

बोर्डवाँकवरून दिसणारी वाफ













काही टिप्स....
  • शक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.
  • कधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.
  • पिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे  पण ..
  • २-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.
  • दुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.
  • शेवटी टिटाँन पार्क.
  • हकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.
आम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो. जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.
इतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.


ग्रँड टिटोँन पुढील भागात......

Saturday, March 17, 2012

लख लख चंदेरी....

आपण लहानपणापासून चंद्र, तारे, सूर्योदय, सूर्यास्त, नक्षत्रे ही सगळी लखलखणारी दौलत पहात मोठे होतो. चांदण्यात फिरणे हा एक मोठा आनंद देणारा अनुभव असतो. अतिशय शांत व शीतल अनुभव. गेल्या वर्षी झायान कँनिअन मध्ये तारकांनी इतके गच्च भरलेले आकाश पाहिले की बस. गावाबाहेर दिव्यांचा प्रकाश कमी असतो तेव्हा हा अनुभव घेता येतो. बर्फामध्ये पण चांदणे फार सुंदर दिसते. वेगळाच प्रकाश दिसतो व गूढ वाटते. लहानपणी मला नेहेमी वाटायचे की कायम आकाशात तेवढ्याच चांदण्या असतात. जागा बदलतात हे हळूहळू लक्षात आले. गच्चीवर उन्हाळ्यात झोपले की नक्षत्रे व त्यांचे आकार बघणे हा खेळ नेहेमी असे. ध्रुव तारा, शनि, शुक्र व मंगळ यांची तेव्हाच ओळख झाली.

आपल्या पूर्वजांनी याच ग्रह तारे यांचा उपयोग करून मोठ्या सफरी पार पाडल्या. पिरँमिड सारखी मोठी बांधकामे करताना ही रेफरन्स साठी यांचा उपयोग झाला होता. शाळेत हळुहळु ग्रहण, आकाशगंगा, यांची ओळख झाली. खगोलशास्त्रज्ञाची माहिती झाली. या सगळ्यात गँलिलिओ ला फार महत्वाचे स्थान आहे. सूर्यमाला व ग्रहांचे फिरणे याबद्दल त्याने प्रथम माहिती दिली. त्यासाठी धर्माच्या राजकारणाचा खूप त्रास त्याने सहन केला. पण खरे शास्त्रज्ञ मागे रहात नाहीत..आपल्याकडे ही कारणे खूप दाखवली जातात संशोधन न होण्यासाठी...., सुरूवातीला या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नव्हता पण जसे शोध लागत गेले लाकांचा विश्वास बसू लागला. यापुढे जाउन माणसाने चंद्रावर पाउल ठेवले व या क्षेत्रात भरपूर संशोधन होउ लागले. अर्थात या क्षेत्रात अनुमानावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्यक्ष लँब नसते कारण हाय टेँपरेचर्स व एवढी हीट आपण प्रयोगशाळेत करू शकत नाही. गणिती आधार, दुर्विणीतून मिळालेले प्रकाशचित्र याच्या आधारावर सगळे चालते.

शास्त्रज्ञाना असे लक्षात आले की आपले युनिव्हर्स एक्स्पांड होते आहे यातून बिग बँग थिअरी ची कल्पना पुढे आली. फार पूर्वी एका बिंदूपासून सुरूवात होउन सगळे विश्व निर्माण झाले असावे असा निष्कर्ष निघाला व आपण कसे तयार झालो याबद्दल बरेच विचारमंथन होउ लागले. या विषयावर सायल्स चँनेल वर खूप छान डाँक्युमेंटरीज दाखवतात. तुम्हाला मिळाल्या तर जरूर पहा. काही ब्रिटीश तर काही अमेरिकन आहेत. या डाँक्युमेंटरीज बघताना आपले वेदातील सिद्धांत आपण बघतो आहोत असे वाटते. शून्यातून ब्रम्हांड, कण कण मे भगवान, जन्म मरणाचे फेरे,नवीन काही जन्मताना जुने नष्ट व्हावे ,जन्म व मरण हे प्रत्येक गोष्टीला असतेचगैरे माझ्यासारखे लोक समोर जेव्हा काही दिसते तेव्हा त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आता विज्ञान जेव्हा आपल्या उत्पत्तीबद्द्ल शोध घेत आहे मला आपले लिहिलेले जुने खरे वाटत आहे. अर्थात हे सिद्ध करताना पण वरेच वेळा गोष्टा मानाव्या लागतात. सगळेच समोर दाखवताा येत नाही. असो या पुढच्या लेखात त्याबद्दल लिहिणार आहे.

. आपण सगळे स्टारडस्ट आहोत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपली आकाशगंगा ही अशी एकातयार झाली आहे. आपल्या शरीरातील सर्व एलिमेंटस ही स्टार्स पासून तयार होतातआपल्या नजरेच्या आड या चांदण्याच्या पल्याड आकाशात खूप गोष्टी घडत असतात. तारे सुद्धा जन्म मरणाच्या सायकल मधून जात असतात. आकाशात स्टार्स तयार होतात व काही (अनेको) वर्षानी नष्ट होतात. नष्ट होताना पुन्हा नव्या स्टार्सना जन्म देतात व ही क्रिया चालू रहाते. हे चक्र सतत चालू असते. सगळ्यात आधी सुरूवात कशी झाली हा प्रश्न अजूनही शास्त्रज्ञ सोडवत आहेत व काही वर्षात नक्कीच निर्णयाप्रत पोचतील ही मला आशा आहे. हे ग्रह तारे यांचे चक्र अनेक बिलिअन वर्षांचे असते. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो व तो आकारमान व इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो.




अशा प्रकारच्या प्रकाशचित्रांवरून शास्त्रज्ञ त्या स्टारबद्दल माहिती गोळा करतात. या रंगावरून वत्यातील स्पाँटसवरून त्यातीलएलिमेंटस बद्दल कल्पना येते.






आपण नेब्युलापासून या चक्राची सुरूवात पाहू.. नेब्युला हा दाट केमिकल्स व गँसचा ढग अवकाशात असतो. त्याच्या अंतर्भागात घर्षणामुळे खूप हीट तयार होते.या सगळ्या प्रक्रियेत हायड्रोजन हा महत्वाचा घटक आहे. कोअर मध्ये जेव्हा हायड्रोजनचे फ्यूजन होते तेव्हा प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. प्रकाश व हीट यारूपातील ही एनर्जी बाहेरच्या बाजूला सरफेसकडे येते. यात तयार होणारे फोटाँन प्रकाश निर्माण करतात. या फ्यूजनच्या प्रक्रियेत हायर एलिमेँटस तयार होतोत. परत त्यांचे फ्यूजन होते अजून एनर्जी व नवीन एलिमेँट्सटी निर्मिती होते. आतून बाहेर येणारी ही एनर्जी जे प्रेशर निर्माण करते ते स्टारला त्याच्या वजनामुळे कोलँप्स होण्यापासून वाचवते. आपण सगळ्यांनी शाळेत पिरिआँडिक टेबल पाहिलेच असेल. ही सर्व एलिमेंटस अशा पद्धतिने तयार झाली आहेत व आपल्या निर्मिती च्या वेळेस जी तयार झाली तीच व तेवढीच आहेत. हा विचार केला की गंमत वाटते.
जेव्हा आयर्न तयार होते तेव्हा एनर्जी कमी व्हयला सुरूवात होते. या पुढची एलिमेंटस एनर्जी घेतात कोअर म्हणजे अंतर्भाग गुरूत्वाकर्षणामुळे कोलँप्स होतो . आता मधे गुरूत्वाकर्षणाचा जोर व बाहेर फयूजन मधून निर्माण झालेला फोर्स याचा बँलन्स जोपर्यंत साधला जातो व हायड्रोजनचा पुरवठा होत रहातो तोवर आकार वाढर जातो व नवीन एलिमेंटस तयार होत रहातात. या प्रक्रियेवरून लक्षात येते की प्रेशस एलिमेँट्स ही शेवटच्या काही मिनिटात बनतात, त्यासाठी प्रचंड हीट लागते. एकंदर आकारमान ही मोठे असावे लागते. जेव्हा इंधन संपते तेव्हा ही सगळी क्रिया थांबते. जेव्हा स्टार कोलँप्स होउन आत खूप सँच्युरेशन होते तेव्हा प्रचंड स्फोट होउन एलिमेंटस बाहेर टाकली जातात. नवीन स्टार्स तयार होतात.















पुढेआकारमानाप्रमाणे नोव्हा, सुपरनोव्हा वा व्लँकहोल्स बनतात.
आपली सूर्यमाला अशाच एका ब्लँकहोल भोवती फिरत आहे व त्यावर भरपूर संशोधन चालू आहे. त्याच्य आत नक्की काय आहे, पलिकडे काय आहे हे शोधण्याचे काम चालू आहे.

आपण नेहेमी जे छान आकाश व चांदणे बघत असतो त्यच्यामागे एवढे काही दडलेले असेल अशी कल्पना येत नाही. बरेच काही कल्पनेनेन बघावे लागते. पण जे आहे त्याबद्दल विचार केला की खूप गूढ अगम्य वाटते व परत परत त्याबद्दल विचार करावासा नक्की वाटतो. आपण या काळात आहोत व या सगळ्या शोधांचे साक्षी आहोत हा आपल्या नशिबाचा भाग. यातूनच पुढे जाउन आपले वेदातील विज्ञान अनुभवायला मिळेत असे वाटते हे नक्की.

Wednesday, January 25, 2012

दिनदर्शिका


दिनदर्शिका....

परवा टी व्ही वर एक कार्यक्रम पाहिला..... जर कालगणना नसती तर... या विषयावर एक मालिका होती. नुसत्या विचारानेच कसेतरी झाले. लहानपणापासून आपण वेळ मोजायला शिकतो. हे जर नसते तर... कशालाच संदर्भ राहिला नसता.... कालगणनेतला एक महत्नाचा टप्पा म्हणजे दिनदर्शिका. शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले की आपण जसे नवीन पुस्तकांची वाट बघतो तसे मी कँलेंडरची वाट बघते. घरात सगळ्यात पहिले येते ते कालनिर्णय. यातील लेख वाचनीय असतात. आणि हो, इतकी वर्षे झाली तरी दर्जा राखलेला आहे. अमेरिकेत आल्यापासून सणवार बघायला हे आवश्यक झाले आहे.

इथे साधारण ख्रिसमस जवळ आला की माँल मध्ये कँलेंडरची तात्पुरती दुकाने दिसायला लागतात. नवीन वर्षाबरोबर किमती कमी होतात हा यातला चांगला भाग आहे. आता तर ७५ टक्के किम्मत कमी केलेली असते. यातील डेस्क वर ठेवण्याजोगी व्हरायटी मला फार आवडते. लोकांना गिफ्ट देण्यास उत्तम. विनोद, कोडी, सुडोकु, रेसिपिज, गोल्फ टिप्स, ट्रंव्हल, ओरिगामी, स्क्रँबल्स अशा अनेक विषयांवर ही छोटी कंलेडर्स असतात. दर दिवसाला नवीन काहीतरी शिकता येते, लहान मुलांना पण शिकवता येते हा फायदा आणि एक रूटीनही रहाते. मोठ्या कँलेंडर्स मधे नँशनल पार्क, प्राणी, युरोप, नामवंत कलाकारांची चित्रे, हाँलीवूड मधील मंडळी हजेरी लावताना दिसतात. गाड्या, वेगवेगळी कोटेशन्स, खेळाडू हेही काहींना आकर्षित करतात. या दुकानात गेले की हरवायला होते. एका वर तर १००० प्रवासी जागांची माहिती होती. फुलांची पण सुंदर असतात. या वर्षी अँपल च्या अँप्स ने ही नंबर लावला या दुनियेत.

या वर्षी अजून एक छान दिनदर्शिका पाहिली. एक बाई गेली २० एक वर्षे चक्क गणित हा विषय घेउन दिनदर्शिका काढते आहे. या वर्षी विशेष म्हणजे प्रत्येक तारखेवर एक गणित आहे वेगवेगळ्या प्रकारातले आणि त्या गणिताचे उत्तर म्हणजे ती तारीख आहे. शिवाय इतर माहिती खूप आहे. ज्यांना गणित आवडते आणि ज्यांना आवडत नाही त्या दोघांना हा प्रकार नक्की आवडेल. amazon.com वर mathematical calendar या भागात ते बघायला मिळेल.

या सगळ्या प्रकारात माझे आवडते मात्र आपले स्वतचे बनवलेले कंलेंडर. आपण बरीच ठिकाणे पहायला जातो, तिथे फोटो काढतो हा सगळे एकत्र करून मी गेली ४-५ वर्षे हा उद्योग करते आहे. विषेष करून पालकांना हा प्रकार आवडतो कारण मुला नातवंडांचे फोटो डोळ्यासमोर रहातात. वाढदिवस, लग्न या तारखा लक्षात ठेवून त्या व्यक्तीचे फोटो टाकता येतात आणि हे personalized calendar छान दिसते. तुम्ही पण करून बघा एखादे. walgreens.com or picsquare.com या सारख्या अनेक साईटस सापडतील.

अगदी पूर्वी फक्त देव किंवा नटनट्या यांना कंलेंडरवर स्थान होते आता ही व्हरायटी पाहिली की मजा वाटते. आता पुढच्या वर्षी नवीन काय काढतील याची उत्सुकता मला आत्ताच आहे. भारतात ही शिवाजी महाराज, राजस्थान, हिमालय, देवस्थाने या विषयावर सुंदर कँलेंडर्स बनतील. बाहेरच्या देशातून आलेल्या पाहुण्यांना द्यायला उत्तम....

Friday, December 30, 2011

काही वाचनीय... दीपस्तंभ

काही वाचनीय... दीपस्तंभ

गेल्या महिन्यात प्रा. शिवाजीराव भोसले यांचे दीपस्तंभ हे पुस्तक वाचनात आले. पेपर मध्ये लिहिलेल्या स्तंभलेखनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तकाचे नाव, प्रस्तावना व आतील मजकूर सगळेच प्रेरणादायी वाटले. समुद्रात वाट चुकलेल्यांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो त्याप्रमाणे या पुस्तकात अशा अनेक लोकांची ओळख करून दिली आहे जे जनजागृति च्या कामात दीपस्तंभासारखे उभे होते. पेशवे कालानंतर धर्माच्या नावावर बराच काळाबाजार चालला होता तो लोकांना दाखवण्याचे काम या लोकांनी केले. अनिष्ट रूढी मोढण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले ते यात दाखवले आहे. गंमत म्हणजे अजूनही जात, धर्म या गोष्टी वापरून आपल्यावर संकटे येत आहेतच. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींची प्रस्तावना लाभली आहे ती पण वाचनीय. आजकाल व्याख्यान संस्क्रृति लोपली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला अजून चांगले वाटले.

शाळेत असताना आपण वरेच वेळा समाजसुधारकांचे कार्य अभ्यासतो पण त्यापुढे जाउन चरित्रे वाचत नाही. या पुस्तकात थोडक्यात चरित्र दिली आहेत. काही मजेदार आठवणी दिल्या आहेत. आपल्याला वाटले तर पुढे जाउन अजून वाचावे. साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, १८ व्या- १९ व्या शतकाचा काळ, बहुतेक सगळे गरिबीतून कसेबसे शिक्षण घेणारे पण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोचणारे. ब्रिटिशांचे एका बाबतीत कौतुक वाटते, जरी ते राज्यकर्ते होते तरी बुदधीला त्यांनी मान दिला. हुशार लोकांना त्याच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यास बोलावले. आणि वेळ आली तर पारितोषकाने गौरवले पण.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोषाचे बरेच खंड संपादित केले आणि आता ते मराठी विश्वकोष या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून झाली.बहुतेक सगऩ्या लोकांनी घर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, ही गोष्ट फार महत्वाची वाटते. शाळेपासूनच जर इतर घर्माबद्दल माहिती झाली तर मुलांना खूप फायदा होईल. १८०० ते १९०० हा काळ असा होता की भारतीय संस्क्रृति, मोगलांचे वर्चस्व व राज्य इंग्रजांचे... सगळ्या गोष्टी धर्माशी निगडीत होत्या. अंधश्रदधातून लोकांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते.

या पुस्तकात आलेल्या समाजसुधारकांचे विचार वेगळे होते, पण प्रत्येकाचे ध्येय एकच होते. सामान्य जनांना जागृत करणे, एकत्र करणे व चांगला समाज तयार करणे. मग ते सर्व धर्मातील मूलतत्वे एकत्र घेउन, एक परमत्त्व सर्वात आहे असे मानणारे ब्राम्हो समाजाचे राजा राममोहन राँय असोत किंवाजातिभेदाला न मानत योग, परमेश्वर चैतन्य यांना मानून आर्य समाजाचा प्रसार करणारे महर्षि दयानंद असोत. बरीच वर्षे देशाबाहेर राहून शिकलेले पण शेवटी भारतातच कार्य करणारे अरविंद योगी असोत. त्यांनी मानवाची पुढची आवृत्ती महामानव सांगितली आहे. matter, mind va supermind अशी त्यांची धारणा होती. प्रत्येकाची कल्पना आणि अभ्यास दांडगा.विश्वेश्वरअय्या यांनी केलेल्या पाण्याच्या प्रश्नांचे व्यवस्थापन आणि काढलेले अनेक कारखाने...एक माणूस किती काम करू शकतो याची कल्पना येते. बहुतेक सगळ्यांना लहानपणी भरपूर पायपीट करावी लागली पण पुढे तब्येतीसाठी फायदाच झाला. दुसरी एक गोष्ट सातत्याने द्सली म्बणजे वहुतेकांना बडोद्याच्या महाराजांनी सहाय्य केले नोकरी किंवा पैसा देउन.
जे क्रृष्णमूर्तींचा थिआँसाँफिकल विचार , स्वामी विवेकानंदांचे विचार, कर्मवीर पाटील यांची रयत शिक्षण संस्था व अगणित वसतिगृहे, शाहू महाराजांचे विचार, साने गुरूजींची तत्वे, या सगळ्याशी या पुस्तकातून ओळख होते.

गुरूदेव रानडे यांनी जी राष्ट्राच्या अवनतीची कारणे दिली आहेत ती आजही पटतात. गुरूदेव टागोरांचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह, काबुलीवालाची गोष्ट, जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेच्या वास्तव्यात घेतलेला श्रमप्रतिष्ठेचा अनुभव, जोतिबा फुले यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण याचे कार्य. साने गुरूजींनी भाषेच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.

हे पुस्तक शाळेत, इंटरनेटवर ठेवले तर जास्त मुलांपर्यंत पोचेल व त्यांना या लोकांची ओळख तरी होइल. पूर्वी लोकांच्या शिक्षणासाठी संत लोक जन्म घेत. हे सगळे आधुनिक संतच म्हणायचे. गंमत ही आहे की एवढी रत्ने जन्मली त्यांनी एवढे काम केले तरी जाति, धर्म यांच्या लढाया वाढत आहेत. धर्म, जाति व अंधश्रद्धेचा पगडा इतका घट्ट का असतो, की जो काढायला हे दीपस्तंभ अपुरे पडावेत.......