Sunday, July 24, 2011

बी एम एम म्हणजे काय रे भाउ

बी एम एम म्हणजे काय रे भाऊ.....

बी एम एम म्हणजे भरपूर मराठी माणसे ... बी एम एम म्हणजे बाहेरची मराठी माणसे .... किंवा बी एम एम म्हणजे जत्रा अशी ३ उत्तरे आज क्लोजिंग सेरिमोनीत ऐकली. २१ ते २४ जुलै २०११ शिकागो येथे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन संपन्न झाले. वरील तीनही व्याख्या खरे ठरवणारे हे संमेलन होते. संपन्न या शब्दाला साजेसा व्हेन्यू मॅकाॅरमिक प्लेस, संपन्नता दाखवणारे रोजचे मेन्यू आणि अभिरूचिपूर्ण असे कार्यक्रम इथे अनुभवायला मिळाले.

आमचा अधिवेशनाचा हा पहिलाच अनुभव. ३५००-४००० लोकांच्या उपस्थितित कार्यक्रम बघायला मजा आली. मला भारतातील कार्यक्रम बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. नाटक व सारे गा मा वाल्यांना व्हिसा न मिळाल्याने ते लोक आले नाहीत. त्यामुळे जरा निराशा झाली. पण इतर कार्यक्रमही छान होते.


खानपान व्यवस्था अतिशय चांगली होती. फार वेळ थांबावे लागत नव्हते. पदार्थ भरपूर आणि व्हरायटीही खूप होती. जरा खाण्याचे जास्त लाड झाले म्हणायला हरकत नाही. स्वयंसेवकांचे कौतुक. चहा पुरवणारे थकले असतील इतका खप होता.कार्यक्रम बरेच ओव्हरलँप होत होते. आणि उशीरामुळे काही भाग बुडत होते. सगळ्यात हाउसफुल झालेला कार्यक्रम म्हणजे मराठी बाणा..... सेट अप्रतिम. तो भारतातून आणणे हे मोठे काम होते. यातील कलाकारांची एनर्जी दाद देण्यायोग्य. आपण इथे जसे शो बघतो त्याची आठवण होते. लोकसंगीत आणि नृत्य याची मेजवानी ... या कार्यक्रमासाठी व्हाँल्यूम मात्र फार मोठा ठेवतात..भारतातही हाच अनुभव होता तो थोडा कमी ठेवला तर यातील लज्जत कमी होणार नाही हे नक्की. आणि लाईटस चा वापर थोडा कमी केला असता तर बरे वाटले असते. या कार्यक्रमासाठी बरेच लोक मदतीला पुढे आले ..काँसमाँस बँंकेने केलेली मदत कौतुकास्पद. डाँलरच्या हिशोबात मदत करणे नक्कीच सोपे नाही. अशीच मदत भारतातही करावी. (हे चित्र मोठे करून जरूर पहा). या एका कार्यक्रमासाठीच इतके पैसे घालवावेत का असाही विचार बरेच लोकांच्या मनात आला असणार.

सा रे गा मा च्या जागी आयत्या वेळेस अमारिकेत आलेले कलाकार आणि वादक यांचा गाण्याचा कार्यक्रम छान झाला. शंकर महादेवन ने रसिकांची मने जिंकली. गणनायकाने सुरूवात करून मन उधाण ,बगळ्यांची माळ फुले, मेरी माँ, अशी गाणी पाठोपाठ गाउन लोकांना खूष केले. अभंग ही म्हटला आणि शेवटी हरीनामाच्या गजरात सर्व श्रोत्यांना सामील करून घेतले. राम कृष्ण हरी हा गजर त्याने निदान २५ वेगळ्या प्रकारे तरी लोकांकडून गाउन घेतला. त्याच्या मुलाने १८ व्या वर्षी एका मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यानेही अमराठी असून मराठी गाणे म्हटले हे पाहून मजा वाटली. सर्वात शेवटी सध्याचे सिनोरिटा ही गायले. बच्चे कंपनीला स्टेजवर बोलावून नाचायचा चान्स दिल्याने ती खूष..आता यात मार्केटिंगचा भाग जरी असला तरी प्रेझेंटेशन मस्त. (त्याने आँनलाईन म्युझिक स्कूल चालू केले आहे. ). आयत्या वेळेस जुळवाजुळव करून हा कार्यक्रम मस्त झाला.

गाण्याचा अजून एक कार्यक्रम प्रेक्षकांनी उचलून धरला तो नमन नटवरा. शेवटी इतकी गर्दी झाली की मंडळी जमिनीवर बसून गाणी ऐकत होती. मंजु।ा पाटील यांची खड्या आवाजातील व आनंद भाटे यांची गोड गाणी दाद मिळवून गेली. शेवटचा जोहार जोरदार.

पु लं च्या लिखाणावर आधारित गोतावळा सुरूवातीला चांगला वाटला मग इतका लांबला की कंटाळवाणा झाला. शेवटचा क्लोजिंग सेरीमनी पण लांबला. त्यामुळे स्किट व नाच बघायचा पेशन्स कमा झाला व मंडळी हळूहळू बाहेर पडायला लागली. आता लावणी नको अशी परिस्थिती झाली अशामुळे कलाकारांच्या मेहनतीवर पाणी पडते हे नक्की. आमच्या गावातल्या ग्रुपची स्किट चांगली झाली पण थोडे लहान असते तर जास्त चांगले झाले असते. ताजमहालसाठी जागा बघायला शहाजहान पुण्यात जातो तेव्हा पुणेरी माणसाकडून त्याला मिळालेले सल्ले हा एक विषय होता. एन आर आय मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला कोकणात जातो असा दुसरा विषय होता. पुढच्या अधिवेशनात प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार होणे गरजेचे आहे.

ओपनिंग सेरीमनी तील काही भाषणे छोटी असती तर लोकांना जास्त आनंद घेता आला असता. द जर्नी हा कार्यक्रम प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. त्यातील शेवटचा नाच उल्लेखनीय.

मीना प्रभू यांची मी फँन आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पाहिला. भेटही घेतली. त्यांची पुस्तके वाचून नेहेमी मनात येते की त्यांनी भारतावरही लिहावे. एखाद्याला जर भारतावर असे प्रवासी पुस्तक द्यायचे झाले तर आपल्यकडे नाही. ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, तेव्हा त्या म्हटल्या, पेपर मासिक यातून सतत लोक लिहित असतात, म्हटले ते वेगळे तुमचे लिखाण वेगळे, त्यावर बघू लिहूयात असे म्हटल्या ...बघूया वाट .... वाट तिबेटची हे त्यांचे नवे पुस्तक -- आपल्या आवडत्या लेखिकेच्या तोंडून पुस्तकाबद्दल ऐकणे...मजा आली आणि तिबेटला जावे असे वाटायलाही लागले. मीना ताईंनी ब्रेल मधून पुस्तक काढून ज्यांना कधी प्रवासाचे सुख मिळत नाही त्यांना पण तो आनंद दिला आहे.

दुसरीकडे शोभा डे यांचा नउवारी ते अरमानी हा कार्यक्रम ही छान झाला. त्यांच्यातल्या लेखिकेचा प्रवास यात दाखवला होता. या वयातही त्या अत्यंत ग्रेसफुल आहेत. उभ्या उभ्या विनोद हा प्रयोग ही हाउसफुल होता. लहान मुलांची सोय चांगली बघितली होती.

स्वरांगण ची स्पर्धा ही छान झाली. गाणारे छान होते त्यामुळे मजा आली. समीप रंगमंच चीएक एकांकिका पाहिली. वेळेअभावि बाकीच्या बघता आल्या नाहीत. अमेरिकातील लोकांचे उभ्या उभ्या विनोद व इतर अनेक कार्यक्रम न बघता मी भारतातल्या कार्यक्रमांवर भर दिला. बहुतेक सर्व कार्यक्रमांना उपस्थिती चांगली होती हे विशेष नमूद करण्यासारखे. आणि खरादीलाही वाव बराच होता. पुस्तके, दागिने, ज्युवेलरी व कपडे उपलब्ध होते. शेवटच्या दिवशी खरेदी केल्यास चांगला डिस्काउंट मिळतो याचा अनुभव घेतला .

आता काही खटकलेल्या गोष्टी..... यातील कुठलाही कार्यक्रम वेळेवर सुरू होत नव्हता कारण आधीचा वेळेवर संपत नव्हता. वाटेत चहा दिसला की तो सोडायचा कसा.....्प त्यामुळे उशीर....मग काही कलाकारांना कमी वेळ मिळाला. गाण्याच्या कार्यक्रमात कलाकार आल्यावर साउंड सेटिंग झाले ते आधी करून ठेवायला हवे होते. काही लोकांची भाषणे इतकी लांबली की बस.....यावर काहीतरी कंट्रोल हवा ..एकदा माईक हातात आला आणि समोर प्रेक्षक दिसले की मंडळी सुटतात....त्यामुळे इतरांवर अन्याय होतो हे लक्षात घेतले पाहिजे. पुढील अधिवेशनात या गोष्टींचा जरूर विचार व्हावा. सगळ्यांनाच सुखाचे होईल. आपण नेहेमी स्वयंपाक करताना सगळे पदार्थ भरपूर करतो तसेच इथे प्रत्येक कार्यक्रम भरगच्च होता मग भाषण असो की स्किट असो संयोजकांनी व कार्यक्रम बसवणारे यांनी जर थोडा हात राखून कार्यक्रम बसवले तर सगळ्यांनाच चांगले रूचतील व पचतील.कार्यक्रम रहित झाले तर ते - भारतातले अथवा लोकल तिकीट घेतलेल्यांशी शेअर करावे....शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवू नये. कार्यक्रमाचे वेळापत्रक वेळेत द्यायला हवे.

तरूण वर्गासाठी व मुलांसाठी ही वेगळे कार्यक्रम होते. त्यांना अजून मेन कार्यक्रमात भाग घ्यायला लावले तर ते जास्त इनव्हाँल्व्ह होतील.

पण एकंदरीत आमचा अनुभव चांगला होता. संयोजक आणि स्वयंसेवक यांचे श्रम कारणी लागले. त्यांचे अभिनंदन.
अनेक लोकांना कार्यक्रम बसवणे, ग्रुप संयोजन याचे शिक्षण ही मिळाले. पुढील अधिवेशनाला जावे असे वाटणारा नक्कीच होता.

4 comments:

Anonymous said...

Shankar Mahadevan is NOT non-marathi.

He is brought up in Mumbai, and learned from Pt. Sriniwas Khale.

अपर्णा said...

मस्त आढावा घेतला आहे...आणि नेहमीचेच प्रॉब्लेम अजूनही आहेत असं वाटतंय..पण इतक्या मोठ्या प्रमाणावर फक्त volunteer करून केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला तेव्हढ माफ असावं ...

आम्ही मागच्या बी एम एमला होतो अगदी काम करून पण यावेळी जाणं शक्य नव्हतं ती कसर तुमच्या पोस्टने भरून काढली आहे...

Madhuri said...

@anonymous

he said he is half Marathi...ani kahi gani gatana tyache ucchar eikle astet tar tumhi he vidhan kele naste...

aso....

Madhuri said...

@aparna,

Thnks for the feedback. I left many things but....

I know its all volunteer work but we can improve in some areas.