Tuesday, October 2, 2012

वेदातील विज्ञान .......भाग १

वेदातील विज्ञान .......भाग १

आपण आता २१ व्या शतकात आलोत.  रोज नवीन शोध, टेक्नाँलाँजी याला आपण सामोरे जातो.  या सगळ्यावर मात करणारे आजारही आपण बघतो. संशोधन हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आपण बघतो आहोत. त्याच्या सहाय्याने अनेक कोडी आपण उलगडतो आहोत. या सगळ्यात आपण कोण, कोठून आलो हा शोध अजून लागला नाही. आपल्या उत्पत्तीच्या मुळाकडे आपण जात आहोत पण नक्की  उत्तर अजून सापडलेले नाही. काही वर्षात ते नक्की सापडेल असे आताच्या संशोधनाकडे पाहून वाटते.

या सगळ्या चर्चेत -आपल्या वेदात सगळे दिले- आहे हे वाक्य खूपदा ऐकायला येते.  हे सतत ऐकून उत्सुकतेपोटी मी उपनिषदाबद्दल वाचायला सुरूवात केली. मला कधीही कुठल्या स्वामी, गुरू यांचे प्रवचन ऐकताना कंटाळा येतो. तेच तेच ऐकल्यासारखे वाटते. चांगले वागा हे सांगण्यासाठी एवढी उदाहरणे देतात की बस. शेवटी परिस्थिती आणि तेव्हा सदसदविवेक बुद्धीने घेतलेले निर्णय महत्वाचे. हे निर्णय घेण्यात संस्कार, त्या व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती या सगळ्यंाचा वाटा असतो. त्याला एक माप लावता येत नाही. या सगळ्यात बरेच वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात, चुका होतात पण हेच जीवन आहे असे वाटते. अर्थात याला काही अपवाद आहेतच. काही प्रवचने खूप छान असतात पण अगदीच थोडी. मला त्यापेक्षा पुस्तके वाचणे आवडते.

आपल्याकडे का कुणास ठाउक अध्यात्म या विषयाचा खूप बाउ केलेला आहे. हा विषय, त्यावरची पुस्तके,  चर्चा हे सगळे ५० नंतर करायचा विषय आहे असे समजले जाते. असे असण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या लेव्हल्स वर ही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. बाहेर रहाताना अथवा भारतातच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा आपल्या धर्माबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे. इंटरनेटवर बरीच माहिती असते पण थोडक्यात असे काही नसते. आता बरीच मंडळी म्हणतील की आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही मनुष्यधर्म पाळतो, असे असले तरी माहिती असणे आवश्यक आहे किंवा एखादी सर्वमान्य वेबसाईट असणे आवश्यक आहे. अगदी शाळेपासून आपला व दुसरे मानतात तो धर्म याबद्द्ल माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्याबद्दल आदर असायला हवा. तसे बघता सगळ्या धर्मात सगळ्यांशी चांगले वागा असेच सांगितले आहे तर प्रत्येक युद्ध हे बहुदा धर्मयुद्धच का असते हे न सुटलेले कोडे आहे.  आजकाल जगात जे चालले आहे ते बघितले तर या गोष्टीची गरज नक्की जाणवेल.

सायन्स चँनेल वरच्या या फिल्म्स बघितल्या की बराच विचार केला की शास्त्रज्ञांची व धाडसी लोकांची कमाल वाटते. आता अवकाशात जाउन चक्क आपला ग्रह बघता येतो. गणिताच्या सहाय्याने अनेक तारे अभ्यासता येतात.  पुढच्या वर्षी नासा अँस्ट्राँईड वर उतरणार आहे. वातावरणाचा थर तिथे जाउन अभ्यासता येतो. आपली सूर्यमाला व इतरांचा अभ्यास चालू आहे.  शेवटी खरे तर आपण कसे आलो हा विचार केला तर घाबरायलाच होते.  पण हळूहळू हे सगळे आपल्या कथा पुराणाशी कुठेतरी मेळ खाते. बरेच साहित्य हे कोड भाषेत असल्याने त्याचे अर्थ लागत नाहीत. इतर देशात पण जुने दस्तऐवज सांकेतिक भाषेत आहेत. धर्मवेड्या लोकांपासून लपविण्यासाठी हे करावे लागे.  त्यामुळे वेगवेगळे अर्थ निघतात व वाद होतात.

आजकाल अध्यात्म व विज्ञान या गोष्टींची सांगड घालणारे बरेच दिसतात. माझ्यासारखी काही मंडळी असतात त्यांना काहीतरी सिद्ध केलेले असले की त्यावर विश्वास बसतो. काही लोकांना जुन्या ग्रंथांवर पूर्ण विश्वास असतो. बरेच लोक या अशा पुस्तकांच्या विरोधात असतात. त्यांचे म्हणणे असते की शोध लागल्यानंतर ही पुस्तके लिहिली गेली तेव्हा हे सगळे जुळवून लिहिले आहे,  कुठुनतरी अर्थ लावायचा आणि शोधांशी सांगड घालायची. मग मी जुन्या लोकांनी लिहिलेले वाचले (शोध लागण्यपूर्वीचे) तर दोन्हीत बरेच साम्य आढळले.  अँस्ट्राँनाँमी वर हल्ली मी खूप फिल्म्स पाहिल्या आणि मग आपले जुने ग्रंथ व आता लागणारे शोध यात नाते आहे असे जाणवू लागले. हल्ली इतक्या प्रकारचे रिसर्च चालू आहेत की येत्या काही वर्षात आपण कोण, कसे आलो, विश्व कसे निर्माण झाले याची उत्तरे नक्की मिळतील असे वाटते. अजून काही वर्षात वेदातील विज्ञान व शोधातील विज्ञान एक होईल असे मला नक्की वाटते. भारतात निदान एखाद्या विद्यापीठात यावर व्यवस्थित संशोधन व्हावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित व्हायला पाहिजेत.  तरच हे वेदात सगळे होते हे म्हणणे सिद्ध होईल. नुसते म्हणणे काही कामाचे नाही.  पाश्चिमात्य जगात शोध लागले तरी ते सगळ्या जगाला उपयुक्त असतातच पण जर भारतीयांनी काही भर घातली तर आपल्या  पूर्वजांच्या कष्टाचे चीज होईल हे नक्की.

1 comment:

aativas said...

वेदांत विज्ञान कशाला शोधायचे हा एक प्रश्नच आहे मला!