Friday, March 17, 2017

पुराणातील देव देवता ....एक सफर

मी काही फार देवदेव करणारी नाही पण त्या एका शक्तीवर विश्वास जरूर आहे. या साऱ्या विश्वाचा पसारा पाहिला की आपण त्या शक्तीला नक्कीच मानतो.

लहानपणापासून अनेक देव देवता आपल्याला भेटतात काही घरात, काही गावात तर काही पुस्तकात. आपण अनेक गोष्टी ऐकत आपली मते बनवतो.जसे आपण मोठे होतो तसे काय खरे काय खोटे याचा आपण विचार करायला लागतो. हल्लीच देवदत्त पटनाईक यांची काही पुस्तके आणि भाषणे ऐकली व काही गोष्टींचे संदर्भ लागत गेले.  सध्या त्यांच्या चालू असलेल्या फेसबुक वरच्या कार्यक्रमावर आधारित......

वेदात वर्णन केलेले देव हे जास्त निसर्गातले होते त्या नंतर सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी पुराणे व इतर गोष्टींची निर्मिती झाली. तेव्हा अनेक प्रथा पद्धति व चिन्हे ...सिंबाॅल्स ची कल्पना उदयाला आली व या गोष्टी पिढी दर पिढी आजपर्यंत पोचल्या.वेदातले ज्ञान हे पाठांतराने एका पिढीतून दुसरीकडे जात होते. छंद मात्रा यात ते गायले जात असे. नंकर पुराणांचे लेखन झाले त्यानंतर काही वर्षांनी कॅलेंडर आर्ट निघाली. एक चित्र अनेक शब्दांचे प्रतिक असते आणि सामान्य माणसापर्यंत पोचते म्हणून भित्तीचित्रे देवळातील मूर्ती यांचा उदय झाला. नंतर कॅलेंडर व त्यावरील देवदेवतांची चित्रे सर्व जातीधर्मांच्या घरात पोचली.

हिंदू धर्मात एवढे देव आहेत.प्रत्येक देव हा एक विचार असतो. अनेक विचारांनी मिळून बनलेली ही समृद्ध परंपरा आहे. स्थल, कालानुसार यात बदल होतात. म्हणून एक देव विविध रूपात दिसत.

गाया मदर गाॅड मातृ देवता ही कल्पना सगळ्या कल्चर मध्ये आहे. आई ही जन्म देते म्हणून तिला जास्त महत्व दिले जाते. पृथ्वी ला माता म्हणून खूप संस्कृती मानतात. आकाश हे पिता स्वरूपात बधितले जाते. वेदात निसर्गाला खूप महत्व दिले आहे. सुरूवातीला भूमाता मग अनेक देवांची उत्पत्ती, त्यानंतर पुन्हा एक ईश्वर वाद असे साधारण चक्र आहे. इतर धर्मा मध्ये स्त्री देवता फार कमी दिसतात. हिंदू धर्मात बऱ्याच रूपात पूजल्या जातात. सप्तमातृका या पाषाणयुगाच्या आधीपासून सापडतात. पुराणात आणि वेगवेगळ्या काळात वेगळ्या आख्यायिका सापडतात. कधी त्या देवाचे शक्तीरूप म्हणून समोर येतात तर कधी देवांच्या मदतनीस म्हणून. नेहेमी समूहात असतात आणि रक्षणकर्त्या रूपात दिसतात. प्रत्येकीचे वाहन असते. गाया किंवा देवीरूपाबद्दल ही बरेच विचार आहेत. सुरूवातीला आदि मायेपासून सृष्टीची निर्मितीझाली असा एक विचार आहे. त्या नंतर जेव्हा मनुष्य कळप करून राहू लागला तेव्हा स्त्रीला जास्त महत्व देत असत कारण तिच्यात प्रजननाची क्षमता होती. नंतर हळूहळू हे महत्व कमी झाले.  स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या या देवीची रूपे असतात. स्त्री व पुरूष यांना समान व मानाने वागवले जावे.

देवी  देवी म्हणजे प्रकृती निसर्ग.  निसर्गातून सगळ्याची निर्मिती होते.  निसर्गावर आपले नियंत्रण नसते. पुरूष रूपी मन असते आणि देवी म्हणजे निसर्ग. पुराणात त्याला स्त्री रूपात दाखवले आहे.  आदि शक्ती म्हणजे निसर्ग म्हणजेच देवी. भाग्य आणि ईच्छा किंवा काम आणि कर्म या दोन गोष्टीवर आपली समाजरचना झाली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण त्या बदलू शकत नाही ते भाग्य किंवा कर्म आणि आपल्या मनाप्रमाणे जे करतो ते काम. विष्णू रूप हे प्रवृत्ती दाखवते तर शिव रूप हे निवृत्ती दाखवते. मनुष्याच्या आधी व नंतर निसर्ग असतो आपण त्याला आपल्या इच्छेने बदलू शकत नाही. त्यामुळे देवीला महत्व आहे.

सरस्वती ..  ही देवी शाळेत सगळ्यांना भेटतेच. पाटीपूजन करून या विद्येच्या देवीला आपण पूजतो.  या कुंदे.....या
श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. ही विद्येची देवता मानली जाते. शुभ्र वस्त्र तिचे बाकी मोहमायेतले वैराग्य दाखवते. ती हंसावर बसलेली असते. हंस हा नीर क्षीर विवेकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखाला पाणी चिकटत नाही. अलिप्तता यातून दिसते.तिच्या हातात वीणा आहे. कवि लोक जे कल्पनेच्या साम्राज्यात वावरतात त्यांची ही देवी आहे. सृजनशीलता , ज्ञान हे सगळे बुद्धी व कल्पनेच्या जोरावर मिळते म्हणून या देवीचे महत्व.

दुर्गा  ही देवी सांगते सर्व भितीच्या अमलाखाली असतात. दुर्ग म्हणजे किल्ला जो रक्षण करतो. महिषासुर राक्षसाला या देवीने मारले. हा राक्षस सर्व देवांना त्रास देत होता तेव्हा देवांच्या आंतरिक शक्तीतून जे तेज एकवटले त्यातून या देवीचा जन्म झला. सगऴेराजा या देवीची पूजा करतात. वेगवेगळी वाहने दिसतात. कधी वाघ तर कधीसिंह. कधी व्हेज तरकधी बळी दिला जातो. माणसाला एक आंतरिक शक्ती व एक बाह्य शक्ती मदत करतात.  बाह्य शक्ती ही शस्त्रे सत्ता यातून मिळते.

काली  कालीचे रूप भयंकर असते. काळा रंग, वस्त्रे नाहीत, गऴ्यात रूंड माळा रक्त पिणारी. काली ही मातेच्या रूपात पूजली जाते. मनुष्य जेव्ह पशूसारखा व्यवहार करतो तेव्हा काली जन्म घेते. संहार होतो. सीता द्रौपदीवर अन्याय झाला तेव्हा त्या पण आपले रूप बदलतात.  निसर्गावर कोणी सत्ता गाजबू शकत नाही हे काली सांगते.

गौरी  सस्कृती माणसाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते.  प्रकृतीत कमतरता आहे म्हणून मनुष्य नीती नियम बनवतो. गौरी श्वेतवर्ण फुलांनी सजलेली, दागिने घातलेली असते. गौरी ही कन्येच्या रूपात पूजली जाते. देवी पूजनात नेहमी कन्या पूजन केले जाते. सभ्यता असेल तेथे गौरी वास करते व असभ्यता आली की कालीचा प्रभाव येतो.

गणपति ही महाराष्ट्राची ईष्टदेवता. सुखकर्ता दुखहर्ता अशी याची महती. लंबउदर हे संपन्नतेचे लक्षण मानतात. पूर्वी
धान्याची कमतरता होती तेव्हा भूक मिटवणे यासाठी पूजन केले जाते. वाहन उंदीर आणि कमरेला साप हे परस्यर विरोधी आहेत. ते एकत्र नांदतात जेव्हा भूक हा प्रश्न नाही.  हत्तीचे मुख सामर्थ्य दाखवते, या सगळ्या गोष्टींची कामना आपण गणपती पूजनात करतो. प्रत्येक चित्रातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरूगन
 हा गणपतिचा भाउ. हातात शस्त्र आणि तेजस्वी. भिती चा सामना करा असे तो सुचवतो.  हा उत्तरेत वेगळ्या रूपात तर दक्षिणेत वेगळ्या रूपात दिसतो. अनेक लोककथा व पुराणातील कथा त्याची महती सांगतात. दक्षिणेत त्याला दोन बायका तर उत्तरेत अविवाहित. त्याच्यासाठी हिमालय व गंगा काही प्रमाणात दक्षिणेत आणली म्हणून दक्षिण काशी व दक्षिण गंगा अशी नावे पडली असे सांगतात. देव हे वेग ळ्या काळात वेगळ्या रूपात बघितले जातात. सहा आया त्यालाआहेत ज्यात अग्नि व वायू यांचाही सामावेश आहे. देवांचा सेनापती मानला जातो. बायकांना या देवळात जाण्याचीबहुतेक ठिकाणी बंदी असते.


कलकी  आता कलियुग चालू आहे व कली अवतार घेउन जग नष्ट करणार अशी कल्पना आपण ऐकतो. हा घोड्यावर
पांढरे कपडे घालून येतो. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट जन्माला येते व अंत पावते व परत जन्माला येते ही कत्पना आहे.