Saturday, March 17, 2012

लख लख चंदेरी....

आपण लहानपणापासून चंद्र, तारे, सूर्योदय, सूर्यास्त, नक्षत्रे ही सगळी लखलखणारी दौलत पहात मोठे होतो. चांदण्यात फिरणे हा एक मोठा आनंद देणारा अनुभव असतो. अतिशय शांत व शीतल अनुभव. गेल्या वर्षी झायान कँनिअन मध्ये तारकांनी इतके गच्च भरलेले आकाश पाहिले की बस. गावाबाहेर दिव्यांचा प्रकाश कमी असतो तेव्हा हा अनुभव घेता येतो. बर्फामध्ये पण चांदणे फार सुंदर दिसते. वेगळाच प्रकाश दिसतो व गूढ वाटते. लहानपणी मला नेहेमी वाटायचे की कायम आकाशात तेवढ्याच चांदण्या असतात. जागा बदलतात हे हळूहळू लक्षात आले. गच्चीवर उन्हाळ्यात झोपले की नक्षत्रे व त्यांचे आकार बघणे हा खेळ नेहेमी असे. ध्रुव तारा, शनि, शुक्र व मंगळ यांची तेव्हाच ओळख झाली.

आपल्या पूर्वजांनी याच ग्रह तारे यांचा उपयोग करून मोठ्या सफरी पार पाडल्या. पिरँमिड सारखी मोठी बांधकामे करताना ही रेफरन्स साठी यांचा उपयोग झाला होता. शाळेत हळुहळु ग्रहण, आकाशगंगा, यांची ओळख झाली. खगोलशास्त्रज्ञाची माहिती झाली. या सगळ्यात गँलिलिओ ला फार महत्वाचे स्थान आहे. सूर्यमाला व ग्रहांचे फिरणे याबद्दल त्याने प्रथम माहिती दिली. त्यासाठी धर्माच्या राजकारणाचा खूप त्रास त्याने सहन केला. पण खरे शास्त्रज्ञ मागे रहात नाहीत..आपल्याकडे ही कारणे खूप दाखवली जातात संशोधन न होण्यासाठी...., सुरूवातीला या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नव्हता पण जसे शोध लागत गेले लाकांचा विश्वास बसू लागला. यापुढे जाउन माणसाने चंद्रावर पाउल ठेवले व या क्षेत्रात भरपूर संशोधन होउ लागले. अर्थात या क्षेत्रात अनुमानावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्यक्ष लँब नसते कारण हाय टेँपरेचर्स व एवढी हीट आपण प्रयोगशाळेत करू शकत नाही. गणिती आधार, दुर्विणीतून मिळालेले प्रकाशचित्र याच्या आधारावर सगळे चालते.

शास्त्रज्ञाना असे लक्षात आले की आपले युनिव्हर्स एक्स्पांड होते आहे यातून बिग बँग थिअरी ची कल्पना पुढे आली. फार पूर्वी एका बिंदूपासून सुरूवात होउन सगळे विश्व निर्माण झाले असावे असा निष्कर्ष निघाला व आपण कसे तयार झालो याबद्दल बरेच विचारमंथन होउ लागले. या विषयावर सायल्स चँनेल वर खूप छान डाँक्युमेंटरीज दाखवतात. तुम्हाला मिळाल्या तर जरूर पहा. काही ब्रिटीश तर काही अमेरिकन आहेत. या डाँक्युमेंटरीज बघताना आपले वेदातील सिद्धांत आपण बघतो आहोत असे वाटते. शून्यातून ब्रम्हांड, कण कण मे भगवान, जन्म मरणाचे फेरे,नवीन काही जन्मताना जुने नष्ट व्हावे ,जन्म व मरण हे प्रत्येक गोष्टीला असतेचगैरे माझ्यासारखे लोक समोर जेव्हा काही दिसते तेव्हा त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आता विज्ञान जेव्हा आपल्या उत्पत्तीबद्द्ल शोध घेत आहे मला आपले लिहिलेले जुने खरे वाटत आहे. अर्थात हे सिद्ध करताना पण वरेच वेळा गोष्टा मानाव्या लागतात. सगळेच समोर दाखवताा येत नाही. असो या पुढच्या लेखात त्याबद्दल लिहिणार आहे.

. आपण सगळे स्टारडस्ट आहोत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपली आकाशगंगा ही अशी एकातयार झाली आहे. आपल्या शरीरातील सर्व एलिमेंटस ही स्टार्स पासून तयार होतातआपल्या नजरेच्या आड या चांदण्याच्या पल्याड आकाशात खूप गोष्टी घडत असतात. तारे सुद्धा जन्म मरणाच्या सायकल मधून जात असतात. आकाशात स्टार्स तयार होतात व काही (अनेको) वर्षानी नष्ट होतात. नष्ट होताना पुन्हा नव्या स्टार्सना जन्म देतात व ही क्रिया चालू रहाते. हे चक्र सतत चालू असते. सगळ्यात आधी सुरूवात कशी झाली हा प्रश्न अजूनही शास्त्रज्ञ सोडवत आहेत व काही वर्षात नक्कीच निर्णयाप्रत पोचतील ही मला आशा आहे. हे ग्रह तारे यांचे चक्र अनेक बिलिअन वर्षांचे असते. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो व तो आकारमान व इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो.




अशा प्रकारच्या प्रकाशचित्रांवरून शास्त्रज्ञ त्या स्टारबद्दल माहिती गोळा करतात. या रंगावरून वत्यातील स्पाँटसवरून त्यातीलएलिमेंटस बद्दल कल्पना येते.






आपण नेब्युलापासून या चक्राची सुरूवात पाहू.. नेब्युला हा दाट केमिकल्स व गँसचा ढग अवकाशात असतो. त्याच्या अंतर्भागात घर्षणामुळे खूप हीट तयार होते.या सगळ्या प्रक्रियेत हायड्रोजन हा महत्वाचा घटक आहे. कोअर मध्ये जेव्हा हायड्रोजनचे फ्यूजन होते तेव्हा प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. प्रकाश व हीट यारूपातील ही एनर्जी बाहेरच्या बाजूला सरफेसकडे येते. यात तयार होणारे फोटाँन प्रकाश निर्माण करतात. या फ्यूजनच्या प्रक्रियेत हायर एलिमेँटस तयार होतोत. परत त्यांचे फ्यूजन होते अजून एनर्जी व नवीन एलिमेँट्सटी निर्मिती होते. आतून बाहेर येणारी ही एनर्जी जे प्रेशर निर्माण करते ते स्टारला त्याच्या वजनामुळे कोलँप्स होण्यापासून वाचवते. आपण सगळ्यांनी शाळेत पिरिआँडिक टेबल पाहिलेच असेल. ही सर्व एलिमेंटस अशा पद्धतिने तयार झाली आहेत व आपल्या निर्मिती च्या वेळेस जी तयार झाली तीच व तेवढीच आहेत. हा विचार केला की गंमत वाटते.
जेव्हा आयर्न तयार होते तेव्हा एनर्जी कमी व्हयला सुरूवात होते. या पुढची एलिमेंटस एनर्जी घेतात कोअर म्हणजे अंतर्भाग गुरूत्वाकर्षणामुळे कोलँप्स होतो . आता मधे गुरूत्वाकर्षणाचा जोर व बाहेर फयूजन मधून निर्माण झालेला फोर्स याचा बँलन्स जोपर्यंत साधला जातो व हायड्रोजनचा पुरवठा होत रहातो तोवर आकार वाढर जातो व नवीन एलिमेंटस तयार होत रहातात. या प्रक्रियेवरून लक्षात येते की प्रेशस एलिमेँट्स ही शेवटच्या काही मिनिटात बनतात, त्यासाठी प्रचंड हीट लागते. एकंदर आकारमान ही मोठे असावे लागते. जेव्हा इंधन संपते तेव्हा ही सगळी क्रिया थांबते. जेव्हा स्टार कोलँप्स होउन आत खूप सँच्युरेशन होते तेव्हा प्रचंड स्फोट होउन एलिमेंटस बाहेर टाकली जातात. नवीन स्टार्स तयार होतात.















पुढेआकारमानाप्रमाणे नोव्हा, सुपरनोव्हा वा व्लँकहोल्स बनतात.
आपली सूर्यमाला अशाच एका ब्लँकहोल भोवती फिरत आहे व त्यावर भरपूर संशोधन चालू आहे. त्याच्य आत नक्की काय आहे, पलिकडे काय आहे हे शोधण्याचे काम चालू आहे.

आपण नेहेमी जे छान आकाश व चांदणे बघत असतो त्यच्यामागे एवढे काही दडलेले असेल अशी कल्पना येत नाही. बरेच काही कल्पनेनेन बघावे लागते. पण जे आहे त्याबद्दल विचार केला की खूप गूढ अगम्य वाटते व परत परत त्याबद्दल विचार करावासा नक्की वाटतो. आपण या काळात आहोत व या सगळ्या शोधांचे साक्षी आहोत हा आपल्या नशिबाचा भाग. यातूनच पुढे जाउन आपले वेदातील विज्ञान अनुभवायला मिळेत असे वाटते हे नक्की.

Wednesday, January 25, 2012

दिनदर्शिका


दिनदर्शिका....

परवा टी व्ही वर एक कार्यक्रम पाहिला..... जर कालगणना नसती तर... या विषयावर एक मालिका होती. नुसत्या विचारानेच कसेतरी झाले. लहानपणापासून आपण वेळ मोजायला शिकतो. हे जर नसते तर... कशालाच संदर्भ राहिला नसता.... कालगणनेतला एक महत्नाचा टप्पा म्हणजे दिनदर्शिका. शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले की आपण जसे नवीन पुस्तकांची वाट बघतो तसे मी कँलेंडरची वाट बघते. घरात सगळ्यात पहिले येते ते कालनिर्णय. यातील लेख वाचनीय असतात. आणि हो, इतकी वर्षे झाली तरी दर्जा राखलेला आहे. अमेरिकेत आल्यापासून सणवार बघायला हे आवश्यक झाले आहे.

इथे साधारण ख्रिसमस जवळ आला की माँल मध्ये कँलेंडरची तात्पुरती दुकाने दिसायला लागतात. नवीन वर्षाबरोबर किमती कमी होतात हा यातला चांगला भाग आहे. आता तर ७५ टक्के किम्मत कमी केलेली असते. यातील डेस्क वर ठेवण्याजोगी व्हरायटी मला फार आवडते. लोकांना गिफ्ट देण्यास उत्तम. विनोद, कोडी, सुडोकु, रेसिपिज, गोल्फ टिप्स, ट्रंव्हल, ओरिगामी, स्क्रँबल्स अशा अनेक विषयांवर ही छोटी कंलेडर्स असतात. दर दिवसाला नवीन काहीतरी शिकता येते, लहान मुलांना पण शिकवता येते हा फायदा आणि एक रूटीनही रहाते. मोठ्या कँलेंडर्स मधे नँशनल पार्क, प्राणी, युरोप, नामवंत कलाकारांची चित्रे, हाँलीवूड मधील मंडळी हजेरी लावताना दिसतात. गाड्या, वेगवेगळी कोटेशन्स, खेळाडू हेही काहींना आकर्षित करतात. या दुकानात गेले की हरवायला होते. एका वर तर १००० प्रवासी जागांची माहिती होती. फुलांची पण सुंदर असतात. या वर्षी अँपल च्या अँप्स ने ही नंबर लावला या दुनियेत.

या वर्षी अजून एक छान दिनदर्शिका पाहिली. एक बाई गेली २० एक वर्षे चक्क गणित हा विषय घेउन दिनदर्शिका काढते आहे. या वर्षी विशेष म्हणजे प्रत्येक तारखेवर एक गणित आहे वेगवेगळ्या प्रकारातले आणि त्या गणिताचे उत्तर म्हणजे ती तारीख आहे. शिवाय इतर माहिती खूप आहे. ज्यांना गणित आवडते आणि ज्यांना आवडत नाही त्या दोघांना हा प्रकार नक्की आवडेल. amazon.com वर mathematical calendar या भागात ते बघायला मिळेल.

या सगळ्या प्रकारात माझे आवडते मात्र आपले स्वतचे बनवलेले कंलेंडर. आपण बरीच ठिकाणे पहायला जातो, तिथे फोटो काढतो हा सगळे एकत्र करून मी गेली ४-५ वर्षे हा उद्योग करते आहे. विषेष करून पालकांना हा प्रकार आवडतो कारण मुला नातवंडांचे फोटो डोळ्यासमोर रहातात. वाढदिवस, लग्न या तारखा लक्षात ठेवून त्या व्यक्तीचे फोटो टाकता येतात आणि हे personalized calendar छान दिसते. तुम्ही पण करून बघा एखादे. walgreens.com or picsquare.com या सारख्या अनेक साईटस सापडतील.

अगदी पूर्वी फक्त देव किंवा नटनट्या यांना कंलेंडरवर स्थान होते आता ही व्हरायटी पाहिली की मजा वाटते. आता पुढच्या वर्षी नवीन काय काढतील याची उत्सुकता मला आत्ताच आहे. भारतात ही शिवाजी महाराज, राजस्थान, हिमालय, देवस्थाने या विषयावर सुंदर कँलेंडर्स बनतील. बाहेरच्या देशातून आलेल्या पाहुण्यांना द्यायला उत्तम....

Friday, December 30, 2011

काही वाचनीय... दीपस्तंभ

काही वाचनीय... दीपस्तंभ

गेल्या महिन्यात प्रा. शिवाजीराव भोसले यांचे दीपस्तंभ हे पुस्तक वाचनात आले. पेपर मध्ये लिहिलेल्या स्तंभलेखनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तकाचे नाव, प्रस्तावना व आतील मजकूर सगळेच प्रेरणादायी वाटले. समुद्रात वाट चुकलेल्यांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो त्याप्रमाणे या पुस्तकात अशा अनेक लोकांची ओळख करून दिली आहे जे जनजागृति च्या कामात दीपस्तंभासारखे उभे होते. पेशवे कालानंतर धर्माच्या नावावर बराच काळाबाजार चालला होता तो लोकांना दाखवण्याचे काम या लोकांनी केले. अनिष्ट रूढी मोढण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले ते यात दाखवले आहे. गंमत म्हणजे अजूनही जात, धर्म या गोष्टी वापरून आपल्यावर संकटे येत आहेतच. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींची प्रस्तावना लाभली आहे ती पण वाचनीय. आजकाल व्याख्यान संस्क्रृति लोपली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला अजून चांगले वाटले.

शाळेत असताना आपण वरेच वेळा समाजसुधारकांचे कार्य अभ्यासतो पण त्यापुढे जाउन चरित्रे वाचत नाही. या पुस्तकात थोडक्यात चरित्र दिली आहेत. काही मजेदार आठवणी दिल्या आहेत. आपल्याला वाटले तर पुढे जाउन अजून वाचावे. साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, १८ व्या- १९ व्या शतकाचा काळ, बहुतेक सगळे गरिबीतून कसेबसे शिक्षण घेणारे पण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोचणारे. ब्रिटिशांचे एका बाबतीत कौतुक वाटते, जरी ते राज्यकर्ते होते तरी बुदधीला त्यांनी मान दिला. हुशार लोकांना त्याच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यास बोलावले. आणि वेळ आली तर पारितोषकाने गौरवले पण.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोषाचे बरेच खंड संपादित केले आणि आता ते मराठी विश्वकोष या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून झाली.बहुतेक सगऩ्या लोकांनी घर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, ही गोष्ट फार महत्वाची वाटते. शाळेपासूनच जर इतर घर्माबद्दल माहिती झाली तर मुलांना खूप फायदा होईल. १८०० ते १९०० हा काळ असा होता की भारतीय संस्क्रृति, मोगलांचे वर्चस्व व राज्य इंग्रजांचे... सगळ्या गोष्टी धर्माशी निगडीत होत्या. अंधश्रदधातून लोकांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते.

या पुस्तकात आलेल्या समाजसुधारकांचे विचार वेगळे होते, पण प्रत्येकाचे ध्येय एकच होते. सामान्य जनांना जागृत करणे, एकत्र करणे व चांगला समाज तयार करणे. मग ते सर्व धर्मातील मूलतत्वे एकत्र घेउन, एक परमत्त्व सर्वात आहे असे मानणारे ब्राम्हो समाजाचे राजा राममोहन राँय असोत किंवाजातिभेदाला न मानत योग, परमेश्वर चैतन्य यांना मानून आर्य समाजाचा प्रसार करणारे महर्षि दयानंद असोत. बरीच वर्षे देशाबाहेर राहून शिकलेले पण शेवटी भारतातच कार्य करणारे अरविंद योगी असोत. त्यांनी मानवाची पुढची आवृत्ती महामानव सांगितली आहे. matter, mind va supermind अशी त्यांची धारणा होती. प्रत्येकाची कल्पना आणि अभ्यास दांडगा.विश्वेश्वरअय्या यांनी केलेल्या पाण्याच्या प्रश्नांचे व्यवस्थापन आणि काढलेले अनेक कारखाने...एक माणूस किती काम करू शकतो याची कल्पना येते. बहुतेक सगळ्यांना लहानपणी भरपूर पायपीट करावी लागली पण पुढे तब्येतीसाठी फायदाच झाला. दुसरी एक गोष्ट सातत्याने द्सली म्बणजे वहुतेकांना बडोद्याच्या महाराजांनी सहाय्य केले नोकरी किंवा पैसा देउन.
जे क्रृष्णमूर्तींचा थिआँसाँफिकल विचार , स्वामी विवेकानंदांचे विचार, कर्मवीर पाटील यांची रयत शिक्षण संस्था व अगणित वसतिगृहे, शाहू महाराजांचे विचार, साने गुरूजींची तत्वे, या सगळ्याशी या पुस्तकातून ओळख होते.

गुरूदेव रानडे यांनी जी राष्ट्राच्या अवनतीची कारणे दिली आहेत ती आजही पटतात. गुरूदेव टागोरांचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह, काबुलीवालाची गोष्ट, जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेच्या वास्तव्यात घेतलेला श्रमप्रतिष्ठेचा अनुभव, जोतिबा फुले यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण याचे कार्य. साने गुरूजींनी भाषेच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.

हे पुस्तक शाळेत, इंटरनेटवर ठेवले तर जास्त मुलांपर्यंत पोचेल व त्यांना या लोकांची ओळख तरी होइल. पूर्वी लोकांच्या शिक्षणासाठी संत लोक जन्म घेत. हे सगळे आधुनिक संतच म्हणायचे. गंमत ही आहे की एवढी रत्ने जन्मली त्यांनी एवढे काम केले तरी जाति, धर्म यांच्या लढाया वाढत आहेत. धर्म, जाति व अंधश्रद्धेचा पगडा इतका घट्ट का असतो, की जो काढायला हे दीपस्तंभ अपुरे पडावेत.......

Monday, December 5, 2011

जागो मोहन प्यारे....

जागो मोहन प्यारे....

आजकाल जमाना फ्यूजन चा आहे. सगळीकडे मिलावट दिसते. वेस्टर्न गाणी, बँड यांचा मुलांवर खूप प्रभाव दिसतो. अर्थात यात त्यांचा दोष नाही. बाहेर सगळीकडे तेच दिसते, ऐकू येते व मुले अनुकरण करतात. पटकन गायक बनण्यासाठी आजकाल सगळे धडपडत असतात. स्टेज शो चे तर सगळ्यांना आकर्षण - लहान असोत की मोठे.

हे सगळे पहाताना वाटते की आपले संगीत यात हरवून तर जाणार नाही ना... आता तुम्ही म्हणाल की खूप मुले गाणे शिकतात...शिकतात हे खरे आहे पण प्रमाण कमी आहे. पूर्वी शाळेत विषय होता आता फारसा दिसत नाही. भारतात लोकांना शिकणे सोपे आहे पण बाहेरच्या देशात थोडे अवघड जाते. आजकाल स्काईप वरून शिकणे हा एक प्रकार चालू झाला आहे.

आपले संगीत शिकायला गुरू ची आवश्यकता असते. गुरू शिष्य पद्धतीवर आपले शिक्षण आधारित आहे. वेस्टर्न प्रकारात सगळे लिहून दिलेले असते. इथल्या मुलांना शाळेपासून शीट म्युझिक ची सवय असते. शाळेत वाद्य शिकणे आवश्यक असते त्या मुळे प्रत्येक मुलाला थोडीतरी जाण असते. बीट सायकल ची ओळख असते त्यामुळे ताल समजतो. लहानपणापासून बँंड, काँन्सर्ट याची शिस्त अंगात भिनलेली असते. पण गाणे जर लिहिलेले नसेल तर कळत नाही. गेली काही वर्षे इथे राहिल्याने हा फरक जाणवतो.

इथे एक म्युझिक सर्कल च्या कामात असे लक्षात आले की अमेरिकन मुले वाद्याचे कार्यक्रम आवडीने बघतात कारण त्यांना ताल कळतो. आपली मंडळी आम्हाला काही ते शास्त्रीय कळत नाही असे म्हणून यायचे टाळतात. असेच एक कलाकार गेल्या महिन्यात आले होते. त्यांनी शिकागो मधील १५ अमेरीकन मुलांना आपल्या पद्धतीने गाणे शिकवले. ५ राग व बंदिशी या नोटेशन लिहून न देता ही मुले म्हणू शकतात. त्यांना आपली गुरू शिष्य परंपरा थोडीतरी कळली आहे हे नक्की. राग भैरव मधील एक बंदिश शेअर करत आहे.

जागो मोहन प्यारे

ही मुले एक सेमेस्टर शिकली आणि छान म्हणत आहेत अगदी १०० टक्के नाही पण कौतुकास्पद आहे. र,ट आणि च हे उच्चार इथल्या मुलांना जमत नाहीत. म्युझिकल नोटेशनशिवाय म्हणले आहे हे ही कौतुकास्पद. त्यांना कोमल आणि शुद्ध हा समजावणे थोडे अवघडच पण या गुरूंनी ते करून दाखवले. या मुलांवर केलेला प्रयोग बघून इतरांना जर यात इंटरेस्ट वाटला तर काही दिवसांनी हिंदुस्तानी संगीताचे चित्र बदलेले दिसेल कारण एखादी गोष्ट पाश्चात्यांनी सांगितली की आम्हाला पटते. पिकते तिथे विकत नाही हेच खरे.

Wednesday, November 9, 2011

जमिनीच्या पोटात

जमिनीच्या पोटात.....

काल एक माहितापर फिल्म पहाण्यात आली. आजकाल आपली(जीव सृष्टीची) सुरूवात कशी झाली, कधी झाली याबद्दल बरेच काही दाखवत असतात. जे माहित नाही ते शोधून काढणे हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्यासाठी तो खूप कष्ट घेत असतो. असाच एक प्रयत्न नायकाच्या बाबतीत झाला. आता हे .नायका प्रकरण आहे तरी काय.....


मेक्सिको च्या उत्तरेला चिवावा प्रांतात काही खाणी आहेत. त्या खाणीत डोंगरातून पाणी येते ते मोठे पंप लावून काढले जाते. आश्चर्याची गोष्ट ही की हे पाणी खूप गरम असते. या काढून टाकलेल्या पाण्याने जवळच एक मोठा लेक तयार झाला आहे. बाकी आजूबाजूला वाळवंट आहे. जमिनीखाली ३०० मी वर हे खाणकाम चालते. एकदा काही कामगारांना वेगळे द्रृष्य दिसले. नेहेमीचे काम करत असताना त्यांचे सहजच खाली लक्ष गेले तर तिथे त्यांना मोठे बर्फासारखे क्रिस्टल्स दिसले. आतमधे एवढे गरम असताना बर्फासारखे काय दिसते म्हणून त्यांची उत्सुकता चाळवली गेली. पुढे गेल्यावर जवळ जवळ
फुटबाँल फिल्ड एवढ्या जागेत हे क्रिस्टल्स दिसून आले. काही तर ११ मी उंच आणि १ मी रूंद एवढे मोठे आहेत. प्युअर जिप्सम चे हे क्रिस्टल्स आहेत. दिसायला अगदी बर्फासारखे ..चमकदार आणि मोहक. मला ते पाहून सुपरमँन च्या एका सिनेमाची आठवण झाली.

वरीच लोक या बाबतीत उत्सुकता दाखवत होती म्हणून एक आंतरराष्ट्रीय टीम तयार झाली व याचा अभ्यास केला गेला. नासा, अँस्ट्रोफिजिसिस्ट, जिआँलाँजिस्ट व केमिस्ट अशी ही मंडळी होती. आत काम करताना स्पेशल थर्मल सूटस घालावे लागले. आँक्सिजन चा पुरवठ मेडिकल हेल्प हेही होतेच १० मि च्या वर आत रहाणे धोक्याचे . तेवढ्याच वेळात त्या टोकेरी क्रिस्टल्स च्या आत उतरून रिडींग्ज घेण्याचे काम त्यांनी केले व पुढे अँनालिसिस ही केले. १ वर्षात आतमधे किती क्रिस्टल वाढतो यावरून त्याचे वय साधारण १ मिलिअन वर्।े ठरवण्यात आले. वर्षाला साधारण १ इंच एवढा तो वाढतो. नंतर कोअर मधला नमुना घेउन हे निदान पक्के करण्यात आले. फटीत जे पाणी थेंब रूपात अडकले होते ते काढून डी एन ए अँनालिसिस करण्यात आले व बँक्टेरीआज तेव्हा होते हे ही दाखवून दिले. जीवावर उदार होउन काम करणारी टीम पाहुन कौतुक वाटले. हे एवढे गरम पाणी कुठुन येत असावे याचाही शोध घेण्यात आला..जमिनीच्या पोटातील मँग्मा हे काम करतो आहे.

२००० साली या केव्हज चा शोध लागला. तिथल्या प्रतिकूल परिस्थिती मुळे आपण आत तर जाउ शकत ऩाही पण या शास्त्रज्ञामुळे व फिल्म बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यामुळे आपण जमिनीच्या पोटात बघू तरी शकलो. या खाणीचे काम संपले (आतले खनिज) की पाण्याचे पंपिंग थांबेल व हे सगळे सुंदर क्रिस्टल्स ही जादुई दिनिया पुन्हा पाण्यात जाईल व कदाचित नष्टही होईल.

Thursday, October 6, 2011

दसरा शुभेच्छा....

दसरा शुभेच्छा....

लहानपणापासून दसरा म्हटले की डोळ्यापुढे एक चित्र येते....वाहनांची पूजा, पाटी पूजन, अवजारे पूजन, झेंडूची फुले, सोने लुटणे, नवीन कपडे आणि मिष्टान्न....

या सगळ्या गोष्टी आठवून हे शुभेच्छापत्र बनवले आहे

















या पूर्वीची काही शुभेच्छापत्रे

Thursday, September 15, 2011

जेपर्डी विथ वाँटसन

जेपर्डी विथ वाँटसन...

अमेरिकेत आल्यापासून मी जेपर्डी हा गेम शो बघते आहे. हा एक प्रश्नोत्तरांचा खेळ आहे. खूप फास्ट खेळला जातो. वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले जातात. हा शो बघून थोडी सामान्य ज्ञानात भर पडते आणि आपल्याला किती गोष्टी माहित नाहीत हे लक्षात येते. विद्यार्थी, शिक्षक, मुले, खेळाडू, चँरिटी, सेलिब्रिटीज, असे वेगवेगळे गट करतात. प्रश्न विचारताना सिनेमा, बायबल, इतिहास, स्पेलिंग, खाणे, नकाशे, कोडी, लेखक अशा खूप गोष्टी असतात. बघताना आपणही इतके त्यात मिसळून जातो की बस....इथल्या शाळात ही अशा स्पर्धा घेतात व मुलांना तयार करतात.

काल जेपर्डी विथ वाँटसन असा गेम पाहिला. (रिपिट) व संध्याकाळी त्यावर एक फिल्म बघितली. वाँटसन हा एक काँम्प्युटर आहे. २ चँम्पिअन्स व काँम्प्युटर असा गेम होता. आणि शेवटी त्यात काँम्प्युटर जिंकला. गेली ४ वर्षे आय बी एम कंपनीतील सायंटिस्ट या प्रकल्पावर काम करत होते.

माणसाचा मेंदू ही त्याला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. अजून तो आपल्याला पूर्ण समजलेला नाही. मेमरी मध्ये गोष्टी साठवणे आणि त्या परत आठवणे हे आपण सतत करत असतो. समोरच्याने विचारलेला प्रश्न समजाउन घेउन त्याला उत्तर देणे हे आपण सतत सहज करत असतो. हे सगऴे कसे होते ते सांगता येत नाही.

या सगळ्या गोष्टी मशिन ला शिकवून त्याला हा गेम खेळायला लावायचा विडा सायंटिस्टनीउचलला. नुसती माहिती साठवणे हे सोपे काम होते पण अँनालिसिस करणे अवघड काम -- परत वेळेचे बंधन होतेच. आय बी एम च्या फाउंडर चे नाव वाँटसन या मशिन ला दिले गेले. पहिल्यांदा नियम लिहिले गेले. भाषा शिकवली गेली. विचारलेल्या प्रश्नातील की वर्ड् शोधून त्याचे रेफरन्स शोधले गेले. (साठवलेल्या माहितीत हा शब्द कुठे आहे ते शोधून) या सगळ्यातून बरीच उत्तरे निघत असत. मग त्यातले जे उत्तर जास्त पुरावे देत असेल(जास्त ठिकाणी वापरले असेल) ते फायनल आन्सर दिले जाउ लागले. या सगळ्या गोष्टी मिलीसेकंदात होतात.

्सुरूवातीला जेपर्डीचे चे प्रश्न मेमरीत साठवले गेले. बायबल, मूव्ही लिटरेचर हिस्टरी ही सगळी माहिती साठवली गेली. एखादे अक्षर जर आपण मेमरीत घातले समजा क तर ते पुरेसे नाही. ते अक्षर इतक्या प्रकारे लिहिता येते की सगळे आपण साठवू शकत नाही. अशा वेळेस उदाहरण म्हणून त्या अक्षराचे अनेक नमुने साठवले जातात मग काँम्प्युटर त्याचा पँटर्न लक्षात ठेवतो आणि त्याचा वापर ओळखताना करतो. (पोस्ट आँफिस मध्ये पत्ते ओळखताना ही गोष्ट लागते कारण प्रत्येकाचे अक्षर वेगळे.....) अशा तर्हेने मशिन लर्निंग च्या सहाय्याने वाँटसन जेपर्डी मध्ये भाग घ्यायला सिद्ध झाला. त्यात अनेक अडचणी आल्या. भाषा बोललेली अजून शंभर टक्के काँम्प्युटरला कळत नाही म्हणून टेक्स्ट मेसेज ने प्रश्न विचारायला परवानगी दिली.

शेजारी चुकीचे उत्तर देत असेल तर ते काँम्प्युटर ला कळत नसे. मग एकदा ऐकल्यावर त्याला ते कळू लागले. कोड्याच्या भाषेत विचारलेलेले प्रश्न अजून नीटसे कळत नाहीत. काँम्प्युटरला इंटरनेट वापरायला परवानगी नाही मग प्रेफरन्सेस व एव्हिडन्स वापरून उत्तरे फायनल होउ लागली. हळूहळू या सुधारणा करत शेवटी काँम्प्युटर ने माणसावर मात केली.बरोबर भाग घेणारे तितकेच हुशार होते. हे सगळे पाहून जर प्रोग्रँम पाहिला तर त्या सायंटिस्टची कमाल वाटते

मला कधी सायन्स फिक्शन सिनेमातील गोष्टी घडतील असे वाटत नाही पण आर्टिफिशिअल इंटिलिजन्स मधले हे काम पाहिल्यावर त्या गोष्टी सत्यात यायला फार दिवस राहिले नाहीत असे वाटायला लागले आहे. कदाचित आपण जे एलिअन म्हणतो ते असेच असतील.....