Wednesday, June 24, 2009

आमची यूरोप टूर -भाग १


आमची यूरोप टूर -भाग १
(तयारी, लंडन,बेल्जिअम व नेदरलॅंडस)

आम्ही रियाधला असल्यापासून युरोप ट्रीप चे प्लान्स चालू होते. याला कारण शाळेतली एखादी सखी या ट्रीपला जाउन आली की इत्थंभूत वर्णन स्टाफरूम मध्ये होत असे अगदी शॉपिंग, बार्गेनिंग सकट. आमच्या दोघांचा भटक्या स्वभाव ही याला कारणीभूत होताच. तिथे ट्रीप प्लान करता करता अमेरिका प्लान झाली आणि शेवटी ट्रीप चे प्लॅनिंग ब्लूमिंग्टन मधून झाले.

प्रसन्न ऑफिस, नाटक प्रॅक्टीस व इतर सोशल गोष्टीत बिझी असल्याने त्याने सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून दिली. एस ओ टी सी ने प्रवास करायचा हे इतरांच्या बर्‍या अनुभवावरून ठरवले व ब्रोशर मागवले. याला महत्वाचे कारण म्हणजे हे लोक रहाणे, फिरणे व जेवणे अशी सगळी व्यवस्था करतात. दिवसातून एक वेळ भारतीय जेवण हे माझ्य्यासाठी मोठे आकर्षण होते. मला २-३ दिवस इतर जेवणावर दिवस काढता येतात पण त्यानंतर भात, पोळी भाजी असे आपले जेवण मिळाले नाही तर कसे तरी होते. ही १४ दिवसांची ट्रीप संपताना शेवटी मात्र वाटले की आपण इतर पदार्थांवरही राहू शकतो. पालक पनीर, पापड, दाल फ्राय हे रोज बघून कंटाळा आला.

या नंतर महत्वाचा टप्पा होता व्हिसा चा. तुम्ही जर अमेरिकन सिटीझन असाल तर व्हिसा लागत नाही. अमेरिकन सिटीझन बद्द्ल हा अपपर भाव पाहून राग आला पण करता काय? देश बघायचे तर व्हिसा काढणे भाग होते. शिकागोतला एजंट गाठला. फॉर्मस डाउनलोड केले. स्वित्झर्लंड, इंग्लंड व ईटली असे व्हिसा लागत होते. स्वित्झर्लंडचा फ़ॉर्म अगदी भरायला सोपा म्हणून पाठवला तो लगेच २ दिवसात परत आला. तुम्ही जसे हिंडणार तसे एकानंतर एक व्हिसा घ्यायचे असतात म्हणे. (कॉमन सेन्स म्हणतात तो असावा हा) मी म्ह्टले एजंट ने सांगितले नाही तर पाठ्वा आधी सोपा दिसणारा फ़ॉर्म. असो. इटली एम्बसीत प्रत्यक्ष जावे लागते. १-२ महिन्यात सर्व व्हिसे हातात पडले. या सर्व प्रकारात पोस्ट ऑफिस, मनी ऑर्डर व फेडेक्स यांच्या बर्‍याच राउंडस झाल्या.तुमचे सर्व कागदपत्र पासपोर्टसह अगदी व्यवस्थित ये जा करतात. फेडेक्स व पोस्ट ऑफिस यांचा हा सुखद अनुभव होता.

या ट्रीपनंतर लगेच पुढे भारतात जायचा प्लान होता. तिथली सुटी कमी झाल्याने घरचे लोक थोडे वॆतागले. प्रवासात सामान कमी घ्यायचे असल्याने प्रसन्न खुशीत होता. ३ हॅंडबॅग्ज व एक एक्स्ट्रा बॅग एवढेच सामान होते. लोकांनी नेहेमीप्रमाणे खर्च किती येणार हा नेहेमीचा प्रश्न टाकलाच. अशा पॅकेज ट्रीप्स मध्ये काही अर्थ नसतो. एका वेळी एक देश बघावा, असा बर्‍याच लोकांनी सल्ला दिला. युरोप मध्ये खाणे फार महाग हाही बरयाच जणांचा सल्ला. आम्ही लंडन टू लंडन अशी ट्रीप बुक केली व काय अनुभव येतो ते बघायचे ठरवले.

लंडन थोडेफार आमचे आम्ही २ दिवसात पाहिले. वॅक्स म्युझिअम ला आधी गेलो. ईंटरनेट्वरून बुकिंग केले होते म्हणून लाईन वाचली. या म्युझिअम चे जेवढे वर्णन वाचले होते तेवढे काही आवड्ले नाही. ईंडिअन पॉलिटीशिअन चे पुतळे एवढे छान नाहीत. कदाचित या पूर्वी सिंगापूर चे बघून तुलना झाली असेल. यातील एका भागात मॅडम तुसाद चा पुतळा व हे पुतळे बनविण्याची माहिती आहे. ते छान वाटले. गार्डन पार्टीचा भाग पण छान आहे. यानंतर सिटी टूर ऒपन बस मधून केली. पॅलेस, मायलेनिअम व्हील, पार्लमेंट बिल्डींग व ट्रफलगार स्क्वेअर बघितले. कोहिनूर मात्र बघायचा राहिला ..पुढच्या वेळेस बघायला शिल्लक ठेवला आहे. लंडनचे रस्ते खूप छोटे वाटले. टॅक्सीज व अंडरग्राउंड रेल्वे फारच छान आहेत. मेन रोडस मात्र जेवढे ऎकले तेवढे इंम्प्रेसिव्ह वाटले नाहीत.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता सगळे वॉटरलू स्टेशनला जमलो. हळूह्ळू देशी चेहेरे दिसू लागले. हे बहुतेक आपल्याच ट्रीपमधले असावेत असे अंदाज बांधणे चालू होते. १० वाजता एस ओ टी सी चा माणूस आला व सर्वांना तिकीटे दिली. सुरूवात तर व्यवस्थित झाली. पासपोर्ट चेकिंग झाले. ही ट्रेन युरोस्टार फ़ास्टॆस्ट ट्रेन आहे. ती इंग्लीश चॅनेल खालून १८ किमी जाते. ट्रेन सुरू होण्यापूर्वी अर्धा तास बोर्डींग झाले. गाडी सुरू झाल्यावर एकदम ’ओम जय जगदीश हरे’ ची सुरूवात झाली मला वाटले गुजराथी लोकांचा फार भरणा झाल्याने कदाचित गाडीत कधी कधी भजन लावतही असतील. पण नंतर कळले आमच्याच ट्रीप मधल्या एका स्मार्ट माणसाने अलार्म सेट करून रेकॉर्ड लावली होती. हा इसम स्वतःला खूप शहाणा समजत असे. त्याचे नावही शहानी होते. हळूहळू तुम्ही कुठले आम्ही कुठले अशा ऒळखी झाल्या. मुलांनी ऒळखी करून घेतल्या. काही जण डायनिंग रूम कडे पळाले.

आमची ट्रेन युरो स्टार इंग्लंड ते ब्रुसेल्स अशी होती. जाताना कंट्री साईड खूप छान दिसते. गाडीचा स्पीड अजिबात समजत नाही. इंग्लीश चॅनेल इंग्लंड व फ्रान्सला जोडतो. हे एक इंजिनिअरिंग वंडर आहे. पाण्याच्या खाली हार्ड रॉक व सॉफ़्ट रॉक च्या लेअरच्या मधे टनेल बांधला आहे. तो बांधताना बरेच अडथळे आले. पण शेवटी यश मिळाले. फ्रान्स व इंग्लंड दोन्ही बाजूनी टनेल खणायला सुरूवात केली व दोन्ही टीम्स नी मध्यावर टनेल जोडले. यामुळे लंडनहून प्रवास सोपा व फास्ट झाला. या वर एक सुंदर फ़िल्म हिस्ट्री चॅनेल वर दाखवतात. जरूर पहा.

ब्रुसेल्सला उतरल्यावर व्हिसा चेकिंग झाल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. आतापर्यंत ७-८ देशांचे व्हिसा घेउन झाले पण एकंदरीत व्हिसा म्ह्टले की टेन्शन येते. एकदा तरी या ऑफिसमध्ये काम करून लोकांना टेन्शन द्यावे अशी माझी ईच्छा आहे. बेल्जिअम हा आमच्या ट्रीप मधला पहिला देश. इथून आमचा बस प्रवास सुरू झाला. १४ दिवसात ६००० कि मी या बसने फिरवले. अगदी आरामात हा प्रवास झाला. संध्याकाळी सिटी टूर होती. किंग्ज पॅलेस, पॅगोडा हे सगळे बाहेरून बघितले. इथे युनोचे हेड्क्वार्टर आहे. बी एम ड्ब्ल्यू , मर्सिडिज टॅक्सी दिसतात. बेल्जिअम मध्ये नवीन बिल्डींग बांधताना बाहेरची जुनी बाजू तशीच ठेवावी लागते, आतले डिझाईन तुम्ही बदलू शकता. शक्य तेवढे जुने बांधकाम जपतात. ब्रुसेल्स हे युरोप मधले गरीब शहर समजतात. आम्हाला तसे काही वाटले नाही.

सुरूवातीला ऑटोमियम पाहिले. (बाहेरूनच), वर्ल्ड ट्रेड एक्झिबिशनसाठी हे बांधले. आयर्न क्रिस्टल चे बेसिक डिझाईन त्याच्या ९ ऍटम्स सकट दाखवले आहे. मेटल, आयर्न इंड्स्ट्री व ऍटॉमिक पॉवर बद्दल विश्वास हे यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. गावातून कुठुनही ते दिसते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप छान व भव्य दिसत होते. प्रत्येक राउंड मध्ये प्रदर्शन आहे व दोन गोळ्यांना जोडणारे रॉडस लिफ्ट म्हणून वापरले आहेत. त्यानंतर पी स्टॅच्यू पाहिला. या जागेवर लोक खूप कचरा टाकत म्हणून एक स्टॅच्यू ठेवून टुरिस्ट स्पॉट बनवला आहे. त्यात बघण्यासारखे काही नाही. भारतात ही आयडीया वापरून पहावी.परत येताना एक पुरूषाचा ब्रॉंझ चा पुतळा दिसला. त्याला हात लावला की बाई प्रेग्नंट होते व पुरूषाचा दिवस चांगला जातो अशी कथा आहे. रिस्क नको म्हणून बायका हात न लावता पुढे जात होत्या. पुरूष मात्र न चुकता हात लावत होते.
त्यानंतर मार्केट स्क्वेअर मध्ये आलो. एकदम भव्य वाटते इथे कारण ४ बाजूंनी उंच इमारती होत्या. कॊन्सिल हॉल, लायब्ररी अशा बर्‍याच जुन्या पण अगदी वेल मेंटेन्ड बिल्डींग्ज होत्या. युरोप मध्ये असे स्क्वेअर्स पुढे खूप भेटले पण हा पहिलाच म्हणून असेल मनावर जास्त ठसला. वर्षात एकदा त्यावर मोठी फुलांची रांगोळी घालतात. मी पूर्ण स्क्वेअरचा फोटॊ घॆण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही शेवटी २-३ वेगळे फोटो घेतले. खूप मंडळी तिथे बसून चित्र काढत होती. कुणी पेंटिंग्ज करत होती. वाटेत छोटी दुकाने होती त्यातले लेस चे पॅटर्न्स खूप छान व अर्थातच महाग होते. नंतर हॉटेल वर परत गेलो. हॉटेल ट्यूलिप ही छान होते. खिडकीतून ऑटोमियम दिसत होते. रात्री १० वाजेपर्यंत उजेड होता. (जून) चक्क काहीही खरेदी न करता हा दिवस पार पडला. एकंदरीत ट्रीपची सुरूवात तर छान झाली.

दुसर्‍या दिवशी सकाळी हॉलंड कडे प्रयाण. नेदरलॅंड्स हा दुसरा देश. नेदरलॅंड म्हणजे लॅंड बिलो सी लेव्हल. या देशात डाइक्स बांधून ५०% जमीन रिक्लेम केली आहे. म्हणजे समुद्राचे थोडे पाणी एका चॊकोनात अडवायचे, ते उन्हाने वाळले की त्या जागेवर बांधकाम करायचे. इथे जागोजागी विंडमिल्स दिसतात. हाय लेव्हल वरून लो लेव्हल वर पाणी खेळवायला त्या वापरत असत. आता ह्या विंडमिल्स वापरात नाहीत पण सरकार त्यांच्या देखरेखी साठी पॆसा देते. पहिला स्टॉप होता वूडन शू फॅक्टरीचा. अतिशय हलक्या लाकडापासून बूट कसा बनवतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. सगळ्यावर छान पेंटिंग केले होते. बाहेरच्या भिंतीवर एका बुटाचा मस्त फ्लॉवर्पॉट करून ठेवला होता. लोकांच्या खरेदीला इथे सुरूवात झाली काही नाही तर की चेन प्रत्येकाने घेतलीच.

त्यानंतर मदुरोडॅम.. हॉलंड इन मिनिअएचर पाहिले. सुरूवातीला वाटले की हे काय किल्ल्यासारखे पहायचे पण त्यातले बारकावे पाहून कॊतुक वाटले. हे सगळे व्हॉलेंटिअर वर्क आहे हे विशेष. वेगवेगळ्या बिल्डींग्ज, विमानतळ, रेल्वे अगदी पाण्यावरचे लॉक्स ही दाखवले होते. आत शिरताना नकाशा दिला होता सगळे शिस्तीत होते. १५ मे पर्यंत जाणार्‍यांना ट्यूलिप्स बघता येतात. यापुढचा टप्पा होता ऍमस्टरडॅम चा. तिथे सायकल चालवणारे खूप लोक असल्याने रस्त्यावर एक ट्रॅक सायकल वाल्यांचा असतो. प्रत्येक घरात वरच्या मजल्यावर एक हुक दिसतो. घरांची रचना अशी की दारे छोटी व खिडक्या मोठ्या. त्यामुळे जड सामान वर नेताना आधी हुक ने वर घेतात व नंतर खिडकीतून घरात घेतात. दोन बिल्डींग मध्ये अंतरही फार नसते. थोड्या पुढे मागे पण असतात.
इथल्या जुन्या आर्किटेक्चर मध्ये खरोखरच बिल्डींग चे टॉप्स ४ प्रकारात दिसले. बेल शेप, स्टेप शेप, नेक शेप किंवा स्क्वेअर. नंतर नदीतून एक बोट टूर घेतली. आजूबाजूला शिकार्‍यासारखी बोट हाउअसेस होती. सगळ्यात छान फुले लावलेली होती. इथली जागा खूप महाग असते म्हणून घरे लांबीला जास्त व रूंदीला कमी होती. त्यानंतर डायमंड फॅक्टरी ला गेलो तिथे पुरूष कंटाळले पण बायकांनी मनसोक्त खरेदी केली. हिरा लाभतो का नाही ते बघायला मी पण एक हिरा घेतला.

आता थोडे इथल्या बसाविषयी- युरोप टूर करणार्‍या शेकडो बसेस आहेत. प्रत्येक बस ए. सी व साधारण ५० जणांची असते. बसमध्ये जी पी एस असते त्यावेळी ते नवीन होते म्हणून खूप मजा वाटली होती. एखादा रस्ता बंद असला की लगेच दुसरा रूट दाखवत असे.बस ड्रायव्हर एक सी डी ठेवतो. त्यात स्टार्ट टाईम व प्रत्येक स्टॉप चे रेकॉर्डींग होते. रोज १२ तासापेक्षा जास्त बस चालवायची नाही व दर २ तासानी एक स्टॉप घ्यायचा असेही बंधन असते. पोलिस रस्त्यात कुठेही थांबवून सी डी तपासू शकतो. लोकांनी जास्त वेळ मध्ये थांबू नये म्हणून आमच्या गाईड ने ही माहिती दिली. आमचा ड्रायव्हर रिकी ईटालिअन होता. त्याने अतिशय छान बस चालवली. .............भाग २ पुढे......

No comments: