Saturday, October 3, 2009

अलास्का - भाग ३

द लास्ट फ़्रंटिअर-
ग्लेशिअर बे नॅशनल पार्क, केचिकन व व्हिक्टोरिआ

ग्लेशिअर बे नॅशनल पार्क हे या क्रूज मधले सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग टिकाण होते. या पार्क मध्ये १६ टायडल वॉटर ग्लेशिअर्स आहेत. ती सगळी इथल्या बे ला मिळतात. इथे जाणार्‍या क्रूज बोटींचा व छोट्या बोटींचा कोटा ठरलेला आहे. आतले प्राणी, मासे, पक्षी यांची विषेश काळजी घेतली जाते. वेगळ्या लांबीची व रूंदीची ही ग्लेशिअर्स आहेत. या भागात स्नो भरपूर पडतो. तो एकावर एक साठत जातो व ग्लेशिअर्स तयार होतात. ग्रॅव्हिटी, डोंगराचा उतार व आतले पाण्याचे प्रमाण यामुळे ही ग्लेशिअर्स पुढे सरकतात. अर्थात समोरून बघताना ती पुढे येताना दिसत नाहित कारण त्याचा स्पीड तसा कमी असतो. मी एवढी ग्लेशिअर्स या ट्रीप मध्ये पाहिली तरी अजून ती पुढे सरकतात असे खरे वाटत नाही.

या ग्लेशिअर बे च्या सुरूवातीला रेंजर चे ऑफिस आहे. २५०-३०० वर्षापूर्वी या बे च्या सुरूवातीपर्य़ंत म्हणे बर्फाची भिंत होती(फार जुनी गोष्ट नाही) ग्लेशिअर्स च्या रिट्रीव्हल मुळे ती मागे सरकत आता ६०-६५ मॆल मागे गेली आहे. सकाळी ६ वाजता छोट्या बोटीतून रेंजर्स क्रूज शिप वर आले. दोन्ही बोटींचा स्पीड साधारण १० नॉटस होता. चालू बोटीत शिडी टाकून ते चढले. इंटरेस्टींग!! सकाळी लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आणि माहिती पण सांगितली. नंतर पी ए सिस्टीम वरून आवश्यक ती कॉमेंटरीही दिली. तिथे पोचेपर्यंत दोन्हीकडे धबधबे, स्नो कॅप वाले डोंगर आणि खाली उतरलेले ढग साथीला होतेच.

मार्जारी ग्लेशिअर समोर बोट बराच वेळ थांबवली. आमची केबिन मिडशिप वर असल्याने अगदी समोर होती. (बाल्कनीचे पॆसे वसूल) ग्लेशिअरच्या बर्‍याच जवळ बोट उभी केली होती. खूप फोटो झाले. हे ग्लेशिअर २५०फूट उंच आहे(पाण्यावर) असे वाटत नव्हते. इथे उंचीचा अंदाज येत नाही. सुंदर निळ्या रंगाची झाक या ग्लेशिअर ला आहे. अधून मधून भेगा दिसतात. बरेच सुळके दिसतात पाठीमागे एवढी मोठी हिमनदी आहे हे खरे वाटत नाही. पण एकदा कल्पना आली की अरे बापरे! असे होते. माझी कन्या रास असल्याने माझ्या मनात आलेला एक विचार मी लगेच नवर्‍याच्या पुढे मांडला की हे सगळॆ एकदम पुढे सरकायला लागले तर? त्याने नेहेमीप्रमाणे हसून घालवले पण नंतर दुपारी मला रेंजर प्रेझेंटेशन मध्ये त्याचे उत्तर मिळाले. ग्लेशिअर कडे बघत असताना मध्येच एकदा एक बर्फाचा कडा ढासळला व पाण्यात पडला. याला काव्हिंग म्हणतात. त्यामुळे बहुतेक सगळी ग्लेशिअर्स रिट्रीट होतात. आजुबाजूला डोंगर असल्याने इथे तो आवाज खूप घुमतो. हे पुढचे कडे केव्हा पडतील हे नकी नसते. कधी खूप वेळ काहीच दिसत नाही. आम्ही तिथे असेपर्यंत २-३ वेळा तरी हे दृष्य पाहिले. बरोबर वहात आलेली माती दगड, झाडे, एखादा प्राणी सगळे पाण्यात पडते. (कॉम्प्रेस्ड मॊड मध्ये असते हे सगळे) हा बर्फ खाली पडल्यावर बरेच लांबवर पाणी येते त्यामुळे बोट अगदी जवळ नेत नाहीत. खाली पडलेले बर्फाचे तुकडे वर उडतात. हे बाहेर पडलेले पाणी मळके दिसते. आम्ही केबिन मधूनच पहाणे सुरूवातीला पसंत केले कारण खूप गार होते. अधून मधून चहा, चकली, वडी असे चालू होते. गरम चहा मस्ट होता. अर्ध्या तासाने बोट पूर्ण ३६० डिग्रीमध्ये वळवली. त्यामुळे दुसर्‍या बाजूचा व्ह्यू दिसला.

याच्या शेजारीच ग्रॅंड पॅसिफिक ग्लेशिअर होते ते इतके काळे दिसत होते कि ते ग्लेशिअर आहे हे खरेच वाटत नव्हते याला कारण म्हणजे वाटेतले खडक, त्याचा चुरा इतका मिक्स झाला आहे की ते एकदम मळकट दिसते. हे ग्लेशिअर कॅनडा व अमेरिका अशा दोन्ही देशांमधून जाते.

नंतर आम्ही बोटीच्या वर गेलो ( एकदम टॉप डेक). थोडासा पाउस येउन गेला होता. हवा एकदम स्वच्छ होती. वर गेल्यावर एकदम पूर्ण ३६० डिग्रीज व्ह्यू दिसतो त्यामुळे या गोष्टी भव्य दिसतात. परत फोटोग्राफी. सगळे जण निःस्तब्द्ध होते व फोटो काढत होते. त्यानंतर आमची बोट जॉन हॉपकिन इनलेट समोर थांबवली. हे ग्लेशिअर म्हणे रोज ५-६ फूट सरकते आणि गेल्या १०० वर्षात बरेच मागे गेले आहे(वितळले आहे). कॅप्टनने अनाउन्स केले "हे ग्लेशिअर बघून घ्या अजून काही वर्षानी ते बरेच मागे जाईल”. नंतर परत गरम पेय हातात घेउन डायनिंग हॉलमधून ग्लेशिअर च्या खाली दिसणारे पाण्याचे प्रवाह, भेगा हे सगळे बघितले. एवढ्या २५००-३००० लोकांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहिल्या ना धक्काबुक्की ना मारामारी. धन्य ते मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग.

अलास्का मध्ये खूप ग्लेशिअर्स आहेत. त्यातले हबार्ड(नॅशनल जिऑग्राफिक चा फाउंडर व पहिला प्रेसिडेंट) ग्लेशिअर सगळ्यात लांब व रूंद आहे. ७६ मॆल लांब व फेस ५-६ मॆल आहे. अर्थात त्यामुळे फार जवळ मोठ्या बोटी नेत नाहीत. कारण काव्हिंग नंतर खूप पाणी तयार होते. अर्थात छोट्या बोटी अगदी जवळ घेउन जाणारे महाभाग ही आहेतच. हे ग्लेशिअर चक्क पुढे पुढे सरकत आहे आणि वाढत आहे. त्याच्यावर सायंटिस्ट नजर ठेवून आहेत. मी अलास्काहून परत आल्यावर याचे वेगवेगळ्या वेळचे फोटो पाहिले आणि हवाईला जाण्यापूर्वी बघितलेल्या व्होल्कॅनो च्या फोटोंची आठवण झाली. तिथे लाव्हा ऍक्च्युअल पुढे सरकताना दिसतो म्हणून आपल्याला तो वहातो असा फील येतो. ग्लेशिअर्स चे वर्षभरानंतरचे फोटो पाहिले की त्याची हालचाल स्पष्ट कळते. ज्या लोकांना पहिल्यांदा हे सगळे कळले असेल त्यांना काय वाटले असेल? जॉन म्यूर त्याची ग्लेशिअल थिअरी तपासायला अलास्का पर्यंत आला होता. त्याची योसेमिटी बद्दलची थिअरी तशी पटते. कॅप्टन कुक चे नाव पण खूप ठिकाणी आहे पण त्याआधी ज्या लोकल्स ना हे समजले असेल त्यांच्या पचनी पडायला जरा अवघड गेले असेल. दुसरी एक गोष्ट मनात आली हवाई मध्ये लाव्हा समुद्राला मिळतो आणि तिथे नवीन जमीन तयार होते, अलास्का मध्ये बर्फ पाण्यात मिसळतो आणि समुद्राचे पाणी वाढते अशा तर्‍हेने निसर्ग दोन्हीचा बॅलन्स तर ठेवत नसेल. (जमीन व पाणी किती प्रमाणात तयार होतात याचा काही मला अंदाज नाही)

दुपारी रेंजरचे प्रेझेंटेशन पाहिले. रेंजर एमिली ने फार छान प्रेझेंटेशन दिले. तिच्याकडचे फोटॊ कलेक्शन अप्रतिम होते. ती तिथेच रहात असल्याने जे काही पूर्ण सूर्यप्रकाशात तिने फोटो काढले होते ते फार सुंदर होते. असे दिवस फार कमी असतात. ’द कॉल ऑफ द वाइल्ड’ ही अतिशय योग्य कविता तिने वाचून दाखवली. फार सुंदर कविता आहे. या पार्क मध्य नोकरी करणे धाडसाचे आहे. ज्याला खरी विल्डरनेस ची आवड आहे तोच करू शकेल. तिने ग्लेशिअर बद्द्ल बरीच माहिती सांगितली. पाण्याचा या ग्लेशिअरच्या पुढे सरकण्यात मोठा वाटा आहे. ग्लेशिअर च्या वरती थोडे पाणी तयार होते सूर्याच्या उष्णतेमुळे हे पाणी फटीतून हळूहळू आत झिरपते व शेवटी तळातून बाहेर पडते अशी चक्क आत एकेमेकांना जोडलेली पाण्यासाटी व्यवस्थित सिस्टीम तयार होते. एकदा काहीतरी मधे अडकून हे सगळे पाणी आतच राहिले त्यामुळे खालचा बर्फ वितळायला लागला व ग्लेशिअरचा मोठा भाग तळापासून सुटला आणि पाण्याला मिळाला त्यामुळे लोकांची धावपळ झाली व त्यांचे बरेच नुकसान झाले हे ऎकल्यावर माझ्या सकाळच्या शंकेचे निरसनही झाले( कन्या राशीला बरोबर शंका येतात असे म्हणायला हरकत नाही). दुपारी सगळे रेंजर्स परत गेले. त्यानंतर व्हेल्स बघितले. अगदी बॊटीच्या जवळून पॅरलल चालले होते. डॉल्फिन्स ही बरेच दिसले इतर पक्षी ही दिसत होते. एखाद्याला व्हेल दिसला की तो ओरडायचा मग सगळ्यांच्या माना तिकडे. असे दृष्य खुपदा दिसे व त्यावर बरेच विनोद ही घडत. एकदा वर जाउन कॅप्टनची केबिन व ब्रिज बघून आलो. तिथेही काही मराठी नावे पाहून बरे वाटले.

संध्याकाळी बोटीवर शॉपिंग केले रोज काहीतरी वेगळा सेल लावत. दुसर्‍या दिवशी सकाळी केचिकन ला स्टॉप होता. केचिकन ला सालमन कॅपिटल म्हणतात. इतका इथे सालमनचा व्यापार चालतो. इथे येण्यापूर्वी मला सालमन मध्ये भरपूर ऒमेगा-३ असते व ४०० डि वर १२ मि बेक केला की तो छान बेक होतो एवढीच माहिती होती. इथे आल्यावर अजून या माहितीत भर पडली. सालमन फिश ऍटलांटिक व पॅसिफिक मध्ये दोन्हीकडे आहेत. सालमन फ्रेश पाण्यात जन्मतात नंतर ते खार्‍या पाण्यात जातात. साधार्ण लाईफ स्पॅन ५-८ वर्षे असतो. शेवट्च्या वर्षी ते अंडी घालतात व नंतर मरतात. असेही म्हणतात की अंडी घालायला ते परत आपल्या जन्म ठिकाणी येतात. कसे येतात यावर रिसर्च चालू आहे. काहींच्या मते ते वासावरून येतात. सालमन च्या अनेक जाती बाजारात दिसतात. आणि फ्रेश डिशेस ही बर्‍याच ठिकाणी मिळत होत्या. पार्सल ची सोय सगळीकडे होती. इथे काही लोकंनी फिशिंग टूर्स ही घेतल्या.

केचिकन मध्ये आम्ही नंतर लंबर जॅक शो बघितला. लाकूड काम करणारे बरेच कसरती, खेळ करून दाखवतात. स्पिरीट साठी बघणार्‍या लोकांना २ ग्रुप्स मध्ये विभागले होते. बरा होता प्रकार. बॅलन्सिंगचा एक प्रकार होता पाण्यात तो मजेशीर होता. इथेच टोटेम पार्क ही बघितले. तिथे जुने जुने टोटेम पोल्स ठेवले आहेत. मृत व्यक्तिच्या स्मृतिसाठी हे बनवत असत. लाकडाच्या उंच खांबावर हाताने कोरलेले माणसांचे चेहेरे आहेत. प्रत्येक पोलची काहीतरी स्टोरी असते. मला इजिप्तच्या ममीज ची आठवण झाली.केचिकन पण छोटे टुमदार गाव आहे. आपल्या हिल स्टेशन सारखे पण झाडी जास्त व स्वच्छता जास्त.

इथेही परत थोडे शॉपिंग झालेच. गरम कपडे व काही भेटी. त्यानंतर बोटीवर परत. संध्याकाळी चॉकलेट बफे होता. इतके चॉकलेट चे प्रकार होते की बघून दमलो. खूप सुंदर डेकोरेशन केले होते. लोकांचे चॉकोलेट खाणे बघायला मजा येत होती. दुपारनंतर समुद्र जरा रफ झाला त्यामुळे मला थॊडा त्रास झाला पण दुसर्‍या दिवशी सगळे ठिक झाले.

आमचा शेवटचा स्टॉप होता व्हिक्टोरिया इथे. हे ब्रिटीश कोलंबिया - कॅनडात येते. संध्याकाळी उअतरलो. हवा एकदम छान होती. तिथले बोटॅनिकल गार्डन बघण्यासारखे आहे पण ते ५ सप्टेंबर नंतर जाणार्‍यांना बघता येत नाही. जाण्यापूर्वी खात्री करून घ्या. आम्ही गावातून फेरी मारली. सगळीकडे मस्त फुले लावली होती. इथली गव्हर्मेंट बिल्डिंग खूप छान आहे. रात्री त्यावर लाइटिंग केले होते तेव्हा अजून छान दिसत होती. रेस्टॉरंट्स युरोपिअन स्टाइल वाटत होती. इथे क्वीन व्हिक्टोरिय़ाचे महत्व आहे त्यामुळे युरोपिअन प्रभाव दिसतो सगळ्या गोष्टीवर. या ठिकाणी अजून जास्त वेळ हवा होता असे नक्की वाटले. रात्री परत येउन पॅकिंग करून बॅगा त्यांच्या ताब्यात देउन टाकल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी क्रुजला बाय करून एक चक्कर पाइक प्लेसला ( फार्मर मार्केट) मारली व छान आठवणी घेउन घरी परतलो.

परत येताना अलास्काला ’लास्ट फ्रंटीअर’ म्हणतात ते किती बरोबर आहे असे वाटले. या स्टेटला दुसर्‍या अमेरिकन स्टेट ची बॉर्डर नाही. खूप मोठे त्याच्या पुढे अमेरिकेचा काही भाग नाही. निसर्गाचा वरदहस्त आहे. प्रत्येक साइट पिक्चर परफेक्ट वाट्ते. रशिया कडून अगदी नगण्य किमतीला अमेरिकेने जरी ते घेतले तरी त्याच्या नेचरचा अभ्यास करून छान टूरिझम डेव्हलप केला आहे. गोल्ड आणि पेट्रोल तर मिळालेच पण लोकांना या सुंदर साईटस च्या जवळ नेण्याचे जे काम टूरिझम च्या माध्यमातून केले आहे ते फार मोठे आहे.

6 comments:

Vinita said...

Faar sundar varnan kelay. Alaska ani yellow stone national park ani iceland hya thikani khup jaaychi ichha ahe . baghu kasa jamta tey.

MAdhuri said...

Thanks.
Jarur plan kara. Alaska is beautifil.
Amcha pun next year yellow stone cha vichar ahe

mugdha said...

Hi Mawshi,
masta lihile ahes, am reading your blog for the first time.

Take care.
Mugdha

Vinita said...

Tu riyadh la hotis hey attach vachli. Tula vandana ani milind pendharkar mahiti ahet ka>

MAdhuri said...

I was in Riyadh from 92 to 99.

I dont know Pendharkar. Te kadhi hote mahit nahi.

Vinita said...

Tey ajoonhi tithech aahet. Amhi pan adhi Bahrain la hoto.