Sunday, September 6, 2009

इंटरनेटची चाळिशी...

आत्ताच टी व्ही वर एक बातमी बघितली..२ सप्टे इंटरनेट ला चाळिस वर्षे पूर्ण झाली. काही लोकांच्या मते ही तारीख वेगळी आहे. आजकालच्या ग्लोबलायझेशनच्या जगतातला सर्वात महत्वाचा घटक ४० वर्षाचा झाला. आधी अमेरिकेत युद्ध नीती साठी याची सुरूवात झाली. मग हळूहळू इतर देशात प्रसार झाला. .कॉम साईट्स आल्या, वेब ऍड्रेसेस आले आणि गुगल सारखे पॉवरफ़ुल सर्च इंजिन आले. आणि हे ’येणे’ कधी थांबत नाही. सतत नवीन गोष्टी येत असतात. आणि आपल्याला त्या शिकाव्याही लागतात. नाहीतर तुम्ही ’बॅकवर्ड’ समजले जाता.

हे सगळे गेल्या १०-१२ वर्षात फास्ट स्पीड ने वाढले आहे. पूर्वी भारतात इंटरनेट महाग होते, सहज मिळत नसे. आता स्पीड वाढला आहे. इंटरनेट मुळे खूप गॊष्टी सोप्या झाल्या. इ मेल मुळे कम्युनिकेशन सोपे झाले. आता तर हव्या त्या भाषेत इ मेल लिहिता येउ लागली. फोटो पाठवणे सोपे झाले. बॅंकेचे व्यवहार, रिझर्वेशन्स बसल्या जागी करता येउ लागले. दूर रहाणारे आजी आजोबा नातवंडांशी ट्च मध्ये राहू लागले आणि वेब कॅम वर त्यांना बघूही लागले. बसल्या जागी जगभरातले पेपर्स वाचता येउ लागले. स्काइप सारख्या टूल वरून लोकांना गाणे, नाच याच्या ऑनलाईन ट्यूशन्स घेता येउ लागल्या. ड्रायव्हिंग चा वेळ वाचून त्या वेळात काही शिकता येउ लागले. अंतर कमी झाले. शाळेत मुलांना होमवर्क सुद्धा ऒनलाइन मिळू लागले. ब्लॉग्ज ची सुविधा उत्पन्न झाली त्यामुळे लोकांना आपले विचार मांडता येउ लागले. आपण रेकॉर्ड केलेल्या गोष्टींचे मूव्ही बनवता येउ लागले. इंटरनेट शिवाय आपण कसे रहाणार असे वाटते आता.

सुरूवातीला एक दोन लोकांची यात मक्तेदारी होती. हळूहळू बर्‍याच कंपन्या या बिझनेस मध्ये उतरल्या. त्यामुळे झाले काय की स्पर्धा वाढली आणि आपला फायदा झाला. साध्या मेलला सुद्धा खूप ऒप्शन्स ऒपन झाले. प्रत्येक जण दुसर्‍यापेक्षा काहीतरी जास्त देउ लागला आणि आपण फायदा घेउ लागलो.

अर्थात या सगळ्या नवीन गोष्टी आल्या तसे लोकांना नवीन गोष्टी शिकायला पण लागल्या. मराठी टायपिंग आले नाही तर काय त्या एडिटर चा उपयोग? इ मेल चे सगळे उपयोग करून घेता नाही आले तर नवीन नवीन येणार्‍या गोष्टींचा कहीच उपयोग नाही. वेब कॅम वापरता आला पाहिजे तर तुम्ही दुसर्‍याला बघू शकता. त्यामुळे या इंटरनेट ने लोकांना शिकते ठेवले आहे हे नक्की.
लहान मुले नवीन गोष्टी पटकन शिकतात. मध्यम वयातल्या लोकांना सतत नवीन गोष्टी आल्या की त्रासदायक वाटतात. सारखा बदल नको वाटतो. आणि इथे तर सतत नवीन गोष्टींची भर....

या सगळ्या लोकांमध्ये एक ग्रुप असा आहे की त्यांना हा वेग ’झेपत’ नाही. आजी आजोबांचा हा ग्रुप आहे. एक साधी इ मेल लिहिता यावी ही त्यांची इच्छा असते पण गोंधळायला होते. टाइप करायला खूप वेळ लागतो. मग ऑफलाईन टायपिंग होते आणि नातू किंवा इतर कोणी त्याच्या वेळेनुसार आजी आजोबांची मेल पाठवतात. काही जणांना अक्षर सापडत नाहीत, काहींना फाईल सेव्ह करता येत नाही आणि हे कमी म्हणून का काय सारखे अपडेटस येत असतात. काहींना भिती वाटते की काही तरी चुकले तर. पण या गोष्टी शिकाव्या तर वाटतात. सगळ्या गोष्टींशी जमवून घेउन वाटचाल करणारे पण खूप सिनिअर सिटीझन आहेत. मुख्य भिती वाटते आपल्याकडून काही डिलीट तर नाही ना होणार? एकदा ही भिती मनातून गेली की हा ग्रुप पटकन गोष्टी शिकू शकेल.

जसजसे इंटरनेट चे वय वाढेल तसे आपले सिनिअर सिटीझन पण त्याचा वेग आत्मसात करू शकतील अशी इच्छा करू या.

Tuesday, September 1, 2009

पंचमहाभूतांची किमया..

आप,, तेज, वायू, पृथ्वी, आकाश ही पाच तत्वे आपले जीवन समृद्ध करतात. आपले जीवन त्यातल्या सर्व तत्वांवर अवलंबून आहे. जोपर्यंत ही सगळी तत्वे प्रमाणात असतात आपले जीवन ती सुखकारक करतात. पण जेव्हा त्यांचे रॊद्र रूप पहायला मिळते तेव्हा मात्र भिती वाटल्याशिवाय रहात नाही. आपण त्यांच्यापुढे काही करू शकत नाही. कितीही पॆसा असो, सामर्थ्य असो तुमच्या हातात काहीच नसते. निसर्गावर आपण मात करू शकत नाही.

गेली ८-१० वर्षे अमेरिकेत रहात आहे. येताना फक्त इथली थंडी, बर्फ, काही ठिकाणचे वाळवंट याबद्दलच माहिती होती. हळूहळू इथल्या हवामानाची माहिती होत गेली. अमेरिकेच्या काही भागात टोर्नॅडो, किनार्‍यावर धडकणारी हरिकेन, एल ए मध्ये लागणार्‍या आगी, बर्फाची वादळे, भूकंप ही सगळी रूपे बघायला मिळाली. भारतामध्ये हवामान बर्‍यापॊकी चांगले असते. काही ठिकाणी खूप गरम, काही ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असतो पण हवामान स्थिर असते. चक्री वादळे, बर्फाची वादळे, पूर कधी कधी येतात पण सतत धोका नसतो.

वार्‍याचे रॊद्र रूप टोर्नॅडोज च्या रूपात बघायला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात टोर्नॅडोज बघायला मिळतात. कॅनडाकडून येणारी थंड हवा व मेन लॅंड वरची गरम हवा यांच्या मुळे टोर्नॅडोज तयार होतात. या मधल्या भागाला टोर्नॅडो अली असे म्हणतात. स्प्रिंग सिझन ची सुरूवात, फॉल ची सुरूवात.. जेव्हा हवेत एकदम गार व गरम असा बदल होतो तेव्हा बरेच फनेल क्लाउड तयार होतात.(फनेलच्या आकाराचे ढग) ह्याचे खालचे टोक जमिनीला लागले की टोर्नॅडो टच झाला असे म्हणतात. त्यामुळे भरपूर नुकसान होते कारण यावेळेस वार्‍याचा स्पीड खूप असतो आणि ते वारे चक्राकार फ़िरत असते. त्याच्या मार्गात येणारी घरे पडतात, झाडे पडतात. फनेल क्लाउड मध्ये भरपूर डेबरी असते. आधी वातावरण एकदम शांत होते. ’वादळापूर्वीची शांतता’ म्हणजे काय ते कळते. नंतर भरपूर पाउस पडतो- वीजा, कधी कधी गाराही अनुभवायला मिळतात. हे कधी व कसे थांबते याबद्द्ल अजून रिसर्च चालू आहे. हा धोका टाळण्यासाठी भरपूर काळजी घेतली जाते. रेडिऒ, टिव्ही वरून सतत माहिती दिली जाते. जिथे जास्त शक्यता असेल तिथे वॉर्निंग्ज, वॉच पोस्ट करतात. लोकांना प्रॉपर शेल्टर घ्यायला सांगतात. घरेही लाकडाची असतात. लहान मुलांना शाळॆत ही ड्रील मधून ट्रेनिंग देतात. मनुष्यहानि कमी होईल याकडे लक्ष दिले जाते. एकंदरीने टोर्नॅडो वॉच लागला की तो संपेपर्यंत चांगलेच टेन्शन देतो.

सध्या लॉस एंजल्स मध्ये एका भागात आग लागलेली आहे. या भागात झाडी भरपूर आहे, वाळवंट ही भरपूर आहे. उन्हाळ्यात इथे वणवे, आगी खूप लागतात. हवा ड्राय असल्याने त्या पटकन पसरतात. ह्या आगी विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स, फायर फायटर्स यांची कसरत चालू असते. पाण्याचा मारा ही करतात. वार्‍याचा वेग जास्त असला तर आग आटोक्यात आणणॆ फार अवघड जाते. मनुष्य हानी न व्हावी यासाठी खूप कष्ट घेतात. घरे खाली करण्यासाठी लोकांना सूचना देतात पण तरी काही महाभाग तसेच हट्टाने राहून स्वतःचे नुकसान करून घेतात. या आगी थांबण्यासाठी वारा कधी कमी होईल अशी वाट बघावी लागते. दर उन्हाळ्यात या आगीचा सामना करावा लागतो.

पाण्याचे रॊद्र रूप बघायला मिळते हरिकेन सिझन मध्ये. तुम्ही कतरिना बद्द्ल वाचले असेलच. अमेरिकेला पॅसिफिक व ऍटलांटिक दोन्ही किनारे लाभले आहेत. उन्हाळा सुरू झाला की या हरिकेन च्या बातम्या टी व्ही वर दिसू लागतात. याला ए टू झी नावे देतात. पाण्याच्या पृष्ठभागावर खूप दमट हवा तयार झाली आणि वार्‍यांचा वेग वाढला की पाण्याचा भोवरा तयार होतो. वार्‍याच्या दिशेप्रमाणे तो दिशा घेतो व वरती वाढत जातो. शेवटी किनार्‍यावर येउन आदळतो. (लॅंड फॉल). सॅटेलाइट वरून सतत याची पिक्चर्स घेउन त्याची दिशा व वेग दाखवले जाते. पूर्व तयारी म्हणून मंडळी घराला लाकडी पट्ट्या ठोकतात, अन्न, पाणी साठवतात. गरज असेल तर घर सोडून दुसरीकडे जातात. बर्‍याच वेळा किनार्‍याला पोचेपर्यंत याचा स्पीड कमी होतो पण दर सीझन ला एक तरी मोठे वादळ होतेच. लॅंडफॉल नंतर भरपूर पाउस, वादळ हे ठरलेले. सगळे स्थिरस्थावर व्हायला १ आठवडा लागतो. नेहेमी त्याच भागात रहाणारी लोक या सगळ्याला सरावलेली असतात.

’रिंग ऑफ फायर’ मध्ये अमेरिकेचा वेस्ट साईडचा भाग येतो. या भागात भूकंप व व्होलकॅनिक ऍक्टिव्हिटी सतत चालू असते. म्हणूनच यलो स्टोन नॅशनल पार्क, हवाई, अलास्का व कॅलिफोर्निया भागात हे प्रकार जास्त दिसतात. आपण खूप उंच इमारती अमेरिकेत बघतो. त्यांना भूकंपाला तोंड देण्यासाठी प्रिव्हेन्शन मेजर्स घेतलेली असतात. सतत सेस्मीक इफेक्ट्स चा अभ्यास केला जातो. हवाईला तर इतक्या जवळून लाव्हा बघता येतो. मानले इथल्या लोकांच्या प्रोसीजर्सना. शील्ड व्होल्कॅनो पण बरेच दिसतात. यलो स्टोनमध्ये काय किंवा हवाई व्होल्कॅनो पार्क मध्ये काय आपल्या खाली एवढी ऍक्टीव्हिटी चाललेली असते खरे वाटत नाही. त्याचा विचार बाजूला ठेवला तरच तुम्ही या जागा नीट बघू शकता.
अमेरिकेत बर्‍याच भागात बर्फ पड्तो. अगदी उन्हाळ्यात कडक उन्हाळा व थंडीत भरपूर बर्फ दिसते. स्नो फ्लेक्स पडताना खूप छान दिसते. चांदण्यात बर्फ़च्छादित घरे जमीन छान चमकतात. स्किईंग करायला मजा येते. स्नो मॅन्स बनवायला छान वाट्ते पण जेव्हा हिमवादळे होतात तेव्हा आपण निसर्गापुढे अगदी हतबल होतो. सगळीकडे पांढरे, ग्रे दिसते. भरपूर बर्फ रस्त्यावर साठतो. तो साफ करावा लागतो. लाईट्स जातात. लाईट दुरूस्त करणे खूप अवघड होते कारण बर्फ वीजेच्या खांबावर साठून त्यावर काम करणे अवघड होते. स्नो पडायला लागल्यावर लगेच रस्त्यावर मिठाचे ट्रक्स फिरायला लागतात व रस्ते साफ होतात (मेन रोडस तरी). पण वादळानंतर जेव्हा बर्फ साठतो व सगळी कडे आइस तयार होतो तेव्हा लोकांची कसरत सुरू होते कारण खूप घसरडे होते.

अमेरिकेत राहिल्यामुळे निसर्गाची ही बरीच रूपे जवळून बघायला मिळाली. या सगळ्या निसर्गाच्या चमत्कारांसकट रोजचे जीवन अगदी व्यवस्थित चालू असते. जीवनाचा तो एक अविभाज्य भाग असल्याने त्याची काळजी सरकार व जनता घेत असते. विमा कंपन्याची इथे त्यामुळे फार गरज असते व चलती ही असते. सॅटेलाइट चा उपयोग अगदी व्यवस्थित करून घेतला आहे या लोकांनी. या सगळ्या प्रकारात फ्लाईट्स कॅन्सल होतात. नुकसान होते. अर्थात या काही रोज घडणार्‍या घटना नाहीत पण दरवर्षी एकतरी अनुभव येतोच. काही जास्त नुकसान झाले तर एकच वाक्य मंडळी म्हणतात ..इट्स मदर नेचर.......आणि आपले रोजचे व्यवहार चालू ठेवतात. खरोखर कॊतुकास्पद आहे.

Wednesday, August 26, 2009

अंदमान चे ’काळे पाणी’...........

सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.
अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.
इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.
संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे .
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.
दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.
नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे.

संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

ने मजसी ने परत मातृभूमीला

Wednesday, August 19, 2009

निवेदन एक कला....

निवेदन एक कला....

मागचे पोस्ट हे गाण्याच्या मागे जी व्यवस्था लागते त्याबद्द्ल लिहिले तेव्हा आता हे प्रत्यक्ष एका गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल. बर्‍याच वेळेला आपण गाण्याचे कार्यक्रम ’बघतो’ नुसते ’ऎकत’ नाही. आजकाल स्टेज डेकोरेशन, कपडे, निवेदन या सगळ्याला महत्व आलेले आहे. बहुतेक वेळेला कुठलीतरी एक थीम घेउन गाणी बसवतात. कधी प्रेमावर तर कधी पावसावर तर कधी विरहावर तर कदी एखाद्या गायक/संगीतकाराची गाणी असतात. ह्या सगळ्या गाण्यांना एका सूत्रात बांधणारी एक महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक. बर्‍याच वेळेला दोन निवेदक असतात (स्त्री व पुरूष). निवेदकाचे काम खूप महत्वाचे असते.

निवेदकाला कार्यक्रमातील सगळी गाणी जोडावी लागतात. यासाठी अधून मधून विनोद, कधी गाण्याबद्द माहिती तर कधी काही कविता असे सागावे लागते. प्रेक्षकांना गाणी ऎकताना खूप वेळ माहिती ऎकणे कंटाळवाणे होते त्यामुळे थोडक्यात पण इंटरेस्ट वाटेल असे बोलणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा काळ, कल्पना आणि वेग या तिन्ही गोष्टी संभाळणे आवश्यक असते. मधे मी एक कार्यक्रम बघितला त्यातल्या निवेदकाने ’वेदनेशिवाय जे ऎकावे वाटते ते निवेदन’ अशी सुट्सुटीत व्याख्या केली होती.
आमच्या इथे असच एक कार्यक्रम बसवला होता (हॊशी) त्याचे हे निवेदन व गाण्याच्या लिंक्स देत आहे. तुम्हाला गाण्याचा एक प्रोग्रॅम बघितल्याचे समाधान वाटेल हे नक्की. या कर्यक्रमात गायकांना त्याच्या आवडीची गाणी म्हणायला परवानगी होती त्यामुळे ती जोडणे हे फार कॊशल्याचे काम होते कारण खूप वेगळ्या विषयावरची गाणी एकत्र गुंफायची होती. हे अवघड काम सोपे केले सॊ. देवयानी गोडसे यांनी. माझाही थोडाफार हातभार होताच. तर बघूया हा कार्यक्रम....

नमस्कार मंडळी. आजच्या माझे गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमात आपली गायक मंडळी घेउन आली आहेत आपल्या आवडीची गाणी. कुणी पसंती दिली आहे आपल्या आवडत्या गायकाला, कुणी त्यातल्या काव्याला तर कुणी चालीला. कार्यक्रमाची सुरूवात करू या एका अभंगाने....
सकल मराठी जनांची मायमाउली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा. या आपल्या माउलीला भेटायला दर वर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठूनामाचा गजर. चला तर आपणही सामील होऊ या या गजरात. संत एकनाथ महाराजांचा अभंग आपल्या दमदार आवाजात सादर करत आहेत.........माझे माहेर पंढरी.....

पंढरीची वारी म्हटली की हमखास पावसाची आठवण होते. या पुढचे गाणे आहे पावसावरचे.
दाटून आलेले आभाळ, वार्‍याची गोड शिरशिरी आणि मनाला धुंदी आणणारा तो मृदगंध हे सगळे आपल्याला पहिल्या पावसाची आठवण करून देते. असे हे सुंदर क्षण अनुभवताना आपली आवडती व्यक्ती बरोबर हवी असे साहजिकच वाटते. अगदी हेच भाव पुढील गाण्यातून सादर केले आहेत......अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले....

या गाण्यात तिच्या मनातले भाव तुम्ही ऎकलेत आता विरहाच्या नुसत्या कल्पनेने त्याची काय परिस्थिती झाली हे बघूया.
प्रेमात गुंतलेले दोन जीव एकमेकांसाठीच जगत असतात. अधून मधून विरहाचे क्षणही येतात पण ते प्रेमाची गोडी अजूनच वाढवतात. आपल्या शिवाय तिचे दिवस कसे सरतील असा गोड प्रश्न त्याला पडलाय. खरे तर दोघांची परिस्थिती तीच आहे पण तिच्याकडून प्रेमाची कबुली घेण्यातली मजा आही ऒरच. संदीप खरे यांची ही सुंदर कविता सादर होत आहे. यातले शब्द आणि चाल तुम्हाला नकीच ठेका धरायला लावतील. कसे सरतील सये....

आपल्या संस्कृतीत लोककलेचा वारसा फार मोठा आहे. मायमराठीचा ठळक्पणे सांगता येणारा लोककलेचा प्रकार म्हणले लावणी. लावण्याचा भावाविष्कार करते ती लावणी. शृंगाररसाची धिटाईने मांडणी करते ती हिच लावणी आणि ऎकणार्‍याला आपल्या तालावर थिरकायला लावते ती पण लावणीच. मध्यंतरी या लावणीला कठिण काळातून जावे लागले पण त्यातून बाहेर पडून पुन्हा लोककलेचा मानाचा तुरा म्हणून ती आता ऒळखली जाते.
अशीच एक नखरेल लावणी आपल्या भेटीला घेउन येत आहे ......रेशमाच्या रेघांनी....

यानंतर पंढ्रीची मायमाउली पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. संत मंडळींना या माउलीला भेटायला प्रत्यक्ष देवळात जावे लागते असे नाही. विठ्ठ्लाच्या रूपाने भारलेल्या वातावरणातच भक्तांना त्याचा साक्षात्कार होतो. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून विठूनामाचा महिमा सादर करत आहोत.....अबीर गुलाल उधलीत रंग............

कुठलाही मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऋतु हिरवा मधील गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. मग आपला कार्यक्रम तरी त्याला अपवाद कसा असणार? वीणेच्या स्वरसाजाचे स्वभाव सांगणारे गाणे यानंतर सादर होत आहे. आपण आपल्या भावना नेहेमी शब्दातून व्यक्त करतो आणि संवाद साधतो. पण संवादासाटी खरेच शब्दांची आवश्यकता असते का? तुम्ही जर कधी वीणा ऎकली तर लक्षात येईल की वीणेचे स्वर नानाविध भाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. कधी तराणा, कधी नखरेल खटका तर कधी सुंदर ताना. मग हे स्वर आपल्या मनाला भिडतात आणि सहजच शब्देविणु संवादु साधला जातो.
बा. भ. बोरकरांच्या कवितेतून सादर झालेले हे विचार सादर होत आहेत पुढच्या गाण्यातून..... झिनीझिनी वाजे बीन

सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगॊळीने सध्या मराठी तरूणाई वर मोहिनी घातली आहे. सरळ सोपे आणि म्हणूनच आपलेसे वाटणारे शब्द, अधी डोलायला लावणारे तर अधी व्याकूळ करणारे. याच जोडीचे एक विरहगीत आता आपल्या पुढे येत आहे. संसारत रूसवे फुगवे, अबोला हे तर नेहेमीचेच पण हे जर एका मर्यादेबाहेर गेले तर कधी कधी ताटातुटीचे क्षण ही येउ शकतात. अशावेळी एकटेपणा प्रकर्षाने जाणवतॊ. नकळतच आपण आपल्या मनाशी कबुली देतो. आपल्या सुरेल आवाजात ही कबुली देत आहेत.
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो..........

यानंतर शेवटचे गाणे सादर करण्यापूर्वी वादकांची ऒळख झाली.

आता वळू या कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्याकडे. ग्रामीण बाजाची गाणी म्हणजे आपल्या साहित्यातला अनमोल ठेवा. ग्रामीण भागातले बोलणे, वागणे अगदी मोकळं. कसं बोलू काय बोलू असे भिडस्त प्रश्न नाहीत. सगळा कारभार कसा खुल्लम खुल्ला. अशा प्रकारची गाणी देण्यात दादा कॊंडके यांचा फार मोठा वाटा आहे. या गाण्यातला तो व ती म्हणजे खेड्यातली जिवंत तरूणाई.
आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील तिखी नोकझोक खास गावरान ठसक्यात सादर होत आहे पुढ्च्या गाण्यातून...
अग हिल हिल पोरी तुला..
.






Wednesday, August 12, 2009

गाणे ऎकताना.........

गाणे ऎकताना.........

गाणे कसे ऎकावे किंवा कुठले ऎकावे याबद्दल हे पोस्ट नाही. आजकाल गाण्याचे अनेक प्रोग्रॅम्स आपण ऎकतो. कार्यक्रम बर्‍याच वेळा वेळेवर सुरू होत नाही. मग आज नीट ऎकू आले नाही किंवा तबलाच फार जोरात होता अशा काहीतरी कॉमेंटस होतात. जो माणूस पॆसे खर्च करून कार्यक्रम बघायला जातो तो काही अपेक्षेने जातो. आणि ते बरोबरही आहे. आमच्या घरी हॊशी कार्यक्रमांच्या बर्‍याच प्रॅक्टीस होतात. माझा सहभाग अर्थात पडद्यामागचा असतो. ते कार्यक्रम बसवताना माझ्या माहितीत थोडीफार भर पडली ती तुमच्याशी शेअर करत आहे.

गाणे ऎकताना काही मंडळी शब्द ऎकतात काही तालाला महत्व देतात तर काही सूरांवर प्रेम करतात. या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचण्याची आवश्यकता असते तेव्हाच कार्यक्रम यशस्वी होतो. यासाठी माइक्स, स्पिकर्स, ऍम्प्लिफायर व फीडबॅक स्पीकर्स ची गरज असते. आणि हे सगळे मॅनेज करण्यासाठी ज्याला चांगला ’कान’ आहे असा साउंड टेक्निशिअन आवश्यक असतो. नेहेमी प्रोग्रॅम बसवताना गायक, वादक भरपूर असतात पण साउंड टेक्निशिअनचे काम करायला फार कमी मंडळी पुढे येतात. तसे बघितले तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

माइक हे गायक, वादक याच्यासाठी वापरतात. ते बरोबर अंतरावर लावले नाहीत तर नीट आवाज येत नाही. स्पिकर्स हे प्रेक्षकांसाठी असतात. हॉलच्या कपॅसिटीच्या प्रमाणे स्पिकर्स लावावे लागतात. कमी किंवा जास्त कपॅसिटीचे लावले तर व्यवस्थित ऎकू येत नाही. फीडबॅक स्पीकर्स हे गायक व वादकांसाठी असतात. मोठ्या हॉलमध्ये स्पीकर्स मधून प्रेक्षकांना आवाज पोचतो पण तो परत गायकाकडे पोचेपर्यंत मधे थोडा वेळ जातो आणि लॅग - विलंब येतो हे टाळण्यासाठी फीड्बॅक स्पीकर्स वापरत्तात. माइक चे बरेच प्रकार असतात. त्यात रिमोट व रेग्युलर मायक्रोफोन्स जास्त वापरले जातात. रेग्युलर मायक्रोफोन्सच्या वायर्स जनरली रंगीत किंवा नंबर लिहिलेल्या असतात. साउंड टेक्निशिअन रंगांवरून अथवा नंबरवरून कुठला माइक कुणाचा हे लक्षात ठेवतो आणि त्याच्या सहाय्याने आवाज कमी जास्त करतो. जेवढे माइक जास्त तेवढे जास्त लक्ष द्यावे लागते. या सगळ्या माइक्स च्या वायर्स एका ऍम्प्लिफायर ला जोडतात. त्याचे एक आउट्पुट स्पीकर्स ला व दुसरे फीडबॅक मॉनिटर ला देतात.

खाली एक बेसिक सिस्टीम दाखवली आहे.




एकामागोमाग दोन प्रोग्रॅम्स असतील तर मधे सेटींग ला वेळ कमी मिळतो. सिस्टीम सेट झाली की आवाजाचे टेस्टींग करावे लागते आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्या गोष्टी करताना शक्यतो सभागृह रिकामे असावे लागते. या सगळ्या गोष्टींना वेळ लागला की प्रेक्षकांना जास्त वाट बघायला लागते. कधी कधी नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होतात. वायर्स कुणी हलवल्या किंवा त्या एकमेकात अडकल्या तर स्पिकर्स मधून जोरात आवाज येतो. फीडबॅक च्या समोरून माइक नेला तर जोरात आवाज येतो की लोकांना कानावर हात ठेवावे लागतात. आता पुढचा कार्यक्रम बघताना, ऎकताना हे सगळे फॅक्टर्स तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि कार्यक्रमाची मजा घ्याल असे वाटते.

Sunday, August 9, 2009

धर्माची गोष्ट

धर्माची गोष्ट

तुमच्या हिंदू धर्मात इतके देव कसे? तुम्ही दगडाच्या स्टॅच्यू ची पूजा कशी करता? तुमच्या देवांची तर चक्क फॅमिली असते ना? ते आपल्यासारखे दागदागिने कसे घालतात? तुमचा कृष्ण प्ले बॉय होता का? इंडिया मध्ये सगळे हिंदूच असतात का? तुमच्या राजांना एवढ्या राण्या (बायका) कशा असतात ? तुम्ही कुठले पुस्तक फॉलो करता? (बायबल, कुराण सारखे), शिवलिंगामागे काय कल्पना आहे? तुमच्याकडे सती प्रथा अजून आहे का? आणि अनटचेबल्स असतात का? अरे हो किती प्रश्न...जगात लोकांना हिंदू देव देवतांबद्द्ल आणि आपल्या धर्माबद्द्ल एवढे प्रश्न असतील असे भारताबाहेर राहिल्याशिवाय लक्षात येत नाही. इतर काही माहिती असो वा नसो या गोष्टीत फार इंटरेस्ट. शाळात, नोकरीच्या ठिकाणी, प्रवासात अनेक लोक तुम्हाला सतत असे प्रश्न विचारून कोड्यात टाकत असतात.

आपण आपल्या देशात आपल्या माणसात असतो तेव्हा मुले वाढताना त्यांच्यावर आजूबाजूच्या गोष्टीमुळे आपोआप संस्कार होत असतात. सण वार, मित्र मंडळी, घरातले वातावरण या सगळ्याचा त्यांच्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. आजकाल चे युग आहे ग्लोबलायझेशन चे. त्यामुळे जगभर आपली मंडळी विखुरली आहेत. मुले बाहेरच्या जगात वेगवेगळ्या संस्कृति मध्ये मिसळत आहेत. अनेक सणवार तिथे साजरे केले जातात. इतर मुलेही त्यात सामील होतात. साहजिकच आपल्या मुलांना प्रकारच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते. भारताबाहेर रहाणार्‍या मुलांना बरेच वेळा संस्कार वर्ग, हिंदू धर्माबद्दल लेक्चर्स किवा इंटरनेट अशा ठिकाणातून मुले आपली मते बनवत असतात. आजकालचे पालक वेळ नाही या नावाखाली मुलांना एखाद्या संस्कार वर्गात घालतात व आपली जबाबदारी संपली असे म्हणतात. खरे तर आपला धर्म कळायला घराच्या बाहेर जायला लागावे ही नामुश्कीची गोष्ट आहे. या गोष्टी घरातून, मोठ्यांच्या वागणूकीतून मुले नकळत शिकत असतात.

आजकाल मुले काहीही अडले की गुगलबाबाचा आधार घेतात. या विषयावर हजारो साईट्स उपलब्ध आहेत पण त्यातल्या उपयुक्त किती हे बघितले तर फार कमी साईटस सापडतात. आपला धर्म खूप जुना आहे. अनेक लोकांचे चांगले विचार एकत्र होऊन तो तयार झाला आहे. काळानुसार, प्रांतानुसार त्यातील बंधने कमी झाली आहेत. त्यात अनेक चांगल्या लोकांचे विचार एकत्रित आहेत म्हणून तो अजूनही टिकला आहे.

हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म हा एक मुद्दा लोकांना पटत नाही. आजकालच्या पिढीला सगळ्या गोष्टींचे प्रूफ हवे असते आणि ही गोष्ट अजून झालेली नाही. लॉजिकली त्याचे बरेच स्पष्टीकरण देतात पण सायन्स ने अजून त्याचे सर्वाना समजेल असे प्रूफ दिलेले नाही. तुम्ही जोपर्यंत सगळ्यांना समजेल असे प्रूफ देत नाही तोवर लोक ते ग्राह्य धरत नाहीत. फिलॉसॉफी चा आधार घेउन बरेच स्पष्टीकरण दिले जाते पण सामान्य लोकांना ते समजणे अवघड असते. त्यामुळे आमचा हा विश्वास आहे किंवा आम्ही हे मानतो असे म्हटले तर समोरचा थोडा शांतपणे ऎकतो. श्रद्धा हा सगळ्या धर्माचा पाया आहे. (अंधश्रद्धा नव्हे). तसे इजिप्त चे जुने लोक ही आफ्टर लाईफ वर खूप विश्वास ठेवायचे.

दुसरा एक गॆरसमज म्हणजे हिंदू धर्मात खूप देव आहेत असे नेहेमी बाहेरच्या लोकांना वाटते कारण ते ठिकठिकाणी मंदिरे बघतात आणि त्यात अनेक वेगवेगळ्या मूर्ती असतात. आपल्याला पटेल, आवडेल अशा रूपात आपण देव बघू शकतो पण शेवटी सगळे एकच देव मानतात हे लोकांना पटत नाही कारण इतर धर्मात बहुधा एक देव मानतात. आणि त्यांना हा फ़्रीडम नाही.

बाकी आपल्याकडे आणि इतर धर्मातही चांगले वागण्यासाठी नियम करून दिलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली जातात. आपल्याकडे जसे हवे त्या देवाची पूजा करता येते तसे धार्मिक पुस्तक ही अमूक एकच वापरा असे बंधन नाही. हे बंधन नसणे बाहेरच्या लोकांना पटकन पटत नाही. गीता वाचली नाही तरी हिंदू माणूस हिंदूच रहातो. देवळात जाणे, पूजा करणे, उपास तापास व्रत वॆकल्ये या गोष्टी म्हणजे एक रस्ता आहे आपल्या धर्माने दाखवलेला, तॊ रस्ता घ्यायचा का आपला स्वतःचा हे तुम्हीच ठरवायचे असते.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की मुलांना लहानपणापासून शाळेत मॊरल सायन्स हा विषय शिकवला पाहिजे. त्यात इतर धर्माबद्दल माहिती दिली पाहिजे. म्हणजे मुले इतर धर्माचा आदर करतील व त्यांना माहिती पण होईल. गॆरसमज दूर होतील. हया विषयाला आपल्या शाळेत फार कमी महत्व दिले जाते. त्यांनी त्या काळी दूर दृष्टीने अशा बर्‍याच सूचना केल्या होत्या पण त्याला कमी महत्व मिळाले नाहीतर आज वेगळा भारत बघायला मिळाला असता.

भारतात इतके धर्म एकत्र नांदू शकतात कारण हिंदू धर्म खूप सहनशील आहे. आजकाल धर्माच्या आडून सगळी भांडणे होतात. जी गोष्ट लोकांना एकत्र आणायला उपयोगात यायला हवी तीच आज लोकांना एकमेकांविरूद्ध करते आहे, आणि याला कुणी कंट्रोल करू शकत नाही. आमचा धर्म सगळ्यात चांगला असे म्हणण्याऎवजी आमचा धर्म आमच्यासाठी चांगला असे जर म्हटले तर काही प्रमाणात परिस्थिती बदलेल. यासाठी लहानपणापासून बरोबर गोष्टी शिकवण्याची गरज आहे.

हिंदू धर्म हा खूप जुना आहे. बाकीचे धर्म अजून नवीन आहेत कदाचित हळूहळू त्यांच्यातही बदल होईल. आपल्या धर्मात अनेक देवांची उपस्थिती पाहून काही मंडळी विचारतात की मग आमचा अल्ला, आमचा येशू तुमच्या धर्मात कुठे बसतो? मला वाटते मुलांनी जर आपल्या धर्माबद्दल बेसिक माहिती घेतली, (ईंटरनेट वरून, कुणा वडिलधार्‍याकडून किंवा पुस्तकातून) तर अशा प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाईल, तुम्हाला काय वाटते?

Tuesday, July 28, 2009


फेरॊंच्या देशात...

गेल्या महिन्यात "प्रिन्स ऑफ इजिप्त” हे कार्टून पाहिले (सुरूवातीला वाटले की बोर असेल पण छान आहे) आणि आमच्या इजिप्तायनची आठवण ताजी झाली. सॊदी अरेबियात रहात असताना दुबई, बहारेन हे बाजूचे देश बघून झाल्यावर इजिप्त ला जावे असे विचार सुरू झाले. पिरॅमिडस बघणे हा एक इंटरेस्ट होताच. सॊदीत त्यावेळेस (१९९६-९७) इंटरनेट एवढे फास्ट नव्हते त्यामुळे रिसर्च लिमिटेड करता आला. अर्थात आधी जे लोक जाउन आले त्यांनी भरपूर माहिती दिली (मॆत्रिणीचे नेटवर्क केव्हाही जास्त माहिती देते). इजिप्त मध्ये बरेच लोक नाईल क्रूज घेउन देश बघतात पण आम्हाला रजा फक्त ५-६ दिवस मिळत होती आणि आमची मुलगी ८-९ वर्षाची होती म्हणून आम्ही ५ दिवसांची टूर ठरवली (नाहीतर ती कंटाळली असती). टूर कंपनीने आमचा प्रोग्रॅम दिला व आमची तयारी सुरू झाली.
इजिप्त मध्ये चाललाय तर जरा जपून, असा सल्ला प्रत्येकाने दिला. तिथे चोर्‍या खूप होतात. पासपोर्ट पळवतील, जास्त पॆसे बाळगू नका. दुकानात खूप बार्गेन करा अशा महत्वाच्या सूचना मॆत्रिणी करत होत्या. तिथे पोचल्यावर पहिला एक दिवस मी प्रत्येक माणसाकडे संशयित नजरेने बघत होते पण आमच्या पूर्ण स्टे मध्ये आम्हाला सगळे चांगले लोकच भेटले, कोणी लुबाडले नाही. सॊदी व इजिप्त तसे शेजारी देश मध्ये फक्त रेड सी आहे. विमानातून जाताना रेड सी छान दिसतो. सुएझ कॅनॉल वरून बघताना मॅप बघतोय असे वाट्त होते. खूप क्लिअर दिसत होते. कॆरॊ एअरपोर्ट वर उतरलो. अगदीच साधारण असा एअरपोर्ट आहे. एखादी शेड किंवा बस स्टॅंड सारखा वाटला. दारात आमचा गाईड आमच्या नावाची पाटी व गाडी घेउन उभा होता. ही आमची पहिलीच अशी एस्कॉर्टेड टूर असल्याने मजा वाटत होती. पुढ्चे ५ दिवस आम्ही आम्हाला त्या गाईडच्या हवाली करून टाकले. हॉटेल वर पोचेपर्यंत अंधार पडला. रूम ताब्यात घेतली. दुसर्‍या दिवशी ८ वाजता गाईड येणार होता. सहज खिडकीतून बाहेर पाहिले तर अंधारात पिरॅमिड सारखे काहीतरी दिसत होते. काहीतरी टेकडी सारखे असावे म्हणून आम्ही झोपलो. सकाळी उठल्यावर खिडकीतून बाहेर पाहिले तर चक्क पिरॅमिडस दूरवर दिसत होते. आधी हॉटेलची अशी सिच्युएशन माहित नसल्याने आम्हाला हे एक छान सरप्राइज होते. बरोबर ८ वाजता गाइड हजर होता हा दुसरा सुखद धकका.

पहिल्या दिवशी पिरमिड्स बघायचे होते. तिथले लोकल्स पिरमिड्स असा उच्चार करतात. या देशात खूप पिरॅमिडस आहेत सुरूवातीला स्टेप्स पिरॅमिडस बांधत असत नंतर पूर्ण पिरॅमिड शेप मध्ये बांधू लागले. गिझा चे तीन फेमस आहेत. हे गावापासून तसे दूर आहेत पण लांबवर दिसतात. आजूबाजूला उंच इमारती बांधायला बंदी आहे. आम्ही तिथे पोचलो तेव्हा बरीच गर्दी होती. लक्षात येण्याइतके जपानी टूरिस्ट होते. तीन पॆकी एका पिरॅमिड्च्या आत जाता येते. कॅमेरा न्यायला बंदी होती. आत जाताना पिरॅमिड चा आतला नकाशा देतात म्हणजे तुम्ही कुठे आहात त्याची कल्पना येते. आतमध्ये जाताना वाकून एका चिंचोळ्या जिन्याने जावे लागते. आत बरिअल चेंबर आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्युझिअम मध्ये आहेत. त्यामुळे आत जाउन काही विशेष बघायला मिळत नाही. बाहेरही बरीच पड्झड झालेली आहे. पण एकंदर त्या स्ट्रक्चरची भव्यता खूप छाप पाडते. त्याकाळी एवढे मोठे दगड कुठुन, कसे आणले, इतके वर कसे चढवले, कॉम्प्युटर शिवाय इतके अचूक मोजमाप कसे केले आहे हे सगळे मति गुंग करणारे आहे. हे दगड एकमेकात बसवताना सिमेंटचा वापर कुठेही नाही. मॊठे दगड लॉक ऍड की अरेंजमेट ने बसवले आहेत. गेले ५००० वर्ष हे स्ट्र्क्चर इनटॅक्ट आहे. पाउस, वारा झेलून ही तितक्याच कणखर पणे ते उभे आहे. बर्‍याच लोकांनी लढायांमध्ये वरचा लाइम स्टोनचा गुळगुळीत, चमकदार भाग नष्ट केला आहे. जेव्हा हे पिरॅमिडस बांधले तेव्हा खूप सुंदर दिसत असतील. आतमध्ये किंग चे कॉफिन आहे दगडाचे बनवलेले. नकाशा बघितल्या मुळे आपण पिरॅमिड च्या नक्की कुठल्या भागात आहोत हे कळते नाहीतर काही कल्पना येत नाही. एकंदर पिरॅमिडस ग्रेट आहेत. या पिरॅमिडस च्या बाजूला स्फिंक्स आहे. तो म्हणे बाहेरून रक्षण करतो. याचे तॊंड माणसाचे (राजाचे) व शरीर सिंहाचे आहे. कुणीतरी त्याचे नाक कापायचा प्रयत्न केला आहे. आम्ही गेलो तेव्हा डागडुजी चालली होती. या बांधकामात लाईम स्टोन खूप वापरला आहे.
या पिरॅमिडस चे आकार जागा याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात. एका ठराविक कॉन्स्टिलेशन कडे ते पॉईंट करतात. मृत्यू नंतर माणूस तिथे प्रवेश करतो. नाईल च्या पश्चिमेला ते आहेत , तिथे सूर्य अस्त पावतो म्हणून ते मृत्यूच्या दिशेला आहेत असे काही म्हणतात, या आकारात वस्तू ठेवली की ती खराब होत नाही म्हणून पिरॅमिड चा शेप निवडला असे काहींचे म्हणणे. गिझाच्या मोठ्या वालुकामय पठारावर ते दिसतात मात्र सुंदर, संध्याकाळी ते अजूनच छान दिसतात. आम्ही २ दिवसांनी तिथे असलेला लाईट व साउंड शो पाहिला...खूपच सुंदर इफेक्ट्स होते. लाईट मुळे तो सगळा परिसर खूपच वेगळा वाटत होता. आणि बरोबरच्या कॉमेंटरी मुळे इतिहासाची पानेही उलगडली जात होती.
इजिप्त मध्ये गाईडस चा सुळ्सुळाट आहे. खूप जनता त्यावर रोजी रोटी कमावते. खूप तरूण मुले इजिप्तॉलॉजी हा विषय शिकतात व गाईड चे काम करतात. आम्ही दोन तीन गाईड चा अनुभव घेतला. तिथे हिंडताना असे जाणवले की जर इथे टूरिझम संपला तर हे लोक काय करतील? सगळे धंदे टूरिस्ट शी निगडीत. इस्लाम धर्म इथे जास्त पाळला जातो. आमच्या एका गाईड ने आम्हाला विचारले की आमच्या कुराणा सारखे तुमचे काय पुस्तक आहे? त्याला सांगितले थोडेसे गीतेबद्द्ल व वेद उपनिषदाबद्दल आणि मग सांगितले की हे वाचले नाही तरी आम्ही हिंदूच रहातो. हिंदू कुंकु लावले नाही तरी हिंदू रहातो. त्याला एवढे आश्चर्य वाटले. तुम्ही कुठ्लेच पुस्तक फॉलो न करता तुमच्या धर्मात कसे रहाता हे काही त्याला समजेना. मग मी त्याला विचारले, "तुम्ही देव मानत नाही मग इथल्या सगळ्या जुन्या गोष्टी, देवळे यात कसे जाता"? कारण त्यांच्या धर्मात मूर्तीपूजा वर्ज्य आहे. तो म्हणाला, "पॊटासाठी करतो दुसरे काही नाही". नाहीतर हे लोक धर्माच्या बाबतीत अगदी कटटर.
नंतर आम्ही उंटावरून राईड घेतली. आधी थोडी घासाघीस झाली किमतीबद्द्ल मग तो तयार झाला. आम्ही तिघे व दोन उंट असे आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यात आल्यावर तो म्हणू लागला जास्त पॆसे द्या नाहीतर मी उंट सोडून जातो....करता काय अडला हरी उंटवाल्याचे पाय धरी. आम्ही जास्त पॆसे देउन खाली उतरलो. (एवढाच हिसका आमच्या प्रवासात मिळाला) त्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो. आम्ही हॉटेल पिरॅमिडस मध्ये उतरलो होतो. छान जागा होती. खिडकीतून पिरॅमिड्स दिसत. इथले डेकोरेशन आणि ब्रेकफास्ट एकदम राजेशाही. जवळच लोकल खाण्याची दुकाने होती(स्वस्त आणि मस्त). इथल्या खाण्यावर ग्रीक, लेबनीज खाण्याचा परिणाम झाला आहे. तिथे आम्ही फिलाफिल सॅंडविच व ज्यूस बर्‍याच वेळा खात असू. हमूस, ताहिनी या चटण्यांचे प्रकार छान होते. बाबागनूष हा वांग्याचा प्रकार होता थोडेसे आपल्या भरतासारखे. एकदा भात व डाळी सारखे काहीतरी ट्राय केले. बकलावा हे स्वीट छान होते. बाकी पिटा ब्रेड, शवरमा, पिझ्झा हे होतेच. सतत टूरिस्ट येत असल्याने वेगवेगळे खाणे उपलब्ध होते. रात्री नाईल नदीतून क्रूझचा प्रोग्रॅम होता. तिथेही जेवण, म्युझिक होतेच. कॆरो बद्द्ल माहिती सांगून मेन बिल्डिंग्ज दाखवत होते. त्यानंतर एका बेली डान्सरने डान्स केला. ती एवढी फास्ट नाचत होती आणि इतके प्रकार करून दाखवत होती की आम्ही बघूनच दमलो.
पुढचा दिवस कॆरो मधले इजिप्शिअन म्युझिअम बघण्यात गेला. (कमीच पडला). हे सगळ्यात जुने म्युझिअम समजले जाते. इजिप्शिअन संस्कृति सगळ्यात जुनी असल्याने इथले सगळे (लायब्ररी, म्युझिअम, युनिव्हर्सिटी, दवाखाने) हे ’सगळ्यात जुने’ या कॅटॅगिरीतले. नंतर नंतर गाईड ने एखादा जुना किल्ला किंवा इमारत दाखवली की आम्ही म्हणत असू हे सगळ्यात जुने किंवा पहिले असेल ना.....सकाळी आधी कागद कसा बनवतात ते बघायला गेलो.
पपायरस च्या झाडापासून कागद कसा बनवतात याचे छान डेमो होते. पपायरस च्या झाडाची पाने भिजवून, त्याचा लगदा करून प्रेस च्या सहाय्याने ती सपाट करतात. मग वाळवून वेगवेगळ्या तर्‍हेच्या कागदात रूपांतरीत करतात. आपल्या समोर कागद बनताना पाहून छान वाटते. आम्ही आपले नाव त्या कागदावर लिहून घेतले. नंतर त्याच्यावर लिहितात कसे, तिथली लिपी कशी होती याबद्द्ल माहिती दिली. मध्यंतरी काही काळ ही लिपी कुणाला समजत नव्हती. कारण त्याचे डॉक्युमेंटेशन नव्हते. काही दिवसांनी लिपी व त्याचा अर्थ लिहिलेली एक शिला सापडली आणि पुढचे काम सोपे झाले. याला हिलोग्रिफिक्स म्हणतात. २००० च्या वर सिंबॉल्स असल्याने अतिशय कॉम्प्लेक्स असा हा प्रकार आहे. यातले प्राणि व पक्षी या लेखनाची दिशा दाखवतात. ती वरून खाली, डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे लिहिता येते. इथल्या सगळ्या टूम्ब्स मध्ये, देवळात, भिंतीवर याच लिपीत मजकूर लिहिला आहे. आम्ही कुठेही गेलो की गाईड आधी टॉर्च मारून त्यावरची लिपी दाखवायचा आणि ती स्टोरी सांगायचा. पूर्वीच्या काळी काढ्लेली पेंटींग्स, चित्रे म्हणजे चक्क इतिहासाची पुस्तके आहेत हे पटते. एकदम इंटरेस्टींग प्रकार वाटला.
त्यानंतर म्युझिअम कॉम्प्लेक्स कडे गेलो. हे म्युझिअम खूप भव्य आहे. सगळ्या पिरॅमिडस मधले सोने, ममीज आणि इतर ऎवज इथे ठेवलेले आहे आणि मुख्य म्हणजे टिकवले आहे. आत गेल्या गेल्या कॉम्प्युटर वर नकाशा होता त्यावरून आम्ही काय काय बघायचे ते ठरवले कारण सगळे एका दिवसात बघणे अशक्य. सुंदर पुतळे, कोरिव काम केलेल्या गोष्टी, सोन्याच्या वस्तू इथे खचाखच भरलेल्या आहेत.
तुतानखामुन हा इथला सगळ्यात तरूण राजा. तो अगदी तरूणपणी गेला. त्याचे एक पूर्ण दालन आहे. त्याला ६-७ पेट्यांच्या आत ठेवले होते. त्या सगळ्यावर सोन्याचे कोरिव काम आहे. याचा मुकुट भरीव सोन्याचा आहे. या लोकांना मृत्यूनंतरच्या जीवनाची फार काळजी. फेरो नंतर देव बनतात त्यामुळे त्यांना ममी करून, त्याच्या सगळ्या वस्तू त्या राजाबरोबर पुरत असत. राजासाठी रक्षक, त्याचे मॊल्यवान सामान , इतर महत्वाच्या गोष्टी त्याच्या बरोबर पुरत असत. नंतर ह्या सगळ्या गोष्टी चोरीला जाउ लागल्या. म्हणून पिरॅमिडस अजून अजून मजबूत बांधायला सुरूवात झाली. ममी करायचे तंत्र कुठेही डॉक्युमेंटेड नाही पण शरीराचे महत्वाचे चार अवयव( आतडी, फुफ्फुस, लिव्हर व पोट) बाहेर काढून त्यातील पाणी काढून त्यांच्यावर केमिकल लावत असत. नंतर उरलेली बॉडी ट्रीट करत ...पाण्याचा अंश पूर्ण काढत असत कारण पाण्यामुळे बॅक्टेरिआ शरीर खराब करतात. ४० दिवसांनी सगळे अवयव आत घालत अथवा जार मध्ये ठेवत व बॉडीला लिनन च्या पट्ट्यंनी गुंडाळत. अशा प्रकारे तयार केलेली बॉडी बघून, साधारणपणे माणूस पूर्वी कसा दिसत असेल याची नंतर बरेच वर्ष कल्पना येई. म्युझिअम मध्ये एका दालनात ममीज ठेवल्या आहेत. अर्थात त्यासाठी जास्तीचे तिकीट होते. आपल्या व इजिप्शिअन लोकांच्या त्या काळच्या समजुती बर्‍याच सारख्या आहेत. देव देवता, मृत्यु नंतरचा पाप पुण्याचा हिशोब, म्रुत्यु देवता, सूर्य, जल देवता वगॆरे. बर्‍याच ठिकाणी एक पेंटिंग पहायला मिळाले. मरणानंतर माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब चालू आहे आणि तराजू मध्ये एका बाजुला पिस ठेवले आहे व दुसरीकडे त्या माणसाचे कर्म. ब‍र्याच पेंटींग मध्ये वेगवेगळ्या देवांच्या गोष्टी रेखलेल्या आहेत. त्यासाठी वापरलेले रंग अजूनही चांगले आहेत
खान ए खलिली हा इथला मोठा बाजार. रस्त्यावर व छोट्या दुकानात हा बाजार भरतो. विक्रेते हिंदी लोक दिसले की राज कपूर, जंजीर असे सांगून गोष्टी गळ्यात मारायला बघतात. बॉलीवूड अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात आपल्याला भेटत असते. कापड, खाणे, शोभेच्या वस्तू, अत्तर सगळे इथे हजर आणि वाजवी किमतीत. मॆत्रिणिंनी किमतीची आधीच कल्पना दिल्याने छान बार्गेन करता आले. पत्र्यावार ठोकून बनवलेल्या फ्रेम्स, पिरॅमिडस चे सेट, वेगवेगळे स्टॅच्यू, कॉटन कफ्तान अशी बरीच खरेदी झाली. एका अत्तराच्या दुकानात आमचा गाईड घेउन गेला. तिथे अनेक प्रकारची अत्तरे होती. बाट्ल्यांचे आकार व रंग फारच सुंदर. अत्तरापेक्षा मी बर्‍याच बाटल्या घेतल्या आणि त्या न फुटता घरी पोचल्या.
अलेक्झांड्रिया..कॆरोपासून ४ तासावर अलेक्झांड्रिआ आहे. आम्ही ट्रेन ने गेलो. अगदी पुणे बॉंबे सारखा प्रवास वाटला. ही ट्रेन आली तेव्हा त्यावर कुठेही इंग्लीश लिहिलेले नसल्याने २ दा विचारून आम्ही बसलो. रूळावर ही ट्रेन घसरत जाते त्यामुळे वेगळे फिलिंग येते. ट्रेन मधल्या खुर्च्या १८० फिरवता येतात. अगदी साध्या ट्रेन्स असल्या तरी सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित चालतात. टूरिझम साठी हे आवश्यक आहे. नरीमन पॉईंट सारखा इथला रस्ता वाटतो. आम्ही सिसिली नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. तिथून व्ह्यू खूप छान दिसतो ( एका मित्राचे रेकमेंडेशन...नाही तर अशा गोष्टी एकदम कशा सापडणार?)
इथली लायब्ररी प्रसिद्ध आहे. ही रिनोवेट केलेली आहे. अलेक्झांडर ने सगळी उत्तमोत्तम पुस्तके हवीत म्हणून सगळ्या जगातून इथे पुस्तके जमवली आहेत. कुठल्या का कारणाने होईना पुस्तकांचे सुंदर कलेक्शन आहे. जगातला कुठलाही पेपर इथे मिळू शकतो. लायब्ररीचे ऒपन डिझाईन असे आहे की आत नॅचरल लाईट भरपूर. वरती डोळ्याच्या पापण्या सारखे डिझाईन आहे. अतिशय सुंदर आर्किटेक्चर....ऒपन मजले आहेत. त्यानंतर हुस्ने मुबारक (प्रेसिडेंट) चा राजवाडा पाहिला. तो रहात असला तरी पहायला परवानगी होती. खूप मोठा आहे. मुस्लीम आर्किटेक्चर कळून येते. संध्याकाळी एक सागरी किल्ला पाहिला. अगदी आपल्या किल्ल्यांची आठवण झाली. तोफा ठेवायची जागा, भुयारे. कोठार वगॆरे. बाहेर येउन समुद्राकाठी उभे असताना समोर लांबवर दिवे दिसत होते. मध्ये मेडिटेरेनिअन समुद्र...पलिकडे टर्की, युरोप. परत एकदा नकाशाच बघतो आहोत असे वाटले. युरोप जवळ असल्याने अलेक्झांड्रिआतली लोके दिसायला वेगळी आहेत. युरोपिअन छाप काही लोकांवर दिसते. एकंदरीने इजिप्शिअन दिसायला छान होत्या. सॊदीत मी जेवढे इजिप्शिअन पाहिले ते सगळे जाड होते म्हणून माझी समजूत झाली होती की सगळे जाड असतील. संध्याकाळी ट्रेन पकडून आम्ही परत कॆरोला आलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी एका टॅक्सी वाल्याला घेउन आम्ही ऒऍसिस बघायला गेलो. वाळवंटात हे पाण्याचे साठे कुठुन सापडतात हे नवलच आहे. त्या पाण्यामुळे आजूबाजूला झाडॆ, वस्ती होते. वाटेत एक टिपीकल खेडे तयार केले होते...त्यात नवीन काही वाटले नाही कारण आपल्याकडे अशी खेडी भरपूर. त्यानंतर समुद्रकिनारी गेलो तिथे छान शिडांच्या बोटी दिसत होत्या. आम्ही त्यात बसणार होतो पण वारे खूप होते आणि पाणि गार होते म्हणून आम्ही तिथून लॊकर निघालो. आम्ही गेलो तो सिझन रमादान चा होता. आमच्या टॅक्सीवाल्याला उपास सोडायचा होता. तो त्याच्या घरी घेउन गेला. अगदी साधे घर होते. मग खजूर दिला. त्याचा उपास सुटला. घरात त्याची फॅमिली, आई वडील होते. आश्चर्य म्हणजे सगळे शिकलेले होते. परत जाताना एका बाजूला खजूराची झाडे व सूर्य अस्ताला चाललेला. खूप छान उजेड होता आणि आकाशाच्या कॅनव्हासवर एक सुंदर निसर्गचित्र काढल्यासारखे दिसत होते.
इजिप्त चे सगळे महत्व नाईल मुळे आहे. या नदीच्या भोवती फक्त वस्ती आहे बाकी सगळे वाळवंट. नाईल जिथून जाते तो भाग मात्र अगदी समृद्ध आहे. नकाशात बघितले तर ही गोष्ट सहज लक्षात येते. नाईलला दर वर्षी पुराचा तडाखा बसत असे. आस्वान इथे त्यावर धरण बांधल्याने हा प्रश्न सुटला. हे एक आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट आहे. त्यामुळे वीज पुरवठा भरपूर झाला. नाईल क्रूज वर भरपूर टूरिझम चालतो. ही नदी दक्षिणेकडून उत्तरेला वहाते कारण तिथली भॊगोलिक परिस्थिती, चढ उतार तसे आहेत. त्यामुळे काही लोक तिला उलटी वहाणारी नदी म्हणतात. दक्षिणेकड्च्या भागाला अप्पर इजिप्त व उत्तरेकडच्या भागाला लोअर इजिप्त म्हणतात.

इजिप्त मध्ये टेंपल्स चे बरेच महत्व आहे. प्रत्येक राजा, फेरो आपल्या नावाचे मोठे टेंपल व मोठा पिरॅमिड बांधत असे. गुलामांचा वापर करून मोठाल्या शिळा दगड हलवले जात. नदी मधून बोटीतून दगड आणताना बाजूला बर्‍याच बोटी बॅलन्सिंग साठी लावाव्या लागत कारण वजनाने पाणी खूप डिसप्लेस होत असे. अबू सिंबल ची टेंपल्स धरणाच्या मध्ये येत होती म्हणून ती चक्क कापून एक मॆल अंतरावर परत जशीच्या तशी बांधली. हेही एक मोठे आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट होते. इजिप्त च्या इतिहासाने इतक्या लोकांना वेडे केले आहे त्यामुळे मदत मागितल्यावर बर्‍याच लोकांनी हात पुढे केला. अजूनही तिथे खोदकाम करणारे परदेशी जास्त दिसतात. लेझर किरणांनॊ जुने मंदिर तुकड्यात कापून एक मॆलावर परत जिग सॉ पझल सारखे बांधले, खरोखर कमाल आहे. या देवळात सूर्याचे किरण ठराविक ठिकाणी मूर्तीच्या अंगावर पडतील अशी रचना त्याकाळी केलेली होती. काय टेक्नॉलॉजी होती माहित नाही. कुठे लिहून ठेवले असते तर मजा आली असती. रॅमसे २ यानेही लक्झर येथे प्रचंड मोठी टेंपल्स बांधली आहेत. त्यातल्या मूर्ती व त्यांची भव्यता बघण्यासारखी आहे. या देवळात बर्‍याच वेळा रा (सूर्य) दिसतो. सिंहासन, देवाची वाहने, आकाश पाताळ सगळे कन्सेप्ट भेटतात.
आम्ही अमेरिकेत आल्यावर लास व्हेगासला गेलो तेव्हा लक्झर हॉटेल मध्येच राहिलो होतो त्याचेही आर्किटेक्चर छान आहे. त्यांनीही बर्‍याच मूर्ती, पिरॅमिडस चा आकार ठेवला आहे. परवा इजिप्तायन हे पुस्तक वाचले आणि इतर अनेक ठिकाणांबद्द्ल माहिती मिळाली. पुस्तक खूप डिटेल मध्ये आहे.
इजिप्तला जाताना मनात वाटत होते काय ते जुने बघायचे पण बघण्यासारखे खूप आहे. पर्यटकांसाठी सोई भरपूर आहेत. तिथली माणसे फसवत नाहीत असे मी म्हणेन. तिथल्या गोष्टी पहाताना पुन्हा एकदा जाणवले आपल्याकडे केवळ सोईंची कमतरता असल्याने कितीतरी छान देवळे, किल्ले हे परदेशी लोकांपासून दूर रहातात. आता ठराविक ठिकाणी थोड्या सोई आहेत पण अगदीच कमी. आपली संस्कृतिही अशीच जुनी आहे. तिथे गेल्यावर जाणवले की हा देश तसा अगदीच गरीब आहे पण या टूरिझमने त्यांनी जगाच्या नकाशावर महत्वाचे स्थान मिळवले आहे हे नक्की.