Tuesday, July 28, 2009


फेरॊंच्या देशात...

गेल्या महिन्यात "प्रिन्स ऑफ इजिप्त” हे कार्टून पाहिले (सुरूवातीला वाटले की बोर असेल पण छान आहे) आणि आमच्या इजिप्तायनची आठवण ताजी झाली. सॊदी अरेबियात रहात असताना दुबई, बहारेन हे बाजूचे देश बघून झाल्यावर इजिप्त ला जावे असे विचार सुरू झाले. पिरॅमिडस बघणे हा एक इंटरेस्ट होताच. सॊदीत त्यावेळेस (१९९६-९७) इंटरनेट एवढे फास्ट नव्हते त्यामुळे रिसर्च लिमिटेड करता आला. अर्थात आधी जे लोक जाउन आले त्यांनी भरपूर माहिती दिली (मॆत्रिणीचे नेटवर्क केव्हाही जास्त माहिती देते). इजिप्त मध्ये बरेच लोक नाईल क्रूज घेउन देश बघतात पण आम्हाला रजा फक्त ५-६ दिवस मिळत होती आणि आमची मुलगी ८-९ वर्षाची होती म्हणून आम्ही ५ दिवसांची टूर ठरवली (नाहीतर ती कंटाळली असती). टूर कंपनीने आमचा प्रोग्रॅम दिला व आमची तयारी सुरू झाली.
इजिप्त मध्ये चाललाय तर जरा जपून, असा सल्ला प्रत्येकाने दिला. तिथे चोर्‍या खूप होतात. पासपोर्ट पळवतील, जास्त पॆसे बाळगू नका. दुकानात खूप बार्गेन करा अशा महत्वाच्या सूचना मॆत्रिणी करत होत्या. तिथे पोचल्यावर पहिला एक दिवस मी प्रत्येक माणसाकडे संशयित नजरेने बघत होते पण आमच्या पूर्ण स्टे मध्ये आम्हाला सगळे चांगले लोकच भेटले, कोणी लुबाडले नाही. सॊदी व इजिप्त तसे शेजारी देश मध्ये फक्त रेड सी आहे. विमानातून जाताना रेड सी छान दिसतो. सुएझ कॅनॉल वरून बघताना मॅप बघतोय असे वाट्त होते. खूप क्लिअर दिसत होते. कॆरॊ एअरपोर्ट वर उतरलो. अगदीच साधारण असा एअरपोर्ट आहे. एखादी शेड किंवा बस स्टॅंड सारखा वाटला. दारात आमचा गाईड आमच्या नावाची पाटी व गाडी घेउन उभा होता. ही आमची पहिलीच अशी एस्कॉर्टेड टूर असल्याने मजा वाटत होती. पुढ्चे ५ दिवस आम्ही आम्हाला त्या गाईडच्या हवाली करून टाकले. हॉटेल वर पोचेपर्यंत अंधार पडला. रूम ताब्यात घेतली. दुसर्‍या दिवशी ८ वाजता गाईड येणार होता. सहज खिडकीतून बाहेर पाहिले तर अंधारात पिरॅमिड सारखे काहीतरी दिसत होते. काहीतरी टेकडी सारखे असावे म्हणून आम्ही झोपलो. सकाळी उठल्यावर खिडकीतून बाहेर पाहिले तर चक्क पिरॅमिडस दूरवर दिसत होते. आधी हॉटेलची अशी सिच्युएशन माहित नसल्याने आम्हाला हे एक छान सरप्राइज होते. बरोबर ८ वाजता गाइड हजर होता हा दुसरा सुखद धकका.

पहिल्या दिवशी पिरमिड्स बघायचे होते. तिथले लोकल्स पिरमिड्स असा उच्चार करतात. या देशात खूप पिरॅमिडस आहेत सुरूवातीला स्टेप्स पिरॅमिडस बांधत असत नंतर पूर्ण पिरॅमिड शेप मध्ये बांधू लागले. गिझा चे तीन फेमस आहेत. हे गावापासून तसे दूर आहेत पण लांबवर दिसतात. आजूबाजूला उंच इमारती बांधायला बंदी आहे. आम्ही तिथे पोचलो तेव्हा बरीच गर्दी होती. लक्षात येण्याइतके जपानी टूरिस्ट होते. तीन पॆकी एका पिरॅमिड्च्या आत जाता येते. कॅमेरा न्यायला बंदी होती. आत जाताना पिरॅमिड चा आतला नकाशा देतात म्हणजे तुम्ही कुठे आहात त्याची कल्पना येते. आतमध्ये जाताना वाकून एका चिंचोळ्या जिन्याने जावे लागते. आत बरिअल चेंबर आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्युझिअम मध्ये आहेत. त्यामुळे आत जाउन काही विशेष बघायला मिळत नाही. बाहेरही बरीच पड्झड झालेली आहे. पण एकंदर त्या स्ट्रक्चरची भव्यता खूप छाप पाडते. त्याकाळी एवढे मोठे दगड कुठुन, कसे आणले, इतके वर कसे चढवले, कॉम्प्युटर शिवाय इतके अचूक मोजमाप कसे केले आहे हे सगळे मति गुंग करणारे आहे. हे दगड एकमेकात बसवताना सिमेंटचा वापर कुठेही नाही. मॊठे दगड लॉक ऍड की अरेंजमेट ने बसवले आहेत. गेले ५००० वर्ष हे स्ट्र्क्चर इनटॅक्ट आहे. पाउस, वारा झेलून ही तितक्याच कणखर पणे ते उभे आहे. बर्‍याच लोकांनी लढायांमध्ये वरचा लाइम स्टोनचा गुळगुळीत, चमकदार भाग नष्ट केला आहे. जेव्हा हे पिरॅमिडस बांधले तेव्हा खूप सुंदर दिसत असतील. आतमध्ये किंग चे कॉफिन आहे दगडाचे बनवलेले. नकाशा बघितल्या मुळे आपण पिरॅमिड च्या नक्की कुठल्या भागात आहोत हे कळते नाहीतर काही कल्पना येत नाही. एकंदर पिरॅमिडस ग्रेट आहेत. या पिरॅमिडस च्या बाजूला स्फिंक्स आहे. तो म्हणे बाहेरून रक्षण करतो. याचे तॊंड माणसाचे (राजाचे) व शरीर सिंहाचे आहे. कुणीतरी त्याचे नाक कापायचा प्रयत्न केला आहे. आम्ही गेलो तेव्हा डागडुजी चालली होती. या बांधकामात लाईम स्टोन खूप वापरला आहे.
या पिरॅमिडस चे आकार जागा याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात. एका ठराविक कॉन्स्टिलेशन कडे ते पॉईंट करतात. मृत्यू नंतर माणूस तिथे प्रवेश करतो. नाईल च्या पश्चिमेला ते आहेत , तिथे सूर्य अस्त पावतो म्हणून ते मृत्यूच्या दिशेला आहेत असे काही म्हणतात, या आकारात वस्तू ठेवली की ती खराब होत नाही म्हणून पिरॅमिड चा शेप निवडला असे काहींचे म्हणणे. गिझाच्या मोठ्या वालुकामय पठारावर ते दिसतात मात्र सुंदर, संध्याकाळी ते अजूनच छान दिसतात. आम्ही २ दिवसांनी तिथे असलेला लाईट व साउंड शो पाहिला...खूपच सुंदर इफेक्ट्स होते. लाईट मुळे तो सगळा परिसर खूपच वेगळा वाटत होता. आणि बरोबरच्या कॉमेंटरी मुळे इतिहासाची पानेही उलगडली जात होती.
इजिप्त मध्ये गाईडस चा सुळ्सुळाट आहे. खूप जनता त्यावर रोजी रोटी कमावते. खूप तरूण मुले इजिप्तॉलॉजी हा विषय शिकतात व गाईड चे काम करतात. आम्ही दोन तीन गाईड चा अनुभव घेतला. तिथे हिंडताना असे जाणवले की जर इथे टूरिझम संपला तर हे लोक काय करतील? सगळे धंदे टूरिस्ट शी निगडीत. इस्लाम धर्म इथे जास्त पाळला जातो. आमच्या एका गाईड ने आम्हाला विचारले की आमच्या कुराणा सारखे तुमचे काय पुस्तक आहे? त्याला सांगितले थोडेसे गीतेबद्द्ल व वेद उपनिषदाबद्दल आणि मग सांगितले की हे वाचले नाही तरी आम्ही हिंदूच रहातो. हिंदू कुंकु लावले नाही तरी हिंदू रहातो. त्याला एवढे आश्चर्य वाटले. तुम्ही कुठ्लेच पुस्तक फॉलो न करता तुमच्या धर्मात कसे रहाता हे काही त्याला समजेना. मग मी त्याला विचारले, "तुम्ही देव मानत नाही मग इथल्या सगळ्या जुन्या गोष्टी, देवळे यात कसे जाता"? कारण त्यांच्या धर्मात मूर्तीपूजा वर्ज्य आहे. तो म्हणाला, "पॊटासाठी करतो दुसरे काही नाही". नाहीतर हे लोक धर्माच्या बाबतीत अगदी कटटर.
नंतर आम्ही उंटावरून राईड घेतली. आधी थोडी घासाघीस झाली किमतीबद्द्ल मग तो तयार झाला. आम्ही तिघे व दोन उंट असे आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यात आल्यावर तो म्हणू लागला जास्त पॆसे द्या नाहीतर मी उंट सोडून जातो....करता काय अडला हरी उंटवाल्याचे पाय धरी. आम्ही जास्त पॆसे देउन खाली उतरलो. (एवढाच हिसका आमच्या प्रवासात मिळाला) त्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो. आम्ही हॉटेल पिरॅमिडस मध्ये उतरलो होतो. छान जागा होती. खिडकीतून पिरॅमिड्स दिसत. इथले डेकोरेशन आणि ब्रेकफास्ट एकदम राजेशाही. जवळच लोकल खाण्याची दुकाने होती(स्वस्त आणि मस्त). इथल्या खाण्यावर ग्रीक, लेबनीज खाण्याचा परिणाम झाला आहे. तिथे आम्ही फिलाफिल सॅंडविच व ज्यूस बर्‍याच वेळा खात असू. हमूस, ताहिनी या चटण्यांचे प्रकार छान होते. बाबागनूष हा वांग्याचा प्रकार होता थोडेसे आपल्या भरतासारखे. एकदा भात व डाळी सारखे काहीतरी ट्राय केले. बकलावा हे स्वीट छान होते. बाकी पिटा ब्रेड, शवरमा, पिझ्झा हे होतेच. सतत टूरिस्ट येत असल्याने वेगवेगळे खाणे उपलब्ध होते. रात्री नाईल नदीतून क्रूझचा प्रोग्रॅम होता. तिथेही जेवण, म्युझिक होतेच. कॆरो बद्द्ल माहिती सांगून मेन बिल्डिंग्ज दाखवत होते. त्यानंतर एका बेली डान्सरने डान्स केला. ती एवढी फास्ट नाचत होती आणि इतके प्रकार करून दाखवत होती की आम्ही बघूनच दमलो.
पुढचा दिवस कॆरो मधले इजिप्शिअन म्युझिअम बघण्यात गेला. (कमीच पडला). हे सगळ्यात जुने म्युझिअम समजले जाते. इजिप्शिअन संस्कृति सगळ्यात जुनी असल्याने इथले सगळे (लायब्ररी, म्युझिअम, युनिव्हर्सिटी, दवाखाने) हे ’सगळ्यात जुने’ या कॅटॅगिरीतले. नंतर नंतर गाईड ने एखादा जुना किल्ला किंवा इमारत दाखवली की आम्ही म्हणत असू हे सगळ्यात जुने किंवा पहिले असेल ना.....सकाळी आधी कागद कसा बनवतात ते बघायला गेलो.
पपायरस च्या झाडापासून कागद कसा बनवतात याचे छान डेमो होते. पपायरस च्या झाडाची पाने भिजवून, त्याचा लगदा करून प्रेस च्या सहाय्याने ती सपाट करतात. मग वाळवून वेगवेगळ्या तर्‍हेच्या कागदात रूपांतरीत करतात. आपल्या समोर कागद बनताना पाहून छान वाटते. आम्ही आपले नाव त्या कागदावर लिहून घेतले. नंतर त्याच्यावर लिहितात कसे, तिथली लिपी कशी होती याबद्द्ल माहिती दिली. मध्यंतरी काही काळ ही लिपी कुणाला समजत नव्हती. कारण त्याचे डॉक्युमेंटेशन नव्हते. काही दिवसांनी लिपी व त्याचा अर्थ लिहिलेली एक शिला सापडली आणि पुढचे काम सोपे झाले. याला हिलोग्रिफिक्स म्हणतात. २००० च्या वर सिंबॉल्स असल्याने अतिशय कॉम्प्लेक्स असा हा प्रकार आहे. यातले प्राणि व पक्षी या लेखनाची दिशा दाखवतात. ती वरून खाली, डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे लिहिता येते. इथल्या सगळ्या टूम्ब्स मध्ये, देवळात, भिंतीवर याच लिपीत मजकूर लिहिला आहे. आम्ही कुठेही गेलो की गाईड आधी टॉर्च मारून त्यावरची लिपी दाखवायचा आणि ती स्टोरी सांगायचा. पूर्वीच्या काळी काढ्लेली पेंटींग्स, चित्रे म्हणजे चक्क इतिहासाची पुस्तके आहेत हे पटते. एकदम इंटरेस्टींग प्रकार वाटला.
त्यानंतर म्युझिअम कॉम्प्लेक्स कडे गेलो. हे म्युझिअम खूप भव्य आहे. सगळ्या पिरॅमिडस मधले सोने, ममीज आणि इतर ऎवज इथे ठेवलेले आहे आणि मुख्य म्हणजे टिकवले आहे. आत गेल्या गेल्या कॉम्प्युटर वर नकाशा होता त्यावरून आम्ही काय काय बघायचे ते ठरवले कारण सगळे एका दिवसात बघणे अशक्य. सुंदर पुतळे, कोरिव काम केलेल्या गोष्टी, सोन्याच्या वस्तू इथे खचाखच भरलेल्या आहेत.
तुतानखामुन हा इथला सगळ्यात तरूण राजा. तो अगदी तरूणपणी गेला. त्याचे एक पूर्ण दालन आहे. त्याला ६-७ पेट्यांच्या आत ठेवले होते. त्या सगळ्यावर सोन्याचे कोरिव काम आहे. याचा मुकुट भरीव सोन्याचा आहे. या लोकांना मृत्यूनंतरच्या जीवनाची फार काळजी. फेरो नंतर देव बनतात त्यामुळे त्यांना ममी करून, त्याच्या सगळ्या वस्तू त्या राजाबरोबर पुरत असत. राजासाठी रक्षक, त्याचे मॊल्यवान सामान , इतर महत्वाच्या गोष्टी त्याच्या बरोबर पुरत असत. नंतर ह्या सगळ्या गोष्टी चोरीला जाउ लागल्या. म्हणून पिरॅमिडस अजून अजून मजबूत बांधायला सुरूवात झाली. ममी करायचे तंत्र कुठेही डॉक्युमेंटेड नाही पण शरीराचे महत्वाचे चार अवयव( आतडी, फुफ्फुस, लिव्हर व पोट) बाहेर काढून त्यातील पाणी काढून त्यांच्यावर केमिकल लावत असत. नंतर उरलेली बॉडी ट्रीट करत ...पाण्याचा अंश पूर्ण काढत असत कारण पाण्यामुळे बॅक्टेरिआ शरीर खराब करतात. ४० दिवसांनी सगळे अवयव आत घालत अथवा जार मध्ये ठेवत व बॉडीला लिनन च्या पट्ट्यंनी गुंडाळत. अशा प्रकारे तयार केलेली बॉडी बघून, साधारणपणे माणूस पूर्वी कसा दिसत असेल याची नंतर बरेच वर्ष कल्पना येई. म्युझिअम मध्ये एका दालनात ममीज ठेवल्या आहेत. अर्थात त्यासाठी जास्तीचे तिकीट होते. आपल्या व इजिप्शिअन लोकांच्या त्या काळच्या समजुती बर्‍याच सारख्या आहेत. देव देवता, मृत्यु नंतरचा पाप पुण्याचा हिशोब, म्रुत्यु देवता, सूर्य, जल देवता वगॆरे. बर्‍याच ठिकाणी एक पेंटिंग पहायला मिळाले. मरणानंतर माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब चालू आहे आणि तराजू मध्ये एका बाजुला पिस ठेवले आहे व दुसरीकडे त्या माणसाचे कर्म. ब‍र्याच पेंटींग मध्ये वेगवेगळ्या देवांच्या गोष्टी रेखलेल्या आहेत. त्यासाठी वापरलेले रंग अजूनही चांगले आहेत
खान ए खलिली हा इथला मोठा बाजार. रस्त्यावर व छोट्या दुकानात हा बाजार भरतो. विक्रेते हिंदी लोक दिसले की राज कपूर, जंजीर असे सांगून गोष्टी गळ्यात मारायला बघतात. बॉलीवूड अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात आपल्याला भेटत असते. कापड, खाणे, शोभेच्या वस्तू, अत्तर सगळे इथे हजर आणि वाजवी किमतीत. मॆत्रिणिंनी किमतीची आधीच कल्पना दिल्याने छान बार्गेन करता आले. पत्र्यावार ठोकून बनवलेल्या फ्रेम्स, पिरॅमिडस चे सेट, वेगवेगळे स्टॅच्यू, कॉटन कफ्तान अशी बरीच खरेदी झाली. एका अत्तराच्या दुकानात आमचा गाईड घेउन गेला. तिथे अनेक प्रकारची अत्तरे होती. बाट्ल्यांचे आकार व रंग फारच सुंदर. अत्तरापेक्षा मी बर्‍याच बाटल्या घेतल्या आणि त्या न फुटता घरी पोचल्या.
अलेक्झांड्रिया..कॆरोपासून ४ तासावर अलेक्झांड्रिआ आहे. आम्ही ट्रेन ने गेलो. अगदी पुणे बॉंबे सारखा प्रवास वाटला. ही ट्रेन आली तेव्हा त्यावर कुठेही इंग्लीश लिहिलेले नसल्याने २ दा विचारून आम्ही बसलो. रूळावर ही ट्रेन घसरत जाते त्यामुळे वेगळे फिलिंग येते. ट्रेन मधल्या खुर्च्या १८० फिरवता येतात. अगदी साध्या ट्रेन्स असल्या तरी सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित चालतात. टूरिझम साठी हे आवश्यक आहे. नरीमन पॉईंट सारखा इथला रस्ता वाटतो. आम्ही सिसिली नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. तिथून व्ह्यू खूप छान दिसतो ( एका मित्राचे रेकमेंडेशन...नाही तर अशा गोष्टी एकदम कशा सापडणार?)
इथली लायब्ररी प्रसिद्ध आहे. ही रिनोवेट केलेली आहे. अलेक्झांडर ने सगळी उत्तमोत्तम पुस्तके हवीत म्हणून सगळ्या जगातून इथे पुस्तके जमवली आहेत. कुठल्या का कारणाने होईना पुस्तकांचे सुंदर कलेक्शन आहे. जगातला कुठलाही पेपर इथे मिळू शकतो. लायब्ररीचे ऒपन डिझाईन असे आहे की आत नॅचरल लाईट भरपूर. वरती डोळ्याच्या पापण्या सारखे डिझाईन आहे. अतिशय सुंदर आर्किटेक्चर....ऒपन मजले आहेत. त्यानंतर हुस्ने मुबारक (प्रेसिडेंट) चा राजवाडा पाहिला. तो रहात असला तरी पहायला परवानगी होती. खूप मोठा आहे. मुस्लीम आर्किटेक्चर कळून येते. संध्याकाळी एक सागरी किल्ला पाहिला. अगदी आपल्या किल्ल्यांची आठवण झाली. तोफा ठेवायची जागा, भुयारे. कोठार वगॆरे. बाहेर येउन समुद्राकाठी उभे असताना समोर लांबवर दिवे दिसत होते. मध्ये मेडिटेरेनिअन समुद्र...पलिकडे टर्की, युरोप. परत एकदा नकाशाच बघतो आहोत असे वाटले. युरोप जवळ असल्याने अलेक्झांड्रिआतली लोके दिसायला वेगळी आहेत. युरोपिअन छाप काही लोकांवर दिसते. एकंदरीने इजिप्शिअन दिसायला छान होत्या. सॊदीत मी जेवढे इजिप्शिअन पाहिले ते सगळे जाड होते म्हणून माझी समजूत झाली होती की सगळे जाड असतील. संध्याकाळी ट्रेन पकडून आम्ही परत कॆरोला आलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी एका टॅक्सी वाल्याला घेउन आम्ही ऒऍसिस बघायला गेलो. वाळवंटात हे पाण्याचे साठे कुठुन सापडतात हे नवलच आहे. त्या पाण्यामुळे आजूबाजूला झाडॆ, वस्ती होते. वाटेत एक टिपीकल खेडे तयार केले होते...त्यात नवीन काही वाटले नाही कारण आपल्याकडे अशी खेडी भरपूर. त्यानंतर समुद्रकिनारी गेलो तिथे छान शिडांच्या बोटी दिसत होत्या. आम्ही त्यात बसणार होतो पण वारे खूप होते आणि पाणि गार होते म्हणून आम्ही तिथून लॊकर निघालो. आम्ही गेलो तो सिझन रमादान चा होता. आमच्या टॅक्सीवाल्याला उपास सोडायचा होता. तो त्याच्या घरी घेउन गेला. अगदी साधे घर होते. मग खजूर दिला. त्याचा उपास सुटला. घरात त्याची फॅमिली, आई वडील होते. आश्चर्य म्हणजे सगळे शिकलेले होते. परत जाताना एका बाजूला खजूराची झाडे व सूर्य अस्ताला चाललेला. खूप छान उजेड होता आणि आकाशाच्या कॅनव्हासवर एक सुंदर निसर्गचित्र काढल्यासारखे दिसत होते.
इजिप्त चे सगळे महत्व नाईल मुळे आहे. या नदीच्या भोवती फक्त वस्ती आहे बाकी सगळे वाळवंट. नाईल जिथून जाते तो भाग मात्र अगदी समृद्ध आहे. नकाशात बघितले तर ही गोष्ट सहज लक्षात येते. नाईलला दर वर्षी पुराचा तडाखा बसत असे. आस्वान इथे त्यावर धरण बांधल्याने हा प्रश्न सुटला. हे एक आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट आहे. त्यामुळे वीज पुरवठा भरपूर झाला. नाईल क्रूज वर भरपूर टूरिझम चालतो. ही नदी दक्षिणेकडून उत्तरेला वहाते कारण तिथली भॊगोलिक परिस्थिती, चढ उतार तसे आहेत. त्यामुळे काही लोक तिला उलटी वहाणारी नदी म्हणतात. दक्षिणेकड्च्या भागाला अप्पर इजिप्त व उत्तरेकडच्या भागाला लोअर इजिप्त म्हणतात.

इजिप्त मध्ये टेंपल्स चे बरेच महत्व आहे. प्रत्येक राजा, फेरो आपल्या नावाचे मोठे टेंपल व मोठा पिरॅमिड बांधत असे. गुलामांचा वापर करून मोठाल्या शिळा दगड हलवले जात. नदी मधून बोटीतून दगड आणताना बाजूला बर्‍याच बोटी बॅलन्सिंग साठी लावाव्या लागत कारण वजनाने पाणी खूप डिसप्लेस होत असे. अबू सिंबल ची टेंपल्स धरणाच्या मध्ये येत होती म्हणून ती चक्क कापून एक मॆल अंतरावर परत जशीच्या तशी बांधली. हेही एक मोठे आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट होते. इजिप्त च्या इतिहासाने इतक्या लोकांना वेडे केले आहे त्यामुळे मदत मागितल्यावर बर्‍याच लोकांनी हात पुढे केला. अजूनही तिथे खोदकाम करणारे परदेशी जास्त दिसतात. लेझर किरणांनॊ जुने मंदिर तुकड्यात कापून एक मॆलावर परत जिग सॉ पझल सारखे बांधले, खरोखर कमाल आहे. या देवळात सूर्याचे किरण ठराविक ठिकाणी मूर्तीच्या अंगावर पडतील अशी रचना त्याकाळी केलेली होती. काय टेक्नॉलॉजी होती माहित नाही. कुठे लिहून ठेवले असते तर मजा आली असती. रॅमसे २ यानेही लक्झर येथे प्रचंड मोठी टेंपल्स बांधली आहेत. त्यातल्या मूर्ती व त्यांची भव्यता बघण्यासारखी आहे. या देवळात बर्‍याच वेळा रा (सूर्य) दिसतो. सिंहासन, देवाची वाहने, आकाश पाताळ सगळे कन्सेप्ट भेटतात.
आम्ही अमेरिकेत आल्यावर लास व्हेगासला गेलो तेव्हा लक्झर हॉटेल मध्येच राहिलो होतो त्याचेही आर्किटेक्चर छान आहे. त्यांनीही बर्‍याच मूर्ती, पिरॅमिडस चा आकार ठेवला आहे. परवा इजिप्तायन हे पुस्तक वाचले आणि इतर अनेक ठिकाणांबद्द्ल माहिती मिळाली. पुस्तक खूप डिटेल मध्ये आहे.
इजिप्तला जाताना मनात वाटत होते काय ते जुने बघायचे पण बघण्यासारखे खूप आहे. पर्यटकांसाठी सोई भरपूर आहेत. तिथली माणसे फसवत नाहीत असे मी म्हणेन. तिथल्या गोष्टी पहाताना पुन्हा एकदा जाणवले आपल्याकडे केवळ सोईंची कमतरता असल्याने कितीतरी छान देवळे, किल्ले हे परदेशी लोकांपासून दूर रहातात. आता ठराविक ठिकाणी थोड्या सोई आहेत पण अगदीच कमी. आपली संस्कृतिही अशीच जुनी आहे. तिथे गेल्यावर जाणवले की हा देश तसा अगदीच गरीब आहे पण या टूरिझमने त्यांनी जगाच्या नकाशावर महत्वाचे स्थान मिळवले आहे हे नक्की.

No comments: