Friday, July 10, 2009

आमची युरोप टूर शेवटचा भाग (इटली, फ्रान्स)

आमची युरोप टूर शेवटचा भाग
(इटली, फ्रान्स)

व्हेनिस ला पोचेपर्यंत दुपार झाली. वाटेत व्हिसा चेकिंग, करन्सी चेंज वगॆरे नाटके झाली. इटलीत शिरताना प्रत्येकजण लिराच्या बाबतीत लक्षाधीश झाला. लिराची किंमत डॉलरच्या तुलनेत फारच कमी आहे. ६५००० लिरामध्ये जेवण झाले. जाताना प्रवासात बरीच टनेल्स लागली. एका टनेल मधून बाहेर पड्लॊ की आपण बर्‍याच उंचावर आलेलो असतो. आमच्या गाईड ने जाताना थोडे लेसन्स दिले. इथे कोल्डा म्हणजे गरम असा अर्थ होतो. बाथरूम मध्ये सी म्हणजे कोल्ड वॉटर अशी आपल्याला सवय असते. इथे मात्र गरम पाणी असा अर्थ होतो. गरम कॉफी ला कोल्डा कापुचिनो अशी ऑर्डर द्यायची. हॉटेल मध्ये बाहेरच्या बाजूला बसलॊ तर जास्त रेट आणि आत बसलो तर कमी. पॅरिस मध्ये हा प्रकार फार दिसतो (आपल्या उलट). इटली मध्ये इंग्लीश फार कमी बोलतात पण टूरिस्ट असले की बरोबर वागतात. ’ट’ चा उच्चार ’त’ असा होतो.

व्हेनिस हे १००-१२५ बेटांचे मिळून झालेले गाव. ’कालव्यांचे शहर’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. तिथे जाण्यासाठी बोटीची सोय होती. गेल्या गेल्या मुरानो ग्लास फॅक्टरी बघितली. मुरानो बेटावर या काचकामाचे मॊठे कारखाने आहेत. प्रसिद्ध व्हेनेशिअन ग्लास इथे बनवतात. छान प्रात्यक्षिक दाखवले. हाताने पाईप वापरून वेगवेगळे नमुने करतात. वेगवेगळे रंग मिसळून छान फ्लॉवर पॉट्स बनवले त्या कारागिरांनी. अशा आता फक्त १०-१२ फॅमिलीज राहिल्या आहेत. त्यांच्या शोरूम मध्ये खूप नमुने ठेवले आहेत. तिथे थोडी खरेदी झाली. किमती मात्र भरपूर होत्या.

त्यानंतर मार्केट स्क्वेअर मध्ये २-३ तास होतो. इथे भरपूर टूरिस्ट होते. आजूबाजूला कबूतरेही खूप होती. हा जगातला सर्वात जास्त फोटो काढला गेलेला स्क्वेअर मानला जातो. एक चर्च/ बॅसिलीका बघण्यासारखी आहे. त्यात मोझॅक स्टाईल ने सुंदर चित्र बनवले आहे. अगदी नीट पाहिल्या तर टाईल्स दिसतात नाहीतर एकसंध चित्र दिसते. नंतर बेल टॉवर वर गेलो. तिथून पूर्ण व्हेनिस चे दृष्य दिसते. आम्ही वर चढत असताना बरोबर ६ वाजता ४ ही बेल्स जोरात वाजायला लागल्या. इतक्या मोठ्या बेलचा आवाज ऎकण्याचा हा पहिलाच अनुभव. बहुतेकांनी गोंडोला राईड घेतली. ह्या बहुतेक काळ्या बोटी असतात वर सोनेरी नक्षी. ४-५ जण बसतात. चालवणारा एखादे गाणे ऎकवतो. वाटेत नेपोलिअनच्या घरासारखी महत्वाची ठिकाणे दाखवतात. हे शहर पूर्ण कालव्यांनी जोडले आहे. भरती ऒहॊटी मुळे पाणी स्वच्छ रहाते असे म्हणतात. मला स्वतःला मात्र ते पटले नाही. ग्रॅंड कॅनॉल वर छान पॅलेस आहेत. गावात छोटी दुकाने व रेस्टॉरंट्स भरपूर. त्यांना छोट्या पुलाने जोडले आहे. इथला एक तुरूंग ही प्रसिद्ध आहे. एकंदरीत व्हेनिस हे बरेच जुने व वेगळे वाटते. काही गोष्टींची उगाच जास्त प्रसिद्धी करतात तसा थोडा प्रकार वाटला.


यानंतरचा मुक्काम होता फ्लोरेन्स चा. इथे एक भव्य ’दूमॊ’ आहे. हा जगातला सर्वात मोठा. २०० वर्षे बांधायला लागली. हिरवा संगमरवर प्रथमच बांधकामात पाहिला. हिरवा, चॉकलेटी व ब्राउन अशा ३ रंगात बांधकाम आहे. पुन्हा एकदा तुकड्या तुकड्यात फोटो झाले. पूर्ण फोटो घेणे अशक्य. इंटरनेट वर काही फार छान फोटो आहेत त्यातले काही टाकले आहेत. दारावर एवढे काम केलेले आहे की आपण बघता बघता दमून जातो. प्रत्येक दारावर बायबल मधली स्टोरी चित्ररूपात काढलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा डोमची दुरूस्ती चाललेली होती. आसपास बरेच अंतर वाहनांना बंदी होती. बरेच रस्ते लाल विटांचे बांधलेले होते.. मला बर्‍याचदा वाटायचे की मी फूटपाथवरून चालते आहे, मग लक्षात यायचे की अरे हा तर रस्ता आहे. पुढ्च्या चॊकात खूप संगमरवरी पुतळे ठेवले आहेत. इटली त एकंदर इतके पुतळे आहेत की त्याकाळी ’पुतळे मेकर’ एकदम डिमांड मध्ये असतील. एक प्रसिद्ध म्युझिअम बाजूलाच होते पण ते वेळेअभावी बघता आले नाही. नंतर आर्नो नदीवरचे पूल पाहिले. या स्क्वेअर पासून जवळ एक टेकडी आहे त्यावरून पूर्ण फ्लोरेन्स, त्यातली मोठी स्ट्रक्चर्स, बरेच पूल दिसतात. वरती मायकेल ऍंजेलोचा पुतळा आहे. त्याने प्रथम पुरूषांचे पुतळे बनवायला सुरूवात केली. तोपर्यंत फक्त बायकांचे पुतळे बनवत. डेव्हिड हा त्याचा मॉडेल होता. मायकेल ऍंजेलोच्या पूर्ण कामात फक्त एका पुतळ्यावर त्याची सही आहे आणि तो व्हॅटिकन मध्ये आहे.
इथे लेदर गुड्स चांगली मिळतात. एका शॉप मध्ये बरीच खरेदी झाली. मी मनाचा हिय्या करून एक १२५ डॉलर्स ची पर्स घेतली. यापूर्वी प्रसन्नने आणलेली पर्स ५-६ वर्ष छान टिकली होती म्हणून धाडस केले. जाणकारांना ती हात लावताच कळते. लेदर जॅकेट्स, बेल्ट्स अशी बरीच खरेदी लोकांनी केली. त्यानंतरचा मुक्काम रोम मध्ये होता. इथे काहीतरी जुनाट, पडके बघावे लागणार अशी माझी अगदी खात्री होती. ती तितकीशी खरी ठरली नाही. ऒल्ड सिटी ऒफ रोम व न्यू सिटी असे २ भाग केले आहेत. ऒल्ड सिटी च्या बाहेर पूर्ण भिंत आहे. ती अजूनही सुस्थितीत आहे. ऒलिव्ह ट्रीज व अंब्रेला शेप ट्रीज आजूबाजूला खुप दिसतात. इन जनरल इटलीत खूप भव्य इमारती आहेत. उंची खूप असते. आमचा गाईड खूप वयस्कर होता पण खूप स्मार्ट होता. प्रथम त्याने स्पॅनिश स्क्वेअर मध्ये फ्रेंच स्टेप्स दाखवल्या. या ठिकाणी बर्‍याच सिनेमांचे शूटिंग झाले आहे. त्यापॆकी रोमन हॉलिडे व टॅलेंटेड मि रिपली हे दोन पाहिलेले होते. नंतर ट्रेव्ही फाउंटन कडे गेलो. हे इथले सर्वात जुने फाउंटन. त्याकाळचा पाण्याचा सोर्स. सध्या यात अगदी कमी पाणी आहे. या फाउंटन कडे पाठ करून आत नाणे टाकले की परत तुम्ही रोमला जाता असे म्हणतात. अमृताने नाणे टाकले बघू परत जाते का? आतमध्ये एक माणूस मोठ्या गाळण्यात नाणी गोळा करत होता. रोममध्ये इन जनरल खूप चालावे लागते. चांगले वॉकिंग शूज या ट्रीपसाठी आवश्यक आहेत. इथे भरपूर टूरिस्ट भेटतात. चोरांपासून सावध असा इशारा आमचा गाईड अधून मधून देत असे.
दुपारी व्हॅटिकन सिटी ला गेलो. ही सर्वात छोटी कंट्री आहे. आतमध्ये बसेस ना परवानगी नव्हती त्यामुळे भरपूर छालावे लागले. पोप चे रहाण्याचे ठिकाण हेच. आपण नेहेमी टी व्ही वर जी जागा बघतो, ती प्रत्यक्ष समोर होती. व्हॅटिकन सिटी सेंट पीटर्स कॅथिड्रल साठी प्रसिद्ध आहे. हे जगातले सर्वात मोठे कॅथेड्रल. दारात जाताच याची भव्यता जाणवते. आत शिरतानाच दोन्ही बाजूला अर्ध गोलाकार खांब आहेत. (२८०) त्या प्रत्येक खांबावर एक एक पुतळा आहे आणि हे पुतळे अजून बर्‍या स्थितीत आहेत. मध्यावर एक उंच खांब आहे तो मेणबत्तीसारखा वाटतो. आत जाताना बरीच सेक्युरीटी होती. स्लीवलेस, शॉर्ट्स व मिनिज ना बंदी होती. हे लोक खूप ऍडव्हान्स असल्याने अशा कारणासाठी बंदी करतील असे वाटले नव्हते. टूर गाईड ने सांगून सुद्धा एक जण स्लीव्हलेस मध्ये आलीच. तिला अडवले मग एकीची ऒढणी तिला दिली व प्रवेश मिळवला. आपल्या देवळात अजून तरी असा प्रवेश नाकारला जात नाही. याचा घुमट मायकेल ऍंजेलो ने बनवला आहे. त्यावर सुंदर मोझॅक टाईल्स ची डिझाईन्स आहेत. ३००-३५० फूटावर जाउन त्याकाळी ही डिझाईन्स कशी बनवली देव जाणे. झोपूनच बनवावी लागली असतील आणि बघणारा माणूस ३०० फूट खालून बघणार हेही लक्षात घ्यावे लागले असेल. रंगचित्रे नसल्याने फोटो ला बंदी नव्हती. एक ममी पण होती बाजूच्या दालनात. पुतळे व पेंटिंग्ज बघून शेवटी तुम्ही दमून जाता. येशूला क्रूसावरून खाली उतरवताना मेरीने त्याला मांडीवर घेतलेले फेमस पेंटिंग व पुतळा इथे आहे या एकाच कलाकृतीवर त्याची सही आहे नाहीतर आजकाल सहीची लोकांना पहिली काळजी असते. तो पेंटिंग, स्थापत्य, चित्रकला, बांधकाम अशा अनेक कलात पारंगत होता. मायकेल ऎंजेलो ग्रेट आणि व्हॅटिकन इज ग्रेट!!!!!!!!
त्यानंतर कलोझिअम हे भव्य ऍम्पिथिएटर पाहिले. यातला बराच भाग आता पडला आहे. ८ वर्षे बांधकाम चालले होते याचे. ६५००० लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती. ६ मजले उंची आहे. प्राण्यांचे खेळही होत असत. त्यांना ठेवण्यासाठी तळघराची सोय होती. भरपूर कमानी भिंतीत होत्या. पूर्वी त्यात पुतळे होते आता त्यात फक्त अवशेष राहिले आहेत. भिंतीतले शिसे ही काढले आहे. पूर्वीचे कलोझिअम कसे होते याची बरीच चित्रे लावली होती. या ठिकाणी एक छान पुस्तक मिळाले. पूर्वीचे फोटो आताच्या फोटोवर सुपर इंपोज केले आहेत. ते पाहून जुन्या काळी या गोष्टी कशा दिसत असतील याची कल्पना येते. आपल्याकडच्या किल्ल्यांसाठी अशी पुस्तके बनवायला हवीत असे रायगड बघताना वाटले. बाहेर जुन्या वेशात काही मुले मुली पोझेस देत होती. याच्या आजूबाजूला बरीच जुनी स्ट्रक्चर्स पडक्या अवस्थेत उभी आहेत. रोमन फोरम, जुने ब्रिजेस वगॆरे. एक ५० बी सी चा ब्रिज आहे आणि आजही तो वापरात आहे. खूप दगडी बांधकाम इथे पाहिले. वाटेत एक भव्य कोर्ट बिल्डींग ही पाहिली. रोमन लोकांनी जुन्या गोष्टी छान जपल्या आहेत. ग्रेट आर्किटेक्चर. तुम्हाला सगळी म्युझिअम्स बघायची असतील तर ५-६ दिवस तरी वेळ द्यायला हवा.
आमचा पुढचा स्टे पिसा ला होता. सकाळी सकाळी बसने लिनींग टॉवर पासून ५ किमी वर सोडले. त्यापुढे त्यांच्या बसने जावे लागते. आत जाताना दोन्हीकडे खूप दुकाने होती. त्यातील काही कोनिकल होती. त्याच्य्यात खूप कप्पे होते आणि त्यामुळे खूप गोष्टी डिसप्ले करता येत होत्या. मस्त डिझाईन होते. पिसाच्या मनोर्‍याच्या बाजूला एक बेल टॉवर व बाप्टिस्ट्री आहे. ते टॉवर पेक्षा छान वाट्ते. लिनींग टॉवर हे जगातील ७ आश्चर्यापॆकी एक आहे. सुरूवातीला हा टॉवर कलतोय हे गॅलिलिऒने दाखवले. त्याच्या बेसला बशी सारखे स्ट्रक्चर आहे. त्यात शिसे भरून बॅलन्स करायचा प्रयत्न केला होता. या मनोर्‍याचे ७ मजले आहेत. साधारण २१ फ़ूट हा टॉवर कललेला आहे. सध्या कलण्याचे प्रमाण कमी आहे. पिसा हे गाव तसे अगदी छोटे आहे. जगातील एक आश्चर्य आपण बघतोय असे हा टॉवर बघून काही मला वाटले नाही.

यानंतर जिनीव्ह वरून फ्रान्सकडे जायचे होते. रोज सकाळी फटाफट ब्रेकफास्ट करून मंडळी बसमध्ये जागेसाठी भांडत असत. रोज सकाळी हे दृष्य दिसत असे. रोटेशन सिस्टीम नसल्याने हा प्रकार होत असे. वय वाढ्ते तशी लोकांची भांडायची हॊस वाढते असे वाटे. या ट्रीप मधला हा एकच निगेटीव्ह पॉईंट होता. बाकी सर्व व्यवस्था छान होती. हॉटेल्स ७०% चांगली होती. युरोप मध्ये सुरूवातीच्या हॉटेल्स मध्ये ब्रेकफास्ट चे प्रकार जास्त असत. पॅरिस मध्ये सर्वात कमी. इट्ली पासून फ्रान्स चा प्रवास सगळ्यात मोठा सलग प्रवास होता. ७ तास लागले. हे रस्ते खूप छान आहेत. ७० ते ८० टनेल्स लागली. एका ट्नेल मधून बाहेर आलो की बरीच उंची आपण चढतो/ उतरतो. घाटातले कमानीवाले रस्ते ब्रिजेस खूप छान आहेत. या लोकांनी इतक्या वर्षापूर्वी किती छान बांधकाम करून ठेवले आहे. याच रस्त्यावर एक डोंगर दिसतो. तो मार्बल चा सोर्स आहे.- करारा मार्बल. रस्त्यावर बरेच मार्बल स्लॅब्स स्टोअर केलेले दिसतात. काही रस्ते याच्या चुर्‍यामुळे चमकतात. जाताना एका बाजूला हिरवे डोंगर, मध्ये घाटातला रस्ता, गावे व दुसर्‍या बाजूला समुद्र असा सुंदर रस्ता. पाण्याचा निळाशार रंग सतत सोबत करतो. स्विस बॉर्डर वर परत चेकिंग झाले. हा चेकपॉईंट चक्क टनेल मध्ये आहे. त्यानंतर वेवे हे चार्ली चॅप्लीनचे गाव लागले. त्याच्या घराचे रूपांतर आता लायब्ररीत केले आहे. मॉन्ट्रे या गावात नेसले चे हेड क्वार्टर आहे. स्वित्झर्लंड हा देश इतका छोटा असून तिथे खूप महत्वाची ऑफिसेस, रेड क्रॉस चे हेड क्वार्टर अशी अनेक महत्वाची ऑफिसेस आहेत. गावात शिरताना आल्प्स च्या रेंजेस खूपच सुंदर दिसतात.
जिनीव्ह मध्ये लेक जिनिव्ह पाहिले. इथले फाउंटन जगातले सर्वात उंच म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या खालोखालचे जेद्दाला(सॊदी त) पाहिले होते. या लेकजवळ एक फ्लोअर क्लॉक आहे. या लेकच्या खाली पार्किंग लॉट केलेला आहे हे जेव्हा कळले तेव्हा जर या लेकमधले पाणी खाली झिरपले तर असा नको तो विचार मनात आलाच. (कन्या रास).. इथे परत चॉकलेट्स, स्विस नाईफ अशी खरेदी झालीच.

यापुढचा शेवटचा टप्पा जिनिव्ह ते पॅरिस होता. आमचा गाईड वाटेत सतत चोरांपासून सावध रहाण्याची सूचना देत होता. युरोप मध्ये रेफ्युजी खूप असतात. त्यांची तरूण मुले पॉकेटमार असतात. त्यांच्या वयामुळे पोलिस त्यांना कायम स्वरूपी पकडू शकत नाहीत. सर्वच ठिकाणी टुरिस्ट खूप होते. गर्दी ही खूप होती पण सुदॆवाने कुणाची चॊरी झाली नाही. पॅरिस मध्ये स्केटस वरून जाणारे पोलिस दिसले. स्वित्झर्लंड मध्ये नेचर्स ब्युटी जास्त तर इटली पॅरिस मध्ये बांधकामे जास्त बघण्यासारखी आहेत. पोचल्या पोचल्या गाईडेड टूर होती. चिनी गाईड इंडिअन लोकांना फ्रेंच लोकांबद्द्ल सांगत होता. प्रथम आर्च पाहिली. यावर जवानांची नावे, शिल्पे आहेत. ते पाहून आपल्या इंडिया गेट ची आठवण झाली. पॅरिस मधला एक रस्ता शांज अलिझे हा खूप प्रसिद्ध आहे. रात्रीचा एक तास सॊडला तर म्हणे यावर सतत वर्दळ असते. इथली हॉटेल्स, बिल्डींग्ज अर्थातच खूप महाग आहेत. हा रस्ता सिंगापूर च्या ऑर्चर्ड स्ट्रीट ची आठवण करून देतो. नंतर कॉंकर्ड स्क्वेअर ला गेलो. बर्‍याच हिंदी गाण्यात दिसणारा एक पिलर इथे दिसतो. इजिप्त कडून या लोकांनी हा भेटी दाखल मिळवला. ऑपेरा हाउस बघितले अतिशय सुंदर बिल्डींग आहे. पॅरिस मध्ये महत्वाच्या बिल्डींग्ज व काही मेटॅलिक पार्ट सोनेरी रंगात रंगवले आहेत. ते लांबून लक्ष वेधून घेतात व रात्री त्यावर लाईट टाकल्यावर खूप छान दिसतात. पॅरिस मध्ये ट्रॅफिक भरपूर होता. गाड्यांच्या नंबर प्लेटस ७५ ने एण्ड होतात. मेन राउंड अबाउट मधून जो व्यवस्थित गाडी चालवतो त्याला म्हणे लायसेन्स मिळते. या ठिकाणी १२ रस्ते मिळाले आहेत त्यातून गाडी काढणे खरेच कॊशल्याचे काम आहे.

पॅरिस मध्ये शिरल्यापासून बर्‍याच वेळा आयफेल टॉवर दिसला. या टॉवरच्या पहिल्या मजल्यापेक्षा उंच बिल्डींग बांधायला बंदी आहे. अशा सगळ्या बिल्डींग दुसर्‍या भागात आहेत. हा टॉवर वर्ल्ड ट्रेड एक्झिबिशन साठी बांधला. प्रथम दर्शनी हे स्ट्रक्चर काही एवढे इंप्रेसिव्ह वाट्त नाही. पॅरिस च्या लोकांनी एक्झिबिशन नंतर हे पाडायचे ठरवले पण आयफेलने एक उपाय शोधून काढला. त्याच्या टोकावर एक ज्योत होती ती काढून एक टी व्ही ऍंटेना बसवली व हे स्ट्रक्चर वाचवले. आज ते पॅरिस चे आकर्षण ठरले आहे. पहिल्या मजल्यावर लिफ्ट ने गेलो. तिथून खालचे दृष्य छान दिसते. अजून वरती वेळेअभावि गेलो नाही. काही मंडळी पायर्‍या चढून जात होती. त्या दिवशी खूप वेळा हा टॉवर पाहिला. रत्री लाईटिंग केल्यावर मस्त दिसत होता. दर तासाच्या ठोक्यावर या टॉवर चे दिवे ५ मि. ब्लिंक करत होते. आता बहुदा ब्लिंकिंग बंद आहे. संध्याकाळी सीन नदीवर क्रूज होता. सर्व बोटींवर सतत कॉमेंट्री चालू असते. बर्‍याच भाषांचे ऑप्शन असतात. नदीतून जाताना परत सगळे स्पॉटस पहायला मिळाले. या नदीवर अनेक ब्रिजेस आहेत. त्यापॆकी अलेक्झांडर ब्रिज खूप देखणा आहे. पाण्यातून जाताना निळ्या आकाशावर पिरॅमिड फार सुंदर दिसतो. परत नकळत १५-२० फोटो होतातच. अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रेंच लोकांनी गिफ्ट दिला आहे. त्याचे आर्किटेक्चर ही आयफेल चेच. ह्या स्टॅच्यूची छोटी प्रतिमा नदीतून जाताना दिसते. ह्या क्रूझ नंतर आमच्या ट्रॅव्हल कंपनीने एक सरप्राईज जेवण दिले. आयफेल टॉवर समोर एक पिरॅमिड म्हणून कॉन्फरन्स रूम आहे. त्याच्या ८ व्या मजल्यावर डिनर होते. सगळीकडून काच असल्याने समॊर टॉवर छान दिसत होता. जेवणही तितकेच छान होते. पिणार्‍यांना वाईन फ़्री होती. मिशेल नावाच्या एका डान्सरने इजिप्शिअन डान्स केला. ज्यांना नाचण्यात इंटरेस्ट होता त्यांनी नाचून घेतले. मी मात्र बाहेर जाउन तो टॉवर डोळ्यात भरून घेतला. कितीही वेळ पाहिला तरी तेवढाच छान दिसत होता.
युरोप मध्ये वाईन्स खूप छान मिळतात. किआंती वाईन फ़ेमस. बाटल्यांचे आकार व वाईन दोन्ही छान होते. पॅरिस मधे एक ड्यूटी फ़्री शॉप आहे - बेनलक्स म्हणून तिथे लिपस्टिक्स, परफ्यूम अशी महागडी खरेदी झाली. इथल्या सेल्स गर्ल्स फारच सुंदर होत्या. पॅरिस मध्ये प्रथम सेंट वापरायची सुरूवात झाली. इथल्या व्हॅलीत खूप फुले फुलतात. पूर्वीच्या काळी म्हणे राजे राण्या रोज अंघोळ करत नसत. कारण अंघोळी नंतर पोअर्स ओपन होऊन जर्म्स आअत जातील असे त्यांना वाट्त असे म्हणून महिन्यातून १-२ वेळा अंघोळ करून भरपूर सेंट्स वापरत असत. आता यातले खरे खोटे माहित नाही. गाईड्ने सांगितलेली गोष्ट. आम्ही गोष्ट बाजूला ठेवून मजबूत सेंटस ची खरेदी केली. रस्त्यावर खूप फरारे गाड्या, स्मार्ट कार्स पाहिल्या. स्मार्ट कार हे मर्सिडीज व सुझुकी चे कॉंम्बिनेशन. अगदी छोटी गाडी. ३ लोक आरामात बसतात. युरोप चे रस्ते छोटे असल्याने अशी डिझाईन्स पॉप्युलर होतात. वाटेत नेपोलिअनचे थडगे पाहिले. त्याला म्हणे ७-८ पेट्यात तुकडे करून पुरले होते. इथे नेपोलिअन बोनापर्ट न म्हणता नेपोलिअन १-२ असे म्हणतात. ऑपेरा हाउस जवळ एक बिल्डींग पाहिली तिला एकही खिडकी नाही. नॉट्रे डॅम चे कॅथेड्रल मात्र कमी वेळात पाहिले. त्यातले स्टेन ग्लास आणि स्टॅच्यू सुंदर आहेत.
दुसर्‍या दिवशी सकाळी म्युझिअम कडे जाताना एक स्क्वेअर मध्ये डायनाला डोडि ने प्रपोज केलेले हॉटेल, त्याने घेतलेल्या रिंग चे दुकान पाहिले. त्यांचा अपघात झालेले टनेल ही पाहिले. त्यावर आयफेल टॉवर वरून काढलेली फ्लेम ठेवली आहे व एक नवीनच ’डायना पॉईंट’ तयार झाला आहे. लुव्हर म्युझिअम अतिशय भव्य आहे. पूर्ण बघणे अशक्य. मोनालिसाचे पेंटिंग मात्र प्रत्येकाने पाहिले. व्हीनस चा स्टॅच्यू ही ’मोस्ट वॉंटेड’ होता. या म्युझिअम मध्ये इतकी चांगली पेंटिंग्ज आहेत की शेवटी फार चांगल्या गोष्टींचाही कंटाळा येतो तसे झाले. असाच अनुभव सालारजंग म्युझिअम मध्ये आला होता. या म्युझिअम मध्ये ठिकठिकाणी स्टुडंटस बसून चित्रे काढ्त होते. चालून दमलो या म्युझिअम मध्ये.

दुपारी पॅलेस ऑफ व्हर्साय पाहिला. हा गावाबाहेर आहे. तिथे लुई द फिलीप ७२ वर्षे राहिला. अतिशय प्रचंड असा हा पॅलेस आहे. पूर्वी मोबाईल नसताना कसे लोक रहात असतील कुणास ठाउक? मागच्या बाजूला शेकडो पुतळे, कारंजे व लांबवर पसरलेली बाग आहे. शिकारीसाठी खुप मोठी जागा आहे. सध्या या पॅलेस ची काहीच दालने उघडी आहेत. राजाची लिव्हींग रूम, डायनिंग रूम, डान्सिंग रूम व बेड रूम . सगळीकडे जुने फर्निचर मेंटेन केले आहे. डान्स रूम मध्ये सुंदर शॅंडेलिअर्स आहेत. सोनेरी रंग सगळीकडे ओतलेला आहे. दारावर पेंटिंग मध्ये बिल्डींग वर सगळीकडे...हा राजा खूप बुटका होता व त्याला १० मुले होती. सगळ्यांना त्याची बेड बघण्यात खूप इंटरेस्ट होता. इथेही भरपूर टूरिस्ट होते. भिंतीवर भरपूर पेंटिंग्ज होती. त्यात ह्यूमन फिगर्स भरपूर. बघून आपण दमतो. रंग खराब झाले तर सतत दुरूस्ती करतात त्यामुळे छान दिसतात. एकंदर खूपच गोष्टी इथे पहायला मिळाल्या. या पॅलेसच्या बाहेर आम्ही ग्रुप फॊटॊ काढले. निदान २० फोटो तरी आमच्या टूर गाईड ने वेगवेगळ्या कॅमेर्‍यातून काढले.
रात्री लिडो शो पाहिला. हा इथला सर्वात जुना कॅब्रे शो आहे. फ्री शॅंपेन हे लोकांना मोठे आकर्षण होते. फुकट मिळाली की किती पितात लोक...स्टेजवर बर्‍याच ट्रीक्स करून दाखवल्या. थोडी जादू, थोड वॉटर डिसप्ले व उरलेला डान्स. सध्या आपण या प्रकारचे खूप प्रोग्रॅम्स टी व्ही वर बघतो. एकंदरीत शो चांगला होता. पॅरिस मध्ये खूप गोष्टी पाहिल्या. जरा जास्तच डोस झाला.
यानंतर काही मंडळी युरो डिस्नेला गेली. निम्मी लंडनला तर उरलेली अमेरिकेला. आम्ही युरोस्टार ने लंडनला परत आलो. दुसर्‍या दिवशी इंडियाची फ़्लाइट होती. संध्याकाळी थोडे शॉपिंग व बरेच विंडो शॉपिंग केले. ऎकला होता तेवढा काही छान वाटला नाही हा भाग. दुसर्‍या दिवशी मुंबईला प्रयाण. दोन फ़्लाईटस १५ दिवसांच्या अंतराने घेतल्याने खूप लांबचा प्रवास केल्यासारखे वाटले नाही. अमृताने (माझ्या मुलीने) पॅरिस रोम लंडन सगळे एन्जॉय केले कारण हिस्टरी मध्ये हा सगळा भाग नुकताच झालेला होता. व्हिडिऒ वर प्रसन्नला खूप लढावे लागले कारण कॅमेरा रूसला होता. पण अजूनही कधी कधी ते शूटिंग पाहिले की मजा येते.

एकंदरीने ’केल्याने युरोप टूर’ हा अनुभव आमचे अनुभव समृद्ध करणारा ठरला. बर्‍याच गोष्टी बघायच्या राहिल्या पण जे पाहिले तेच खूप होते. पु लंचे जावे त्यांच्या देशा हे पुस्तक आल्यावर परत एकदा वाचले. त्यांनी २५ वर्षापूर्वी लिहिलेली लिखाण आजही पुरेपूर पटते. या सर्व टिकाणी हिंडल्यावर एक गोष्ट मात्र खटकते. आपल्या कडे इतकी सुंदर ठिकाणे, म्युझिअम्स जुने किल्ले आहेत. ती जर मेंटेन केली, भिकारी पंडे हलवले व गाईडेड टूअर्स दिल्या तर खूप टूरिस्ट येतील. नेहेमी आपल्याकडे नेहेमी लोकसंख्या जास्त हे कारण सांगितले जाते पण ईजिप्त, पॅरिस, रोम इथे हिंडल्यावर हे कारण पटत नाही. या सगळ्या ठिकाणी अगदी भरपूर गर्दी असते. थोडीशी शिस्त, स्वच्छता व नियोजन असले तर हे अवघड नाही, पण लोकांना सांगितले तर आवडत नाही. नजिकच्या भविष्यात आपल्याकडेही असा टूरिझम असावा असे मात्र जरूर वाटते.

No comments: