Sunday, July 19, 2009

आग होती पण धग नव्हती...

परवा ’लज्जा’ ही तस्लीमा नसरीन यांनी लिहिलेली कादंबरी वाचली. बाबरी मशिद पाडल्यावर बांगला देशात बरीच जाळपोळ, लुटमार झाली त्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहीली आहे. अल्पसंख्यांक लोकांना जगभर हयाची झळ पोचली. या कादंबरीच्या लिखाणानंतर लेखिकेला बराच त्रास सहन करावा लागला. या पुस्तकाच्या बर्‍याच प्रती खपल्या. पुस्तक वाचल्यानंतर सहजच विचार आला, आपण त्या वेळी कुठे होतो, काय परिस्थिती होती वगॆरे...आम्ही त्या वेळी रियाध, सॊदी अरेबियात होतो. हा देश मुस्लीमांचा आहे. ही मंडळी धर्माने अगदी बांधलेली असतात. शेजारी पाजारी, दुकानदार सगळेच आजूबाजूला मुसलमान. मी त्यावेळी इंडिअन स्कूल मध्ये नोकरी करत होते. तिथेही ८०% मुस्लीम, १०% इतर व १०% हिंदू असे साधारण प्रमाण होते. शाळेत वातावरण खूप मोकळे होते. हिंदू, ख्रिश्चन, सिक्ख सगळेच एकमेकांशी ऒपनली बोलत असत. कधी चेष्टा, कधी टीका, कधी थोडीशी वादावादी पण सगळे स्पोर्टिंगली चालत असे.

बाबरी मशिद पडल्याची बातमी ऎकली. हळूहळू टी व्ही वर सतत बातम्या दाखवू लागले. थॊड्याच वेळात हळूहळू वातावरणात टेन्शन दिसू लागले. जाळपोळ लूटालूट यांची दृष्ये टी व्ही वर येउ लागली. आम्ही शाळेत असताना मुलांच्यात साहजिकच चर्चा होऊ लागली. आमच्या नेहेमीच्या मॆत्रिणींच्या नजरेत थोडासा बदल दिसून येत होता. पण हे सगळे १०-१५ मिनिटेच टिकले. दिवसभर थोडासा ताण होता वातावरणात पण सगळे व्यवहार नेहेमीप्रमाणे चालू होते. काही पालकांनी आवाज केला पण त्यांना शाळेने समज दिली. सॊदी अरेबियात जमाव बंदी, मोर्चा बंदी असल्याने आणि शिक्षा कडक असल्याने गावात शांतता होती. संध्याकाळी बाजारात अथवा गावात हिंडताना काही भिती वाटली नाही. तसे सगळ्यांना कळत होते की मूठभर माणसांचे हे काम होते आणि त्यात नाहक दोन्हीकडचे लोक बरेच दिवस भरडले जाणार होते. पुढील एक दोन दिवसात सतत बातम्या येत होत्या , एका मशिदीच्या पाडण्यामुळे अनेक देवळे पाडली गेली, हिंदू मुस्लीम दंग्यात अनेकांची घरे जाळली गेली, आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. ही सगळी गोळाबेरीज बघताना वाटले की जो मूळ उद्देश होता तो साधला गेला का?

आजपर्यंत जेवढे दंगे झाले तेव्हा असे दिसले की काही माणसांच्या चुकीच्या वागणूकीने त्या गोष्टीशी संबंध नसलेले अनेक लोक उगाचच भरडले जातात. आजकाल ग्लोबलायझेशनमुळे जगभर सर्व धर्माची माणसे पसरलेली आहेत. त्यात अर्थातच अल्पसंख्यांक नेहेमी बळी पडतो. ही परिस्थिती कधी सुधारेल का? सर्व धर्म जर चांगले वागा अशी शिकवण देतात तर दुसर्‍याच्या धर्माचा आदर करायला लोक का शिकत नाहीत? आपल्याकडे शाळेत मॉरल सायन्स नावाचा एक विषय कधी कधी शिकवला जातो (बहुधा तो ऒप्शनला टाकला जातो) त्याला जास्त महत्व दिले गेले आणि लहानपणापासून जर इतर धर्माबद्द्ल पण माहिती दिली गेली तर कदाचित थोडा बदल घडेल. ( विवेकानंदांनी हे बर्‍याच वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे) आपल्या देशाचा इतिहास बघता युद्धापेक्षा जास्त माणसे या दंग्यात मारली गेली असतील. फाळणी, गोध्रा हत्याकांड, मुंबई हल्ले, अक्षरधाम हल्ला, ईंदिरा गांधी मृत्यु व असे बरेच प्रसंग बघता या परिस्थितीत कधी बदल होईल असे वाटत नाही. त्यावर बरेच सिनेमे निघाले चर्चा झाल्या पण दर वेळेस पुन्हा नव्याने तेच. अमेरिकेसारख्या अगदी प्रगत राष्ट्रात सुद्धा ९-११ चा विषय निघाला की एशिअन लोकांकडे बघायची नजर बदलते. आणि यात मला हे वागणे फार चुकीचे वाटत नाही. ’ज्याचे जळते त्याला कळते’ या नुसार ज्याचा पर्सनल लॉस होतो तो माणूस नक्कीच पेटून उठतो. अशावेळी सदसदविवेक बुद्धी ने विचार करणे सामान्य माणसाला जमत नाही.

दोन दिवसांनी आम्ही सुटीसाठी भारतात गेलो. एअर पोर्टवर खूप टेन्शन दिसत होते. आम्हाला पटकन मुंबईच्या बाहेर पडायला सांगितले. आजूबाजूला दंगलीच्या खुणा दिसत होत्या, तेव्हा आम्हाला या प्रकारातल्या गांभीर्याची कल्पना आली. आम्ही भारताच्या बाहेर अगदी मुस्लीम अड्ड्यात होतो पण तसा त्रास काही झाला नाही. आम्ही अगदी आगीच्या जवळ होतो पण नशिबाने धग मात्र लागली नाही.

No comments: