Friday, December 25, 2009

तुमचे स्केल काय हो?

आमच्या घरी गाण्याचे बरेच हॊशी कार्यक्रम बसवले जातात. कधी मराठी मंडळासाठी, कधी म्युझि्‍क ग्रुप साठी तर कधी नुसतेच जमून गाणी म्हणतात. बर्‍याच वेळेला नवीन कुणी जॉईन होते. गाणे म्हणण्याचा आग्रह होतो आणि मग हो नाही करत गाण्याला सुरूवात होते. त्या आधी कुणीतरी विचारते, "तुमचे स्केल काय?" बहुतेक वेळेला "माहित नाही" हेच उत्तर येते. नाहीतर तुम्हीच सांगा असे उत्तर येते. सुरूवातीला मलाही हे स्केल प्रकरण कळत नसे.

आपण नेहेमी रेडिऒवर किंवा रेकॉर्ड वर जी गाणी ऎकतो ती खूप हाय स्केल वर असतात. साधारण गायकाला त्या पट्टीत गाता येत नाही. म्हणून आपली पट्टी किंवा स्केल शोधणे महत्वाचे आहे. पेटी वर आपण नेहेमी काळ्या पांढ्र्‍या पट्ट्या बघतो. त्या मद्र, मध्य व तार अशा ३ सप्तकात विभागलेल्या असतात. स्केल शोधताना तुम्ही ज्या काळ्या किंवा पांढर्‍या पट्टीच्या वरचे व खालचे सूर सहज म्हणू शकता ती तुमची पट्टी. ती सूर ट्राय करून शोधावी लागते. त्यामुळॆ काळी १, काळी ४, पांढरी ६ अशा स्केल्स असू शकतात. थोडक्यात काळी १ हा तुमचा ’सा’ धरून पुढ्चे सूर वाजवावे लागतात. आपल्या संगीतात हार्मोनिअमची ही खसियत आहे की कुठलीही की ही ’सा’ म्हणून वापरता येते आणि त्यानुसार रेफरन्स बदलत जातात.पांढरी १
काळी ४


आता साथ करणार्‍याने प्रॅक्टीस एका स्केल वर केली आणि गाणार्‍याने अचानक स्केल बदलले तर त्याची गडबड होते. कारण आपले डोळॆ ठराविक रेफरन्स ने सेट झालेले असतात. हे सारेगामा वाले किती गाणी किती वेगवेगळ्या स्केलवर वाजवतात, कमाल आहे.

अर्थात असे प्रश्न निर्माण झाले की त्याच्यावर उपाय ही काढतात. स्केल चेंजर म्हणून एक हार्मोनिअमचा प्रकार मिळतो त्यात कीज स्लाईड करण्याची सोय असते. की बोर्ड वर ट्रान्सपोज नावाचे बटण वापरून हे करता येते. त्यामुळे इंटर्नली चेंज होतो व वाजवणार्‍याला सोपे जाते. गाणे म्हणणार्‍याला पण स्लो स्पीड वर गाणे म्हणायचे झाले(प्रॅक्टीस साठी) तर विंडोज मिडिया प्लेअर वर तशी सोय असते. जरज निर्माण झाली की तशी तशी सॉफ्ट्वेअर्स लिहिली जातात.

हे सगळे कळायला आमच्या घरी होणार्‍या प्रॅक्टीसचा मला असा खूपच फायदा झाला हे नक्की.

8 comments:

Mahendra said...

मी पण लहानपणी हार्मोनियम शिकलोय तिन चार वर्ष.. (एकाही परिक्षेला बसलो नाही) .
पण हे स्केल प्रकरण माहिती नव्हतं.
छान माहिती दिलीत..

Mahendra said...

तसा माझ्या कडे एक स्केल चेंजर माउथ ऑर्गन होता. त्यामधे अर्धी पट्टी मागे पुढे करुन काही स्वर बदलता यायचे. त्याची आठवण झाली. शोधला पाहिजे कुठे आहे तो.

अपर्णा said...

मलाही जेव्हा मी थोडंफ़ार गाणं शिकायला सुरूवात केली तेव्हाच हे स्केल प्रकरण कळलं..आणि माहित आहे का कि-बोर्ड लाही या पर्याय आहे.. transpose (+/-) केलं ना की स्केल चेंजर सारखं होतं..माझ्या गुरुने दाखवलं होतं घरी तयारी करण्यासाठी कारण आता इथे पेटी कुठून आणायची....दिड वर्ष शिकुन थांबलेलं प्रकरण पुन्हा काढलं पाहिजे....असं वाटायला लागलं...

आणि मराठी मंडळाच्या कार्यक्रमापेक्षा जास्त मजा या प्रॅक्टिसच्या वेळीच येते नाही का???

MAdhuri said...

महेंद्र,
स्केल चेंजर माउथ ऑर्गन ..इंटरेस्टींग बघायला पाहिजे.
गाणारे आले की स्केलचा जास्त प्रश्न येतो. पेटी सोडली का?

MAdhuri said...

अपर्णा, हो ना प्रत्यक्ष प्रोग्रॅम पेक्षा प्रॅक्टीसला गंमत असते. मी गात नाही किंवा वाजवतही नाही, पण बॅकस्टेजचे काम मात्र करते आणि चायवाल्याचे.
की बोर्ड च्या ट्रान्सपोजचा उल्लेख मी केला आहेच.
आम्ही हल्ली गाणी ऎकतो तेव्हा बर्‍य़ाच गाण्यांबरोबर अजून एक डायमेन्शन असते ते बसवताना आलेल्या अनुभवाचे, गमतीचे.
कंटिन्यू करा परत तुमचे गाणे.

Mahendra said...

अहो अगदी इतिहास जमा झालंय ते.. जवळपास ३०-३५ वर्ष झालीत सोडून..पेटी शिकलो नाही, पण कुठलंही गाणं वाजवता मात्र येतं.

Naniwadekar said...

> आपल्या संगीतात हार्मोनिअमची ही खसियत आहे की कुठलीही की ही ’सा’ म्हणून वापरता येते आणि त्यानुसार रेफरन्स बदलत जातात.
>-----------

तुम्ही (नेहमीप्रमाणे) एक चर्चा करण्यासारखा विषय मांडलात. पण तुम्ही भारतीय संगीताकडे संवादिनीच्या चष्म्यातून पाहिल्यासारखी माहिती दिली आहे. आवाज़ ज्या मर्यादेत किंवा क्षेत्रात (range) सहज़ फिरू शकतो त्याबरहुकुम आपला षड्‌ज लावायची पद्‌धत अनेक शतकांपासून आहे, पण पेटी मात्र गेल्या १०० वर्षांपासूनच वापरात आहे. आज़ ज्याला आपण सफ़ेद-१ किंवा काळी-चार म्हणतो त्याला १८५० साली काय म्हणत हा एक प्रश्न आहे; तुमच्या लेखाचा फायदा हा की आज़ पहिल्यांदाच मला हा प्रश्न पडला. बघू त्याविषयी काही माहिती मिळते का. कर्नाटक संगीतात या स्केल-ला कट्टई म्हणतात. तेव्हा अशा प्रकारे गायकाचा सा पहिले तानपुर्‍यात किंवा दुसर्‍या वाद्यात (पेटी, सारंगी, व्हायलीन) लावतात, आणि मग तो सूर प्रमाण धरून गायक आपला आवाज़ त्यात मिळवतो. यात संवादिनीचं वेगळेपण म्हणजे त्यात पायर्‍यापायर्‍यांनीच (distinct digital steps) सूर लागतो, तर सारंगीसारख्या वाद्यात तारेवरचं बोट सूक्ष्म मागेपुढे करून सुरांच्या अनेक छटा पकडता येतात. साथीदार-सारंगिया गायकाच्या स्वरानुसार आपल्या वाद्याचा सा पुढेमागे करून मिळवतो, आणि इतर तारांतही तो फरक करावा लागतो. आधुनिक उपकरणांत यावर वेगळे उपाय असतात, पण तानपुर्‍यातला स्वर ज्या ताकदीचा (जवारीचा) येतो, तसा स्वरपेटीतून येत नाही. म्हणून त्या विषयात खोलात जाणार्‍यांना स्वरपेटी वापरू नका, आणि शिक्षणाच्या सुरवातीला संवादिनीही वापरू नका, हा सल्ला देतात. संवादिनीच्या मर्यादेमुळे नभोवाणी-मंत्री केसकरांनी १९५५ च्या सुमारास आकाशवाणीवर त्या वाद्याला (आणि सिने-गीतांनाही) मज्जाव केला होता. पण सुरात अतिशय पक्के असलेले भास्करबुवा बखले ते भीमसेन ज़ोशी अनेक गायक पेटीच्या भरीव आवाज़ामुळे ती साथीला घेत आलेले आहेत, म्हणून केसकरांनी घातलेल्या बन्दीवर बराच वाद होऊन शेवटी ती उठवली. व्हायलीनला लांबलचक पट्ट्या नसल्यामुळे कसलेले वादक दोन वेगळ्या पट्ट्यांची (scales) वाद्य बाळगतात. म्हणजे एक अंदाज़े २०० ते ३०० Hz मधे पडणार्‍या सा-साठी, तर दुसरं वाद्य त्याच्यावरच्या सा-साठी.

याबद्दल मी बरेच वर्षांपूर्वी सा-रे-ग-म स्पर्धा गाज़वलेल्या संजीव रामभद्रनला प्रश्न केला. संजीव गातो, तबला वाज़वतो, व्हायलीनवर वेस्टर्न क्लासिकल वाज़वतो, आणि त्याचा कर्नाटक पद्‌धतीचाही अभ्यास आहे. गेल्या वर्षी तो भारत भेटीत झी-मराठी वर परीक्षक म्हणूनही होता. त्यानी दिलेली माहिती अशी:
Carnatic music goes by the "kaTTai" system... 1 "kaTTai" is the same as C or safed-1, 1.5 "kaTTai" then would be C-sharp or kaali-1, so then you'd have everything upto 7, except no 3.5 (because safed-3 and safed-4 have no black keys in between them). The violinist retunes to the vocalist's Sa, but I suspect that many players retain two or more instruments to stay naturally "in the groove" for particular ranges of Sa-s. I believe the sarangi players also re-tune to the appropriate saa (though not sure if they keep multiple instruments).

MAdhuri said...

नानिवडेकर, तुमच्या डिटॆल अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. हे पोस्ट फक्त संवादिनीच्या संदर्भातच लिहिले आहे. तुम्ही म्हणता ती इतर माहिती होती पण मग पोस्ट फार मोठे झाले असते.

बाकी तुम्ही दिलेली आकाशवाणीवरची गोष्ट नव्याने कळली. धन्यवाद.