Tuesday, January 26, 2010

बळी तो कान पिळी

बळी तो कान पिळी

आजकाल खूप वेगळ्या विषयावर सिनेमा निघत आहेत. पूर्वीच्या प्रेमाच्या त्रिकोणातून बाहेर पडत आहे. काही हलके फुलके तर काही विनोदी तर काही गंभीर सगळे विषय हाताळले जात आहेत. मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काहीतरी बघायला मिळते आहे. काही चित्रपट मात्र ’आय ऒपनिंग’ या विभागात मोडतात. कालपरवाच ’जोगवा’ या सिनेमाला ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे वाचले. सर्व कलाकारांचे आणि दिग्दर्शकाचे अभिनंदन. विशेष म्हणजे अमराठी गायकांना बक्षिस मिळाले आहे.

या सिनेमातल्या काम अरणार्‍यांना घरे द्या, जोगत्यांना काम द्या वगॆरे गोष्टी पेपर मध्ये येत होत्या. कर्नाटकात अजूनही ही प्रथा चालू आहे हे पाहून फार विचित्र वाटते. आज आपण एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहोत आणि अजूनही अशा प्रथा चालू आहेत हा केवढा विरोधाभास आहे. पूर्वी काही कारणाने ही प्रथा सुरू झाली असेल पण आपण जसे आपल्या इतर परंपरात बदल करत गेलो तशा या गोष्टींना थांबवू नाही शकलो. माझे थोडे शिक्षण कोल्हापूर इथे झाले. तिथे अधून मधून यल्लमाची जत्रा बघायला मिळॆ. माझ्या वर्गात ही एक मुलगी होती ८ वी -९ वी त. तिला जट आली म्हणून थोडे दिवस वर्गात चर्चा चाले पण थोड्या दिवसात ते थांबले. त्या वेळेस एवढे काही कळत नव्हते पण त्या मुलीची मनःस्थिती अजूनही आठवते. ती खूप अस्वस्थ असे.

आता जोगवा ची खूप चर्चा होईल. असला विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चर्चा होणार कारण या भारताबहे्रच्या लोकांना असल्या विषयात भारी इंटरेस्ट. भारतात पण एका ठराविक वर्गात हा सिनेमा बघितला जाईल. पण प्रत्यक्ष जे लोक यातून जात आहेत त्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोचवायचे काम कोण करणार? आजकाल टीव्ही तर सगळीकडे पोचले आहेत. सरकारने हे काम केले पाहिजे आणि त्यांना रोजगाराच्या दुसर्‍या संधी दाखवल्या पाहिजेत तरच या सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पारितोषकाला काही अर्थ आहे असे मला वाटते. हे काम सोपे नाही कारण नवीन प्रथा सुरू करणे सोपे आहे पण जुन्या प्रथा मोडणे अवघड असते. आपल्या अनट्चेबल बद्द्ल पण बाहेर खूप आकर्षण असते.

असेच काही सिनेमे जे मला खूप प्रभावी वाटले ते म्हणजे --




अर्धसत्य - पोलिस जीवनावर-ऒम पुरी,
देव - हिंदॊ मुसलमान वादावर..प्रत्येकाने एकदा तरी जरूर पहावा-ओम पुरी व बच्चन जबरदस्त अभिनय
वॉटर - बनारस मधील विधवांच्या जीवनावर ..याचे चित्रीकरण सुद्धा बनारस मध्ये न करता श्रीलंकेत करावे लागले
स्लमडॉग मिलिनेअर - भरपूर चर्चा होऊन पुढे काही फरक नाही
नटरंग - तमाशावाल्यांचे जीवन
कुर्बान - थोड्या फार प्रमाणात

हे सगळे सिनेमे खूप चांगले बनवले आहेत पण ते ज्या लोकांनी बघायला पाहिजेत तिथे पोचवले तर ते बनवणार्‍यांचे श्रम कारणी लागतील असे वाटते. थोडी लोक जरी बदलली, त्यांचे विचार बदलले तरच या सिनेमांचा काही उपयोग झाला असे वाटते. मी तर हे सगळे सिनेमा पाहून एवढेच म्हणीन ...बळी तो कान पिळी

Monday, January 18, 2010

सीमेपार बघताना ...

सीमेपार बघताना ...

आता २६ जानेवारी जवळ आली. सगळीकडे देशभक्तीपर गाणी, सिनेमा, प्रदर्शने वगॆरे सुरू होतील. याच सुमारास मी जम्मूला गेले होते त्याची आठवण झाली.
आमचे एक नातेवाईक आर्मी मध्ये आहेत. त्यांचे पोस्टींग जम्मू येथे होते. मी माझ्या मामाच्या फॅमिली बरोबर तिथे सुट्टीत गेले होते. ही गोष्ट २५ एक वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस जम्मू भागात एवढी गडबड नव्हती. त्यांचे घर जम्मूपासून थोडेसे बाहेर होते. आतमध्ये आर्मी चा सगळा कारभार. कोण कुणाकडे आले याची व्यवस्थित नोद. गेल्यावर आम्ही जम्मू बघायला दुसर्‍या दिवशी गेलो. जाताना वन ट्न या ट्रक सारख्या गाडीने आम्हाला सोडले गावात. तिथे गेल्यावर कुणाशी जास्त बोलायचे नाही अशी सूचना होती. नाहीतर फळ वाले, दुकानदार सहज चॊकशी करतात आणि माहिती काढून घेतात. अशी बरीच हेरगिरी चालते. आम्हाला हे सांगितले नसते तर लक्षातही आले नसते. आम्ही जम्मूतील मंदिर व इतर ठिकाणे बघून रात्री परत आलो. वाटेत कोणी लोकल भेटले की विचारायचे, "आप बंबई से हो? फिर आपको फिल्म ऍक्टर्स मिलते / दिखते हॆ क्या?" मग आम्ही सांगायचो ते काही असे रस्त्यातून हिंडत नाहीत. गम्मत म्हणजे आम्हाला हे प्रश्न विचारणार्‍या मुली इतक्या दिसायला छान असायच्या कि त्यांच्यापुढे आपल्या नट्या ठीक ठाक वाटत. पण सिनेमाचे वेड सगळीकडे असतेच.
तिथे असताना थोडीफार आर्मीच्या जीवनाची कल्पना आली. एकंदर खूप साहसाचे आयुष्य असते त्यांचे. टेन्शन म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो त्यांना रोजच्या जीवनात. या सगळ्याच्या मध्ये विरंगुळा म्हणून पिकनिक ठरवतात.

आम्ही तिथे असताना असेच एक पिकनिक होते. परत त्या मोठ्या ट्रक मधून आम्ही गेलो. अगदी सीमेजवळ जायला मिळणार म्हणून थ्रिल वाटत होते. जाताना अंताक्षरी सारखे खेळ चालले होते. यात भाग घेणारे काही नुकतेच धाडसी कामे करून परत आले होते किंवा तिकडे जाणार होते. वाटेत एका खेड्यात थांबून संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन खरेदी झाली. अगदी फ्रेश ....त्यानंतर सगळे वॉच टॉवर पाशी गेलो. तिथून एका बाजूला आपला टॉवर व काही अंतरावर पलीकडे त्यांचा. अध्ये थोडे कुंपण होते. त्या टॉवर वर आम्ही अगदी वर पर्यंत चढून गेलो. तिथे बसून नेहेमी सॆनिक आसपास नजर थेवून असतात. बराच उंच टॉवर होता. वरून सीमेपलिकडचा भाग दिसत होता. मनात थोडी उत्सुकता, थोडी का भरपूर भिती आणि छातीत धडधड अशी परिस्थिती होती. तसे बघितले तर इकडे आणि तिकडे सारखीच जमीन तशीच झाडे पण तो भाग शत्रूचा हे ते मधले कुंपण सांगत होते त्यामुळे लगेच बघण्याचा अर्थ बदलत होता. ते आणि आपण अशी सीमा मध्ये होती. सीमेपार बघत्ताना कसे वाट्ते याचा अनुभव घेता आला.
हे चित्र नेट वरून घेतले आहे कारण तेव्हा कॅमेरा न्यायला बंदी होती. पण साधारण याच्या तिप्पट उंच टॉवर होता.

आपण घरी बसून शांतपणे आपले रोजचे व्यवहार या सॊनिकांच्या जीवावर करत असतो. त्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने धन्यवाद.

Thursday, January 14, 2010

मी आणि माझा देश(मला माहित नसलेला)

मी आणि माझा देश(मला माहित नसलेला)

आपल्यापॆकी प्रत्येकाने लहानपणी काचेचे रंगीत तुकडे गॊळा करून कलायडोस्कोप मधून त्याची वेगवेगळी डिझाईन्स बघितली असतीलच. दर डिझाईन वेगळे, त्याचे रंग वेगळे. प्रत्येकाला ते वेगळे भासते. आपला भारत देश पण तसाच आहे, इतकी विविधता मला वाटते इतर कुठल्या देशात नसेल. अनेक धर्म, भाषा, चालीरीती, खाणॆ इथे नांदत आहेत. प्रत्येक आणि बाहेरचा माणूस त्याकडे जसा बघेल तसा त्याला तो दिसतो. बाहेरच्या देशात रहाताना बरेच वेळेला लोक प्रश्न विचारतात आपल्या देशातील या विविधतेबद्द्ल आणि बर्‍याच वेळेला आपल्याकडे खात्रीलायक उत्तर नसते. भारताबाहेर रहाताना मला नेहेमी हे वाटते (मिडल इस्ट व अमेरिका) की याबाबतीत शिक्षण खाते काहीतरी करू शकेल. भारताबाहेर कशाला, भारतात रहाणार्‍यांनाही याचा खूप उपयोग होईल.

तुम्ही म्हणाल आजकाल इंटरनेट वर सगळे मिळते पण सगळ्यांकडे ती सोय असेलच असे नाही. आपल्या देशाची ही विविधता जर शाळेपासून शिकवले गेली तर फार चांगले कारण तॊ वर्षे फार महत्वाची असतात. आणि पुस्तक वाचण्यापेक्षा डिव्हीडी बघितली तर मुलांच्या चांगले लक्षात रहाते. शाळेचे ऑफ पिरीयड त्यासाठी वापरायला हरकत नाही. प्रत्येक प्रांताची एक आणि पूर्ण भारताची एक अशा दोन डिव्हीडीज बनवाव्यात. त्यामध्ये त्या प्रांताचे सण वार, खाणे , कला,पर्यटनाची ठिकाणे, थोडा इतिहास, कपडे यांचे फोटो , जमल्यास व्हिडिऒ टाकावे. अगदी डिटेल् नाही बनवले तरी हरकत नाही पण साधारण कल्पना आली पाहिजे. महाराष्ट्र असेल तर त्यावर किल्ल्यांची लिक असावी. यामध्ये वेगवेगळ्या धर्मांबद्दल पण माहिती दिली पाहिजे म्हणजे लहान पणापासून दुसर्‍यांच्या धर्मात काय असते हे कळेल व कदाचित एकमेकांच्या धर्मांबद्द्ल आदर वाढेल(?)

आपण लहानपणापासून आपल्या भोवतीची माणसे बघत बरेच काही शिकतो. आपल्याला जर पर प्रांतीय परधर्मीय मित्र असतील तर थोडी त्यांच्या रीतींची माहिती होते. पण प्रत्येकाला हा चान्स असतोच असे नाही. बाहेरच्या देशात गेलो की आपल्याला बरीच माहिती कळते. मला तर किती दिवस साउथ इंडियन सगळे सारखे वाटायचे जेव्हा त्यांच्यात मिसळले तेव्हा त्यांची माहिती कळली. आता तुम्ही म्हणाल इतिहास भूगोलात हे सगळे असतेच ..पण अभ्यास म्हणून पाठ करण्याऎवजी मुलांना डिव्हीडी वर बघितले की पटकन लक्षात रहाते.

आपल्याकडे टॅलटची कमी नाही, टेक्नीकल नॉलेज खूप जणांना असते. अशा डिव्हिडीज बनवणे सहज शक्य आहे. मझाही प्रयत्न चालू आहे. बघू केव्हा प्रत्यक्षात येते ते.

Friday, January 8, 2010

३ इडियट्स..

३ इडियट्स..

परवा ३ इडियटस पाहिला. जरा धाकधूकच होती. एखादा चित्रपट आधीच खूप गाजला की खूप अपेक्षा वाढतात आणि बर्‍याच वेळा निराशा होते. आमिर खानचे पिक्चर्स म्हटले की जनरली चांगले असतात. ( अपवाद गजिनी आणि मंगल पांडे.. हे मला विशेष आवडले नाहीत) ३ इडियट्स चांगला निघाला. आधी पिक्चर बघितला मग स्टोरी बद्द्ल बरीच चर्चा ऎकली म्हणून पुस्तक वाचले. पिक्चर अर्थात चांगला आहे. मला वाटते की स्टॊरी बद्दल जी काही चर्चा झाली ती एक पब्लिसिटीचा भाग असावा.

या सिनेमात पंच लाइन्स खूप छान आहेत आणि त्या हसताना बर्‍याच वेळा निघून जातात. हा सिनेमा तरूण व बाकीच्या वयाच्या प्रेक्षकांना आवडण्याचे कारण म्हणजे प्रत्येक जण कुठेतरी त्यात स्वतःला रिलेट करू शकतो. फोटोग्राफी उत्तम. विशेषतः हेलिकॉप्टरचे शॉट्स उल्लेखनीय. शेवट्ची १५ मिनिटे तर लडाखचे सुंदर चित्रण. एवढ्या हाय अल्टिट्यूड वर जाउन चित्रण करणे सोपे नाही. लेकचे चित्रिकरण छान आहे. सिनेमामुळे अशा सुंदर गोष्टी लाखॊ लोकांपर्यंत पोचतात. लडाख अजून हिंदी सिनेमात कमी दिसते. आपल्याकडची सुंदर ठिकाणॆ अजून जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोचली तर पर्यटन खात्याला त्याचा नक्की फायदा होईल.

आमिर खान दिसतो कॉलेज गोइंग. त्याने छोट्या छोट्या गोष्टीतून आपले कॅरॅक्टर छान उभे केले आहे. कपडे, लकबी. लहान पणचा आमिर खान पण चांगला शोधला आहे. जावेद जाफरी मात्र वाया गेला आहे. तो खूप चांगले काम करू शकतो. कॉलेज मध्ये भाषण करणार्‍या मुलाची एक्स्प्रेशन्स फार मस्त आहेत.त्याला शब्दांचे अर्थ माहित नसल्याची एक्स्प्रेशन्स त्याने छान दाखवली आहेत. बरीचशी मुले ज्यांना हिंदी येत नाही ती नुसती पाठांतर करतात आणि मार्क्स मिळवतात. मी याचा सॊदीत शाळॆत शिकवताना अनुभव घेतला आहे त्यामुळे हा प्रसंग मला पटला. तसेच जुजराती पदार्थावरील कॉमेटस ही पटल्या आम्ही पण घरी नेहेमी म्हणायचो काय ही नावे पदार्थांची..थेपला, हांडवा, ढोकळा....

डिलिव्हरीच्या प्रसंगाऎवजी दुसरा कुठला प्रसंग घेतला असता तर चागले वाटले असते. तो अर्धा तास जरा जादा वाटला.(बोअर झाला) एखादे गाणे कमी केले असते तरी चालले असते. पण शेवटी डायरेक्टर म्हणेल ती पूर्व दिशा...

आजकाल म्हणे हा सिनेमा बघून आत्मह्त्यांचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी मुलांना स्पर्धेत उतरायला जसे शिकवावे तसे अपयशाला सामोरे जायला ही शिकवावे म्हणजे ही वेळ येणार नाही. स्वप्न बघायची तर भरपूर मेहेनत करायची तयारी हवी. पहिल्या झटक्यात स्वप्ने सहसा खरी होत नाहीत. असो.

एकंदरीने बर्‍याच दिवसांनी एक करमणूक करणारा, हसवणारा, अतिरेकी नसलेला, बंदूक नसलेला सिनेमा बघायला मिळाला. तुम्हालाही आवडेल. शेवट्च्या शॉटसाठी शक्यतोवर मोठ्या पडद्यावर पहा.

Thursday, January 7, 2010

स्पिरीट स्पर्धेचे....

स्पिरीट स्पर्धेचे....

गेल्या आठवड्यात आमच्या एका मित्राने शिकागो ला लहान मुलांची गाण्याची स्पर्धा आयोजित केली होतॊ. आजकाल सारेगामापा मुळे मुलांना आणि पालकांना ही कल्पना माहिती आहे. १७ वर्षाच्या मुलांपर्यंत ह्य़ा स्पर्धेत मुलांनी भाग घेतला होता. बिगिनर्सना, नवीन शिकणार्‍यांना प्लॅटफॉर्म मिळावा हा हेतू होता. स्पर्धा असली म्हणजे तुलना होते आणि आपले स्वतःचे गाणे आणि इतरांचे गाणे यातला फरक मुलांना कळतो. इथल्या शाळेत अशी तुलना फार कमी असते. मी जजेस बरोबर गेले होते. माझा सहभाग प्रेक्षक म्हणूनच होता. कुठे मार्क्स चे कॅलक्युलेशन कर, शूटिंग कर अशी डिफॉल्ट कामे होतीच.

एका लायब्ररीच्या हॉल मध्ये ही स्पर्धा झाली. ऑरगनायझर्सना माइक्स लावणे, टेप लावणे, खाण्यापिण्याची सोय करणे अशी बरीच जबाबदारी होती. ही कामे अगदी साधी वाटतात पण त्याच्या मागे बरेच कष्ट असतात.

आजकाल बरीच मुले शास्त्रीय संगीत शिकतात हे पाहून छान वाटले. आपले गाणे इथे परदेशात राहून जपणे सोपे नाही. शाळॆत कानावर सतत इथले म्युझिक पडत असते. भाषा पण इंग्लीश सतत ऎकली बोलली जाते. बहुतेक मुले सभाधीट होती. पूर्वी मी शाळॆत असताना मुले खूप घाबरायची स्टेजवर यायला. आता माइक वगॆरे नीट हॅंडल करतात. एक दोनच मुले घाबरली असतील बाकी बिनधास्त होती. ही एक खूप चांगली गोष्ट वाटली.

प्रत्येकाला आपआपले तबला पेटी ची सोय(साथीची सोय) करायला सांगितली होती. आम्हाला वाटले की सी डी वर म्युझिक रेकॉर्ड करून आणतील. त्या गोष्टी मध्ये इतकी व्हरायटी बघायला मिळाली की बास. दर गाण्याला प्रत्येकाच्या हातात वेगळाच डिव्हाइस दिसायचा. काही लोकांनी कॅरिऒके म्युझिक कॉपी करून आणले होते. काही लोकांनी कॅसेट लावली होती आणि त्यावर म्युझिक लावले होते, शब्द सप्रेस करत होते. कुणी आयपॉड, कुणी लॅपटॉप तर कुणी स्वतःचे म्युझिक रेकॉर्ड करून आणले होते. एक दोघांनॊ लाइव्ह तबला पेटी वापरली. या व्हरायटी मुळे म्युझिक सेट करणार्‍याची चांगलीच परिक्षा होती. कॅरिऒके ट्रॅक्स हे ऒरिजिनल स्केल मध्येच असतात आणि बहुतेक लोकांना इतक्या हाय स्केल मध्ये गाता येत नाही. या निमित्ताने बर्‍याच लोकांच्या हे लक्षात आले असेल आणि पुढ्च्या वेळेस मुलांच्या स्केल मध्ये म्युझिक रेकॉर्ड करतील. आजकाल तसे सॉफ्ट्वेअर निघाले आहे. एकाच सी डी वर म्युझिक असले तर प्ले करायला खूप सोपे जाईल. मुलांच्या स्केलमध्ये तबला पेटी वापरून स्वतःचे कॅरिऒके करणे हे सगळ्यात चांगले. या स्पर्धेच्या निमित्ताने लोकांना याची कल्पना आली असेल. सा रे गा मा मध्ये किती म्युझिशिअन्स व वादक किती प्रॅक्टीस करत असतील याची सगळ्यांना कल्पना आली असेल.

३ राउंडस मध्ये ही स्पर्धा झाली. रिजनल, हिंदी व क्लासिकल बेस्ड गाणी. जजेस नी जजमेट साठी सूर, ताल, भाव, उच्चार व कॉम्प्लेक्सिटी ला महत्व दिले होते. त्यांनीही आधी गाणी ऎकून अभ्यास केला होता. बर्‍याच पालकांनी मुलांच्या आवडीची गाणी सिलेक्ट केली होती. स्पर्धेमध्ये गाणे निवड ही फार महत्वाची असते. अवघड गाणे घेण्यापेक्षा जमेल ते गाणे सिलेक्ट करून खूप प्रॅक्टीस केली तर नक्कीच जास्त मार्क मिळू शकतात. बरीच मुले इथे वाढल्याने काही शब्दांचे उच्चार जमत नव्हते. विशेषतः ’र’ हे अक्षर म्हणणे बर्‍याच मुलांना अवघड पडत होते. या साठी खूप वेळा ते गाणे ऎकले आणि म्हटले तर नक्कीच फायदा होतो.

मुलांनी चांगली तयारी केली होती. गाणी पाठ होती. छोट्या मुलांनी ३-४ तास एका जागी बसून आपल्य़ा राउंड नुसार गाणे सादर करणे हे चांगलेच पेशन्स चे काम होते. याबद्दल त्यांचे कॊतुक. कॉन्फिडन्स पण वाखाणण्यासारखा होता.

एकंदर स्पर्धा छान झाली. प्रत्येकाला भाग घेतल्याबद्द्ल सर्टिफिकेट मिळाले. पहिल्या ३ मुलांना ट्रॉफी मिळाली. हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे प्रत्येकाला यातून काहीतरी शिकायला मिळाले. काही लोक नुस्तेच बघायला आले होते. प्रेक्षकांचा फीड बॅक पॉझिटीव्ह होता.आता यापुढे दर वर्षी मुलांची संख्या वाढेल व गाण्यात नक्कीच प्रगती होईल.

आपल्या देशापासून दूर राहून आपले संगीत जोपासण्याचा हा प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे लोक इथे करत आहेत त्यांना धन्यवाद.