Wednesday, June 24, 2009

आमची यूरोप टूर -भाग १


आमची यूरोप टूर -भाग १
(तयारी, लंडन,बेल्जिअम व नेदरलॅंडस)

आम्ही रियाधला असल्यापासून युरोप ट्रीप चे प्लान्स चालू होते. याला कारण शाळेतली एखादी सखी या ट्रीपला जाउन आली की इत्थंभूत वर्णन स्टाफरूम मध्ये होत असे अगदी शॉपिंग, बार्गेनिंग सकट. आमच्या दोघांचा भटक्या स्वभाव ही याला कारणीभूत होताच. तिथे ट्रीप प्लान करता करता अमेरिका प्लान झाली आणि शेवटी ट्रीप चे प्लॅनिंग ब्लूमिंग्टन मधून झाले.

प्रसन्न ऑफिस, नाटक प्रॅक्टीस व इतर सोशल गोष्टीत बिझी असल्याने त्याने सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून दिली. एस ओ टी सी ने प्रवास करायचा हे इतरांच्या बर्‍या अनुभवावरून ठरवले व ब्रोशर मागवले. याला महत्वाचे कारण म्हणजे हे लोक रहाणे, फिरणे व जेवणे अशी सगळी व्यवस्था करतात. दिवसातून एक वेळ भारतीय जेवण हे माझ्य्यासाठी मोठे आकर्षण होते. मला २-३ दिवस इतर जेवणावर दिवस काढता येतात पण त्यानंतर भात, पोळी भाजी असे आपले जेवण मिळाले नाही तर कसे तरी होते. ही १४ दिवसांची ट्रीप संपताना शेवटी मात्र वाटले की आपण इतर पदार्थांवरही राहू शकतो. पालक पनीर, पापड, दाल फ्राय हे रोज बघून कंटाळा आला.

या नंतर महत्वाचा टप्पा होता व्हिसा चा. तुम्ही जर अमेरिकन सिटीझन असाल तर व्हिसा लागत नाही. अमेरिकन सिटीझन बद्द्ल हा अपपर भाव पाहून राग आला पण करता काय? देश बघायचे तर व्हिसा काढणे भाग होते. शिकागोतला एजंट गाठला. फॉर्मस डाउनलोड केले. स्वित्झर्लंड, इंग्लंड व ईटली असे व्हिसा लागत होते. स्वित्झर्लंडचा फ़ॉर्म अगदी भरायला सोपा म्हणून पाठवला तो लगेच २ दिवसात परत आला. तुम्ही जसे हिंडणार तसे एकानंतर एक व्हिसा घ्यायचे असतात म्हणे. (कॉमन सेन्स म्हणतात तो असावा हा) मी म्ह्टले एजंट ने सांगितले नाही तर पाठ्वा आधी सोपा दिसणारा फ़ॉर्म. असो. इटली एम्बसीत प्रत्यक्ष जावे लागते. १-२ महिन्यात सर्व व्हिसे हातात पडले. या सर्व प्रकारात पोस्ट ऑफिस, मनी ऑर्डर व फेडेक्स यांच्या बर्‍याच राउंडस झाल्या.तुमचे सर्व कागदपत्र पासपोर्टसह अगदी व्यवस्थित ये जा करतात. फेडेक्स व पोस्ट ऑफिस यांचा हा सुखद अनुभव होता.

या ट्रीपनंतर लगेच पुढे भारतात जायचा प्लान होता. तिथली सुटी कमी झाल्याने घरचे लोक थोडे वॆतागले. प्रवासात सामान कमी घ्यायचे असल्याने प्रसन्न खुशीत होता. ३ हॅंडबॅग्ज व एक एक्स्ट्रा बॅग एवढेच सामान होते. लोकांनी नेहेमीप्रमाणे खर्च किती येणार हा नेहेमीचा प्रश्न टाकलाच. अशा पॅकेज ट्रीप्स मध्ये काही अर्थ नसतो. एका वेळी एक देश बघावा, असा बर्‍याच लोकांनी सल्ला दिला. युरोप मध्ये खाणे फार महाग हाही बरयाच जणांचा सल्ला. आम्ही लंडन टू लंडन अशी ट्रीप बुक केली व काय अनुभव येतो ते बघायचे ठरवले.

लंडन थोडेफार आमचे आम्ही २ दिवसात पाहिले. वॅक्स म्युझिअम ला आधी गेलो. ईंटरनेट्वरून बुकिंग केले होते म्हणून लाईन वाचली. या म्युझिअम चे जेवढे वर्णन वाचले होते तेवढे काही आवड्ले नाही. ईंडिअन पॉलिटीशिअन चे पुतळे एवढे छान नाहीत. कदाचित या पूर्वी सिंगापूर चे बघून तुलना झाली असेल. यातील एका भागात मॅडम तुसाद चा पुतळा व हे पुतळे बनविण्याची माहिती आहे. ते छान वाटले. गार्डन पार्टीचा भाग पण छान आहे. यानंतर सिटी टूर ऒपन बस मधून केली. पॅलेस, मायलेनिअम व्हील, पार्लमेंट बिल्डींग व ट्रफलगार स्क्वेअर बघितले. कोहिनूर मात्र बघायचा राहिला ..पुढच्या वेळेस बघायला शिल्लक ठेवला आहे. लंडनचे रस्ते खूप छोटे वाटले. टॅक्सीज व अंडरग्राउंड रेल्वे फारच छान आहेत. मेन रोडस मात्र जेवढे ऎकले तेवढे इंम्प्रेसिव्ह वाटले नाहीत.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता सगळे वॉटरलू स्टेशनला जमलो. हळूह्ळू देशी चेहेरे दिसू लागले. हे बहुतेक आपल्याच ट्रीपमधले असावेत असे अंदाज बांधणे चालू होते. १० वाजता एस ओ टी सी चा माणूस आला व सर्वांना तिकीटे दिली. सुरूवात तर व्यवस्थित झाली. पासपोर्ट चेकिंग झाले. ही ट्रेन युरोस्टार फ़ास्टॆस्ट ट्रेन आहे. ती इंग्लीश चॅनेल खालून १८ किमी जाते. ट्रेन सुरू होण्यापूर्वी अर्धा तास बोर्डींग झाले. गाडी सुरू झाल्यावर एकदम ’ओम जय जगदीश हरे’ ची सुरूवात झाली मला वाटले गुजराथी लोकांचा फार भरणा झाल्याने कदाचित गाडीत कधी कधी भजन लावतही असतील. पण नंतर कळले आमच्याच ट्रीप मधल्या एका स्मार्ट माणसाने अलार्म सेट करून रेकॉर्ड लावली होती. हा इसम स्वतःला खूप शहाणा समजत असे. त्याचे नावही शहानी होते. हळूहळू तुम्ही कुठले आम्ही कुठले अशा ऒळखी झाल्या. मुलांनी ऒळखी करून घेतल्या. काही जण डायनिंग रूम कडे पळाले.

आमची ट्रेन युरो स्टार इंग्लंड ते ब्रुसेल्स अशी होती. जाताना कंट्री साईड खूप छान दिसते. गाडीचा स्पीड अजिबात समजत नाही. इंग्लीश चॅनेल इंग्लंड व फ्रान्सला जोडतो. हे एक इंजिनिअरिंग वंडर आहे. पाण्याच्या खाली हार्ड रॉक व सॉफ़्ट रॉक च्या लेअरच्या मधे टनेल बांधला आहे. तो बांधताना बरेच अडथळे आले. पण शेवटी यश मिळाले. फ्रान्स व इंग्लंड दोन्ही बाजूनी टनेल खणायला सुरूवात केली व दोन्ही टीम्स नी मध्यावर टनेल जोडले. यामुळे लंडनहून प्रवास सोपा व फास्ट झाला. या वर एक सुंदर फ़िल्म हिस्ट्री चॅनेल वर दाखवतात. जरूर पहा.

ब्रुसेल्सला उतरल्यावर व्हिसा चेकिंग झाल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. आतापर्यंत ७-८ देशांचे व्हिसा घेउन झाले पण एकंदरीत व्हिसा म्ह्टले की टेन्शन येते. एकदा तरी या ऑफिसमध्ये काम करून लोकांना टेन्शन द्यावे अशी माझी ईच्छा आहे. बेल्जिअम हा आमच्या ट्रीप मधला पहिला देश. इथून आमचा बस प्रवास सुरू झाला. १४ दिवसात ६००० कि मी या बसने फिरवले. अगदी आरामात हा प्रवास झाला. संध्याकाळी सिटी टूर होती. किंग्ज पॅलेस, पॅगोडा हे सगळे बाहेरून बघितले. इथे युनोचे हेड्क्वार्टर आहे. बी एम ड्ब्ल्यू , मर्सिडिज टॅक्सी दिसतात. बेल्जिअम मध्ये नवीन बिल्डींग बांधताना बाहेरची जुनी बाजू तशीच ठेवावी लागते, आतले डिझाईन तुम्ही बदलू शकता. शक्य तेवढे जुने बांधकाम जपतात. ब्रुसेल्स हे युरोप मधले गरीब शहर समजतात. आम्हाला तसे काही वाटले नाही.

सुरूवातीला ऑटोमियम पाहिले. (बाहेरूनच), वर्ल्ड ट्रेड एक्झिबिशनसाठी हे बांधले. आयर्न क्रिस्टल चे बेसिक डिझाईन त्याच्या ९ ऍटम्स सकट दाखवले आहे. मेटल, आयर्न इंड्स्ट्री व ऍटॉमिक पॉवर बद्दल विश्वास हे यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. गावातून कुठुनही ते दिसते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप छान व भव्य दिसत होते. प्रत्येक राउंड मध्ये प्रदर्शन आहे व दोन गोळ्यांना जोडणारे रॉडस लिफ्ट म्हणून वापरले आहेत. त्यानंतर पी स्टॅच्यू पाहिला. या जागेवर लोक खूप कचरा टाकत म्हणून एक स्टॅच्यू ठेवून टुरिस्ट स्पॉट बनवला आहे. त्यात बघण्यासारखे काही नाही. भारतात ही आयडीया वापरून पहावी.परत येताना एक पुरूषाचा ब्रॉंझ चा पुतळा दिसला. त्याला हात लावला की बाई प्रेग्नंट होते व पुरूषाचा दिवस चांगला जातो अशी कथा आहे. रिस्क नको म्हणून बायका हात न लावता पुढे जात होत्या. पुरूष मात्र न चुकता हात लावत होते.
त्यानंतर मार्केट स्क्वेअर मध्ये आलो. एकदम भव्य वाटते इथे कारण ४ बाजूंनी उंच इमारती होत्या. कॊन्सिल हॉल, लायब्ररी अशा बर्‍याच जुन्या पण अगदी वेल मेंटेन्ड बिल्डींग्ज होत्या. युरोप मध्ये असे स्क्वेअर्स पुढे खूप भेटले पण हा पहिलाच म्हणून असेल मनावर जास्त ठसला. वर्षात एकदा त्यावर मोठी फुलांची रांगोळी घालतात. मी पूर्ण स्क्वेअरचा फोटॊ घॆण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही शेवटी २-३ वेगळे फोटो घेतले. खूप मंडळी तिथे बसून चित्र काढत होती. कुणी पेंटिंग्ज करत होती. वाटेत छोटी दुकाने होती त्यातले लेस चे पॅटर्न्स खूप छान व अर्थातच महाग होते. नंतर हॉटेल वर परत गेलो. हॉटेल ट्यूलिप ही छान होते. खिडकीतून ऑटोमियम दिसत होते. रात्री १० वाजेपर्यंत उजेड होता. (जून) चक्क काहीही खरेदी न करता हा दिवस पार पडला. एकंदरीत ट्रीपची सुरूवात तर छान झाली.

दुसर्‍या दिवशी सकाळी हॉलंड कडे प्रयाण. नेदरलॅंड्स हा दुसरा देश. नेदरलॅंड म्हणजे लॅंड बिलो सी लेव्हल. या देशात डाइक्स बांधून ५०% जमीन रिक्लेम केली आहे. म्हणजे समुद्राचे थोडे पाणी एका चॊकोनात अडवायचे, ते उन्हाने वाळले की त्या जागेवर बांधकाम करायचे. इथे जागोजागी विंडमिल्स दिसतात. हाय लेव्हल वरून लो लेव्हल वर पाणी खेळवायला त्या वापरत असत. आता ह्या विंडमिल्स वापरात नाहीत पण सरकार त्यांच्या देखरेखी साठी पॆसा देते. पहिला स्टॉप होता वूडन शू फॅक्टरीचा. अतिशय हलक्या लाकडापासून बूट कसा बनवतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. सगळ्यावर छान पेंटिंग केले होते. बाहेरच्या भिंतीवर एका बुटाचा मस्त फ्लॉवर्पॉट करून ठेवला होता. लोकांच्या खरेदीला इथे सुरूवात झाली काही नाही तर की चेन प्रत्येकाने घेतलीच.

त्यानंतर मदुरोडॅम.. हॉलंड इन मिनिअएचर पाहिले. सुरूवातीला वाटले की हे काय किल्ल्यासारखे पहायचे पण त्यातले बारकावे पाहून कॊतुक वाटले. हे सगळे व्हॉलेंटिअर वर्क आहे हे विशेष. वेगवेगळ्या बिल्डींग्ज, विमानतळ, रेल्वे अगदी पाण्यावरचे लॉक्स ही दाखवले होते. आत शिरताना नकाशा दिला होता सगळे शिस्तीत होते. १५ मे पर्यंत जाणार्‍यांना ट्यूलिप्स बघता येतात. यापुढचा टप्पा होता ऍमस्टरडॅम चा. तिथे सायकल चालवणारे खूप लोक असल्याने रस्त्यावर एक ट्रॅक सायकल वाल्यांचा असतो. प्रत्येक घरात वरच्या मजल्यावर एक हुक दिसतो. घरांची रचना अशी की दारे छोटी व खिडक्या मोठ्या. त्यामुळे जड सामान वर नेताना आधी हुक ने वर घेतात व नंतर खिडकीतून घरात घेतात. दोन बिल्डींग मध्ये अंतरही फार नसते. थोड्या पुढे मागे पण असतात.
इथल्या जुन्या आर्किटेक्चर मध्ये खरोखरच बिल्डींग चे टॉप्स ४ प्रकारात दिसले. बेल शेप, स्टेप शेप, नेक शेप किंवा स्क्वेअर. नंतर नदीतून एक बोट टूर घेतली. आजूबाजूला शिकार्‍यासारखी बोट हाउअसेस होती. सगळ्यात छान फुले लावलेली होती. इथली जागा खूप महाग असते म्हणून घरे लांबीला जास्त व रूंदीला कमी होती. त्यानंतर डायमंड फॅक्टरी ला गेलो तिथे पुरूष कंटाळले पण बायकांनी मनसोक्त खरेदी केली. हिरा लाभतो का नाही ते बघायला मी पण एक हिरा घेतला.

आता थोडे इथल्या बसाविषयी- युरोप टूर करणार्‍या शेकडो बसेस आहेत. प्रत्येक बस ए. सी व साधारण ५० जणांची असते. बसमध्ये जी पी एस असते त्यावेळी ते नवीन होते म्हणून खूप मजा वाटली होती. एखादा रस्ता बंद असला की लगेच दुसरा रूट दाखवत असे.बस ड्रायव्हर एक सी डी ठेवतो. त्यात स्टार्ट टाईम व प्रत्येक स्टॉप चे रेकॉर्डींग होते. रोज १२ तासापेक्षा जास्त बस चालवायची नाही व दर २ तासानी एक स्टॉप घ्यायचा असेही बंधन असते. पोलिस रस्त्यात कुठेही थांबवून सी डी तपासू शकतो. लोकांनी जास्त वेळ मध्ये थांबू नये म्हणून आमच्या गाईड ने ही माहिती दिली. आमचा ड्रायव्हर रिकी ईटालिअन होता. त्याने अतिशय छान बस चालवली. .............भाग २ पुढे......

Tuesday, June 16, 2009

खाणे त्यांच्या देशा........

आजकाल बरीच मुले शिकायला, नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत व इतर देशात जातात. काही मेस मध्ये जेवतात तर बरीच स्वतः स्वयंपाक करून जेवतात. भारतात स्वहस्ते करायची वेळ कमीच येते. बाहेर आल्यावर मात्र घरच्या खाण्याची आठवण नेहेमीच होते. एकतर व्हेजिटेरिअन खाणार्‍यांना चॉईस कमी व मसाले अगदीच न के बराबर. त्यामुळे पिझ्झा, पास्ता. टॅको बेल्स हे ऑप्शन्स बघितले जातात. अशा बाहेरून इतर देशात जाणार्‍यांकरता हे काही प्रकार. स्वस्त, सोपे व पटकन होणारे

इथे ग्रोसरी करताना दुकानात गेल्यावर सुरूवातीला गडबड होते. इतके प्रकार असतात त्यातले काय घ्यावे व काय नाही ते कळत नाही. पॆशाचा पण विचार करावा लागतो. आपल्याला रूपया व बाहेरच्या करन्सीत फ़ार फरक वाट्तो..साहजिकच आहे. या मोठ्या स्टोअर्स मधून शॉपिंग करण्यात फार वेळ जातो. सुरूवातीला एखादी चक्कर नुसतीच मारून अंदाज घ्यावा. शक्यतो लो फ़ॅट ऑप्शन चूज करावा. फ़ुल फ़ॅट, लो फ़ॅट व फ़ॅट फ़्री असे ऑप्शन्स असतात.

बेसिक फोडणी शिकून घेणे.

पोळीला पर्याय:
ब्रेड - नानाविध प्रकारचे ब्रेड मिळतात. त्यापॆकी व्हीट ब्रेड शक्यतो निवडावा. अगदीच आवडला नाही तर व्हाईट खा.
पीटा ब्रेड, पीटा पॉकेट्स - बेकरी सेक्शन मध्ये मिळतात. ते टोस्ट करून खाल्ले की चांगले लागतात.
टॉर्टीयाज - ह्या मेक्सिकन पोळ्या असतात. गहू किंवा कॉर्न पासून बनवलेल्या. चव सगळ्यांना आवडतेच असे नाही.

भाज्या व उसळी: फ्रोझन व्हेजिटेबल्स नेहेमी फ्रिज मध्ये ठेवाव्यात. त्यात
मटार, मिक्स व्हेज, कॉर्न, एड्मामे...शेंगा किंवा दाणे, फ़्रेन्च कट बिन्स ठेवावे.
टिन मध्ये चिक पीज(छोले), किडनी बीन्स(चवळी), ब्लॅक बीन्स व राजमा मिळतात.

बेकिंग : बेकिंग करणे खूप सोपे आहे कारण बहुतेक किचन्स मध्ये कुकिंग रेंज असते. बेकिंग ट्रे डिस्पोजेबल वापरले तर सोपे पडते. पॅम स्प्रे मिळतो तो वापरवा. बेकिंग सेक्शन मध्ये केक मिक्स, ब्राउनी मिक्स, कॉर्न ब्रेड, मफिन मिक्स मिळतात. त्यावर व्यवस्थित सूचना असतात. बहुधा एखादे अंडे व तेल मिक्स मध्ये घालावे लागते. दिलेले तपमान व वेळ याप्रमाणे बेक करावे. बिघडत नाही. स्नॅक्स म्हणून या गोष्टी उपयोगी पडतात.

जेलो पाकिटे, पुडींग पॅक्स मिळतात. अधून मधून खायला चांगले.

स्मूदी....फळे, दही व थोडेसे टोफू किंवा ड्राय फ्रूट व बर्फ़. आवडीप्रमाणे साखर अथवा मध. स्मूदी बनवताना फळे चिरून थोडा वेळ फ़्रीझर मध्ये ठेवावे. फ्रेश किंवा फ्रोझन फळे वापरता येतात. वेगवेगळ्या फळांची कॉम्बिनेशन्स करणे.

व्हेजिटेबल सेक्शन मध्ये सोयाचे चीज मिळते. चीज ला अल्टर्नेटिव्ह म्हणून वापरता येते.
एथनिक सेक्शन मध्ये काही डाळी, दाणे, कडधान्ये मिळतात.
आले, लसूण पेस्ट तयार मिळते. ती फ़्रीज मध्ये ठेवावी.
तूप आवडत असेल तर अनसॉल्टेड बटर घेउन गॅसवर कढवावे.

जवळपास इंडिअन स्टोअर असेल तर चिंचेची चटणी, गरम मसाला इ आणून ठेवावे.

सॅंड्विचेस: व्हिट ब्रेड / व्हाईट ब्रेड ....शक्यतो टोस्ट करावे. बटर, क्रीम चीज, सोया मेयोनीज, कीरी चीज, हम्मस या गोष्टी आलटून पालटून वापरा. या गोष्टी चीज सेक्शन व ड्रेसिंग सेक्शन मध्ये मिळतात. सोयाचे पॅटीस-बोका बर्गर मिळतात ते थोडेसे शॅलो फ़्राय करून वापरावे. बाकी लेट्यूस, टोमॅटो, कांदा टोमॅटो केचप वरून घालावे. रेलिश पण छान लागते.

ऑम्लेट मध्ये कांदा, टोमॅटॊ व मिक्स व्हेज घालून सॅंडविच बनवावे.

स्टर फ़्राय: कांदा, लसूण, थोडा बटाटा,टोमॅटो, ब्रोकोली, मशरूम्स, कॅप्सिकम,एडमामे दाणे, घालून परतावे. चिली सॉस, सोया सॉस घालावे. ५ ते १० मिनिटात डिश तयार. भात, टॉर्टीयात घालून अथवा नूडल्स जे आवडत असेल त्याबरोबर खावे.

पिटा पॉकेटस: पिटा टोस्ट करून त्यात लेट्यूस, टोमॅटो, उकडलेले अंडी / स्टर फ़्राय भाज्या / घालावे.

पास्ता: आपल्याला आवडेल त्या प्रकारचा पास्ता घ्यावा. ऒलिव्ह ऒईल वर कांदा, लसूण, टोमॅटो, ब्रोकोली, कॅपसिकम, मशरूम्स, थोडा स्पिनॅच घालावा. त्यात पास्ता सॉस (रगू चांगला आहे) मिक्स करून मग शिजवलेला पास्ता घालावा. नंतर ओरेगॅनो व गार्लिक सॉल्ट घालून मिक्स करावे. हे इटालिअन मसाले मसाले सेक्शन मध्ये मिळतात.

उसळी: कांदा, आले लसूण घालून परतावा. त्यावर टोमॅटो घालून परतावे. थोडासा गरम मसाला घालावा. छोले, चवळी, राजमा हे टिन्स मध्ये मिळतात. ते मिक्स करावे. उसळ तयार. भाताबरोबर अथवा ब्रेड बरोबर खावे.

चाट : टॉर्टीयाज कापून तळून ठेवाव्या त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, छोले(टिन मधले), हिरवी चट्णी, दही, व चिंचेची चटणी घालावी.

स्कूप्स : चिप्स सेक्शन मध्ये हे कॉर्न स्कूप्स मिळतात. त्यात भरण्यासाठी ब्लॅक बीन्स, कॉर्न, कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो चिली सॉस व थोडी जिरा पाउडर मिक्स करावी. हे स्कूप्स मध्ये भरून खावे.

भाजी: मिक्स व्हेज चे पाकीट मिळते त्याची भाजी छान होते. प्रथम तेलावर कांदा, आले लसूण पेस्ट परतावे. त्यावर टोमॅटो घालून परतावे. त्यात फ़्लॉवर, कॅप्सिकम घालून परतावे. मग मिक्स व्हेज घालून थोडे पाणी घालून शिजवावे. नंतर थॊडेसे क्रीम, अथवा मिल्क पाउडर किंवा काजू पेस्ट यातील काही घालावे. नसल्यास हरकत नाही.

अशीच फ़्रेंच बीन्स ची भाजी करता येते. जिर्‍याच्या फोडणीवर थोडा लसूण घालावा. वर फ़्रेंच बीन्स घालाव्यात. झाकण ठेवून थोडा वेळ शिजवणे. नंतर थोडे मीठ, लिंबू घालावे. दाण्याचे कूट घालून ३-४ मिनिटे परतणे की भाजी तयार. दाणे रोस्टेड अनसॉल्टेड घेउन कूट करावे.

अजून काही पदार्थ थोड्या दिवसांनी.

Friday, June 12, 2009

फुलांचे पण टाईम टेबल असते.....

फुलांचे पण टाईम टेबल असते.....

अमेरिकेत आल्यावर बागकाम हा माझा आवडता उद्योग परत सुरू झाला. वेळ भरपूर आणि मातीची आवड त्यामुळे बागेत बराच वेळ मी घालवते. इथे ज्या भागात बर्फ़ पडते तिथे ४ महिने बाग करता येते. जिथे ट्रॉपिकल हवा आहे तिथे भारतासारखे सगळे दिवस बाग फुलवता येते.

आम्ही सुरूवातीला अपार्ट्मेंट मध्ये रहात होतो तेव्हा छोट्याश्य़ा बाल्कनीत २-४ कुंड्या आल्या. अर्थात गुलाब ही बहुतेक भारतीयांची पहिली पसंती असते त्यानुसार मी पण गुलाबाने सुरूवात केली. बाकी बरीच झाडे अनोळखी होती. सगळीच झाडे फुलांनी अगदी डवरलेली दिसत. मला वाटते वर्षाचे १२ महिने मिळत नाहीत फुलायला त्यामुळे संधी मिळाली की अगदी भरपूर फुलतात ही झाडे. आम्ही मिडवेस्ट मध्ये रहातो त्यामुळे तसे ४ महिनेच मिळतात बाग फुलवायला. स्प्रिंग च्या सुरूवातीला सगळ्या नर्सरी मध्ये फुलांचे ताटवे दिसायला लागतात. त्याची तयारी १-२ महिने आधीच चालू असते. छोट्या ट्रेज मध्ये रोपे बनवतात. सगळे कसे शिस्तीत असते. झाडांना माती व खत यांचे बरोबर मिश्रण घातलेले असते. आपल्याकडची गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, अनंत ही फुले दिसतात. गरम भागात चाफा, कण्हेर, जाई ही बघायला मिळतात. बाकी सगळी नवीन फुले बघायला मिळाली आणि हो लावायला पण मिळाली.

घर घेतल्यावर बरीच झाडे लावण्याची माझी हॊस भागली. ऑक्टोबर नंतर बाग हळूह्ळू वाळायला लागते. अगदी काड्या दिसतात. पानांचा पत्ता नसतो. त्यापॆकी काही झाडे पुन्हा मार्च मध्ये येतात (पेरिनिअल). ते बघायला खूप मजा येते. अगदी वाळलेली बाग पुन्हा जिवंत होऊन आपल्यासमोर येते. सुरूवातीला मी त्या झाडंचे खूप निरीक्षण केले. पहिल्या वर्षी प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास बसला नव्हता. आता मात्र झाडे लावताना पेरिनिअल जास्त लावली जातात कारण ती पुन्हा पुन्हा येतात. २-३ वर्षे गेल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, या फुलांचे पण टाईमटेबल आहे. ठराविक दिवसात ठराविक फुले येतात. हवेनी मनमानी केली तर एखादा आठवडा पुढे मागे पण ही फुले ठराविक वेळेलाच येतात व ठराविक वेळच टिकतात.

सुरूवातीला माझ्या बागकामावर घरात बरीच चर्चा होत असे पण आता सगळेच वाट बघतात. दर वर्षी फुलुन पुनःप्रत्ययाचा आनंद देणार्‍या या फुलांची मी आभारी आहे. आणि हो आता गुलाब, मोगरा यांच्याबरोबरीने ही फुलेही मला ’आपलीच’ वाटतात. अशाच काही माझ्या बागेतल्या फुलांचा हा पुष्प्गुच्छ.


Month of April
(daffodils, Tulips, lily of valley)

..



Month of May( Iris, Rhododendron, clementis, Peonies)


...................
.

.

................................
Peonies Memorial day weekend


Month of June July and August(Lily, Salvia, Hibiscus,
Pitunia, Rose and Mogra)

.
.....

...

Month of July August September( mums, plumeria (from HAwaii)
gardenia .....)

......... .

.
....... and many more....

Tuesday, June 2, 2009

यू ट्यूब झिन्दाबाद.........

यू ट्यूब झिन्दाबाद.........

आजकाल जमाना इंटरनेटचा आहे. सगळी माहिती अगदी एका क्लिक वर मिळते. इंटरनेट सुरू झाल्यावर सुरूवातीला ते महाग होते, लोकांकडे इतके संगणक नव्हते त्यामुळे त्याचा वापर मर्यादित होता. हळूहळू ही परिस्थिती बदलली. सगळ्यांना ते सहजपणे मिळू लागले. साहजिकच त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरु झाल्या. वेगवेगळी सर्च इंजिन्स, जाहिराती हे सुरू झाले.
कशावर बंधन नसल्याने तरूण वर्ग खुश..अशातच ’यू ट्यूब’ ची सुरूवात झाली.

य़ू ट्यूब वर तुम्ही काहीही पोस्ट करू शकता. ना भाषेचे बंधन ना विषयाचे बंधन त्यामुळे अल्पावधितच ही साईट प्रसिद्ध झाली. आजकाल एखाद्याच्या प्रसिद्धिचे मोजमाप पण या साईट च्या ’हिट्स’ वरून करतात. वापरायला सोपे असल्याने सगळे ते वापरू लागले. अर्थात यात थोडी रिस्कही होती. काही आक्षेपार्ह गोष्टी पण त्यावर दिसू लागल्या. माझ्यासारख्या लोकांना वाईट गोष्टी आधी दिसतात.

असे असले तरी हळूहळू मीही या साईटचा वापर करू लागले. हव्या त्या सिरीअल्स हव्या तेव्हा बघता येतात. जाहिरातींशिवाय कार्यक्र्म बघता येतात हे विशेष. बरेच जुने सिनेमा बघता आले. आपल्याला हवे ते रेकॉर्डींग टाकता येते आणि आपले मित्र मंडळ, घरचे लोक ते कुठुनही बघू शकतात. गाण्याची दुर्मिळ रेकॉर्डींग्ज बघता येतात.

एके दिवशी माझ्या मुलीचा फोन आला, " तू पु. लं. चे नक्षत्रांचे देणे पाहिलेस का?" नवीन आले आहे. मी आश्चर्य चकित.. तिने ते यू ट्यूब वर पाहिले होते. यापूर्वी मी तिला त्यांच्या बर्‍याच कॅसेट्स ऎकवल्या होत्या. पु. लं ची पुस्तके तिने वाचावीत अशी माझी ईच्छा. ती थोड्या वेळाने कंटाळत असे. मी पु. लं. ची फॅन असल्याने त्यांच्या पुस्तकातले काही उतारे, विनोद किंवा आवडलेला मजकूर तिला अधूनमधून वाचून दाखवत असे. इंग्लीश मिडिअम मुळे आजकाल बहुतेक मुलांचे मराठी वाचन कमी झालेले आहे. ती बिचारी सगळे ऎकून घेत असे. मी एखादे नवीन पुस्तक वाचले की तिला माहित असते की पुढच्या फोन मध्ये त्या पुस्तकाबद्दल काहीतरी ऎकावे लागणार. माझा नवरा आणि मुलगी या दोघांना माझ्या वाचनाने मी सतत पीडत असते.

त्यानंतर तिने सगळे पु लं चे साहित्य ’बघितले’. काही शब्द कळत नसत पण अर्थ लागत असे. मी एवढी वर्ष हे साहित्य तिच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होते ते काम यू ट्यूब ने काही दिवसात केले. परत हे सगळे आवडीने झाले. दृक गॊष्टींचा जास्त परिणाम होतो हे खरे. दृक असो की श्राव्य मला जे तिच्यापर्यंत पोचवायचे होते ते पोचले. काही जुने, नवे मराठी सिनेमे, नाटके हे सगळे अपडेट झाले. गीतरामायणातील बरीच गाणी आज मला पाठ नाहीत पण तिला तोंडपाठ आहेत. अर्थात नाचाची आवड असल्याने त्यातला ताल हाही एक महत्वाचा फॅक्टर होता. लिट्ल चॅम्प्स चे पर्व ही यू ट्युब मुळे बघता आले. त्यातली सगळी मराठी जुनी गाणी तिला माहित झाली.

आजकाल ती मला बर्‍याच वेळेला नवीन काही पाहिले की कळवते, आणि मी म्हणते यू ट्यूब झिंदाबाद.....

Monday, June 1, 2009

माझ्या साहसकथा

माझ्या साहसकथा....

आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात. पण जमेल का नाही असे साराखे वाटत रहाते. मनात थोडी भिती वाटत असते, पण उत्सुकता गप्प बसून देत नाही. मला पोहायला अगदी जेमतेम येते...न के बराबर त्यामुळे माझी बरीच साहसे ही अर्थातच पाण्याशी निगडीत. या गोष्टीतला ’साहस’ हा भाग तसा सापेक्षच. माझ्यापेक्षा वयाने लहान मंडळी या गोष्टी अगदी सहज करत असतात.

अंदमानच्या सहली मध्ये स्नॉर्कलींग हा प्रकार पहिल्यांदा पाहिला व केला. समुद्राच्या पोटात अगदी उथळ व शांत पाण्यात काही ठराविक ठिकाणी पाण्याखाली ही रंगीत दुनिया दिसते. आतापर्यंत फ्लोरिडा, हवाई इथेही कोरल्स पाहिली पण अंदमानच्या कोरलच्या रंगाची सर कुठे नाही. नुसते पाण्याला डोळे लावले की आत एवढा खजिना दिसेल याची अगदी कल्पना येत नाही. कोरल्स बघण्यासाठी आधी एका मोटर बोटने बरेच आतवर नेले. हा प्रवास खूप छान होता. पाण्याचा रंग सुंदर हिरवा निळसर. काठाजवळ तर खालचा तळ दिसत होता इतके स्वच्छ पाणी होते. नंतर एका छोट्या बोटीने अजून थोडे अंतर नेले व प्रत्येकाला मास्क दिले. हा मास्क घालून तोंडाने हवा घ्यायची असते, वाटते की पटकन जमेल पण आपल्याला नाकाने हवा घ्यायची एवढी सवय झालेली असते की आपण नकळत नाकाने श्वास घेतो व थोडी खार्‍या पाण्याची चव घेतो. मला एका कातकरी माणसाने टायरच्या सहाय्याने पुढे नेण्याची तयारी दाखवली पण हे जमेल का नाही असे वाटत होते. "तुम्ही एकदा पाण्याला डोळे लावून तर पहा" या आग्रहाला मी बळी पडले व पाण्याला डोळे लावले. खालचे सुंदर रंगीत मासे व रंगबिरंगी कोरल्स पाहून मी नकळत त्या माणसावर भरोसा टाकून बरीच पुढे गेले. केशरी रंगाच्या कोरल्स चा इथे साठा आहे. पिवळे, जांभळे केशरी ठिपकेवाले काळे पांढरे पट्टे असलेले असे अनेक मासे बघितले. फारसे कमर्शियल असे हे ठिकाण नसल्याने अजून हा साठा शिल्लक आहे. इथे अगदी उथळ पाण्यात व आतवरही कोरल्स आहेत त्यामुळे त्याला धक्का न लावता ती बघा असे सारखे सांगितले जाते. ही अडाणी मंडळी ह साठा चांगला जपत आहेत. मधेच एकदा मागे वळून पाहिले असता पोहत खूप पुढे आल्याचे लक्षात आले पण आता भिती कमी झाली होती. थोडेसे साहस जर त्या दिवशी केले नसते तर मी केवढ्या आनंदाला मुकले असते.....

अमेरिकेत आल्यापासून व्हाईट वॉटर राफ्टींग हा शब्द फार वेळा कानावरून गेला. खळाळत्या पाण्यात जाणार्‍या त्या बोटी पाहिल्या आणि आपणही एकदा हा अनुभव घ्यावा असे वाटू लागले. कोलोरॅडो स्प्रिंग्सहून जवळच एका नदीवर आम्ही हा अनुभव घेतला. आम्हाला एका बसने नदीच्या एका बाजूला नेले. तिथून ट्रीप सुरू होणार होती. जाताना गाईड ने’ ’संभाव्य धोके’ यावर बरीच माहिती दिली जरा जास्तच..ऎकून वाटायला लागले की इतकी भिती का दाखवतात? पण ती सगळी माहिती देणे त्याना आवश्यक होते. मे महिना असला तरी पाणी गार होते म्हणून स्पेशल सूटस चढवले. त्यावर लाईफ़ जॅकेट अशी तयारी झाली. प्रत्यक्ष बोटीत बसेपर्यंत मला वाटत होते की पाण्यात पडायची वेळ आली तरी बोटीला घट्ट धरून ठेवायचे पण प्रत्यक्षात उलटेच होते. पडायची वेळ आली तर पटकन बोट सोडून बाजूला व्हायचे. प्रत्येक बोटीत ६ जण व एक गाईड होता. त्याला पाण्यातल्या रॅपिडस ची पूर्ण माहिती होती. तो बरोबर बोटीला दिशा देउन बोट पुढे कढत होता. सुरूवातीला नेहेमीप्रमाणे धाकधूक वाटत होती पण एकदा सुरूवात झाल्यावर मजा वाटली. दोन्ही बाजूला छान डोंगर मध्ये रस्ता व शेजारी नदी असा सुंदर प्रवास होता. अधून मधून रिमझिम पाऊसही होता.गाईड ने सूचना केली की आम्ही वल्ही मारत होतो पण त्याला विषेश अर्थ नव्हता तोच मेन काम करत होता. एकदोनदा त्या खळ्खळ्णार्‍या पाण्यावरून जाताना बॊट उलट्णार असे वाट्ले पण वाचलो. आमच्या ५ पॆकी १ बोट वाटेत आडवी झाली पण कुणाला फारसे लागले नाही. रॅपिडस वरून जाताना बोट जोरात जाते, आपण भिजतो पण खूप मजा येते. आम्ही ईंटरमिजिएट लेव्हल घेतली होती त्यामुळे फार अवघड वाटले नाही. ज्या लोकांनी पूर्ण प्रवाहाचा अभ्यास करून हा खेळ चालू केला त्यांचे कॊतुक वाटल्याशिवाय रहात नाही.

२००८ मध्ये आम्ही हवाईची सफर केली. मुख्य आकर्षण होते ज्वालामुखी बघण्याचे. हा ज्वालामुखी जागृत आहे. नेमके आम्ही जाण्यापूर्वी तो थंडावला. मी रोज दोनदा तरी ईंटरनेट वरून अपडेट्स बघत असे. बरोबर आम्ही जाण्यापूर्वी १-२ दिवस आधी तो चालू झाला व मला हुश्श झाले. हा ज्वालामुखी बिग आयलंड या बेटावर आहे. तिथे व्होल्केनो पार्क, ब्लक सॅंड बीच व मॊना किया वर जाऊन ऍस्ट्रॉनामीचे टेलिस्कोप्स बघण्यात २ दिवस गेले. नुकताच ज्वालामुखी परत जागृत झाल्याने नेहेमीची जागा बदलली होती. तो बघण्याची वेळही अगदी थोडी होती. . आजूबाजूची हवा चांगली नाही म्हणून फार जवळ जाउ देत नव्हते. पण तो बघायचा तर होताच त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर राईड घ्यायचे ठरवले. माउई या शेजारच्याच बेटावरून राईड घेतली. सुरूवातीला वींड सर्फर्स, आजुबाजुला धबधबे, छोटी बेटे बघत बिग आयलंड वर आलो. आजपर्यंत लाव्हा फक्त भूगोलाच्या पुस्तकातून भेट्ला होता. त्याचे असणारे प्रचंड तपमान, बाहेर पडणारे विषारी वायू, क्षणार्धात गोष्टींचा नाश करण्याची ख्याती अशा सगळ्या गोष्टी एकदम आठवल्या. विमानातून गेल्याने खालची लाव्हा फ़िल्ड्स , लाव्हा कुठुन कसा वाहत गेला, त्यामुळे जळलेली झाडे, घरे दिसत होती. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिथे वाढलेली झाडे हे सगळे अगदी छान बघता आले. या गोष्टी जमिनीवरून बघता येत नाहीत. हा लाव्हा मोठ्या ट्यूब्सच्या मधून वहात शेवटी समुद्राला जाऊन मिळतो. त्याच्यावरून जाताना खाली आधी खूप धूर दिसतो आणि मग पाण्यात पडणारा लाव्हा दिसतो अगदी पाण्याच्या पाईप मधून पाणी वहाते तसा लाव्हा बाहेर पडत होता. सर्व जागेवर वाफेचे ढग दिसत होते. त्या वर सेफ अंतर ठेवून आमचा पायलट हेलिकॉप्टर चालवत होता. काय साईट होती! मनात खूप भिती वाटत होती. पायलट ने ३-४ फेर्‍या वेगवेगळी माहिती देत मारल्या. एकीकडे वाटत होते पटकन परत फिरावे तर दुसरीकडे वाटत होते अजून एक फेरी मारावी. निसर्गाची करामत पाहून खूप छान वाटत होते. पाण्याला जीवन म्हणतात हे खरे आहे. जिथे लाव्हा समुद्रात मिळत होता तिथे नवीन जमीन तयार होते. सतत बाहेर पडणार्‍या लाव्हा मुळे एक नवीन बेट पाण्याखाली तयार व्हायला लागले आहे. डिस्ट्रक्शन व कन्स्ट्रक्शन एकाच ठिकाणी बघण्याचा हा अदभूत योग आयुष्यात कधीही विसरणार नाही.


इलिनॉय रिव्हर कनू ट्रिप

आजपर्यंत बोटींग बरेच केले आहे. ज्या जागी गेलो तिथे बोटींग ची सोय असेल तर आम्ही जायचोच. क्रेडिट गोज टू - अर्थात माझा नवरा. अमेरिकेत आल्यावर आमच्या घराच्या मागेच एक छोटे लेक असल्याने लगेचच कनू ची खरेदी झाली. तिथे थोडी सवय झाली वल्ही मारण्याची. इथे बरेच ग्रुप्स कॉलेज मधून रिव्हर कनूला जातात असे कळले. त्यांच्याबरोबर जायचे ठरले. त्यांनी आधी एक दिवस प्राथमिक माहिती दिली. दुसर्‍या दिवशी सकाळी निघालो. ८-१० जणांचा ग्रुप होता. एक गाईड होता. सगळ्यांनी मिळून कनू लोड केल्या. २-३ गाड्या घेउन गेलो. आदल्या दिवशी पाउस पडल्याने नदीचे पाणी वाढले होते. आधी थोडी प्राथमिक माहिती देउन कनू करायला सुरूवात झाली. हवा छान होती. सुरूवातीला पाणी एकदम संथ व भराभर पुढे जाता येत होते. आपण जणू पाणी कापत जात आहोत असे वाटत होते. आजूबाजूला ७-८ बोटी सगळे उत्साही त्यामुळे मजा वाटत होती. कनू करताना दोघांनी एका वेगात वल्हवले की छान वेग येतो व मजा येते. एकमेकांना ऒव्हरटेक करणे चालले होते. १२ मॆलांचा प्रवास होता. साधारण ६ मॆलांवर जेवणाचा ब्रेक झाला. हळूहळू हाताला जाणीव व्हायला लागली होती. जेवणानंतर अचानक चित्र पालटले. बाजूला मोटर बोटस फ़िरत होत्या. त्यांच्या लाटा हळूहळू आमच्या पर्यंत पोचत होत्या. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर बोट वल्हवणे खूप अवघड झाले. लाटांमुळे बोट खूप हलत होती व जाम भिती वाटत होती. एकदा आपल्याला कळले की आता आपल्या हातात काही नाही की मग आपण जरा इतर विचार करायला लागतो. हळूहळू आमचा स्पीड कमी झाला. नवरा मनात वॆतागला पण वरकरणी मला प्रोत्साहन देत होता. वल्हवताना पूर्वी ज्या लोकांनी भर समुद्रात बोटी नेउन वेगवेगळ्या जागा शोधल्या त्यांच्याबद्दल विचार येत होते. हवाईला नुकत्याच त्यांच्या गॊष्टी ऎकल्या होत्या. दिशा शोधत, समुद्री लाटांना तोंड देत, अत्याधुनिक साधने जवळ नसताना त्यांनी कसा प्रवास केला असेल? खरोखर ग्रेट लोक होते ते. बराच वेळ झाल्यावर हात अक्षरशः थांबले. आमचा गाईड सगळ्यांकडे लक्ष ठेवत होता. हळूहळू आम्ही शेवटच्या टप्प्याला आलो व हुश्श झाले. आपण १२ मॆल कनू केले यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्यातल्याच दोघांनी ड्राईव्ह केले परत आल्यावर सगळ्या कनू धुवून पुसून जागेवर गेल्या. मी मात्र हात दुखत आहेत म्हणून शेवटचे काम चुकवले. हात न चालणे म्हणजे काय याचा अनुभव या ट्रीप मध्ये घेतला. समीर व शेतल यांना या ट्रीप साठी धन्यवाद. आता पुन्हा एकदा संथ पाण्यात कनू करायला गेले पाहिजे...लाटा नकोत.