Showing posts with label काही वाचनीय. Show all posts
Showing posts with label काही वाचनीय. Show all posts

Friday, December 30, 2011

काही वाचनीय... दीपस्तंभ

काही वाचनीय... दीपस्तंभ

गेल्या महिन्यात प्रा. शिवाजीराव भोसले यांचे दीपस्तंभ हे पुस्तक वाचनात आले. पेपर मध्ये लिहिलेल्या स्तंभलेखनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तकाचे नाव, प्रस्तावना व आतील मजकूर सगळेच प्रेरणादायी वाटले. समुद्रात वाट चुकलेल्यांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो त्याप्रमाणे या पुस्तकात अशा अनेक लोकांची ओळख करून दिली आहे जे जनजागृति च्या कामात दीपस्तंभासारखे उभे होते. पेशवे कालानंतर धर्माच्या नावावर बराच काळाबाजार चालला होता तो लोकांना दाखवण्याचे काम या लोकांनी केले. अनिष्ट रूढी मोढण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले ते यात दाखवले आहे. गंमत म्हणजे अजूनही जात, धर्म या गोष्टी वापरून आपल्यावर संकटे येत आहेतच. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींची प्रस्तावना लाभली आहे ती पण वाचनीय. आजकाल व्याख्यान संस्क्रृति लोपली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला अजून चांगले वाटले.

शाळेत असताना आपण वरेच वेळा समाजसुधारकांचे कार्य अभ्यासतो पण त्यापुढे जाउन चरित्रे वाचत नाही. या पुस्तकात थोडक्यात चरित्र दिली आहेत. काही मजेदार आठवणी दिल्या आहेत. आपल्याला वाटले तर पुढे जाउन अजून वाचावे. साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, १८ व्या- १९ व्या शतकाचा काळ, बहुतेक सगळे गरिबीतून कसेबसे शिक्षण घेणारे पण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोचणारे. ब्रिटिशांचे एका बाबतीत कौतुक वाटते, जरी ते राज्यकर्ते होते तरी बुदधीला त्यांनी मान दिला. हुशार लोकांना त्याच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यास बोलावले. आणि वेळ आली तर पारितोषकाने गौरवले पण.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोषाचे बरेच खंड संपादित केले आणि आता ते मराठी विश्वकोष या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून झाली.बहुतेक सगऩ्या लोकांनी घर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, ही गोष्ट फार महत्वाची वाटते. शाळेपासूनच जर इतर घर्माबद्दल माहिती झाली तर मुलांना खूप फायदा होईल. १८०० ते १९०० हा काळ असा होता की भारतीय संस्क्रृति, मोगलांचे वर्चस्व व राज्य इंग्रजांचे... सगळ्या गोष्टी धर्माशी निगडीत होत्या. अंधश्रदधातून लोकांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते.

या पुस्तकात आलेल्या समाजसुधारकांचे विचार वेगळे होते, पण प्रत्येकाचे ध्येय एकच होते. सामान्य जनांना जागृत करणे, एकत्र करणे व चांगला समाज तयार करणे. मग ते सर्व धर्मातील मूलतत्वे एकत्र घेउन, एक परमत्त्व सर्वात आहे असे मानणारे ब्राम्हो समाजाचे राजा राममोहन राँय असोत किंवाजातिभेदाला न मानत योग, परमेश्वर चैतन्य यांना मानून आर्य समाजाचा प्रसार करणारे महर्षि दयानंद असोत. बरीच वर्षे देशाबाहेर राहून शिकलेले पण शेवटी भारतातच कार्य करणारे अरविंद योगी असोत. त्यांनी मानवाची पुढची आवृत्ती महामानव सांगितली आहे. matter, mind va supermind अशी त्यांची धारणा होती. प्रत्येकाची कल्पना आणि अभ्यास दांडगा.विश्वेश्वरअय्या यांनी केलेल्या पाण्याच्या प्रश्नांचे व्यवस्थापन आणि काढलेले अनेक कारखाने...एक माणूस किती काम करू शकतो याची कल्पना येते. बहुतेक सगळ्यांना लहानपणी भरपूर पायपीट करावी लागली पण पुढे तब्येतीसाठी फायदाच झाला. दुसरी एक गोष्ट सातत्याने द्सली म्बणजे वहुतेकांना बडोद्याच्या महाराजांनी सहाय्य केले नोकरी किंवा पैसा देउन.
जे क्रृष्णमूर्तींचा थिआँसाँफिकल विचार , स्वामी विवेकानंदांचे विचार, कर्मवीर पाटील यांची रयत शिक्षण संस्था व अगणित वसतिगृहे, शाहू महाराजांचे विचार, साने गुरूजींची तत्वे, या सगळ्याशी या पुस्तकातून ओळख होते.

गुरूदेव रानडे यांनी जी राष्ट्राच्या अवनतीची कारणे दिली आहेत ती आजही पटतात. गुरूदेव टागोरांचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह, काबुलीवालाची गोष्ट, जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेच्या वास्तव्यात घेतलेला श्रमप्रतिष्ठेचा अनुभव, जोतिबा फुले यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण याचे कार्य. साने गुरूजींनी भाषेच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.

हे पुस्तक शाळेत, इंटरनेटवर ठेवले तर जास्त मुलांपर्यंत पोचेल व त्यांना या लोकांची ओळख तरी होइल. पूर्वी लोकांच्या शिक्षणासाठी संत लोक जन्म घेत. हे सगळे आधुनिक संतच म्हणायचे. गंमत ही आहे की एवढी रत्ने जन्मली त्यांनी एवढे काम केले तरी जाति, धर्म यांच्या लढाया वाढत आहेत. धर्म, जाति व अंधश्रद्धेचा पगडा इतका घट्ट का असतो, की जो काढायला हे दीपस्तंभ अपुरे पडावेत.......

Thursday, October 7, 2010

काही वाचनीय .... इंडिया अनव्हेलड

काही वाचनीय .... इंडिया अनव्हेलड

काही वर्षापूर्वी हे पुस्तक बघितले होते. त्या वेळेस अमेरिकन लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे, ठीक आहे असे म्हणून नीट लक्ष देउन बघितले नव्हते. परत ते २-३ दा पाहिले - पाहिले कारण यातले फोटो अतिशय छान आहेत. दर वेळेस अधिकाधिक आवडत गेले. साहजिकच मग ते वाचले गेले. आणि आता संग्रही पण आहे.

बाॆब अर्नेट नावाच्या लेखकाचे हे पुस्तक आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी एका भारतीय माणसाशी त्याची ओळख झाली. त्याच्याकडून योगा बद्दल माहिती घेतली. त्याने प्रभावित होउन भारताची वारी झाली. त्यानंतर ५-६ वेळा वेगवेगळ्या भागात फिरणे झाले आणि त्यातून हे पुस्तक तयार झाले. ५ भागात आपला देश विभागून त्याचा आढावा घेतला आहे.

आजकाल टूरिझम वाढला आहे तरीही आपण ठराविक भागातच फिरायला जातो. हा मनुष्य कुठे कुठे फिरला आहे. अगदी साघ्या लोकांच्या घरात राहून अतिथी देवो भव चा अनुभव घेतला आहे. आपल्या चालीरीती सण हे सगळे घरात राहून नीट बघितले आहेत. हिंदु फिलाॆसाॆफी सोप्या शब्दात लिहिली आहे. वेस्टर्नर्सना काय वाटते हे त्याला चांगले माहित आहे त्यांना आपल्या धर्माबद्दल पडणार्या प्रश्र्नांना छान उत्तरे दिली आहेत. आपले अनेक देव, आनेक भाषा, गुरूबद्दल आदर, अरेंज मॆरेज, एकत्र कुटुंब पद्धती, योगाचे महत्व , वसुधैव कुटुंबकम ची कल्पना, हिंदु धर्माची सहिष्णुता , देव सगळ्या गोष्टीत असण्याची कल्पना या सगळ्या गोष्टी अगदी सोपे पणाने सांगितल्या आहेत.

फोटो फार सुंदर आहेत. काही फुल पेज आहेत. राजस्थान, हिमालय व अजंता इथले विशेष उल्लेखनीय... आपल्याला एका ठिकाणी भारताचे कोलाज बघायचे असेल तर हे पुस्तक उत्तम आहे. यात काही ठिकाणी अपुरी माहिती वाटते( आपले गड, वारी इ) पण आपला देश एवढा मोठा आहे की सगळे एका ठिकाणी लिहिणे तसे अवघडच.

you can chk pictures here या लिंक वर या पुस्तकातील कंटेंट व फोटो बघता येतील. जरूर बघा.

दुसरा धर्म कसा आहे हे नीट समजावून घेउन, दुसरा देश कसा आहे हे लोकांपुढे मांडणे हे नक्कीच अवधड काम आहे जे या लेखकाने चांगले पार पाडले आहे.

खूप माहिती नसल्याने हे पुस्तक कंटाळवाणे होत नाही. प्रत्येक ठिकाणी धर्म कसा प्रभाव पाडत गेला, हे छान लिहिले आहे.
हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच आपण काही ठिकाणांना भेटी द्यायचे ठरवतो. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक नक्कीच आहे.

Tuesday, August 24, 2010

काही वाचनीय .... मेनी मास्टर्स मेनी लाइव्हस

परवा एक पुस्तक वाचनात आले. नुकतेच एका मैत्रिणीने सुचवले होते आणि लायब्ररीत समोरच दिसले. वाचनाचा योग दिसत होता. अनुवादित होते तरी पटकन उचलले. (आजकाल अनुवाद चांगले करतात).

डाँ ब्रायन वेस याने लिहिलेले व सुवर्णा बेडेकर यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक. (मेनी मास्टर्स मेनी लाईन्हस) मूळ लेखक पेशंटवर उपचार म्हणून संमोहन विद्या वापरतो. (गरज पडली तर). अशाच एका पेशंटवर उपचार करताना - तिच्या लहानपणीच्या आठवणी जाणून घेताना ती पूर्वजन्मात ल्या आठवणी सांगू लागते. एक नाही दोन नाही ८६ जन्मातल्या आठवणी ती सांगते. इजिप्त, ग्रीस, रोम इ देशात तिचे जन्म आहेत. तिथल्या भौगोलिक परिस्थितीवरून हे अंदाज काढले आहेत. कधी पुरूष कधी बाई, कधी गरीब कधी श्रीमंत. काही जन्मात चालू जन्मातील माणसे तिला दिसतात.

हळूहळू हा डाँ तिला दर जन्मातल्या मृत्युच्या वेळेपर्यंत घेउन जातो आणि मृत्यूनंतर काय - या गूढ प्रश्नाकडे घेउन जातो. त्यानंतर ती मुलगी दर वेळास
मृत्यूनंतर वर जाउन तरंगते आणि एका प्रकाशाची वाट बघते असे सांगते. प्रकाश दिसला की तिला उर्जा मिळते व मास्टर्स नी आज्ञा केली की तिचा पुनर्जन्म होतो. कधी कधी वाट बघावी लागते. आत्ताच्या जन्मातील काही माणसे परत तिच्या बरोबर असतात (वेगवेगळ्या रूपात )कारण ती त्यांचे काही देणे लागत असते. ती बोलताना तिचा व मास्टर्सचा आवाज वेगळा येतो.

हे सगळे वाचून आपल्याकडे मृत्यूनंतरची जी कल्पना आहे तेच सगळे लिहिले आहे असे वाटते. हिंदू फिलाँसाँफी इन अमेरिकन कँपसूल असेच वाचताना वाटते. एकदा वाटले या माणसाने आधी आपल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून मग फिक्शन लिहिले आहे. पण या डाँ ने सर्व टेप केले आहे व जरूर तिथे नावे बदलली आहेत. हिंदू तत्वज्ञानाचा उल्लेखही केला आहे. या उपचारानंतर ती तरूणी बरी झाली व काम करत आहे. तिचे भास स्वप्ने भिती गेले आहे. या डाँ ला काही स्वप्ने पडतात व तो या मास्टर्स शी संवाद करू शकतो. अगदी मनुष्य यंत्रांच्या आहारी जाणार व शेवटी आजून काही वर्षात तो सर्वनाश ओढवून धेणार ...

हे पुस्तक वाचल्यावर एक गूढ वातावरण नक्कीच तयार होते. ही पेशंट दुसरीकडे जाउन भविष्य बघून आली आबे. त्या बाईने भूतकाळात डोकावून याच गोष्टी क्राँसचेक केल्या आहेत. या नंतर अजून १२-१५ पेशंटवर हा प्रयोग केले त्या पैकी २-३ जणांना गेल्या जन्मातले आठवले.

प्रत्येक धर्मात एक श्रद्धा आसते त्यानुसार मी या गोष्टीकडे बघते. पण कुठेतरी या गोष्टीचे प्रूफ असावे असे नक्की वाटते. स्वमी विवेकेनंदांनी जेव्हा अमेरिकेत लेक्चर्स दिली तेव्हा टेसला नावाचा एक शास्रज्ञ ऐकायला येत असे. त्याच्याकरवी (फिजिक्स व गणित वापरून) अात्मा व पुनर्जन्म यांचे आस्तित्व पटवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला होता असे एका ठिकाणी वाचले होते. पण ते जमले नाही. आता आपलेच तत्वज्ञान वेस्ट च्या लोकांनी प्रूव्ह करून दाखवले तर............ हरकत नाही पण छान नाही वाटणार हे नक्की.

एक गोष्ट मात्र नक्की - आपल्याकडे ही गोष्ट खूप अवघड करून सांगतात. ध्यानानंतर काय वाटते ते सांगता येत नाही - तुम्ही करून पहा मग कळेल - या पुस्तकात या मुलीच्या निवेदनातून अगदी सोप्या भाषेत सगळे सांगितले आहे.

सध्या माझ्या एका मित्राने डां ची अपाँईंटमेंट धेतली आहे त्याला जर मागील काही घटना आठवल्या तर बघायचे आहे. त्याचा अनुभव टेप करून तो शेअर ही करणार आहे. आता उत्सुकता आहे त्याची टेप काय म्हणते याची.

Wednesday, June 23, 2010

काही वाचनीय -- खरेखुरे आयडांल्स

काही वाचनीय -- खरेखुरे आयडांल्स

अानंद अवधानी यांचे खरेखुरे आयडांल्स हे पुस्तक वाचण्यात आले. टी व्ही वर हल्ली या अायडाँल वाल्यांनी धुमाकुळ घातला अाहे. ४-५ महिन्यात तुम्हाला नवे नवे अायडाँल्स मिळतात. गाणे, नाच, अभिनय यात ही मंडळी स्वत ला शहाणी समजू लागतात. मिडिया त्याना खूप प्रसिद्धी देते. भरीत भर म्हणजे मतांच्या जोरावर निकाल देतात. म्हणजे पैसे असणारे जोरात.

अापल्या समाजात काही लोक असे अाहेत की जे खरोखर लोकोपयोगी काम करत अाहेत. अापले पैसे खर्च करून, अापला वेळ घालवून ही मंडळी एखाद्या कामात गुंतलेली आहेत. कित्येकांना गावातल्या लोकांना एकत्र आणण्यात खूप वेळ धालवावा लागला आहे. बरे या कार्यात सरकार पाठिंबा देईल असेही नाही. ही मंडळी खरी आयडांल्स. त्याच्याबद्दल टी व्ही वर फारच कमी कार्यक्रम ्असतात. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली ही कामे लोकांपर्यंत पोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे असे म्हणावे लागेल.

पाणी टंचाई वर रेन वाँटर हार्वेस्टींग , ग्रीन हाउस , आदिवासींना आरोग्य सेवा, शेतीवर केलेले प्र.ोग, खरोखर महाराश्ट्रात राहुन या गोश्टी लोकांपर्यंत पोचत नाहीत. रेन वाँटर हार्वेस्टींग वर आजकाल खूप चर्चा , आवाज ऐकू येतो पण प्रत्यक्षात किती काम होते हे बघण्यासारखे आहे. शेवटी सरकार वर सगळे आरोप करतात. खरोखर का हे काम मोठ्या पातळीवर होत नाही ... फारसे खर्चिक पण नाही. आजकाल लोकांकडे पैसा खूप आहे मग बिझिनेस हाऊसेस का पुढे येत नाहीत ... ज्यांच्याकडे पैसा व ईच्छा आहे अशी मंडळी पण ही कामे करू शकतात.

या लोकांनी जी कामे केली आहेत त्याला प्रसिद्धि दिली पाहिजे, तिथल्या टूर्स ठेवल्या पाहिजेत. टी वही वर मुलाखती घेतल्या पाहिजेत. टी व्ही मुळे तळागालळात माहिती पटकन पोचते. अभय बंग, दिनकर कर्वे, अण्णा हजारे, मनिषा ंम्हैसकर, टाकळकर, गणपतराव पाटील, खोपडे, बारवाले ही त्यातील काही नावे.

विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी ही ्अमेरिकेत शिकून तिथली नोकरी सोडून भारतात आली आहेत. बाहेरच्या लोकांपर्यंत पोचायचे कसे हे त्यांना माहीत आहे आणि त्याचा फायदा नककीच झाला आहे.

तुम्हीही भेटून पहा या लोकांना या पुस्तकामार्फत. तुम्हाला नककी आवडेल.

Friday, May 14, 2010

काही वाचनीय..... एका तेलियाने

काही वाचनीय..... एका तेलियाने
सध्या मराठी पुस्तके कथा, कादंबर्‍या यातून थोडी बाहेर पडून इतर विषयांनाही महत्व द्यायला लागली आहेत. या वर्षीच्या भारत भे्टीत जेव्हा पुस्तकांच्या दुकांनाना भेटी दिल्या तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. (आणि चांगलेही वाटले). इंग्लीश मध्ये अशी पुस्तके व सिनेमेही भरपूर आहेत. आता मराठी वाचक ही वेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांकडे आकर्षित होताना दिसत आहे.

’एका तेलियाने’ हे गिरीश कुबेर’ यांचे पुस्तक पाहिल्यावर असेच वाटले. आधी वाटले काहीतरी पेट्रोल भावांची आकोडेमोड, आणि क्लिष्ट असे हे पुस्तक असेल पण एकदा वाचायला लागल्यावर खूप इंटरेस्टिंग आहे. वेगळ्या विषयावरचे आहे. पुस्तक आवडायचे दुसरे कारण म्हणजे आम्ही सॊदी अरेबियात काही वर्षे वास्तव्य केल्याने यातील बरीच ठिकाणे माहितीची होती, पाहिलेली होती. सॊदी लोकांच्यात राहिल्याने त्यांचे थोडेतरी स्वभावविशेष कळले होते त्यामुळॆ पुस्तक वाचताना अजून मजा आली. तिसरी गोष्ट म्हणजे यात वर्णन केलेल्या बर्‍याच गोष्टींची ही पिढी साक्षीदार आहे. ओपेक, तेलाचे राजकारण, गल्फ वॉर या सगळ्याशी आपला डायरेक्ट संबंध नसला तरी आपण ते सर्व बघितले आहे

सॊदी अरेबिया चा तेलमंत्री झाकी यामानी याला केंद्र्स्थानी ठेवून तेलजगतातल्या सगळ्या गोष्टींचा आढावा छान घेतला आहे. हा ’मेन तेलिया’ या पुस्तकाचा हिरो म्हणता येईल, त्याच्या बरोबर इतर देशातल्या(तेल राष्ट्रातल्या) महत्वाच्या लोकांचीही छान माहिती दिली आहे. अमेरिकेची अरेरावी, त्याला प्रत्युत्तर देऊन यामानी ने केलेली देशाची भरभराट यात दाखवली आहे. सगळा तेलाच्या राजकारणाचा इतिहास आपल्यापुढे उभा केला आहे. ऒपेक ची स्थापना, तेलदर व त्याचे राजकारण, वेळोवेळी चाललेल्या लढाया, रशियाचा शिरकाव न होऊ देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न, सगळ्या राष्ट्रांना एकत्र ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळे यात चांगले मांडले आहे.ऒपेक च्या सदस्यांच्या अपहरणाचा प्रसंग अतिशय नाट्यपूर्ण लिहिला आहे. यामानीला देशातील अडाणी लोक व परकिय चलाख लोक या दोघांशीही एकदम लढा द्यावा लागला. तो मुळात शिकलेला असल्याने दूरवरचे पाहू शकत होता. हे पुस्तक वाचल्यावर एक मात्र पटते, नुसता राजा चांगला असून भागत नाही , मंत्रीही चांगलेच निवडावे लागतात तरच देश पुढे जाऊ शकतो. किंग फॆजल ने सॊदी मध्ये सुधारणा करताना किती कष्ट घेतले ते छान सांगितले आहे. सतत मुल्ला मॊलवींचा विरोध. परत धर्माची आडकाठी होच सुधारणा करताना.

मी यातल्या महत्वाच्या घटना साधारण क्रमानुसार माडून ठेवल्या आहेत. त्यावर नजर टाकली तर सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिल. जोडीला मिडल इस्ट चा नकाशा ही टाकला आहे.
१९१८ - व्हेनेझुएला -गोमेझ यांनी तेल विकून कर्ज फेडले, पायाभूत सुविधा आणल्या
१९३२ - सॊद तर्फे सॊदी अरेबिया नामकरण
१९३३- अमेरिकन कंपनी सोकॅलला प्रथम तेल खोदकामाचे हक्क
१९३७ - समाधानकारक तेल मिळू लागले
१९४४ - अरॅम्को ची स्थापना - सॊदीला पॆसा मिळावा म्हणून
१९५१ - इराण - महंमद मोसादेघ - प्रथम तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले
१९५९ - व्हेनेझुएलाचे पेरेझ व सॊदी मंत्री तारिक एकत्र येउन - ऒपेक चा जन्म
१९५६ - लिबियात तेल साठे मिळायला लागले. सुवेझ च्या दुसर्‍या बाजूला असल्याने महत्व
१९५७ - किंग फॆजल बरोबर यामानी यांची कामाला सुरूवात
१९५८ - इजिप्त व सॊदी मध्ये मॆत्री - झेककडून शस्त्र खरेदी
सिरियाचा हल्ला, सॊदीला खर्च नियंत्रण गरजेचे
बिन लादेन च्या वडीलांची मदत
१९६२ - झाकी यामानी ३२ व्या वर्षी तेलमंत्री, पेट्रोमिन ची स्थापना, युनिव्हर्सटिची स्थापना, रूमानियाबरोबर धान्यकरार
१९६७ - इस्त्रायल विरूद्ध इजिप्त,जॉर्डन, सिरिया इराक ६ दिवसांचे युद्ध, अमेरिका विरोधाची लाट, तेलाचा कोट ठरविण्यासाठी ओआपेक
ची स्थापना
१९६९ - गडाफी नी भाववाढ सुरू केली. यामानींची मदत घेऊन ऒक्सी कंपनी वर बंदी व इतर कंपन्याही दबावाखाली आणल्या
१९७१ - प्रत्येक देशाशी वेगळ्या दराचा करार. लिबियाचा जास्त फायदा.
१९७३- बायबॅक तेलाचा रेट वाढवला. तेलाचे भाव खूप वाढवले. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इजिप्त सिरियाच्या बाजूने तेलकंपन्यावर बहिष्कार शेअर बाजार कोसळले, मंदी, १६ दिवसांचे युद्ध इजिप्त इस्त्रायल करार होऊन युद्ध संपले.
१९७५ - सॊदी राजाची हत्या, कार्लोस चे अपहरण नाट्य
१९७८ - खोमेनी शहा विरोध, अरॅम्को बद्दल माहिती ला नकार
१९८० - इराक इराण युद्ध अतोनात तेल भाववाढ सॊदीत अतोनात पॆसा
१९९० - इराक कुवेत युद्ध. कुवेतसाठी अमेरिकन फॊजांना सॊदी भूमीवर परवानगी, सॊदीत असंतोष, अल काईदाचा जन्म

Monday, April 26, 2010

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही पुस्तके वाचली की ती आपल्याला आवडतात. कधी त्यातल्या साहित्यामुळे, कधी पुनःप्रत्ययामुळे, कधी त्यातल्या व्यक्तिरेखेमुळे तर कधी आपले व लेखकाचे विचार कुठेतरी जुळतात म्हणून. एकाच पुस्तकातले प्रत्येकाला वेगळेच काहीतरी भावते. सध्य़ा मराठी पुस्तकांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी अनुवादित पुस्तकांची क्वालिटी इतकी चांगली नव्हती हल्ली ती खूपच सुधारली आहे. मी जास्त करून मराठीच वाचते. माझे स्वतःचे कलेक्शन ही बर्‍यापॆकी झाले आहे. अगदी विमानात प्रवास करताना पण मी साप्ताहिक सकाळ, त्यातले शब्द्कॊडे पसंत करते. इंग्लीश पुस्तकांकडे हात जरा कमीच जातो. याला कारण माझा आळस असेल किंवा सध्य़ा सोपेपणाने मिळणारी मराठी पुस्तके असतील. अमेरिकेत आल्यापासून तर लायब्ररीमध्ये मनसोक्त पुस्तके मिळतात पण मी मात्र मराठीला चिकटून आहे. इथे आमच्या छोट्या गावात आता मराठी पुस्तकांची लायब्ररी पण सुरू केली आहे त्यामुळे अजून वाचनाची चंगळ. अशीच काही आवडलेली पुस्तके तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न. बघा कदाचित तुम्हालाही ती आवडतील.

या वर्षी भारतात सुट्टीवर आले असताना नेहेमीप्रमाणे पुस्तक खरेदी झाली स्वतःसाठी आणि लायब्ररीसाठी. त्यातच ’किमयागार’ हे अच्युत गोडबोले यांचे पुस्तक आणले. या पुस्तकाची प्रस्तावना आणि पहिला भाग वाचतानाच, ’अरे मला हेच म्हणायचे होते’ असे बरेच वेळा झाले आणि भराभर पुढचे वाचत गेले. विशेष करून देवळे आणि त्यातील राजकारण, भारतीय लोकांचे आमच्या वेदात सगळे आहे म्हणून बढाया मारणे याचा इथे सतत अनुभव येतो. लोकसंख्या व गरिबी ही कारणे सतत पुढे करणे भारतात चालू असते पण साधारण त्याच परिस्थितीत युरोप मध्ये नोबल लॉरेटस होऊ शकले हे कसे? आपल्या देशात हुशारीला कमी नाही. इथे ही नोबेल प्राइज विनर तयार व्हावेत.

हे पुस्तक संशोधकांवर लिहिले आहे.कुणीतरी शास्त्रज्ञांवर पुस्तक लिहिले आहे हे पाहून फार बरे वाट्ले. आपण शाळॆत असताना काही नावे वाचतो, त्यांच्या शोधांबद्दल अभ्यास करतो व नंतर त्यावर काही करत नाही. बरे अभ्यासाच्या पुस्तकात फारच थोडी नावे असतात (सिग्नेचर). या पुस्तकात या संशोधकांबद्दल बरीच माहिती आहे. त्यांनी घे्तलेले कष्ट, त्या वेळचे सामाजिक जीवन, धार्मिक आडकाठ्या , लोकांचे स्वभाव या सगळ्याचे छान वर्णन आहे. आपण सायन्स परत शिकतो आहोत असे अधून मधून वाटते. लेखकाने बर्‍याच पुस्तकांचे दाखले दिले आहेत. त्यांनी वाचलेले सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवले आहे. प्रत्येक संशोधकाचा शोध व त्याविषयी माहिती सांगितली आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते की मनुष्य स्वभाव हा सगळीकडे सारखा असतो. कुठल्याही देशात धर्म हा आडकाठी बनतो या ना त्या रूपाने. (एंजल ऍंड डेमन्स पाहिला असेलच.)

किमयागार या पुस्तकात भॊतिक शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जीवशास्त्र या सगळ्या क्षेत्रातल्या काम केलेल्या लोकांबद्दल माहिती मिळेल. प्रश्न निर्माण होणे आणि ते सोडवणे हे काम त्या मानाने सोपे होते पण ते लोकांना समजावून सांगणे फार अवघड होते या लोकांना . विचार करा सुरूवातीला ’पृथ्वी स्वतःभोवती फिरते’ हे मान्य करायला लोकांना किती कठिण गेले असेल. कारण ते धर्माच्या विरूद्ध होते. शास्त्रज्ञांनी केलेली मेहेनत, प्रयोगांसाठी केलेले कष्ट, यांचे या पुस्तकात चांगले वर्णन केले आहे. वर फेकलेला दगड खाली येणे आणि चंद्राने पृथ्वीभोवती फिरणे हे गुरूत्वाकर्षण या एकाच नियमांचे अविष्कार आहेत हे न्यूटन ने लोकांना कसे पटवले असेल याची कल्पना येते. स्टीफन हॉकिंग ने स्वतःच्या व्याधीवर मात करून केलेले संशोधन याबद्दलही छान माहिती आहे.

आपल्याकडे एखाद्या छोट्या मुलाला शाहरूख खान किंवा सचिन ही नावे पटकन येतील पण त्याच्या या हिरोंना जो टी व्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो त्या माणसाचे नाव माहित असतेच असे नाही. याच टी व्ही वर जर एखादा प्रोग्रॅम शोधांबद्दल दाखवला तर कितीतरी सोपे पणाने ही नावे सगळ्यांपर्यंत पोचतील. मिडिया हा आजकालचा सर्वात महत्वाचा घटक आहे. बी बी सी वर अशा खूप डॉक्युमेंटरीज असतात ज्यात या लोकांच्या शोधांबद्द्ल माहिती दिलेली असते. या जर शाळेत दाखवल्या तर नक्कीच फायदा होईल. अनुवंशिकतेसाठी मेंडेलने केलेले वाटाण्यावरचे प्रयोग, डी एन ए चे मॉडेल मुलांकडून करवून घेउन त्याच्यावर बी बी सी ने केलेली फ़िल्म अशा अनेक गोष्टी यात आहेत. वर्गात नुसती थिअरी शिकवताना जोडीने अशा फ़िल्म्स दाखवल्या तर ते मुलांच्या मनावर पटकन ठसते. बी बी सी किंवा हिस्टरी चॅनेल्स यावर अशा छान फिल्म्स असतात त्या शाळेत दाखवल्या गेल्या पाहिजेत काही नाही तर फ्री पिरियड मध्ये.

गंमत म्हणजे किमयागार या नावाची ७-८ पुस्तके इंटरनेट वर दिसली. हे नाव लेखकाना फार आवडते असे दिसते.