Showing posts with label भटकंती-युरोप. Show all posts
Showing posts with label भटकंती-युरोप. Show all posts

Friday, July 10, 2009

आमची युरोप टूर शेवटचा भाग (इटली, फ्रान्स)

आमची युरोप टूर शेवटचा भाग
(इटली, फ्रान्स)

व्हेनिस ला पोचेपर्यंत दुपार झाली. वाटेत व्हिसा चेकिंग, करन्सी चेंज वगॆरे नाटके झाली. इटलीत शिरताना प्रत्येकजण लिराच्या बाबतीत लक्षाधीश झाला. लिराची किंमत डॉलरच्या तुलनेत फारच कमी आहे. ६५००० लिरामध्ये जेवण झाले. जाताना प्रवासात बरीच टनेल्स लागली. एका टनेल मधून बाहेर पड्लॊ की आपण बर्‍याच उंचावर आलेलो असतो. आमच्या गाईड ने जाताना थोडे लेसन्स दिले. इथे कोल्डा म्हणजे गरम असा अर्थ होतो. बाथरूम मध्ये सी म्हणजे कोल्ड वॉटर अशी आपल्याला सवय असते. इथे मात्र गरम पाणी असा अर्थ होतो. गरम कॉफी ला कोल्डा कापुचिनो अशी ऑर्डर द्यायची. हॉटेल मध्ये बाहेरच्या बाजूला बसलॊ तर जास्त रेट आणि आत बसलो तर कमी. पॅरिस मध्ये हा प्रकार फार दिसतो (आपल्या उलट). इटली मध्ये इंग्लीश फार कमी बोलतात पण टूरिस्ट असले की बरोबर वागतात. ’ट’ चा उच्चार ’त’ असा होतो.

व्हेनिस हे १००-१२५ बेटांचे मिळून झालेले गाव. ’कालव्यांचे शहर’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. तिथे जाण्यासाठी बोटीची सोय होती. गेल्या गेल्या मुरानो ग्लास फॅक्टरी बघितली. मुरानो बेटावर या काचकामाचे मॊठे कारखाने आहेत. प्रसिद्ध व्हेनेशिअन ग्लास इथे बनवतात. छान प्रात्यक्षिक दाखवले. हाताने पाईप वापरून वेगवेगळे नमुने करतात. वेगवेगळे रंग मिसळून छान फ्लॉवर पॉट्स बनवले त्या कारागिरांनी. अशा आता फक्त १०-१२ फॅमिलीज राहिल्या आहेत. त्यांच्या शोरूम मध्ये खूप नमुने ठेवले आहेत. तिथे थोडी खरेदी झाली. किमती मात्र भरपूर होत्या.

त्यानंतर मार्केट स्क्वेअर मध्ये २-३ तास होतो. इथे भरपूर टूरिस्ट होते. आजूबाजूला कबूतरेही खूप होती. हा जगातला सर्वात जास्त फोटो काढला गेलेला स्क्वेअर मानला जातो. एक चर्च/ बॅसिलीका बघण्यासारखी आहे. त्यात मोझॅक स्टाईल ने सुंदर चित्र बनवले आहे. अगदी नीट पाहिल्या तर टाईल्स दिसतात नाहीतर एकसंध चित्र दिसते. नंतर बेल टॉवर वर गेलो. तिथून पूर्ण व्हेनिस चे दृष्य दिसते. आम्ही वर चढत असताना बरोबर ६ वाजता ४ ही बेल्स जोरात वाजायला लागल्या. इतक्या मोठ्या बेलचा आवाज ऎकण्याचा हा पहिलाच अनुभव. बहुतेकांनी गोंडोला राईड घेतली. ह्या बहुतेक काळ्या बोटी असतात वर सोनेरी नक्षी. ४-५ जण बसतात. चालवणारा एखादे गाणे ऎकवतो. वाटेत नेपोलिअनच्या घरासारखी महत्वाची ठिकाणे दाखवतात. हे शहर पूर्ण कालव्यांनी जोडले आहे. भरती ऒहॊटी मुळे पाणी स्वच्छ रहाते असे म्हणतात. मला स्वतःला मात्र ते पटले नाही. ग्रॅंड कॅनॉल वर छान पॅलेस आहेत. गावात छोटी दुकाने व रेस्टॉरंट्स भरपूर. त्यांना छोट्या पुलाने जोडले आहे. इथला एक तुरूंग ही प्रसिद्ध आहे. एकंदरीत व्हेनिस हे बरेच जुने व वेगळे वाटते. काही गोष्टींची उगाच जास्त प्रसिद्धी करतात तसा थोडा प्रकार वाटला.


यानंतरचा मुक्काम होता फ्लोरेन्स चा. इथे एक भव्य ’दूमॊ’ आहे. हा जगातला सर्वात मोठा. २०० वर्षे बांधायला लागली. हिरवा संगमरवर प्रथमच बांधकामात पाहिला. हिरवा, चॉकलेटी व ब्राउन अशा ३ रंगात बांधकाम आहे. पुन्हा एकदा तुकड्या तुकड्यात फोटो झाले. पूर्ण फोटो घेणे अशक्य. इंटरनेट वर काही फार छान फोटो आहेत त्यातले काही टाकले आहेत. दारावर एवढे काम केलेले आहे की आपण बघता बघता दमून जातो. प्रत्येक दारावर बायबल मधली स्टोरी चित्ररूपात काढलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा डोमची दुरूस्ती चाललेली होती. आसपास बरेच अंतर वाहनांना बंदी होती. बरेच रस्ते लाल विटांचे बांधलेले होते.. मला बर्‍याचदा वाटायचे की मी फूटपाथवरून चालते आहे, मग लक्षात यायचे की अरे हा तर रस्ता आहे. पुढ्च्या चॊकात खूप संगमरवरी पुतळे ठेवले आहेत. इटली त एकंदर इतके पुतळे आहेत की त्याकाळी ’पुतळे मेकर’ एकदम डिमांड मध्ये असतील. एक प्रसिद्ध म्युझिअम बाजूलाच होते पण ते वेळेअभावी बघता आले नाही. नंतर आर्नो नदीवरचे पूल पाहिले. या स्क्वेअर पासून जवळ एक टेकडी आहे त्यावरून पूर्ण फ्लोरेन्स, त्यातली मोठी स्ट्रक्चर्स, बरेच पूल दिसतात. वरती मायकेल ऍंजेलोचा पुतळा आहे. त्याने प्रथम पुरूषांचे पुतळे बनवायला सुरूवात केली. तोपर्यंत फक्त बायकांचे पुतळे बनवत. डेव्हिड हा त्याचा मॉडेल होता. मायकेल ऍंजेलोच्या पूर्ण कामात फक्त एका पुतळ्यावर त्याची सही आहे आणि तो व्हॅटिकन मध्ये आहे.
इथे लेदर गुड्स चांगली मिळतात. एका शॉप मध्ये बरीच खरेदी झाली. मी मनाचा हिय्या करून एक १२५ डॉलर्स ची पर्स घेतली. यापूर्वी प्रसन्नने आणलेली पर्स ५-६ वर्ष छान टिकली होती म्हणून धाडस केले. जाणकारांना ती हात लावताच कळते. लेदर जॅकेट्स, बेल्ट्स अशी बरीच खरेदी लोकांनी केली. त्यानंतरचा मुक्काम रोम मध्ये होता. इथे काहीतरी जुनाट, पडके बघावे लागणार अशी माझी अगदी खात्री होती. ती तितकीशी खरी ठरली नाही. ऒल्ड सिटी ऒफ रोम व न्यू सिटी असे २ भाग केले आहेत. ऒल्ड सिटी च्या बाहेर पूर्ण भिंत आहे. ती अजूनही सुस्थितीत आहे. ऒलिव्ह ट्रीज व अंब्रेला शेप ट्रीज आजूबाजूला खुप दिसतात. इन जनरल इटलीत खूप भव्य इमारती आहेत. उंची खूप असते. आमचा गाईड खूप वयस्कर होता पण खूप स्मार्ट होता. प्रथम त्याने स्पॅनिश स्क्वेअर मध्ये फ्रेंच स्टेप्स दाखवल्या. या ठिकाणी बर्‍याच सिनेमांचे शूटिंग झाले आहे. त्यापॆकी रोमन हॉलिडे व टॅलेंटेड मि रिपली हे दोन पाहिलेले होते. नंतर ट्रेव्ही फाउंटन कडे गेलो. हे इथले सर्वात जुने फाउंटन. त्याकाळचा पाण्याचा सोर्स. सध्या यात अगदी कमी पाणी आहे. या फाउंटन कडे पाठ करून आत नाणे टाकले की परत तुम्ही रोमला जाता असे म्हणतात. अमृताने नाणे टाकले बघू परत जाते का? आतमध्ये एक माणूस मोठ्या गाळण्यात नाणी गोळा करत होता. रोममध्ये इन जनरल खूप चालावे लागते. चांगले वॉकिंग शूज या ट्रीपसाठी आवश्यक आहेत. इथे भरपूर टूरिस्ट भेटतात. चोरांपासून सावध असा इशारा आमचा गाईड अधून मधून देत असे.
दुपारी व्हॅटिकन सिटी ला गेलो. ही सर्वात छोटी कंट्री आहे. आतमध्ये बसेस ना परवानगी नव्हती त्यामुळे भरपूर छालावे लागले. पोप चे रहाण्याचे ठिकाण हेच. आपण नेहेमी टी व्ही वर जी जागा बघतो, ती प्रत्यक्ष समोर होती. व्हॅटिकन सिटी सेंट पीटर्स कॅथिड्रल साठी प्रसिद्ध आहे. हे जगातले सर्वात मोठे कॅथेड्रल. दारात जाताच याची भव्यता जाणवते. आत शिरतानाच दोन्ही बाजूला अर्ध गोलाकार खांब आहेत. (२८०) त्या प्रत्येक खांबावर एक एक पुतळा आहे आणि हे पुतळे अजून बर्‍या स्थितीत आहेत. मध्यावर एक उंच खांब आहे तो मेणबत्तीसारखा वाटतो. आत जाताना बरीच सेक्युरीटी होती. स्लीवलेस, शॉर्ट्स व मिनिज ना बंदी होती. हे लोक खूप ऍडव्हान्स असल्याने अशा कारणासाठी बंदी करतील असे वाटले नव्हते. टूर गाईड ने सांगून सुद्धा एक जण स्लीव्हलेस मध्ये आलीच. तिला अडवले मग एकीची ऒढणी तिला दिली व प्रवेश मिळवला. आपल्या देवळात अजून तरी असा प्रवेश नाकारला जात नाही. याचा घुमट मायकेल ऍंजेलो ने बनवला आहे. त्यावर सुंदर मोझॅक टाईल्स ची डिझाईन्स आहेत. ३००-३५० फूटावर जाउन त्याकाळी ही डिझाईन्स कशी बनवली देव जाणे. झोपूनच बनवावी लागली असतील आणि बघणारा माणूस ३०० फूट खालून बघणार हेही लक्षात घ्यावे लागले असेल. रंगचित्रे नसल्याने फोटो ला बंदी नव्हती. एक ममी पण होती बाजूच्या दालनात. पुतळे व पेंटिंग्ज बघून शेवटी तुम्ही दमून जाता. येशूला क्रूसावरून खाली उतरवताना मेरीने त्याला मांडीवर घेतलेले फेमस पेंटिंग व पुतळा इथे आहे या एकाच कलाकृतीवर त्याची सही आहे नाहीतर आजकाल सहीची लोकांना पहिली काळजी असते. तो पेंटिंग, स्थापत्य, चित्रकला, बांधकाम अशा अनेक कलात पारंगत होता. मायकेल ऎंजेलो ग्रेट आणि व्हॅटिकन इज ग्रेट!!!!!!!!
त्यानंतर कलोझिअम हे भव्य ऍम्पिथिएटर पाहिले. यातला बराच भाग आता पडला आहे. ८ वर्षे बांधकाम चालले होते याचे. ६५००० लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती. ६ मजले उंची आहे. प्राण्यांचे खेळही होत असत. त्यांना ठेवण्यासाठी तळघराची सोय होती. भरपूर कमानी भिंतीत होत्या. पूर्वी त्यात पुतळे होते आता त्यात फक्त अवशेष राहिले आहेत. भिंतीतले शिसे ही काढले आहे. पूर्वीचे कलोझिअम कसे होते याची बरीच चित्रे लावली होती. या ठिकाणी एक छान पुस्तक मिळाले. पूर्वीचे फोटो आताच्या फोटोवर सुपर इंपोज केले आहेत. ते पाहून जुन्या काळी या गोष्टी कशा दिसत असतील याची कल्पना येते. आपल्याकडच्या किल्ल्यांसाठी अशी पुस्तके बनवायला हवीत असे रायगड बघताना वाटले. बाहेर जुन्या वेशात काही मुले मुली पोझेस देत होती. याच्या आजूबाजूला बरीच जुनी स्ट्रक्चर्स पडक्या अवस्थेत उभी आहेत. रोमन फोरम, जुने ब्रिजेस वगॆरे. एक ५० बी सी चा ब्रिज आहे आणि आजही तो वापरात आहे. खूप दगडी बांधकाम इथे पाहिले. वाटेत एक भव्य कोर्ट बिल्डींग ही पाहिली. रोमन लोकांनी जुन्या गोष्टी छान जपल्या आहेत. ग्रेट आर्किटेक्चर. तुम्हाला सगळी म्युझिअम्स बघायची असतील तर ५-६ दिवस तरी वेळ द्यायला हवा.
आमचा पुढचा स्टे पिसा ला होता. सकाळी सकाळी बसने लिनींग टॉवर पासून ५ किमी वर सोडले. त्यापुढे त्यांच्या बसने जावे लागते. आत जाताना दोन्हीकडे खूप दुकाने होती. त्यातील काही कोनिकल होती. त्याच्य्यात खूप कप्पे होते आणि त्यामुळे खूप गोष्टी डिसप्ले करता येत होत्या. मस्त डिझाईन होते. पिसाच्या मनोर्‍याच्या बाजूला एक बेल टॉवर व बाप्टिस्ट्री आहे. ते टॉवर पेक्षा छान वाट्ते. लिनींग टॉवर हे जगातील ७ आश्चर्यापॆकी एक आहे. सुरूवातीला हा टॉवर कलतोय हे गॅलिलिऒने दाखवले. त्याच्या बेसला बशी सारखे स्ट्रक्चर आहे. त्यात शिसे भरून बॅलन्स करायचा प्रयत्न केला होता. या मनोर्‍याचे ७ मजले आहेत. साधारण २१ फ़ूट हा टॉवर कललेला आहे. सध्या कलण्याचे प्रमाण कमी आहे. पिसा हे गाव तसे अगदी छोटे आहे. जगातील एक आश्चर्य आपण बघतोय असे हा टॉवर बघून काही मला वाटले नाही.

यानंतर जिनीव्ह वरून फ्रान्सकडे जायचे होते. रोज सकाळी फटाफट ब्रेकफास्ट करून मंडळी बसमध्ये जागेसाठी भांडत असत. रोज सकाळी हे दृष्य दिसत असे. रोटेशन सिस्टीम नसल्याने हा प्रकार होत असे. वय वाढ्ते तशी लोकांची भांडायची हॊस वाढते असे वाटे. या ट्रीप मधला हा एकच निगेटीव्ह पॉईंट होता. बाकी सर्व व्यवस्था छान होती. हॉटेल्स ७०% चांगली होती. युरोप मध्ये सुरूवातीच्या हॉटेल्स मध्ये ब्रेकफास्ट चे प्रकार जास्त असत. पॅरिस मध्ये सर्वात कमी. इट्ली पासून फ्रान्स चा प्रवास सगळ्यात मोठा सलग प्रवास होता. ७ तास लागले. हे रस्ते खूप छान आहेत. ७० ते ८० टनेल्स लागली. एका ट्नेल मधून बाहेर आलो की बरीच उंची आपण चढतो/ उतरतो. घाटातले कमानीवाले रस्ते ब्रिजेस खूप छान आहेत. या लोकांनी इतक्या वर्षापूर्वी किती छान बांधकाम करून ठेवले आहे. याच रस्त्यावर एक डोंगर दिसतो. तो मार्बल चा सोर्स आहे.- करारा मार्बल. रस्त्यावर बरेच मार्बल स्लॅब्स स्टोअर केलेले दिसतात. काही रस्ते याच्या चुर्‍यामुळे चमकतात. जाताना एका बाजूला हिरवे डोंगर, मध्ये घाटातला रस्ता, गावे व दुसर्‍या बाजूला समुद्र असा सुंदर रस्ता. पाण्याचा निळाशार रंग सतत सोबत करतो. स्विस बॉर्डर वर परत चेकिंग झाले. हा चेकपॉईंट चक्क टनेल मध्ये आहे. त्यानंतर वेवे हे चार्ली चॅप्लीनचे गाव लागले. त्याच्या घराचे रूपांतर आता लायब्ररीत केले आहे. मॉन्ट्रे या गावात नेसले चे हेड क्वार्टर आहे. स्वित्झर्लंड हा देश इतका छोटा असून तिथे खूप महत्वाची ऑफिसेस, रेड क्रॉस चे हेड क्वार्टर अशी अनेक महत्वाची ऑफिसेस आहेत. गावात शिरताना आल्प्स च्या रेंजेस खूपच सुंदर दिसतात.
जिनीव्ह मध्ये लेक जिनिव्ह पाहिले. इथले फाउंटन जगातले सर्वात उंच म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या खालोखालचे जेद्दाला(सॊदी त) पाहिले होते. या लेकजवळ एक फ्लोअर क्लॉक आहे. या लेकच्या खाली पार्किंग लॉट केलेला आहे हे जेव्हा कळले तेव्हा जर या लेकमधले पाणी खाली झिरपले तर असा नको तो विचार मनात आलाच. (कन्या रास).. इथे परत चॉकलेट्स, स्विस नाईफ अशी खरेदी झालीच.

यापुढचा शेवटचा टप्पा जिनिव्ह ते पॅरिस होता. आमचा गाईड वाटेत सतत चोरांपासून सावध रहाण्याची सूचना देत होता. युरोप मध्ये रेफ्युजी खूप असतात. त्यांची तरूण मुले पॉकेटमार असतात. त्यांच्या वयामुळे पोलिस त्यांना कायम स्वरूपी पकडू शकत नाहीत. सर्वच ठिकाणी टुरिस्ट खूप होते. गर्दी ही खूप होती पण सुदॆवाने कुणाची चॊरी झाली नाही. पॅरिस मध्ये स्केटस वरून जाणारे पोलिस दिसले. स्वित्झर्लंड मध्ये नेचर्स ब्युटी जास्त तर इटली पॅरिस मध्ये बांधकामे जास्त बघण्यासारखी आहेत. पोचल्या पोचल्या गाईडेड टूर होती. चिनी गाईड इंडिअन लोकांना फ्रेंच लोकांबद्द्ल सांगत होता. प्रथम आर्च पाहिली. यावर जवानांची नावे, शिल्पे आहेत. ते पाहून आपल्या इंडिया गेट ची आठवण झाली. पॅरिस मधला एक रस्ता शांज अलिझे हा खूप प्रसिद्ध आहे. रात्रीचा एक तास सॊडला तर म्हणे यावर सतत वर्दळ असते. इथली हॉटेल्स, बिल्डींग्ज अर्थातच खूप महाग आहेत. हा रस्ता सिंगापूर च्या ऑर्चर्ड स्ट्रीट ची आठवण करून देतो. नंतर कॉंकर्ड स्क्वेअर ला गेलो. बर्‍याच हिंदी गाण्यात दिसणारा एक पिलर इथे दिसतो. इजिप्त कडून या लोकांनी हा भेटी दाखल मिळवला. ऑपेरा हाउस बघितले अतिशय सुंदर बिल्डींग आहे. पॅरिस मध्ये महत्वाच्या बिल्डींग्ज व काही मेटॅलिक पार्ट सोनेरी रंगात रंगवले आहेत. ते लांबून लक्ष वेधून घेतात व रात्री त्यावर लाईट टाकल्यावर खूप छान दिसतात. पॅरिस मध्ये ट्रॅफिक भरपूर होता. गाड्यांच्या नंबर प्लेटस ७५ ने एण्ड होतात. मेन राउंड अबाउट मधून जो व्यवस्थित गाडी चालवतो त्याला म्हणे लायसेन्स मिळते. या ठिकाणी १२ रस्ते मिळाले आहेत त्यातून गाडी काढणे खरेच कॊशल्याचे काम आहे.

पॅरिस मध्ये शिरल्यापासून बर्‍याच वेळा आयफेल टॉवर दिसला. या टॉवरच्या पहिल्या मजल्यापेक्षा उंच बिल्डींग बांधायला बंदी आहे. अशा सगळ्या बिल्डींग दुसर्‍या भागात आहेत. हा टॉवर वर्ल्ड ट्रेड एक्झिबिशन साठी बांधला. प्रथम दर्शनी हे स्ट्रक्चर काही एवढे इंप्रेसिव्ह वाट्त नाही. पॅरिस च्या लोकांनी एक्झिबिशन नंतर हे पाडायचे ठरवले पण आयफेलने एक उपाय शोधून काढला. त्याच्या टोकावर एक ज्योत होती ती काढून एक टी व्ही ऍंटेना बसवली व हे स्ट्रक्चर वाचवले. आज ते पॅरिस चे आकर्षण ठरले आहे. पहिल्या मजल्यावर लिफ्ट ने गेलो. तिथून खालचे दृष्य छान दिसते. अजून वरती वेळेअभावि गेलो नाही. काही मंडळी पायर्‍या चढून जात होती. त्या दिवशी खूप वेळा हा टॉवर पाहिला. रत्री लाईटिंग केल्यावर मस्त दिसत होता. दर तासाच्या ठोक्यावर या टॉवर चे दिवे ५ मि. ब्लिंक करत होते. आता बहुदा ब्लिंकिंग बंद आहे. संध्याकाळी सीन नदीवर क्रूज होता. सर्व बोटींवर सतत कॉमेंट्री चालू असते. बर्‍याच भाषांचे ऑप्शन असतात. नदीतून जाताना परत सगळे स्पॉटस पहायला मिळाले. या नदीवर अनेक ब्रिजेस आहेत. त्यापॆकी अलेक्झांडर ब्रिज खूप देखणा आहे. पाण्यातून जाताना निळ्या आकाशावर पिरॅमिड फार सुंदर दिसतो. परत नकळत १५-२० फोटो होतातच. अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रेंच लोकांनी गिफ्ट दिला आहे. त्याचे आर्किटेक्चर ही आयफेल चेच. ह्या स्टॅच्यूची छोटी प्रतिमा नदीतून जाताना दिसते. ह्या क्रूझ नंतर आमच्या ट्रॅव्हल कंपनीने एक सरप्राईज जेवण दिले. आयफेल टॉवर समोर एक पिरॅमिड म्हणून कॉन्फरन्स रूम आहे. त्याच्या ८ व्या मजल्यावर डिनर होते. सगळीकडून काच असल्याने समॊर टॉवर छान दिसत होता. जेवणही तितकेच छान होते. पिणार्‍यांना वाईन फ़्री होती. मिशेल नावाच्या एका डान्सरने इजिप्शिअन डान्स केला. ज्यांना नाचण्यात इंटरेस्ट होता त्यांनी नाचून घेतले. मी मात्र बाहेर जाउन तो टॉवर डोळ्यात भरून घेतला. कितीही वेळ पाहिला तरी तेवढाच छान दिसत होता.
युरोप मध्ये वाईन्स खूप छान मिळतात. किआंती वाईन फ़ेमस. बाटल्यांचे आकार व वाईन दोन्ही छान होते. पॅरिस मधे एक ड्यूटी फ़्री शॉप आहे - बेनलक्स म्हणून तिथे लिपस्टिक्स, परफ्यूम अशी महागडी खरेदी झाली. इथल्या सेल्स गर्ल्स फारच सुंदर होत्या. पॅरिस मध्ये प्रथम सेंट वापरायची सुरूवात झाली. इथल्या व्हॅलीत खूप फुले फुलतात. पूर्वीच्या काळी म्हणे राजे राण्या रोज अंघोळ करत नसत. कारण अंघोळी नंतर पोअर्स ओपन होऊन जर्म्स आअत जातील असे त्यांना वाट्त असे म्हणून महिन्यातून १-२ वेळा अंघोळ करून भरपूर सेंट्स वापरत असत. आता यातले खरे खोटे माहित नाही. गाईड्ने सांगितलेली गोष्ट. आम्ही गोष्ट बाजूला ठेवून मजबूत सेंटस ची खरेदी केली. रस्त्यावर खूप फरारे गाड्या, स्मार्ट कार्स पाहिल्या. स्मार्ट कार हे मर्सिडीज व सुझुकी चे कॉंम्बिनेशन. अगदी छोटी गाडी. ३ लोक आरामात बसतात. युरोप चे रस्ते छोटे असल्याने अशी डिझाईन्स पॉप्युलर होतात. वाटेत नेपोलिअनचे थडगे पाहिले. त्याला म्हणे ७-८ पेट्यात तुकडे करून पुरले होते. इथे नेपोलिअन बोनापर्ट न म्हणता नेपोलिअन १-२ असे म्हणतात. ऑपेरा हाउस जवळ एक बिल्डींग पाहिली तिला एकही खिडकी नाही. नॉट्रे डॅम चे कॅथेड्रल मात्र कमी वेळात पाहिले. त्यातले स्टेन ग्लास आणि स्टॅच्यू सुंदर आहेत.
दुसर्‍या दिवशी सकाळी म्युझिअम कडे जाताना एक स्क्वेअर मध्ये डायनाला डोडि ने प्रपोज केलेले हॉटेल, त्याने घेतलेल्या रिंग चे दुकान पाहिले. त्यांचा अपघात झालेले टनेल ही पाहिले. त्यावर आयफेल टॉवर वरून काढलेली फ्लेम ठेवली आहे व एक नवीनच ’डायना पॉईंट’ तयार झाला आहे. लुव्हर म्युझिअम अतिशय भव्य आहे. पूर्ण बघणे अशक्य. मोनालिसाचे पेंटिंग मात्र प्रत्येकाने पाहिले. व्हीनस चा स्टॅच्यू ही ’मोस्ट वॉंटेड’ होता. या म्युझिअम मध्ये इतकी चांगली पेंटिंग्ज आहेत की शेवटी फार चांगल्या गोष्टींचाही कंटाळा येतो तसे झाले. असाच अनुभव सालारजंग म्युझिअम मध्ये आला होता. या म्युझिअम मध्ये ठिकठिकाणी स्टुडंटस बसून चित्रे काढ्त होते. चालून दमलो या म्युझिअम मध्ये.

दुपारी पॅलेस ऑफ व्हर्साय पाहिला. हा गावाबाहेर आहे. तिथे लुई द फिलीप ७२ वर्षे राहिला. अतिशय प्रचंड असा हा पॅलेस आहे. पूर्वी मोबाईल नसताना कसे लोक रहात असतील कुणास ठाउक? मागच्या बाजूला शेकडो पुतळे, कारंजे व लांबवर पसरलेली बाग आहे. शिकारीसाठी खुप मोठी जागा आहे. सध्या या पॅलेस ची काहीच दालने उघडी आहेत. राजाची लिव्हींग रूम, डायनिंग रूम, डान्सिंग रूम व बेड रूम . सगळीकडे जुने फर्निचर मेंटेन केले आहे. डान्स रूम मध्ये सुंदर शॅंडेलिअर्स आहेत. सोनेरी रंग सगळीकडे ओतलेला आहे. दारावर पेंटिंग मध्ये बिल्डींग वर सगळीकडे...हा राजा खूप बुटका होता व त्याला १० मुले होती. सगळ्यांना त्याची बेड बघण्यात खूप इंटरेस्ट होता. इथेही भरपूर टूरिस्ट होते. भिंतीवर भरपूर पेंटिंग्ज होती. त्यात ह्यूमन फिगर्स भरपूर. बघून आपण दमतो. रंग खराब झाले तर सतत दुरूस्ती करतात त्यामुळे छान दिसतात. एकंदर खूपच गोष्टी इथे पहायला मिळाल्या. या पॅलेसच्या बाहेर आम्ही ग्रुप फॊटॊ काढले. निदान २० फोटो तरी आमच्या टूर गाईड ने वेगवेगळ्या कॅमेर्‍यातून काढले.
रात्री लिडो शो पाहिला. हा इथला सर्वात जुना कॅब्रे शो आहे. फ्री शॅंपेन हे लोकांना मोठे आकर्षण होते. फुकट मिळाली की किती पितात लोक...स्टेजवर बर्‍याच ट्रीक्स करून दाखवल्या. थोडी जादू, थोड वॉटर डिसप्ले व उरलेला डान्स. सध्या आपण या प्रकारचे खूप प्रोग्रॅम्स टी व्ही वर बघतो. एकंदरीत शो चांगला होता. पॅरिस मध्ये खूप गोष्टी पाहिल्या. जरा जास्तच डोस झाला.
यानंतर काही मंडळी युरो डिस्नेला गेली. निम्मी लंडनला तर उरलेली अमेरिकेला. आम्ही युरोस्टार ने लंडनला परत आलो. दुसर्‍या दिवशी इंडियाची फ़्लाइट होती. संध्याकाळी थोडे शॉपिंग व बरेच विंडो शॉपिंग केले. ऎकला होता तेवढा काही छान वाटला नाही हा भाग. दुसर्‍या दिवशी मुंबईला प्रयाण. दोन फ़्लाईटस १५ दिवसांच्या अंतराने घेतल्याने खूप लांबचा प्रवास केल्यासारखे वाटले नाही. अमृताने (माझ्या मुलीने) पॅरिस रोम लंडन सगळे एन्जॉय केले कारण हिस्टरी मध्ये हा सगळा भाग नुकताच झालेला होता. व्हिडिऒ वर प्रसन्नला खूप लढावे लागले कारण कॅमेरा रूसला होता. पण अजूनही कधी कधी ते शूटिंग पाहिले की मजा येते.

एकंदरीने ’केल्याने युरोप टूर’ हा अनुभव आमचे अनुभव समृद्ध करणारा ठरला. बर्‍याच गोष्टी बघायच्या राहिल्या पण जे पाहिले तेच खूप होते. पु लंचे जावे त्यांच्या देशा हे पुस्तक आल्यावर परत एकदा वाचले. त्यांनी २५ वर्षापूर्वी लिहिलेली लिखाण आजही पुरेपूर पटते. या सर्व टिकाणी हिंडल्यावर एक गोष्ट मात्र खटकते. आपल्या कडे इतकी सुंदर ठिकाणे, म्युझिअम्स जुने किल्ले आहेत. ती जर मेंटेन केली, भिकारी पंडे हलवले व गाईडेड टूअर्स दिल्या तर खूप टूरिस्ट येतील. नेहेमी आपल्याकडे नेहेमी लोकसंख्या जास्त हे कारण सांगितले जाते पण ईजिप्त, पॅरिस, रोम इथे हिंडल्यावर हे कारण पटत नाही. या सगळ्या ठिकाणी अगदी भरपूर गर्दी असते. थोडीशी शिस्त, स्वच्छता व नियोजन असले तर हे अवघड नाही, पण लोकांना सांगितले तर आवडत नाही. नजिकच्या भविष्यात आपल्याकडेही असा टूरिझम असावा असे मात्र जरूर वाटते.

Wednesday, July 1, 2009

आमची युरोप टूर भाग २ (जर्मनी, स्वित्झर्लंड )

आमची युरोप टूर भाग २
(जर्मनी, स्वित्झर्लंड )

ऍमस्टरडॅम नंतर पुढचा टप्पा होता जर्मनी. या ट्रीप मध्ये कलोन, ब्लॅक फ़ॉरेस्ट व र्‍हाईन क्रूझ बघायचे होते. जर्मअनी मध्ये ऑटोस्ट्राडा म्हणजे फ़्री वेज ची सुरूवात झाली. हिटलरने युद्धाच्या वेळी सॆन्य पटापट हलवता यावे म्हणून हे रस्ते बांधले. या रस्त्यांवर स्पीड लिमीट नाही. काय मजा आहे ना? फक्त विशेष बोर्ड असले की लिमीट पाळावी लागते. जर्मनीत शिरल्यापासून जी हिरवीगार झाडी दिसली ती इटली ला जाईपर्यंत...इथे एवढी झाडी असेल असे वाटले नव्हते. पूर्ण डॊंगर हिरवे, रस्त्याच्या बाजूला हिरवळ कधी कधी डोळे दमायचे ती हिरवळ बघून. रस्तेही अतिशय छान.

सुरूवातीला कलोन कॅथेड्रलचा स्टॉप होता. हे तिसर्‍या नंबरचे. सर्वात मोठे व्हॅटिकनचे सेंट पीटर्स, दुसरे लंडनचे. आतून खूप भव्य आहे. मोठे मोठे ऒर्गन्स व विश कॅंडल्स आत दिसल्या. बांधकामाला लाइम स्टोन वापरला आहे त्यामुळे स्वच्छ करताना साध्या पाण्याने धुतात. बर्‍याच ठिकाणी डागडुजी चालली होती. याच्या वरच्या मजल्यावर दीपस्तंभासारखी अनेक स्ट्रचर्स आहेत. त्याची एक प्रतिकृती खाली ठेवली अहे. तीच साधारण १० फूट उंच आहे. त्यावरून याच्या भव्यतेची कल्पना येते. इथेही पूर्ण पिक्चर घेता आले नाही. तुमच्याकडे वाइड ऍंगल कॅमेरा हवा. मग मी २-३ वेगवेगळे फोटो घेतले. या ठिकाणचे अजून एक वॆशिष्ट्य म्हणजे स्टेन ग्लास विंडोज. काचेवर उभे सुंदर रंगीत पेंटिंग केलेले असते, त्यावर सूर्यप्रकाश पडला की ते खूप सुंदर दिसते. बाहेरून पाहिले तर काळसर काच दिसते पण आतून खूप छान पेंटिंग दिसते. पूर्व दिशेच्या काचा थोड्या जाड असतात कारण तिथून प्रकाश जास्त येतो. ऒडिकोलन मूळचे या गावचे त्यामुळे त्याची इथे बरीच खरेदी झाली. ब्रेडस ची खूप दुकाने वेगवेगळ्या ब्रेडस नी भरलेली होती. खूप प्रकार होते. इथे दुकानात काम करणार्‍या काय किंवा गावातल्या काय मुली सुंदर होत्या.
वाटेत हेडलबर्ग चा किल्ला पाहिला त्याचा फक्त पुढचा भाग चांगल्या स्थितीत आहे. तिथल्या नदीवर ७० लॉक्स होते अगदी कमी उंचीचे होते हे लॉक्स. पाण्याची लेव्हल सारखी नसली तर बोटींना त्रास होतो म्हणून लॉक्स ची योजना करतात.
यापुढ्चा प्रवास ब्लॅक फॉरेस्ट मधून होता. ही झाडे इतकी दाट असत्तात की आत खूप डार्क दिसते म्हणून हे नाव पडले असावे. या लाकडापासून कक्कू क्लॉक्स बनवतात. त्याची फॅक्टरी पाहिली. तिथले शॉप घड्याळाच्या आकाराचे आहे. दर अर्ध्या तासाने कक्कू बर्ड वेळ दाखवतो तर दर तासाने ह्यूमन फ़िगर्स एखाद्या ट्य़ून वर डान्स करतात.
हे घड्याळ कसे बनवतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या घड्याळाच्या डेकोरेशनला पक्षी, मॅपल ची पाने, रेनडिअर्स अशी चित्रे वापरतात. मॅन्युअल सेटींग असते. कक्कूचा आवाज एका छोट्या पीसवर काढू शकतात म्हणून या घड्याळांना हे नाव पडले. या दुकानात भरपूर घड्याळे होती. आठवण म्हणून मी एक घड्याळ घेतलेच.

त्यानंतर र्‍हाइन क्रूझ चा प्रोग्रॅम होता. ब्लॅक फॉरेस्ट मधून सुंदर प्रवास करून बसने एका ठिकाणी सोडले. ३ तासानंतर दुसर्‍या ठिकाणाहून परत प्रवास सुरू. ही बॊट र्‍हाईन नदीतून सफर घडवते. सुरूवातीला सगळे जण वरच्या मजल्यावर बसले. एका बाजूला डोंगर त्याच्या उतरणीवर सर्वत्र द्राक्षाचे मळे, बाजूला ट्रेन ट्रॅक, दुसर्‍या बाजूला सिमेंट रोड व मध्ये पाणी असा ३ तासाचा प्रवास होता. मधे मधे छोटी सुबक गावे लागतात त्यातल्या प्रत्येक घरासमोर लाल फुले लावली आहेत. प्रत्येक गावाशी बोट थांबत असे. डोंगरावर अधूनमधून जुने किल्ले दिसत होते. सतत कॉमेंटरी चालू होती. या डोंगर उतरणीवर द्राक्ष शेती करणे किती कठिण जात असेल याची कल्पना आली. हा सर्व प्रदेश वाईन साठी प्रसिद्ध आहे. या क्रूज वर फ़्री वाईन असल्याने पिणार्‍यांनी बोटीत पाय ठेवल्यापासून जी सुरूवात केली ती जेवण होईपर्यंत. आमच्यासारखेच इतर ट्रीप्स चे ग्रुप्स ही बोटीवर होते. त्यात्तील एका बाईने ’मेरी साडी तेरी साडीसे सफेद’ या धर्तीवर तिची ट्रीप आमच्याहून स्वस्त असल्याचा दावा केला. तो आम्ही सर्वांनी परतवला. या बोटीवर बरीच फोटोग्राफी झाली. मुलांचा १४ जणांचा छान ग्रुप जमला होता. अमृताला निकीता मिळाली. ६ ३० ला खाली जाउन पुरी भाजी व फ़्रूट कस्टर्ड असा सरप्राईज मेन्यू होता. लोकांनी वाईन बरीच टेस्ट केल्याने हळू हळू आवाज कमी झाले व पुढ्चा प्रवास शांततेत झाला.
बसमध्ये टाइमपास म्हणून अंताक्षरी चालत असे. आमच्या बसमधला एक माणूस दुसर्‍या टीम वर ग अक्ष्रर आले की गांडानु ग, गधडानु ग असे चिडवत असे. एक गोवानीज कपल होते त्यानी त्यांच्या भाषेतले गाणे म्हट्ले. दुसर्‍या दिवशी प्रसन्नने त्याचा गळा साफ केला. आमचा व्हिडिओ कोच असून फक्त शेवटचे २ दिवस फक्त मूव्हीज बघितले. बाहेर निसर्ग इतका छान होता की इतर करमणूकीची गरज नव्हती. प्रवासात दर दोन तासानी रेस्टरूम स्टॉप्स असतच. बर्‍याच ठिकाणी पॆसे द्यावे लागत त्यामुळे जिथे पॆसे द्यायचे नसत तिथे शावक(आमचा गाईड) सांगत असे...इधर मोफतमे होता हॆ सब लोग जाव...
दर देशानंतर दुसर्‍या देशात एन्टर होताना करन्सी चेंज करावी लागे. तेव्हा युरो वापरात नव्हता. आम्ही थोडे पॆसे जवळ ठेवून बाकीचे चेंज करत असू. आमच्या कॉईन कलेक्शन मध्ये बरीच भर पडली. सगळीकडे क्रेडिट कार्ड चालतात फक्त रेस्टरूम्स मध्ये चेंज लागे. ग्रुप मध्ये असल्याने भाषेचा प्रश्न आला नाही. सगळीकडे तिकीटे काढलेली असत त्यामुळे वेळ वाचत असे. रोज २ तास आपले आपल्याला फिरायला मिळत असे. २-३ जागा सोडल्या तर ही व्यवस्था बरई वाट्ली. काही जागी मात्र वाटले की अजून वेळ असता तर बरे झाले असते. आमच्या गाईड ची ही ३० वी ट्रीप होती म्हणून अनुभव भरपूर होता.
ही र्‍हाईन नदी जर्मनीतून स्वित्झर्लंड मध्ये शिरली की र्‍हाईन फॉल्स आहेत. एकदम पांढरे शुभ्र पाणी, मध्ये जाण्यासाठी बोटीची सोय आहे. हा फॉल युरोप मधला मोठा फॉल आहे. त्या रात्री एका छोट्या हॉटेल मध्ये राहिलो. आतापर्यंत हॉटेल्स मोठी होती. जर्मनीत शिरल्यापासून स्विस सोडेपर्यंत एक गोश्ट जाणवली म्हणजे छोटी लाकडी घरे व सर्वत्र पांढरे लेसचे पडदे. घराच्या एका तरी खिडकीत पांढरा लेसचा पडदा व फ़ुलांचे डेकोरेशन दिसतेच. मी पांढरा पडदा सोडून दुसरा रंग शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडला. आपल्याकडे असे केले तर किती जण तो नियम पाळतील? स्विस घरांचा बेस सिमेंटचा व वरचे घर लाकडी दिसले. भरपूर गुलाबाची फुले फुलली होती पण कोणी तोडत नव्हते. ट्रीप मधल्या एक दोघांनी तरी तोडलीच. (का?) . इथे भूमिगत सॆनिक व दारूगोळा ठेवायची सोय आहे. या देशात वेगवेगळी २०-२२ डिपार्ट्मेंट असतात. ती पॉलिसी डिसाईड करतात. नॉर्थ ते साउथ ४ भाषा बोलतात. जर्मन व फ्रेंच भरपूर वापरले जाते. नेहेमीच्या वापरातल्या गोष्टीवर ४ भाषात लिहिलेले असते त्यामुळे बरीच मंडळी बघून भाषा शिकतात असे एका लोकल ने सांगितले. घरे बांधताना मॉडेल बनवून ठेवावे लागते. त्यावर जर कोणी आक्षेप घेतला आणि तो जर बरोबर असेल तर मालकाला बदल करावा लागतो. स्विस बॅंका तर प्रसिद्ध आहेतच. आपले अकाउंट गुप्त ठेवायचे तर मात्र त्यांना पॆसे द्यावे लागतात.
स्वित्झर्लंड मध्ये शिरताच लॅंडस्केप बदलले. जर्मनीत ब्लॅक फॉरेस्ट मध्ये उंच झाडे दिसली त्याऎवजी आता लहान झाडे दिसू लागली. सगळीकडे भरपूर हिरवळ. पावसाळ्यात पूर्वी बॉम्बे पूना रोड दिसत असे त्याची आठवण झाली. इथे हॉटेल टेरेस मध्ये मुक्काम होता. ते एस ऒ टी सी च्या मालकीचे होते. नावाप्रमाणेच उंचावर होते. खिडकीतून खोलीतून बाहेरून सगळी कडून आल्प्स चे दर्शन होत होते. हे डोंगर पूर्ण बर्फाच्छादित नव्हते त्यामुळे जास्त सुंदर दिसत होते. बाहेरच्या बाजूला मोठा प्लास्टीकचा बनवलेला चेस बोर्ड आहे. लहान मुले त्यावर रमली नंतर तो बर्‍याच सिनेमात पाहिला. या हॉटेलचे वॆशिष्ट्य म्हणजे एलॅबोरेट इंडिअन मेन्यू. इतर ग्रुप च्या लोकांशी थोड्या ओळखी झाल्या.

दुसर्‍या दिवशी यांग फ्राउ इथे जायचे होते. हा आल्प्स मधला सर्वात उंच पॉईंट आहे. १३५०० फूटावर सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. वर जाताना रस्त्यात झरे, सिनरी फार छान आहे. एका ट्रेन मधून मधून ५००० फूट नेतात. आपल्या नकळत आपण खूप फोटो काढ्तो. प्रत्येक सीन पिक्चर परफेक्ट वाटतो. प्रसन्न व्हिडिओ कॅमेर्‍यावर लढत होता. मी ट्रीप मध्ये ९ रोल संपवले पण ते वर्थ आहे. ५००० फूट नंतर पुढ्चा प्रवास टनेल मधून आहे. इतक्या वर्षापूर्वी केवळ छिन्नी हातोडे वापरून हे ट्नेल्स बनवले आहेत हे खरे वाटत नाही. स्विस लोकांनी अनेक ठिकाणी टेक्निकल नॉलेज वापरून नॅचरल ब्युटी अजून वाढवली आहे. या टनेल्स मध्ये २ स्टॉप होते. तिथे खिडक्या केल्या आहेत. आपण किती बर्फात आहोत ते कळ्ते. वरती एक पोस्ट ऑफिस आहे. प्रत्येकाने आपल्या मित्राला अगर घरी पाठवले. या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने काहीना डोके दुखणे, दम लागणे असे प्रकार झाले. इथे सर्व हालचाली हळू हळू केल्या तर दम लागत नाही. या स्पॉटवर बर्फच बर्फ़ आहे. उन असले तर ग्लेअरचा त्रास होतो. या ठिकाणी पण भरपूर फोटोग्राफी झाली. इथे एक आईस पॅलेस बनवला आहे. त्यात पेंग्विन्स, पुतळे व इतर चित्रे करून मांडली आहेत. इतक्या उंचीवर बर्फ वितळत नाही म्हणून हे आकार तसेच रहातात. अजून एक बघण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्यावेळी टनेल कसे बनवले याचे छोटे प्रदर्शन. ते बघून रात्री परत हॉटेल टेरेस वर.
दुसर्‍या दिवशी आईस फ्लायर वर जायचे होते. ३ वेगळ्या लिफ्टस मधून ४० मिनिटे प्रवास करून वर नेतात. पहिल्या टप्प्यावर साध्या रोप वे सारख्या लिफ्ट ने नेतात. केबल्स कार वर देशांची नावे व फ्लॅग्स लावले आहेत. आम्ही सगळ्यांनी अर्थात ईंडियाचा फ्लॅग व नाव बघून घेतले. वर जातान लॅंडस्केप खूप छान दिसते. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज खूप वेळ सोबत करतो. त्यानंतर दुसरा टप्पा दुसर्‍या केबल कार मधून नेतात. आता हळूहळळ बर्फ दिसू लागते. तिसर्‍या टप्प्यावर रोटेटिंग केबल कार आहे. त्यातून आजूबाजूची सर्व सिनरी बघता येते. ही जगातील पहिली रोटेटिंग कार आहे. स्पीडही बर्‍यापॆकी होता. आतमध्ये बर्‍याच भाषात वेलकम लिहिले आहे. आम्ही गेलो तेव्हा चक्क हिंदीत अनाउन्समेंट होती. ह स्पॉट १०००० फूटावर असल्याने जास्त एनजॉय करता येते. ब‍र्याच लोकांनी बर्फात खेळून घेतले. आईस फ्लायर राईड ही बहुतेकांनी घेतली. ही राईड आपल्याला ग्लेशिअर वर घेउन जाते. त्यासाठी पाळण्यात बसवून नेतात. या पाळण्यात बसणे हेही एक स्किल होते. एकामागोमाग पाळणे येत असतात आपण पटकन बसायचे. लगेच वरून कव्हर येते व आपल्याला लॉक करते. याची जर कल्पना नसेल तर घाबरायला होते. खालून या लिफ्ट्स ऒपन आहेत. आपल्याल ग्लेशिअर च्या अगदी जवळून नेतात. क्रिव्हासेस बघता येतात. ही राईड खूप छान आहे. त्यानंतर टायर वरून बर्फात घसरण्याचा खेळ बराच वेळ चालला होता. त्यात पण खूप मजा येते. हे सगळे झाल्यावर चक्क ईंडिअन लंच मिळाले. परत आल्यावर संध्याकाळी सगळी मंडळी पायी फेरफटका मारून आली.
स्वित्झर्लंड चा शेवट्चा दिवस ल्यूसन मध्ये प्लॅन होता. दुसरे आकर्षण होते शॉपिंग चे. बर्‍याच लोकांनी स्विस वॉचेस ची खरेदी केली. आतिशय महाग पण टिकाउ अशी त्यांची ख्याती आहे. स्विस नाईफ्स खूप प्रसिद्ध आहेत. त्याचे इतके प्रकार दाखवतात की नक्की कोणते घ्यायचे हे ठरवायला वेळ लागतो. प्रिसीजन इंन्स्ट्र्यूमेंटस बनवण्यात स्विस अग्रेसर आहे. आर्मी नाईफ हा त्याचा बेसिक प्रकार. जगातल्या बर्‍याच चांगल्या गोष्टींचा उगम आर्मी वॉर मध्ये झाला आहे जसे ऒटोस्ट्राडा- हायवेज , कॉम्प्युटर्स, प्रीसीजन इंस्ट्रूमेंट्स इत्यादी. आताच्या परिस्थीतीत असा एखादा शॊध लागेल का?

ल्युसन मध्ये एक मोठे लेक आहे. इथे लेक ला ’स’ म्हणतात. ही लेक्स समुद्रासारखी मोठी आहेत. तिथे २ तासांचा क्रूज होता. त्यांनी स्विस फोक डान्स व स्विस म्युझिक ची थोडी झलक दाखवले. बेल्स वापरून छान म्युझिक वाजवून दाखवले. चिकन डान्स ची बर्‍याच जणांनी मजा घेतली. या सर्वापेक्षा तो लेक, चारीबाजूला बर्फाच्छादित शिखरे, आजूबाजूचा परिसर व संथ निळे पाणी हे फार सुंदर होते. मी खूप वेळ बाहेर काढला. परत कधी युरोपला आलो तर परत स्वित्झर्लंड ला यायचे हे दोघांच्याही मनात आलॆ. नंतर एक लायन मॉन्युमेंट पाहिले. ते लाइम स्टोन चे बनवले आहे. ह सिंह घायाळ होऊन पड्ला आहे आणि पडतापड्ता फ्रान्स ची ढाल हातात धरली आहे. स्विस सोल्जर्स फ्रान्स साठी लढत असत त्यांच्यासाठी हे मॉन्युमेंट बनवले आहे.

परतीच्या वाटेवर इंटरलाकन इथे स्टॉप होता. हे गाव दोन छोट्या लेक्सना जोडते. इथली सीनरी, फाउंटन्स खूपच छान आहेत. बर्‍याच हिंदी सिनेमांचे शूटींग इथे झाले आहे. इथे येउन शूटिंग करण्यापेक्षा कुलू मनाली, काश्मीर इथे शूटींग का नाही करत? बरीच मंडळी हॅंग ग्लाइडींग करताना दिसली. या नंतर आमचा इथला ३ दिवसांचा स्टे संपवून आम्ही ईटलीकडे प्रयाण केले.

या ट्रीप मधील सर्व ठिकाणात स्वित्झर्लंड चा स्टे आम्हाला सगळ्यात आवडला.

Wednesday, June 24, 2009

आमची यूरोप टूर -भाग १


आमची यूरोप टूर -भाग १
(तयारी, लंडन,बेल्जिअम व नेदरलॅंडस)

आम्ही रियाधला असल्यापासून युरोप ट्रीप चे प्लान्स चालू होते. याला कारण शाळेतली एखादी सखी या ट्रीपला जाउन आली की इत्थंभूत वर्णन स्टाफरूम मध्ये होत असे अगदी शॉपिंग, बार्गेनिंग सकट. आमच्या दोघांचा भटक्या स्वभाव ही याला कारणीभूत होताच. तिथे ट्रीप प्लान करता करता अमेरिका प्लान झाली आणि शेवटी ट्रीप चे प्लॅनिंग ब्लूमिंग्टन मधून झाले.

प्रसन्न ऑफिस, नाटक प्रॅक्टीस व इतर सोशल गोष्टीत बिझी असल्याने त्याने सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून दिली. एस ओ टी सी ने प्रवास करायचा हे इतरांच्या बर्‍या अनुभवावरून ठरवले व ब्रोशर मागवले. याला महत्वाचे कारण म्हणजे हे लोक रहाणे, फिरणे व जेवणे अशी सगळी व्यवस्था करतात. दिवसातून एक वेळ भारतीय जेवण हे माझ्य्यासाठी मोठे आकर्षण होते. मला २-३ दिवस इतर जेवणावर दिवस काढता येतात पण त्यानंतर भात, पोळी भाजी असे आपले जेवण मिळाले नाही तर कसे तरी होते. ही १४ दिवसांची ट्रीप संपताना शेवटी मात्र वाटले की आपण इतर पदार्थांवरही राहू शकतो. पालक पनीर, पापड, दाल फ्राय हे रोज बघून कंटाळा आला.

या नंतर महत्वाचा टप्पा होता व्हिसा चा. तुम्ही जर अमेरिकन सिटीझन असाल तर व्हिसा लागत नाही. अमेरिकन सिटीझन बद्द्ल हा अपपर भाव पाहून राग आला पण करता काय? देश बघायचे तर व्हिसा काढणे भाग होते. शिकागोतला एजंट गाठला. फॉर्मस डाउनलोड केले. स्वित्झर्लंड, इंग्लंड व ईटली असे व्हिसा लागत होते. स्वित्झर्लंडचा फ़ॉर्म अगदी भरायला सोपा म्हणून पाठवला तो लगेच २ दिवसात परत आला. तुम्ही जसे हिंडणार तसे एकानंतर एक व्हिसा घ्यायचे असतात म्हणे. (कॉमन सेन्स म्हणतात तो असावा हा) मी म्ह्टले एजंट ने सांगितले नाही तर पाठ्वा आधी सोपा दिसणारा फ़ॉर्म. असो. इटली एम्बसीत प्रत्यक्ष जावे लागते. १-२ महिन्यात सर्व व्हिसे हातात पडले. या सर्व प्रकारात पोस्ट ऑफिस, मनी ऑर्डर व फेडेक्स यांच्या बर्‍याच राउंडस झाल्या.तुमचे सर्व कागदपत्र पासपोर्टसह अगदी व्यवस्थित ये जा करतात. फेडेक्स व पोस्ट ऑफिस यांचा हा सुखद अनुभव होता.

या ट्रीपनंतर लगेच पुढे भारतात जायचा प्लान होता. तिथली सुटी कमी झाल्याने घरचे लोक थोडे वॆतागले. प्रवासात सामान कमी घ्यायचे असल्याने प्रसन्न खुशीत होता. ३ हॅंडबॅग्ज व एक एक्स्ट्रा बॅग एवढेच सामान होते. लोकांनी नेहेमीप्रमाणे खर्च किती येणार हा नेहेमीचा प्रश्न टाकलाच. अशा पॅकेज ट्रीप्स मध्ये काही अर्थ नसतो. एका वेळी एक देश बघावा, असा बर्‍याच लोकांनी सल्ला दिला. युरोप मध्ये खाणे फार महाग हाही बरयाच जणांचा सल्ला. आम्ही लंडन टू लंडन अशी ट्रीप बुक केली व काय अनुभव येतो ते बघायचे ठरवले.

लंडन थोडेफार आमचे आम्ही २ दिवसात पाहिले. वॅक्स म्युझिअम ला आधी गेलो. ईंटरनेट्वरून बुकिंग केले होते म्हणून लाईन वाचली. या म्युझिअम चे जेवढे वर्णन वाचले होते तेवढे काही आवड्ले नाही. ईंडिअन पॉलिटीशिअन चे पुतळे एवढे छान नाहीत. कदाचित या पूर्वी सिंगापूर चे बघून तुलना झाली असेल. यातील एका भागात मॅडम तुसाद चा पुतळा व हे पुतळे बनविण्याची माहिती आहे. ते छान वाटले. गार्डन पार्टीचा भाग पण छान आहे. यानंतर सिटी टूर ऒपन बस मधून केली. पॅलेस, मायलेनिअम व्हील, पार्लमेंट बिल्डींग व ट्रफलगार स्क्वेअर बघितले. कोहिनूर मात्र बघायचा राहिला ..पुढच्या वेळेस बघायला शिल्लक ठेवला आहे. लंडनचे रस्ते खूप छोटे वाटले. टॅक्सीज व अंडरग्राउंड रेल्वे फारच छान आहेत. मेन रोडस मात्र जेवढे ऎकले तेवढे इंम्प्रेसिव्ह वाटले नाहीत.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता सगळे वॉटरलू स्टेशनला जमलो. हळूह्ळू देशी चेहेरे दिसू लागले. हे बहुतेक आपल्याच ट्रीपमधले असावेत असे अंदाज बांधणे चालू होते. १० वाजता एस ओ टी सी चा माणूस आला व सर्वांना तिकीटे दिली. सुरूवात तर व्यवस्थित झाली. पासपोर्ट चेकिंग झाले. ही ट्रेन युरोस्टार फ़ास्टॆस्ट ट्रेन आहे. ती इंग्लीश चॅनेल खालून १८ किमी जाते. ट्रेन सुरू होण्यापूर्वी अर्धा तास बोर्डींग झाले. गाडी सुरू झाल्यावर एकदम ’ओम जय जगदीश हरे’ ची सुरूवात झाली मला वाटले गुजराथी लोकांचा फार भरणा झाल्याने कदाचित गाडीत कधी कधी भजन लावतही असतील. पण नंतर कळले आमच्याच ट्रीप मधल्या एका स्मार्ट माणसाने अलार्म सेट करून रेकॉर्ड लावली होती. हा इसम स्वतःला खूप शहाणा समजत असे. त्याचे नावही शहानी होते. हळूहळू तुम्ही कुठले आम्ही कुठले अशा ऒळखी झाल्या. मुलांनी ऒळखी करून घेतल्या. काही जण डायनिंग रूम कडे पळाले.

आमची ट्रेन युरो स्टार इंग्लंड ते ब्रुसेल्स अशी होती. जाताना कंट्री साईड खूप छान दिसते. गाडीचा स्पीड अजिबात समजत नाही. इंग्लीश चॅनेल इंग्लंड व फ्रान्सला जोडतो. हे एक इंजिनिअरिंग वंडर आहे. पाण्याच्या खाली हार्ड रॉक व सॉफ़्ट रॉक च्या लेअरच्या मधे टनेल बांधला आहे. तो बांधताना बरेच अडथळे आले. पण शेवटी यश मिळाले. फ्रान्स व इंग्लंड दोन्ही बाजूनी टनेल खणायला सुरूवात केली व दोन्ही टीम्स नी मध्यावर टनेल जोडले. यामुळे लंडनहून प्रवास सोपा व फास्ट झाला. या वर एक सुंदर फ़िल्म हिस्ट्री चॅनेल वर दाखवतात. जरूर पहा.

ब्रुसेल्सला उतरल्यावर व्हिसा चेकिंग झाल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. आतापर्यंत ७-८ देशांचे व्हिसा घेउन झाले पण एकंदरीत व्हिसा म्ह्टले की टेन्शन येते. एकदा तरी या ऑफिसमध्ये काम करून लोकांना टेन्शन द्यावे अशी माझी ईच्छा आहे. बेल्जिअम हा आमच्या ट्रीप मधला पहिला देश. इथून आमचा बस प्रवास सुरू झाला. १४ दिवसात ६००० कि मी या बसने फिरवले. अगदी आरामात हा प्रवास झाला. संध्याकाळी सिटी टूर होती. किंग्ज पॅलेस, पॅगोडा हे सगळे बाहेरून बघितले. इथे युनोचे हेड्क्वार्टर आहे. बी एम ड्ब्ल्यू , मर्सिडिज टॅक्सी दिसतात. बेल्जिअम मध्ये नवीन बिल्डींग बांधताना बाहेरची जुनी बाजू तशीच ठेवावी लागते, आतले डिझाईन तुम्ही बदलू शकता. शक्य तेवढे जुने बांधकाम जपतात. ब्रुसेल्स हे युरोप मधले गरीब शहर समजतात. आम्हाला तसे काही वाटले नाही.

सुरूवातीला ऑटोमियम पाहिले. (बाहेरूनच), वर्ल्ड ट्रेड एक्झिबिशनसाठी हे बांधले. आयर्न क्रिस्टल चे बेसिक डिझाईन त्याच्या ९ ऍटम्स सकट दाखवले आहे. मेटल, आयर्न इंड्स्ट्री व ऍटॉमिक पॉवर बद्दल विश्वास हे यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. गावातून कुठुनही ते दिसते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप छान व भव्य दिसत होते. प्रत्येक राउंड मध्ये प्रदर्शन आहे व दोन गोळ्यांना जोडणारे रॉडस लिफ्ट म्हणून वापरले आहेत. त्यानंतर पी स्टॅच्यू पाहिला. या जागेवर लोक खूप कचरा टाकत म्हणून एक स्टॅच्यू ठेवून टुरिस्ट स्पॉट बनवला आहे. त्यात बघण्यासारखे काही नाही. भारतात ही आयडीया वापरून पहावी.परत येताना एक पुरूषाचा ब्रॉंझ चा पुतळा दिसला. त्याला हात लावला की बाई प्रेग्नंट होते व पुरूषाचा दिवस चांगला जातो अशी कथा आहे. रिस्क नको म्हणून बायका हात न लावता पुढे जात होत्या. पुरूष मात्र न चुकता हात लावत होते.
त्यानंतर मार्केट स्क्वेअर मध्ये आलो. एकदम भव्य वाटते इथे कारण ४ बाजूंनी उंच इमारती होत्या. कॊन्सिल हॉल, लायब्ररी अशा बर्‍याच जुन्या पण अगदी वेल मेंटेन्ड बिल्डींग्ज होत्या. युरोप मध्ये असे स्क्वेअर्स पुढे खूप भेटले पण हा पहिलाच म्हणून असेल मनावर जास्त ठसला. वर्षात एकदा त्यावर मोठी फुलांची रांगोळी घालतात. मी पूर्ण स्क्वेअरचा फोटॊ घॆण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही शेवटी २-३ वेगळे फोटो घेतले. खूप मंडळी तिथे बसून चित्र काढत होती. कुणी पेंटिंग्ज करत होती. वाटेत छोटी दुकाने होती त्यातले लेस चे पॅटर्न्स खूप छान व अर्थातच महाग होते. नंतर हॉटेल वर परत गेलो. हॉटेल ट्यूलिप ही छान होते. खिडकीतून ऑटोमियम दिसत होते. रात्री १० वाजेपर्यंत उजेड होता. (जून) चक्क काहीही खरेदी न करता हा दिवस पार पडला. एकंदरीत ट्रीपची सुरूवात तर छान झाली.

दुसर्‍या दिवशी सकाळी हॉलंड कडे प्रयाण. नेदरलॅंड्स हा दुसरा देश. नेदरलॅंड म्हणजे लॅंड बिलो सी लेव्हल. या देशात डाइक्स बांधून ५०% जमीन रिक्लेम केली आहे. म्हणजे समुद्राचे थोडे पाणी एका चॊकोनात अडवायचे, ते उन्हाने वाळले की त्या जागेवर बांधकाम करायचे. इथे जागोजागी विंडमिल्स दिसतात. हाय लेव्हल वरून लो लेव्हल वर पाणी खेळवायला त्या वापरत असत. आता ह्या विंडमिल्स वापरात नाहीत पण सरकार त्यांच्या देखरेखी साठी पॆसा देते. पहिला स्टॉप होता वूडन शू फॅक्टरीचा. अतिशय हलक्या लाकडापासून बूट कसा बनवतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. सगळ्यावर छान पेंटिंग केले होते. बाहेरच्या भिंतीवर एका बुटाचा मस्त फ्लॉवर्पॉट करून ठेवला होता. लोकांच्या खरेदीला इथे सुरूवात झाली काही नाही तर की चेन प्रत्येकाने घेतलीच.

त्यानंतर मदुरोडॅम.. हॉलंड इन मिनिअएचर पाहिले. सुरूवातीला वाटले की हे काय किल्ल्यासारखे पहायचे पण त्यातले बारकावे पाहून कॊतुक वाटले. हे सगळे व्हॉलेंटिअर वर्क आहे हे विशेष. वेगवेगळ्या बिल्डींग्ज, विमानतळ, रेल्वे अगदी पाण्यावरचे लॉक्स ही दाखवले होते. आत शिरताना नकाशा दिला होता सगळे शिस्तीत होते. १५ मे पर्यंत जाणार्‍यांना ट्यूलिप्स बघता येतात. यापुढचा टप्पा होता ऍमस्टरडॅम चा. तिथे सायकल चालवणारे खूप लोक असल्याने रस्त्यावर एक ट्रॅक सायकल वाल्यांचा असतो. प्रत्येक घरात वरच्या मजल्यावर एक हुक दिसतो. घरांची रचना अशी की दारे छोटी व खिडक्या मोठ्या. त्यामुळे जड सामान वर नेताना आधी हुक ने वर घेतात व नंतर खिडकीतून घरात घेतात. दोन बिल्डींग मध्ये अंतरही फार नसते. थोड्या पुढे मागे पण असतात.
इथल्या जुन्या आर्किटेक्चर मध्ये खरोखरच बिल्डींग चे टॉप्स ४ प्रकारात दिसले. बेल शेप, स्टेप शेप, नेक शेप किंवा स्क्वेअर. नंतर नदीतून एक बोट टूर घेतली. आजूबाजूला शिकार्‍यासारखी बोट हाउअसेस होती. सगळ्यात छान फुले लावलेली होती. इथली जागा खूप महाग असते म्हणून घरे लांबीला जास्त व रूंदीला कमी होती. त्यानंतर डायमंड फॅक्टरी ला गेलो तिथे पुरूष कंटाळले पण बायकांनी मनसोक्त खरेदी केली. हिरा लाभतो का नाही ते बघायला मी पण एक हिरा घेतला.

आता थोडे इथल्या बसाविषयी- युरोप टूर करणार्‍या शेकडो बसेस आहेत. प्रत्येक बस ए. सी व साधारण ५० जणांची असते. बसमध्ये जी पी एस असते त्यावेळी ते नवीन होते म्हणून खूप मजा वाटली होती. एखादा रस्ता बंद असला की लगेच दुसरा रूट दाखवत असे.बस ड्रायव्हर एक सी डी ठेवतो. त्यात स्टार्ट टाईम व प्रत्येक स्टॉप चे रेकॉर्डींग होते. रोज १२ तासापेक्षा जास्त बस चालवायची नाही व दर २ तासानी एक स्टॉप घ्यायचा असेही बंधन असते. पोलिस रस्त्यात कुठेही थांबवून सी डी तपासू शकतो. लोकांनी जास्त वेळ मध्ये थांबू नये म्हणून आमच्या गाईड ने ही माहिती दिली. आमचा ड्रायव्हर रिकी ईटालिअन होता. त्याने अतिशय छान बस चालवली. .............भाग २ पुढे......