Showing posts with label भटकंती-सौदी. Show all posts
Showing posts with label भटकंती-सौदी. Show all posts

Wednesday, May 27, 2009

अरेबियन साईट्स

अरेबियन साईट्स...........

तिथे म्हणे फक्त ईस्लाम हा एकच धर्म मानला जातो (आपल्या देवांची पूजा करता येत नाही), बायकांवर बरीच बंधने आहेत - बुरखा घालावा लागतो, बायका ड्राईव्ह करू शकत नाहीत, फारशा एकट्या फिरू शकत नाहीत, आवश्यक सेवेतच नोकरी करता येते, पुरूषांच्या बरोबरीने अधिकार नाहीत, रेस्टॉरंट्मध्ये पार्टीशन घालून बसण्याची सोय असते, मुलामुलींच्या शाळा वेगळ्या असतात. सिनेमा नाटकाची थिएटर्स नाहीत, चोरी केली तर शिक्षा म्हणून हातपाय तोडतात. वगॆरे वगॆरे. खरे वाटत नाही ना?

हे सगळे अगदी खरे आहे. असाही एक देश जगाच्या पाठीवर आहे. आणि तिथे ६-७ वर्षे आम्ही आरामात राहिलो.

१९९१ मध्ये आमचे रियाधला जायचे ठरले. नुकतेच वॉर संपले होते. पुण्यात टी व्ही समोर बसून स्कड्स चे शूटींग पाहिले होते. तिथे भरपूर पोल्यूशन असेल अशी बर्‍याच जणांनी भिती घातली. तिथे जाण्यापूर्वी थोडे रिस्की वाटत होते कारण रियाध बद्दल काही माहिती नव्हती किंवा तिथे रहाणारे कुणी भेटले नव्हते. मी फॅमिली व्हिसा आल्यावर ६ महिन्यांनी माझ्या मुलीला घेउन गेले. माझा हा पहिलाच विमानप्रवास तोही इंटरनॅशनल. नवर्‍याने अगदी सगळी माहिती पाठवली होतॊ तरी जरा विचित्रच वाटत होते. सगळे सोपस्कार पार पडले. शेवटी इमिग्रेशन काउंटर वर रिटर्न का वन वे तिकीट असे विचारले, मी सांगितले रिटर्न तेव्हा "काय मॅडम पहिल्यांदाच चाललात वाटतं?" अशी विचारणा झाली. आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी या गोष्टी लगेच लक्षात येतात.

रियाधला उतरताना आजूबाजूला खूप वाळवंट पसरलेले दिसते. एअरपोर्ट खूप मोठा आहे. आतमध्ये फाउंटन्स व फुले लावलेली आहेत. इथे इमिग्रेशन वर व सगळीकडेच अरेबिक बोलत होते. कॉम्प्युटर वर उजवीकडून डावीकडे टायपिंग चालू होते. आपल्याला भाषा येत नसली की कसे हेल्पलेस वाटते याचा अनुभव आला. बाहेर पडल्यावर पहिली जाणीव होते ती सुंदर रस्त्यांची. नुकतेच पुण्यातून गेल्यावर तर याची महती खूप पटते. रियाध ही कॅपिटल असल्याने इथले रस्ते फारच चांगले आहेत अगदी अमेरिकेतल्या पेक्षा.

गेल्यावर सेटल होण्यात काही दिवस गेले. इथे आल्यावर सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे बुरखा. हे बुरखा प्रकरण पूर्वीच्या टॊळी युद्धामुळे आले असावे. पुरूष लांब पांढरा डगला ’तोप’ घालतात वर डोक्याला चॊकडीचा रूमाल. बायका मात्र पूर्ण काळ्या बुरख्यात फक्त डोळे उघडे. डोक्यापासून पायापर्यंत बंद. वरून बुरखा असला तरी आत या बायका लेटेस्ट कपडे, मेक अप करतात. दिसायला सुंदर. अरेबिक लोकंप्रमाणे आम्ही बुरखा घालत नव्ह्तो. वकिलाप्रमाणे काळा डगला व गळ्यात ऒढणी. जर कधी मुतव्वाने (धार्मिक पोलिस) हटकले तर डोक्यावर ओढणी घ्यायची. माझ्या ६ वर्ष्याच्या स्टे मध्ये असे एक दोनच प्रसंग आले. सुरूवातीला विचित्र वाटले पण आजूबाजूला सगळे तसेच पाहून सवय झाली. अगदी अमेरिकन्स सुद्धा इथे बुरखा घालतात. मला अमेरिकेत आल्यावर थंडीत कोट, टोपी घातले की बुरखा घातल्यासारखेच वाटते. अमेरिकेत मदर नेचर मुळे तर तिथे धर्मामुळे. सुदानी बायका रंगीबेरंगी साड्या अंगभर गुंडाळून नेसतात. मुतव्वा हे धार्मिक पोलिस असतात. त्यांचा पोशाख वेगळा असतो व बरोबर पोलिस असतात. लोकांना नमाज पढायला पाठवणे, बायकांनी जास्त मेक अप केला असेल तर अडवणे, कुठे देवपूजा होत असेल तर ती बंद करणे असे यांचे काम असते. हिंदू लोकांना नमाज ला पाठवत नाहीत. सॊदीत येताना इमिग्रेशन कार्ड वर ड्रग आणणे व इतर धर्म पालन केल्यास कडक शिक्षा लिहिलेल्या असतात. तरीही ९०% लोकांच्या घरात देव असतात. (का?)

हळूहळू काही भारतीय लोकांशी ओळखी झाल्या. आमचे एक मित्र परत भारतात परत जाणार होते त्यांनी कॅसेटस चा गठ्ठा आणून दिला. मी प्रथमच एवढ्या प्रमाणात त्यातल्या पाकिस्तानी सिरीअल्स पाहिल्या. त्यापॆकी धूप किनारे व तनहाईयॉ उल्लेखनीय. टी व्ही वर सगळे कार्यक्रम एडिटेड असत. कॅसेट मध्ये देवाबद्दल काही आले की तिथे फुले दाखवत असत. सुरूवातीला आम्हाल काही कळत नसे. पण नंतर हळूहळू सवय झाली. इथे टॅक्स नाही. आम्ही गेलो तर सुरूवातीला लोकल कॉल्स फुकट होते. नंतर थोडा चार्ज होता. रियाधमध्ये खाण्यापिण्याची मात्र चंगळ. अगदी गुलटेकडीतल्या आंबे द्राक्षांपासून ते अमेरिकेतल्या सफरचंदापर्यंत सर्व रास्त भावात हजर. युरोपातले चीज, ईंडोनेशियातले कपडे, इंडियन पाकिस्तानी थाई, चायनीज, फिलीपीनी, बांगला देशी, ग्रीक, अमरिकी, लेबनीज रेस्टॉरंटस भरपूर. शिवाय फास्ट फूड चा भरणा. लेबनीज रेस्टॉरंट मध्ये फ्रेश ज्यूस फार छान मिळतात. अमेरिकेत आल्यावर इथले ज्यूस पाहून फार बोअर झाले. फ्रेश ज्यूस इथे का बनवत नाहीत? फलाफल किंवा शवरमा (चिकन) व ऑरेंज ज्यूस यावर आमची शॉपिंग नंतरची जेवणे होत असत. इथल्या लोकांच्या रोजच्या जेवणात खुबुस म्हणजे मोठी रोटी व भात आणि नॉनव्हेज. बकलावा छान मिळतो.

अरेबिक लोकल्स फरसे आपल्यात मिसळत नाहीत. त्यातले शिकलेले जरा तरी मिसळतात. आपल्या मुलांसाठी इंडिअन स्कूल्स आहेत. ब्रिटीश व अमेरिकन शाळा आहेत. बायका शिकतात पण ठराविक ठिकाणीच काम करू शकतात. आजकाल बॅंकेत काम करायला लागल्या आहेत. ड्रायव्हिंग करायला बायकांना बंदी असणारा हा एकमेव देश, व्हिडीओ शॉप मध्ये जायला बंदी. फन पार्कस पुरूषांची वेगळी व बायकांची वेगळी अशा काही गमतीदार गोष्टी इथे आहेत ज्या ऎकून आधी आपला विश्वास बसत नाही.
बाकी पार्कस व शॉपिंग सेंटर मध्ये तुम्ही एकत्र जाउ शकता. खूप छान शॉपिंग सेंटर्स इथे आहेत. युरोप, चायना, भारत, अमेरिका इथले कपडे, दागिने, व शो पिसेस खूप छान व रिझनेबल मिळतात. इथली सोन्याची मार्केटस बघण्यासारखी आहेत. प्रत्येक ठिकाणी ४०-५० दुकाने. दागिन्यांचा एवढा डिस्प्ले असतो की बस. रियाध मध्ये ईंडिअन डिझाईन्स कमी दिसतात, ती दुबई मध्ये खूप दिसतात. त्यामानाने आपण्न सोनेही कमी घेतो. मी एकदा माझ्या मुलीसाठी बांगड्या घ्यायला गेले तेव्हा दुकानदाराने विचारले, " किती देउ? १२ का २४ ?" बाजारात जाउन भाजी घ्यावी तसे इथे लोक अंगठ्या, कानातली घेतात. या दुकानात आपल्यासमोर खूप विश्वासाने दागिने ठेवतात. नमाज च्या वेळेस बरेच दुकानदार दुकाने उघडी टाकून जातात. सोन्याची दुकाने तेवढी बंद करतात. अजूनही चोरीला हात तोडण्याची शिक्षा असल्याने हे शक्य होत असावे.

बाहेर स्त्रियांना फिरताना नेहेमी एस्कॉर्टेड फिरावे लागते. आम्ही मराठी मंडळी ग्रुप मध्ये बर्‍याच गोष्टी करत असू. दिवाळी, नवीन वर्ष एखाद्या व्हिलात साजरे होई. व्हिला मध्ये मोठे हॉल्स, लॉन्स, स्वीमिंग पूल असे. तिथे आत बुरखा घालणे आवश्यक नव्हते. मुलांसाठी दर १५ दिवसांनी बागेत जाण्याचा कार्यक्रम असे. रियाध म्हणजे सिटी ऑफ गार्डन्स.एवढ्या वाळवंटात रियाध मध्ये खूप छान बागा केल्या आहेत. खरोखर क्रेडीटेबल आहे. पाण्यासाठी पाण्यासारखा पॆसा खर्च करतात. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. डिसॅलिनेशन प्लांट्स मधून पाणी शुद्ध करून लांबवर पोचवतात. आपल्याकडे एवढा पाउस पडतो पण बागा अगदी कमी दिसतात. (का?)

मॆत्रिणी जमून शॉपिंगला जाणे हा मोठ्ठा टाईमपास असे. बर्‍याच वेळा आम्ही बायका बायका शॉपिंगला जात असू. कधी प्रॉब्लेम आला नाही. अरेबिक भाषेतले आबश्यक तेवढे शब्द येत होते. बर्‍याच दुकानात केरळी मंडळी कामावर असत ती हिंदीतून बोलत असत. एकटे फिरताना टेन्शन वाटते हे नक्की कारण रस्त्यावर एकटी फिरणारी माणसे कमी व भाषा नीट येत नाही. मी काही वेळा टॅक्सीतून एकटी फिरले. चायनीज गोष्टी बाजारात भरपूर दिसतात. त्याची क्वालिटी थोडी कमी असते. छोट्या दुकानात (५-१० रियाल शॉप) खूप छानछान गोष्टी मिळतात.

गेल्या गेल्या मला शाळेत जॉब मिळाला. शिकवण्यात विशेष रस नव्ह्ता पण रोज घराबाहेर पडता येईल हा मोठा फायदा होता. ही शाळा चालू करण्याचे श्रेय इंदिरा गांधींना जाते. आज जवळजवळ ७००० मुले तिथे शिकतात. सी बी एस ई चा अभ्यासक्रम आहे. तिथे बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या.कॉम्प्युटर सायन्स, गणित व सायन्स शिकवले. ऑफिस चे बरेच काम केले. रिझल्ट प्रोसेसिंग करत असे. एखादा नवीन क्लास चालू करतान टीचर स्टुडंट प्रमाण काय लागते, टाईमटेबल बनवणे किती कटकटीचे असते हे इथे राहून कळले. अजून कुणीही टाईम टेबल चा प्रोग्रॅम लिहू शकलेले नाही. मी ही बराच प्रयत्न केला. शाळेत मुस्लीम मुले बरीच होती. पण काही वेगळे वाटले नाही. दुसरा फायदा म्हणजे बर्‍याच मॆत्रिणी मिळल्या. पूर्वी मला सगळे साउथ इंडिअन एकसारखे वाटत. त्यांचे प्रकार, भाषा यात किती व्हरायटी आहे ते कळले. तमिळ ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद देशस्थ कोकणस्थ वादापेक्षा मोठा आहे असे कळले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकमेकींकडे ऑर्डर्स देत असू. लखनौ ड्रेसेस, कलकत्ता साड्या, कश्मिरी ड्रेसेस व साउथ सिल्क अगदी त्या त्या ठिकाणाहून मागवता येत असे. इतकेच कशाला हज किंवा रमजान मध्ये कोणी मक्केला गेले की पोवळ्य़ांची ऑर्डर ही जाउ लागली. सुट्टीत कुणी फिरून आले की शॉपिंग बारगेनिंग च्या टीप्स मिळत. इजिप्त व सिंगापूर ट्रीप मध्ये याचा खूप फायदा झाला. स्टाफ रूम मध्ये अगदी केरळ ते कन्याकुमारी सगळा फ्लेव्हर होता. खाण्याचे विविध प्रकार टेस्ट केले. एक मात्र लक्षात आले की महाराष्ट्र हे राज्य रहाण्याच्या दृष्टीने चांगले आहे. बायकांना बराच मोकळेपणा आहे. कश्मिर मध्ये बायकांना फारच कमी फ़्रीडम आहे. साउथ मध्ये हुंडा प्रकरण फारच जोरात आहे. हे सगळे तिथे रहाणार्‍या मॆत्रिणींकडून ऎकले.

रियाध मध्ये आल्यावर माझी प्रथम मुस्लीम लोकांची ऒळख झाली. माझा अनुभव चांगला होता. शेजारी पाकिस्तानी व बांगलादेशी. दोघेही चांगले होते. इथे आल्यावर अरेबिक आणि इतर मुस्लीम यांच्यात फरक जाणवतो. माझ्या सासू,सासर्‍यांना वाटायचे की आमच्या मुलीवर मुस्लीम संस्कार होतील, ते जेव्हा प्रत्यक्ष राहून गेले तेव्हा त्यांची काळजी मिटली. मुस्लीम लोकांचे रीती रिवाज, त्यांची नात्यातील लग्ने, बुरख्याची महती, सतत कुराणाचे दाखले देणे, या सगळ्याची जवळून ऒळख झाली आणि आपला धर्म किती फ्रीडम देतो हे लक्षात आले. अर्थात आपल्याकडेही पूर्वी घाशीराम कोतवाल होतेच. मात्र एक गोष्ट खरी हे लोक धर्माने अगदी पक्के बांधले गेले आहेत. आपल्याला बर्‍याच गोष्टी पटत नाहीत पण त्या सोडून द्यायच्या.

माझी एक शेजारीण माझ्याकडून फ़ोटो काढून घ्यायची कारण त्यांना फोटो काढण्यावर बंदी. अरेबिक घरात दोन हॉल असत एक पुरूषांसाठी व एक बायकांसाठी. लग्नात सुद्धा वधू वर दोन वेगळ्या हॉल मध्ये असतात. मुलींच्या शाळेत शाळा सुटल्यावर माईक वर नावे पुकारतात त्यानुसार एक एक मुलगी पूर्ण बुरख्यात बाहेर येते व घरच्या माणसाबरोबर घरी जाते. सु्रूवातीला आम्हाला खूप गंमत वाटत असे. आपल्या शाळात मात्र बराच फ्रीडम होता. पार्क मध्ये पण कधी कधी अचानक नावांचा पुकारा होई मग त्या माणसाची बायका मुले बाहेर जात असत. आम्ही मात्र नेहेमी ३-४ फ़ॅमिलीज एकत्र जात असू पार्कात. इथे जेवढी बंधने आहेत तेवढ्या पळवाटा ही आहेत. दारूबंदी आहे पण डिप्लोमॅटिक एरिआत चालते. बुरखा कंपल्सरी पण कंपाउंड मध्ये गरज नाही. कॅसेट्स एडिट करतात पण लोकांना त्या कशातरी मिळतात.

रियाधचे हवामान साधारण दिल्ली सारखे. उन्हाळा ४८-५० डिग्रीज पर्यंत जाते. शाळा जून जुलॆ बंद असतात व तोवर नवीन वर्षाची पहिली टर्म झालेली असते. सुटीत बरीच मंडळी भारतात जातात. आजूबाजूला सुंदर रेड सॅंड ड्यून्स आहेत. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती फार सुंदर दिसतात. त्यावर चढणे वाटते तेवढे सोपे नसते. या ड्यून्स कडे जाणारा रस्ता फार छान आहे. मॅकानाज गोल्ड ची आठवण येते.

इथे राहून दुबई, बहारिन, इजिप्त, हे आजूबाजूचे देश बघता आले. हे देश अगदी रियाध च्या जवळ, तिथे मात्र पूर्ण फ्रीडम आहे. आता हळूहळू इथेही बायकांच्या मागण्या वाढत आहेत...बघू कधी बदलतात ते. बहारिनला जाताना सुंदर पूल आहे. दोन्हीकडे रिव्हॉलव्हींग रेस्टॉरंटस आहेत. दोन्हीकडच्या वातावरणात जमीन अस्मानाचा फरक. वीक एन्ड्स ला मग सॊदी लोक तिकडे जाउन फ़्रीडम ची मजा घेतात. आभा व बहा ही इथली हिल स्टेशन्स. अतिशय सुंदर घाट बांधले आहेत. झाडीही बरीच आहे. आभाला एक रोप वे आहे. मात्र चांगले नकाशे, गाईडस यांची कमतरता जाणवते.

रियाध मध्ये खूप छान इमारती आहेत.काचांचा वापर भरपूर. घरात मार्बल चा वापर भरपूर अगदी आमचे जिने सुद्धा संगमरवरी होते. जेद्दा, दम्माम, ज्युबॆल ही आजूबाजूची गावे. दाहरान इथे ऑईल रिफ़ायनरी आहे. तिथे भरपूर अमरिकी रहातात. ते बर्‍याच वेळा कंपाउंड मध्ये रहातात. म्हणजे त्यांची ठराविक जागा कंपाउंड ने बंद केलेली असते. आत मध्ये अतिशय छान जिम, पोहण्याचे तलाव घरे असतात. आत बुरख्याची जरूरी नसते. शॉर्टस मध्ये लोक फिरू शकतात. बाहेर पडले की मात्र त्यांचे नियम पाळावे लागतात. या लोकांवर अमेरिकेचा प्रभाव खूप आहे म्हणून अमेरिकेतल्या सगळ्या सोई इथे आहेत. देशाबाहेर लोकांनी जाउ नये म्हणून हा प्रयत्न.
इथे पिकत तसे काहीच नाही. पेट्रोकेमिकल ही मेन ईडस्ट्री. सोनेही भरपूर. या दोन्ही गोष्टीमुळे पॆसाही भरपूर. त्यामुळे आपल्या रूढी सोडायला हे लोक तयार नाहीत. सर्व ऒईल वर अवलंबून आहे. मधूनच सॊदीआयझेशनचे वारे येते पण बाहेरच्या लोकांवर अवलंबून रहावे लागते. ईंडियन लोक बर्‍याच चांगल्या पोस्टवर कामे करतात.

इथे रहाताना एक दोन प्रसंग असे आले की थोडी काळजी वाटत होती. ६ डिसेंबर ला बाबरी मशिद प्रकरण झाले तेव्हा आणि पोखरण चे टेस्टींग झाले तेव्हा. पण कुठेही दंगा किंवा जाळपोळ झाली नाही.

आयुष्यात एकदा या बंधनांचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. आपला ’देव्हार्‍यातला देव’ मनात ठेवून या अरेबियन साईटस बघायला काहीच हरकत नाही. भाषा मात्र शिकून घ्या म्हणजे थोडे तरी संभाषण समजते. इथे रहाताना मनात एक प्रकारचे टेन्शन मात्र वाटायचे, खरे तर काही कारण नाही.