Showing posts with label भटकंती-भारत. Show all posts
Showing posts with label भटकंती-भारत. Show all posts

Saturday, January 28, 2017

खजुराहो एक शिल्पप्रवास

emblem

     





या वर्षी मध्यप्रदेशातील कान्हा, जबलपूर व खजुराहो या ठिकाणांना भेट दिली.

कान्हा... जंगल सुरेख. स्वच्छता वाखाणण्याजोगी.. गाईड उत्तम.. वाघाचे दर्शन झाले. सकाळच्या वेळचे जंगल फार सुंदर दिसले.जबलपूर ला धुवांधार धबधबा, ६४ योगिनी देउळ व भेडा घाट ला भेट दिली. भेडा घाट ला नर्मदेचे दर्शन झाले. दोन्ही बाजूला संगमरवरी कपारीतून बोट राईड घेतली.



म प्रदेशात रस्ते अतिशय खराब. तेवढीच माणसे बोलायला छान. आदरातिथ्य उत्तम. अधेमधे फार कमी गावे लागतात. माणसे जरा मागास वाटली. हाॅटेल बुकिंग करताना शक्यतो मध्य प्रदेश टूरीझम ची करावीत.

खजुराहो थोडेसे बाजूला आहे. आम्ही जबलपूरहून गेलो. शेवटचे ५० मैल खड्डयांचाच रस्ता आहे. इथे एवढा टूरिझम आहे तर सरकारने लक्ष घालून रस्ते सुधारायला हवेत. खजुराहोला १० व्या शतकातील २०-२२ देवळे आहेत. बरीच सुस्थितीत आहेत. चंडेल राजांच्या राजवटीत ही देवळे बांधली गेली. जवळच पन्ना येथील खाणीतला दगड वापरला आहे. साधारणपणे लढाईत विजय मिळाला की नवीन देउळ बांधले गेले. अशी ८५ देवळे होती असे म्हणतात. कालांतराने ही देवळे झाडीत झाकली गेली व नजरेआड गेली. या भागात विशेष काही पिकत नाही म्हणून पण शत्रू फार फिरकला नाही.तो जमाना डिजिटल नव्हता. टी व्ही सेल फोन सिनेमा अजून अस्तित्वात नव्हते. अशा वेळेस आपल्या राजेरजवाड्यांनी कलाकारांना आसरा देउन संस्कृती संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यात शिल्पकारांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी जे देवळे सजवण्याचे काम केले आहे त्यामुळे आपण भूतकाळात डोकावून बघू शकतो आणि आपल्या पूर्वजांच्या रहाणी विषयी काही आडाखे बांधू शकतो.

एखादी लढाई जिंकली की त्या विजयाचे प्रतिक म्हणून विजयस्तंभ अथवा मंदिर बांधलेले दिसून येते.  १०००-१२०० वर्षापूर्वीची मंदिरे आजही चांगल्या स्थितीत पहायला मिळतात. चंडेल राजांच्या कारकिर्दीत खजुराहोची मंदिरे बांधली गेली. खजुराहो म्हणजे मिथुन शिल्पे असा आपला एक समज असतो. पण प्रत्यक्षात १० % शिल्पे अशा प्रकारची आहेत. रात्री  लाइट साउंड शो होता. साधारण पार्श्वभूमी कळण्यास उपयोग होतो.
   चांदण्या  रात्री  कार्यक्रम पाहिल्यास देवळे फार सुंदर दिसतात. 
 असे म्हणतात की खजुराहोत ८५ देवळे बांधली  होती त्यातील २०-२२ आता दिसतात. ही देवळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या  अधिकारात असल्याने चांगल्या स्थितीत रहातील अशी आशा. तीन भागात ही देवळे विभागली आहेत. आर्किलाॅजिकल सर्व्हे तर्फे गाईडस् मिळतात अथवा आॅडिओ गाईड बुक्स आहेत. आम्ही गाईड घेतला....प्रश्न विचारता येतात.सर्वात प्रथम लक्ष्मण मंदिर पाहिले....इथे लक्ष्मणाचे देउळ कसे असे वाटत होते तेव्हा कळले की ते लक्ष्मण वर्मन याने बांधले आहे. हे देउळ बरेच सुस्थितीत आहे . सगळी देवळे मोठ्या चौथऱ्यावर आहेत. इथली देवळे नागर शैलीतली आहेत. पंचायतन पद्धतीने मेन देव मधे व बाजूला चार दिशाला चार छोटी देवळे आहेत. 
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भरपूर शिल्पे आहेत. बाहेर युद्धातील देखावे, लग्नाचा देखावा, वाद्यवृंद इत्यादी शिल्पे आहेत. देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर चार प्रकारची शिल्पे आढळतात. सुरसुंदरी .. कुणी पायातला काटा काढते, कुणी सिंदूर लावते तर कुणी आरशात पहाते. त्रिभंग प्रकारातील बरीच शिल्पे आहेत. चेहऱ्यावर हावभाव सुंदर. मूर्तीना बाक दिल्याने सैंदर्यात भर पडली आहे. या शिल्पामध्ये एक प्रकारची लय आहे असे 
Laxman Temple
वाटते.  मदतनीस छोट्या आकारात दिसतात. तो त्यांचे स्टेटस दाखवण्यासाठी म्हणे...... केशरचनेचे वेषभूषेचे अनेक प्रकार दिसतात. साध्या दगडातून इतकी सुंदर शिल्पे वेगवेगळे भाव दाखवतात. त्या शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे थोड...नाव मात्र राजाचे होते . नाही म्हणायला शिल्पकारांसाठी म्हणून एक शिल्प इथे केले आहे.देवदेवतांची अनेक शिल्पे आहेत.  एका विचित्र प्राण्याचे शिल्प सगळीकडे दिसते"..आपल्या मनातले चांगले व वाईट याचे द्वंद्व दाखवले आहे. या सगळ्याबरोबर सेक्स दाखवणारी बरीच शिल्पे आहेत. तांत्रिक विद्या मानणाऱ्या लोकांचा प्रभाव या मंदिरांवर आहे असे म्हणतात तर काही लोकांच्या मते धर्म अर्थ काम मोक्ष अशा चार पायऱ्या ही शिल्पे दाखवतात. पूर्वी माझा असा समज होता की अशी शिल्पे फक्त खजुराहोतच आहेत पण ती अनेक मंदिरात दिसतात इतकी चांगल्या स्थितित नसली तरी...मग खजुराहो एवढ्या चर्चेत का?
या मंदिरात कुठेही सिमेंट वापरलेले नाही जोड काम इंटरलाॅक पद्धतीने सगळे दगड बसवले आहेत.हे अतिशय कौशल्याचे काम आहे. इथून जवळच असलेल्या पन्ना मधील खाणीतून सगळा सॅंडस्टोन वापरला आहे. आजही तिथे उत्तम प्रतीचा दगड मिळतो आहे. काही ठिकाणी रिलीफ शिल्पे दिसतात, म्हणजे दगडाना उउठावदेउन काम केले आहे. 

Kandaria Mahadeo front view
या नंतर कंडारिया महादेव हे सर्वात मोठे मंदिर आहे. या च्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण कोरलेले आहे ज्यावर यक्ष किन्नर व गांधर्व दिसतात. ते नेहमी अधांतरी दाखवतात. कंडारिआ म्हणजे गुहेत रहाणारा .या मंदिरावर पुन्हा तोच पॅटर्न दिसतो मूर्तींचा पण जास्त सुबक व मोठा आकार आहे. ८०० च्या हून जास्त शिल्पे या एका मंदिरात आहेत. ती बनवायला किती दिवस व कष्ट लागले असतील .आधी सगळे कोरीव काम होउन मग तेमंदिर नकाशाबरहुकुम बांधले गेले असे गाईड ने सांगितले. महादेव मंदिर पुढुन बघितले तर एकावर एक सात शिखरे दिसतात. हे सर्वात भव्य मंदिर विद्याधर राजाने बांधले आहे. महंमद गझनी ला हरवून आणि शेवटी तह करून ही जागा वाचवली होती. त्या विजया नंतर या देवळाची निर्मिती झाली. याच्या शिखरावर ८४ छोटी शिखरे दिसतात. ८४ लक्ष योनी नंतर मोक्ष प्राप्त होतो ही कल्पना मांडली आहे. कैलास पर्वत डोळ्यापुढे ठेवून ही रचना केली आहे. हळू हळू चढत जाणारी रचना देवळाला भव्यता प्राप्त करून देते.


बाहेरील भागात सप्तमात्रृका वाहनाबरोबर दिसतात. अग्नि व स्वाहा हे ही बघायला मिळतात. अग्नि ला अर्पण करताना जे स्वाहा म्हणतो तीच ही देवता. 

त्या नंतर जगदंबी , चित्रगुप्त व विश्वनाथ मंदिरे पाहून बाहेर असलेले ११ फुट शिवलिंगाचे मंदिर पाहिले. हे सर्वासाठी खुले आहे व पूजा होते. बाकी आतील मंदिरात गाभाऱ्यात मूर्ती आहेत पण पूजा होत नाही. 
काही अंतरावर असलेले चतुर्भुज मंदिर दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले. शिवाचा मुकुट, बु्द्धाचा चेहरा, विष्णूचे अंग व कृष्णाची बासरी ची पोज असे या मूर्तीचे वर्णन करतात. या मंदिरावर मिथुन शिल्पे नाहीत. कुठे न दिसणारे नरसिंहीणी चे शिल्प आहे. गंगा यमुना हे शिल्प ही दिसते.

 शिल्पकडेदोनवेगळ्या  पाहिल्यास वेगळे भाव दिसतात. 
  केस पुसत आहे आणि तिच्या केसातले पाण्याचे थेंब पाहून एक हंस फसला आहे व मोती म्हणून त्याकडे बघत आहे. असे अनेक बारकावे या शिल्पात आहेत व गाईडस ते सगळे दाखवतात. 

अजून एक गंमत म्हणजे गाईड आरशाचा तुकडा घेउन उन्हाचा फायदा घेउन कवडसे पाडून बारकावे दाखवतात.
देवळाच्या अलिकडे वराह टेंपल आहे. एका दगडातून कोरलेले वराह अवताराचे शिल्प आहे. हात लावून लावून दगड गुळगुळीत होऊन मेटल चा वाटतो. त्याच्या मुखात वीणावादन करणारी सरस्वती तर दोन्हीबाजूला मिळून नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. ३३ कोटी देवांचे प्रतिनिधी म्हणून ३३३ छोट्या सुबक प्रतिमा काढल्या आहेत. अगदी छोटे असले तरी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे हे देउळ म्हणजे.या सगळ्या मंदिरात दशावतार भेटत रहातात.



















चित्रगुप्त मंदिरात सूर्याचे रथामधले शिल्प तसेच १० मुखी विष्णू चे चित्र आहे. ही विशेष कुठे न दिसणारी शिल्पे आहेत.

या मंदिराची कामसूत्र टेंपल अशी जाहिरात न करता जास्त लोकांनी भेट दिली पाहिजे.

या देवळांनी बरीच माहिती पुराणतील गोष्टी व अप्रतिम कारागिरी दाखवली हे नक्की.






war scene


vadyavrunda



Sundar toran eka dagdatun 


sanskrut shilalekh


Chaturbhuj Mandir

chaturbhuj Mandir Murti
sculptures in three layers

Outer side carvings
Shilpkaransathi shilp

temple recently found in outskirts







Saturday, September 8, 2012

अंदमान चे ’काळे पाणी’...........




अंदमान चे ’काळे पाणी’...........

सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.

अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.

इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.

संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांनी इथेच लिहिले असे म्हणतात. http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.

दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.

नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे. संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

Saturday, April 10, 2010

अनंतहस्ते ...३ (उदयपूर, चितोडगड)

Click on the pictures to enlarge them


उदयपूरमध्ये शिरल्या जाणवली स्वच्छता. ’प्लॅस्टीक निषिद्ध क्षेत्र’ अशा बर्‍याच पाट्या दिसल्या. लोक सिरियसली हा नियम पाळताना दिसतात. टूरिझम साठी महत्वाची गोष्ट. भरपूर लेक्स या गावाला लाभली आहेत. बोगन व कण्हेर सगळीकडे फुललेली दिसते. सध्या टूरिस्ट प्लेस मध्ये टॉप चा मान या सिटी ने मिळवला आहे. हे शहर छोटे आहे पण इतिहास व ऎतिहासिक वस्तू नी भरलेले आहे.

सिटी पॅलेस हा इथला मुख्य अजेंडा होता. त्याच कॅंपस मध्ये लेक पिचोळा, लेक पॅलेस, जगदीश मंदिर व क्रिस्ट्ल गॅलरी बघता येते. सकाळी सकाळी तिथे पोचलो. तिकीटे काढून गाईड मिळवण्यात बराच वेळ घातला. आम्हाला डिटेल बघायचे होते. इथले बरेच गाडीवाले, गाईड्स गोर्‍यांच्या मागे असतात. मला वाटले त्यापेक्षा गाईडस कमी होते. आमचा गाईड एक सरदारजी होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आम्ही गेलो त्याच्या दुसर्‍या दिवशी तिथे एक फंक्शन होते त्याची तयारी चालली होती. सरकारी तनखे बंद झाल्यावर इथल्या लोकांनी हॉटेल्स बनवली आणि लग्नाला वगॆरे हे महाल भाड्याने देतात. त्यामुळॆ त्यांची बरीच देखभाल होते आणि पॆसा पण भरपूर मिळतो. १५ लाख रू भाड्यात इथे लग्न करता येते. (बाकी खर्च वेगळा)

सिटी पॅलेस हा महाराजा उदयसिंग ने बांधला व नंतर त्यात अनेक राजांनी भर घातली. ते बघताना जाणवते. पण बाहेरून मात्र एक सलग वास्तू वाटते. या महालात बर्‍याच गमती जमती आहेत. महाराणा प्रतापची सगळी कहाणी जिवंत करणारी शस्त्रे, पेंटींग्ज आहेत. हल्दीघाटीच्या लढाईची बरीच चित्रे आहेत. राण्यांचे महाल, वेगवेगळ्या काचांचे नमुने (बेल्जिअम जास्त), मध्येच खॊटे दरवाजे, आरशाचा भास वाटणारे दरवाजे, झरोके, राण्यासाठी छोटे तलाव, बाहेरून दिसणार नाही अशा काचांच्या खिडक्या. चालायची तयारी मात्र हवी. हे सगळे बघताना आपण इतके जिने उतरतो व इतके चढ्तो की बस. बहुतेक सगळे जिने भिंतीत काढले आहेत. पायर्‍या उंच व कमी जास्त उंचीच्या. हे सगळॆ म्हणे सिक्युरिटी साठी केले होते. इथले राजे खूप उंच होते म्हणून पायर्‍या उंच पण आपले पाय मात्र शेवटी बोलायला लागतात. पेटींग्ज ही खूप बघायला मिळतात. मोर चॊकात खूप छान झरोखे आहेत. सगळे काम काचेचे. अजूनही सगळे चांगल्या अवस्थेत आहे. या पॅलेसच्या चॊथ्या मजल्यावर चक्क मोठी मोठी झाडे व तलाव आहे. तिथे म्हणे एक टेकडी होती ती तशीच ठेवून या लोकांनी बाग केली. बाहेरून मात्र काही कळत नाही पॅलेसचा एक भाग वाटतो. काय काय आयडिआज करतील माहित नाही. मध्ये एका ठिकाणी एकात एक दरवाजांच्या चॊकटी दिसतात..आपल्याला वाट्ते की आपण आरशात बघत आहोत अशा तर्‍हेने ते बांधले आहे. त्या मानाने राणीच्या महालात विशेष काही बघायला मिळाले नाही. खाली शस्त्रागार आहे. सगळीकडे कमानी भरपूर दिसतात. कमानी मुळॆ सगळ्या देखाव्याला एक शोभा आली आहे.

खालच्या चॊकात काही दुकाने आहेत अर्थात आमचा मोर्चा तिकडे वळला. यातील गोष्टी थोड्या महाग आहेत पण क्वालिटी छान आहे. आमची थोडीफार खरेदी झाली.

हा पॅलेस लेक पिचोलाच्या काठावर आहे. रात्री लाईट्स मध्ये हे सगळे पॅलेस छान दिसतात आम्ही ते मिस केले, तुम्ही करू नका. नंतर बोट राईड ने लेक मध्ये फिरून आलो. मध्ये जगदीश्वर मंदिर ला उतरलो ती जागाही हॉटेल मध्ये बदलली आहे. तिथली बाग आणि बाथरूम्स अप्रतिम. लेक पॅलेसही बाहेरून बघितला. आजकाल फक्त चेक इन केले तरच त्याच्या आत जात येते. पाण्यात त्याचे प्रतिबिंब छान दिसते. आजूबाजूला बरेच महाल हॉटेल मध्ये कन्व्हर्ट केलेले दिसत होते. हवा छान होती. त्यानंतर आम्ही क्रिस्ट्ल म्युझिअम पाहिले. त्यात भरपूर क्रिस्ट्लच्या गोष्टी आहेत पण खूप छान गोष्टी एकत्र पाहिल्या की काही वाटेनासे होते तसे थोडे झाले आणि पोटात कावळे ऒरडत होते त्यामुळे जरा भरभर पाहिले हे म्युझिअम. इथे ३ च्या सुमारास चहा स्टाईल मध्ये मिळतो. या म्युझिअम मध्ये ऒडिऒ मशिन देतात आणि आपले आपण सगळे बघू शकतो. क्रिस्टल बेड , खुर्च्या, ग्लसेस, बाटल्या, देव, दिवे काय नाही तिथे. याचे तिकीट भरपूर आहे. नंतर आम्ही पोट्पूजा केली आणि विंटेज कार म्युझिअम पाहिले. पॅलेस परिसरात उठेही रिझनेबल खाण्याची सोय नाही. सगळे फाईव्ह स्टार.

बाहेर फिरताना सध्याच्या राजाचे दर्शन झाले. एखादा साधारण तरूण असावा असा तो वाटला. त्याने सॊर उर्जेवर बरेच काम केले आहे व त्याबद्द्ल त्याला जर्मनीत ऍवॉर्ड दिले आहे. हे कुटुंब मागच्या बाजूला रहाते. आणि हॉटेल व म्युझिअम मधून भरपूर पॆसा कमावते. त्यांचे जुन्या गाड्यांचे म्युझिअम जवळच आहे. या सगळ्या विंटेज कार्स चालू स्थितित आहेत. प्रत्येकाला वेगळे गॅरेज. प्रत्येक गाडी हि अधून मधून रस्त्यावर काढून चालवतात. खुप मोठा पसारा आहे. आमच्यातील पुरूष वर्ग ह्या गाड्या बघायला गेला व आम्ही आरामात जेवण करून शॉपिंगचे प्लॅन्स केले. काही गाड्यांना अर्ध्या बाजूला गॉगल ग्लास लावली आहे (बायकांसाठी). काहीत शिकारीसाठी बदल केले आहेत. एका गाडीत ऑटोमॅटिक ऑईल चेंज ची सोय आहे. तर बग्गीला अनफॊल्ड होणारा जिना आहे. जी अजून समारंभात वापरतात) एका गाडीत इंग्लंड मधील टॅक्सी सारखे पार्टीशन व मागे स्पीकरची सोय आहे ड्रायव्हरशी बोलायला. प्रत्येक गाडीची काहीतरी स्पेशालिटी आहे. काही गाड्यांचे तर ओरिजिनल पेंटस ही आहेत. कॅडिलॅक, शेव्हरले, फरारे या गाड्याही आहेत.

त्यानंतर सहेलियोंकी बाडी बघायला गेलो. इथे एक छान बाग आहे व त्यात नॅचरल फोर्स व चालणारी कारंजी आहेत. पूर्वी मेडस इथे अंघोळीला, देवपूजेला येत. आम्हाला हा स्पॉट काही विशेष भावला नाही. मध्ये एंपोरियम ला थांबलो पण तिथे विशेष शॉपिंग केले नाही आम्हाला लोकल मार्केट हवे होते.
त्यानंतर रात्री ’अपणी ढाणी’ चा प्रोग्रॅम होता. गावाबाहेर एका टेकडीवर खेड्यातले वातावरण , घरे, जादूचे प्रयोग, नाच, कठपुतली दुकाने करून ठेवली आहेत ज्यायोगे सर्व वयाच्या लोकांना काहीतरी करमणूक मिळेल. गेल्यावर वेलकम ड्रिंक व पापड दिला. मग राजस्थानी स्टाईल नाच पहिला. नाचणारी साधीच होती पण छान नाचत होती. तिथेच एक बर्थ डे पार्टी चालली होती त्यांचा जरा दंगा चालला होता. हवा एकदम मस्त होती. नंतर जेवणासाठी जमिनीवर सोय केली होती. साधेपणा आणि स्वच्छता लक्षात येत होती. खास राजस्थानी पदार्थ पत्रावळीवर वाढत होते. बाजरीचा खिचडा व तूप, चुट्टा चुरमा, बाजरी भाकरी मका भाकरी, दाळ बाटी आणि तूप, सॅलड, गट्टेकी सब्जी, कढी, शेवेची भाजी ....किती खाल तुम्ही...सगळे पदार्थ छान होते. एक संपेपर्यंत दुसरा हजर. शेवटी जिलबी आणली व सगळ्यांना आग्रहाची भरवली गेली. १०-१० जिलब्या भरवत होते --- समोरचा खाणारा वाटला तर. तिथे वाढायला २च लोक होत पण इतके छान मॅनेज करत होते की बस. एकंदर पोटाची वाट लागली. पण मजा आली. आजकाल पुण्याच्या बाहेर पण असे एक ठिकाण चालू झाले आहे. रात्री हॉटेलच्या गच्चीत बसून थोड्या गप्पा मारल्या. मस्त चांदणे होते. एकंदर राजस्थानी लोककला व खानपान याचा चांगला नमुना बघायला मिळाला.
दुसर्‍या दिवशी सकाळी जगदीश मंदिर बघायला गेलो. हे सिटी पॅलेसच्या अगदी जवळ आहे. एकदम चढ्या पायर्‍या आहेत. देवळावर कोरीव काम अतिशय सुंदर आहे. त्याच्या जवळच हाथी पोळ मध्ये लोकल बाजार बघायला मिळाला. तुम्हाला जर बांधणी व इतर छोट्या गोष्टी घ्यायच्या असतील तर हा बाजार छान आहे. आम्ही पर्सेस, मोजडी, बांधणीचे मटेरियल शोपिसेस, बांगड्या, कानातली अशी बरीच खरेदी केली आधीच हा बाजार दाखवला असता तर बरे झाले असते. बांधणीचे भरपूर नमुने बघायला मिळाले. शेवटी एक बॅग येताना वाढली.
दुपारी चेंज म्हणून इडली सांबार चा समाचार घेउन चितोड्गड ला निघालो. रस्ता ठीक होता. गडावर पोचण्यापूर्वी लांबूनच चितोडगड ची भिंत दिसते. इथे वर जाताना बरीच गेट्स लागतात. शत्रूला अडवण्यासाठी पूर्वी बरीच गेट्स बांधत असावेत. वरती पोचल्यावर प्रथम गाईड घेतला. हा जरा वयस्क पण खूप माहिती सांगणारा गाईड होता. आपण नुसता किल्ला पाहिला तर काही कळणार नाही. प्रथम एक गोलाकार भिंत दिसली ती जुनी बॅंक होती. मुसलमानांनी तोडमोड केल्यावर त्यातले काही चांगले मंदिराचे अवशेष याच्या बांधकामात वापरलेले दिसतात. राणीचा जुना महाल पाहिला. अगदी खूप पडझड झाली आहे पण कल्पना येते. वरच्य़ा मजल्याच्या छतावरची नक्षी दिसते. या मंदिरातून एक भुयार तळ्यापर्यंत जाते त्यातून राण्या जात असत. त्या तळ्याजवळ पूर्वी जोहार केला असे सांगतात. शत्रू कडून हार होणार असे समजले की रजपूत स्त्रिया एकत्रित पणे स्वतःला जाळून घेत त्याला जोहार म्हणत. आणि पतीबरोबर चितेवर ज्या अग्निप्रवेश करत त्यांना सती म्हणत. असे काही करायचे म्हणजे केवढे धॆर्य पाहिजे...

त्यानंतर मीरा मंदिर पाहिले. त्याचीही मुसलमानांनी बरीच तोडफॊड केली आहे. पहाताना आमच्या आसपास काही मुसलमान ही होते. माझ्या मनात नेहेमी येते, जेव्हा गाईड सांगतो की मुसलमानांनी एवढी मंदिरे पाडली, मूर्त्या तोडल्या, हे ऎकल्यावर त्या लोकांना काय वाटत असेल? त्यानंतर विजयस्तंभ बघितला. हा राणा कुंभाच्या काळात १० वर्षे बांधत होते. खिलजी च्या विरूद्ध लढाई जिंकल्यावर हा बांधला. त्यावर खूप हिंदू देवतांची चित्रे कोरली आहेत. शस्त्रांची पण चित्रे आहेत. ९ मजले आपण वरपर्यंत जाउ शकतो..पायर्‍या जरा उंच आहेत. हे स्ट्रक्चर या गडावर एकदम प्रॉमिनंट आहे. याच्या बाहेर गाईड मधील गाणे सगळ्यांना आठवत असेलच. या स्तंभाच्या दर मजल्याला बाल्कनीज आहेत. एकूण छान स्ट्र्क्चर आहे फक्त जरा जास्त काम केलेले वाटले. रेड स्टोन व मार्बल वापरला आहे. याच्या बाजूला एक महादेवाचे छान मंदिर आहे. जवळच जोहार केलेली जागा दाखवतात.

याच गडावर किर्ती स्तंभ आहे जो विजयस्तंभाहून जुना आहे. त्यावर जॆन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत व जॆन आर्किटेक्चर आहे. हा स्तंभ विजयस्तंभापेक्षा डेलिकेट वाटतो.

सगळ्यात शेवटी पद्मिनी महाल पहायला गेलो. ही राणी काश्मिरहून आणलेली होती. दिसायला अतिशय सुंदर. तिला गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून एक जलमहाल बांधला आहे. पूर्वी आजूबाजूला खूप पाणी होते तळ्यात आता अगदीच कमी आहे. अशी एक कथा सांगतात , या राणीला बघण्याची अल्लाउद्दीन खिलजी ने गळ घातली तेव्हा दुसर्‍या महालाच्या आरशातून त्याला राणी दा्‍खवली. ती तिथे पायर्‍यांवर बसली होती. मागे वळून पाहिले तर ती पायरी दिसत नाही. (फिजिक्स्च्या तत्वाचा वापर करून). यात खरे किती माहित नाही पण गाईडस अगदी रंगवून ही गोष्ट सांगतात. ही सगळी स्टोरी गाईड च्या या गाण्यात शेवट्च्या २ कडव्यात दाखवली आहे. अर्थात स्टोरी माहित नसेल तर काही कळणार नाही. http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU

त्यानंतर किर्ती स्तंभाच्या जवळ सुंदर सूर्यास्त पाहिला. अगदी पिक्चर पर्फेक्ट. संध्याकाळी लाईट ऎंड साउंड शो पाहिला. त्या सगळ्या पडक्या भिंती, महाल या शोमध्ये सगळा इतिहास आपल्या पुढे जिवंत करतात. दर वेळॆला मेवाडचे राजे प्राण पणाला लाउन लढायचे पण मुसलमानांना मिळायचे नाहीत आणि हरले तरी खूप शॊर्य दाखवून हरायचे. मेवाडच्या लोकांना मारवाडच्या लोकांबद्द्ल खूप चीड आहे. ( जयपूर, मानसिंग व जोधाबाई) आमचा गाईड खूप चिडून बोलत होता. ते ऎकून इथे जोधा अकबर ला का विरोध झाला असेल ते समजते. पूर्वी मला वाटायचे उगाच नाटक करतात पण मेवाड वाल्यांना मारवाड वाल्यांबद्द्ल खरेच राग आहे. त्या राजांची कहाणी, मीराबाईची गोष्ट व पद्मिनीची कहाणी छान सागितली आहे. नंतरचा इतिहास मात्र फारसा सांगत नाहीत (महाराणा प्रताप नंतर...ते जरा खटकले)

रात्री हा सगळा इतिहास डोक्यात घोळवत परत आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या एका मित्राकडे भेटायला गेलो. त्याच्या मते उदयपूर मध्ये इतरही अनेक जागा बघण्यासारख्या आहेत. गप्पा, छान ब्रेकफास्ट खाल्ला व अहमदाबादला निघालो. ६-७ दिवस कसे गेले कळलेच नाही. इतके कोरीव काम पाहिले की झोपल्यावर छतावर कोरीव कामच दिसे. खूप चाललो, चढ उतार ही खूप झाले एकंद्रीत ट्रीप मस्त झाली. या उदयपूर मध्ये ऒपन ड्रेनेज हा प्रकार मात्र सगळीकडे खटकत होता. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा. अजून एक गोष्ट मनात आली महाराष्ट्रात इतके गड किल्ले आहेत पण एकही धड अवस्थेत नाही. एकतर मुस्लीमांना ते कधी शरण जात नसत त्यामुळॆ सतत लूट तॊडफॊड होऊन किल्ल्यांवर काही शिल्लक राहिले नाही. आता जसे आहेत त्याच्यावर टूरिझम च्यासाठी काही तरी केले पाहिजे. राजस्थान च्या लोकांनी मात्र आपले किल्ले शिल्लक ठेवले आणि आतले सामानही. आता यातले चांगले काय व वाईट काय हा प्रश्न वेगळा आहे.

Monday, April 5, 2010

अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)




अनंतहस्ते.... भाग २ - (राणकपूर-हल्दीघाटी-उदयपूर)

(फोटोवर क्लिक केल्यास मॊठे दिसतील)

दुसर्‍या दिवशी सकाळी माउंट अबू सोडले. घाट उतरताना रस्ता खूप छान होता. वाटेत बरीच वानरसेना काही खाद्य मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला बसली होती. एका ठिकाणी पाटी होती ’माकडांना खायला घालू नका’ आणि त्याशेजारीच ३-४ माकडे बसली होती. कोणीतरी म्हटले, ’काय पाटीशेजारीच बसली आहेत’, (काय करणार अजून माकडांना वाचता येत नाही ना..) लोकांना कितीही सांगितले कि माकडांना खायला घालू नका तरी लोक ऎकत नाहीत त्यामुळे ही सगळी सेना अशी खाण्याची वाट बघत बसते. घाट उतरल्यावर हवा बदललेली जाणवली.

पुढचा मुक्काम राणकपूर येथे होता. हे ५००-६०० वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे. त्यात १४४४ खांब आहेत. प्रत्येक खांब दुसर्‍याहून वेगळा आहे. असे म्हणतात कि हे खांब मोजता येत नाहीत. बहुतेक जिथे जिथे खांब असतात तिथे असेच सांगतात कि हे खांब मोजता येत नाहीत...कारण काही कळत नाही. हे मंदिर अरवली च्या जंगलात एका छोट्या गावात आहे.जाताना घाट बर्‍यापॆकी अवघड होता. बाजूला जंगल. पावसाळ्यात हा भाग खूप छान दिसतो. हे देउळ इतक्या आत का बांधले असावे असा आम्ही विचार करत होतो, तिथल्या पुजार्‍याने सांगितले की लोकल लोकांनी बांधले आहे. राणा कुंभाच्या काळात हे देउळ बांधले असे म्हणतात. आम्ही पोचल्यावर कळले की इथे फोटॊ काढता येतात. बरे वाटले. ज्या लोकांनी शॉर्ट्स, स्कर्ट घातले होते त्यांना अडवले. पूर्ण कपडे रेंट वर मिळण्याची सोय होती ते घालून आत जाउ दिले. ही माहिती इंटरनेट वर ठेवायला पाहिजे. बरेच गोरे पांढर्‍या कफ्न्या घालून हिंडत होते. मला व्हॅटिकन सिटी ची आठवण झाली. तिथेही असेच अडवले होते आणि पर्यायी व्यवस्था काही नव्हती.
आत गेल्यावर एक गाइड घेतला..एक १३-१४ वर्षाची मुलगी होती. चांगली माहिती दिली. तिथे ३ कुटुंब आहेत. वर्मा, शर्मा व पुरोहित. त्यातलेच लोक गाईड चे काम पिढ्यानपिढ्या करत आहेत. बघा टूरिझम मुळे निदान काही लोकांची उपजिविकेची सोय झाली आहे. या देवळाच्या आर्किटेक्ट्चा पुतळा एका खांबावर आहे. हे त्या गाईडने सांगितले म्हणून कळले. कोरीव काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खांब, छतावरचे ३ डी काम, मधले चॊक फारच सुंदर ...हे बघू का ते असे चालले होते. आतमध्ये मार्बल मुळे गार वाटत होते. आपल्याला एक फूल काढायचे म्हटले तर सिमेट्रीकल काढता येत नाही, इथली डिझाईन्स कशी केली असतील हा प्रश्न पडतो. या लोकांनी इतक्या पूर्वी ते मार्बल नेले, कोरीव काम केले आणि मुसलमानांपासून जपले......ग्रेट. पूर्वीच्या राजे लोकांच्या मध्ये स्पर्धा असेल कोण किती चांगल्या वास्तू बांधतो त्यामुळे आज आपण इतकी चांगली मंदिरे बघू शकतो. इथली ३-४ डिझाईन्स प्रसिद्ध आहेत. एक १०८ साप व त्याच्या एकमेकात गुंतलेल्या शेपट्या....


एका ठिकाणी ५ धडे व एकच चेहेरा त्याला आहे..हे पुन्हा जोडताना त्याचा ऍंगल चुकला आहे. पूर्वी कुठुनही पाहिले तरी तो चेहेरा त्या शरीराचा वाटे. कारागिरांनी इथे बर्‍याच करामती केल्या आहेत.... बरे त्या

मनाने गाजावाजा कमी...लोकांची प्रसिद्धी साठी केवढे ्प्रयत्न चालतात त्यामानाने इथे साधेपणा जाणवला. लोक इथे दान देतात. पुण्यातून आम्ही आलो म्हटल्यावर रांका जुवेलर्स चे खूप कॊतुक करत होते त्यांची इथे बरीच मदत आहे. पण आश्चर्य म्हणजे गवगवा नाही (आजकालच्या मी पणाच्या काळात.) आमची बरीच फोटॊग्राफी झाली. अर्थात प्रत्यक्ष आणि फोटॊ यात खूप फरक पडतो.
नंतर पोट्पूजेसाठी बाहेरील खानावळ गाठली. इथे जेवण फुकट पण स्वच्छ्तेचे २५ रू चार्ज करतात. साधे पण चांगले जेवण होते. शिस्त होती. पानात टाकू नका असा आग्रह होता. तिथून बाहेर पडल्यावर dari काम बघण्यासाठी थांबलो. सरकार या लोकांना ही कला चालू ठेवण्यासाठी मदत करते. एका खेड्यात ८०-९० घरात हे का चालते. नॆसर्गिक रंग व हाताने विणलेल्य़ा सतरंज्या बघण्यासारख्या होत्या. इथे थोडी खरेदी झाली. एकंदर मांडणी चांगली होती त्या जागेची. एक सतरंजी विणण्यामागे किती कष्ट असतात हे बघितले.





आम्ही गेलो ते होळी नंतरचे दिवस. राजस्थानात महिनाभर हा उत्सव चालतो. आपल्याकडे जशी गणपतीची वर्गणी गोळा करतात तशी इथे होळीची. इथले आदिवासी लोक दगड, काटेरी झुडुपे लावॊन रस्ते अडवतात. आणि १०-२० रू. मागून घेतात. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर कटकट वाटायला लागली. या गोष्टी कडे पोलिस पूर्ण दुर्लक्ष करतात. आपण गाडी दगडांपासून वाचवण्यासाठी पॆसे देत जातो....हा सिझन सोडून जाणे हा सोपा उपाय, कारण ते काही बदलणार नाहीत. इथे नव्यानेच डोंगर खोदून रस्ते केले आहेत त्यामुळे रस्ते अडवायला दगड भरपूर. या सगळ्या गोंधळात आमचे टाइम टेबल चुकायला लागले...स्पीड कमी पडू लागला. या सगळ्यात कुंभळगड चा विचार सोडावा लागला. ही जागा बघण्याचे फार मनात होते. रोहन यांच्या ब्लॉगवर वाचले होते आणि फोटो ही बघितले होते. पण या होळी च्या अडवणूकीमुळे विचार बदलला. (मुलीची तब्येत ही जरा बिघडली). चितोडगड बघणार आहोत मग हा नाही बघितला तरी चालेल असे ड्रायव्हरचे म्हणणे ...मला मात्र रूखरूख लागली इतक्या जवळ जाउन त्या होळी वाल्यांमुळे बघता आला नाही म्हणून.

या पुढचा मुक्कम होता प्रसिद्ध हल्दी घाटीचा. या बद्दल आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले असते त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करू शकत होता. महाराणा प्रताप ची लढाई , चेतक घोडा या सगळ्याबद्द्ल एक फिल्म दाखवतात. तिथे एक म्युझिअम आहे - बघण्यासारखे आहे. प्रत्यक्ष युद्धाचे चित्र मॉडेल रूपात मांडले आहे. पन्ना दाईची गोष्ट व इतर काही प्रसंग छान उभे केले आहेत. चेतकची समाधी बघता येते. इथे आल्यावर कळले की चेतक ही घोड्याची जात आहे घोड्याचे नाव नाही.चेतक व नाटक अशा २ जाती होत्या. चेतक घोड्याला लढताना हत्तीची सोंड लावत म्हणजे समोॠन येणारा हत्ती त्याला इजा करत नसे. त्यामुळे इथल्या चित्रात नेहेमी चेतकला हत्तीची सोंड दिसते.
इथे एक डोंगरात घाटी दाखवतात. तिथली माती पिवळी दिसते ज्यामुळे हे नाव पडले पण खरी घाटी जरा वेगळी कडेच आहे. आमच्यापॆकी एकाने पूर्वी ही जागा बघितली असल्याने त्यांच्या हे लक्षात आले. तिथे जवळच जुना रस्ता व घाटी दिसते. लोकांना काहीतरी बघायला मिळावे म्हणून ही नवीन घाटी दाखवतात...हा खोटेपणा करण्याचे खरे म्हणजे काहीच कारण नाही. असो.
हल्दी घाटीचे अजून एक वॆशिश्ट्य म्हणजे इथे गुलाबाची खूप लागवड होते. हा प्रदेश इतका रुक्ष दिसतो कि इथे गुलाब होत असतील हे वाटत नाही. आम्ही गुलकंद व सरबताची खरेदी केली. तिथेच त्यांची साधी मशिनरी होती (एक मोठा रांजण , गॅस इ) या गोष्टी नेट वर असल्याने माहित होत्या. आमचा ड्रायव्हर म्हणायचा आपको तो सब पहलेसे पता हॆ..(थॅंक्स टू ट्रिप ऍडव्हायझर रिव्ह्यूज...)

हल्दी घाटीतून निघून उदयपूरला पोचेपर्यंत रात्र झाली. तिथे रामप्रसाद व्हिला त चेक इन केले. हॉटेल छान आहे फक्त लिफ्ट नाही. आमच्या रूम्स ३र्‍या मजल्यावर होत्या. बाजूला टेरेस व समोर लेक आणि त्यामागे टेकडी...छान सिट्यूएशन होती. कुणाचे तरी घर कन्व्हर्ट केले आहे हॉटेल्मध्ये. सगळीकडे मार्बल, कमानी, डेकोरेशन छान होते. रात्री समोरच्या टेकडीचा रस्ता लाईटेड दिसे. एकंदर रात्री दमून आल्यावर गच्चीत थांबले की छान देखावा दिसायचा.

(क्रमशः)