Showing posts with label सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा. Show all posts

Friday, January 8, 2010

३ इडियट्स..

३ इडियट्स..

परवा ३ इडियटस पाहिला. जरा धाकधूकच होती. एखादा चित्रपट आधीच खूप गाजला की खूप अपेक्षा वाढतात आणि बर्‍याच वेळा निराशा होते. आमिर खानचे पिक्चर्स म्हटले की जनरली चांगले असतात. ( अपवाद गजिनी आणि मंगल पांडे.. हे मला विशेष आवडले नाहीत) ३ इडियट्स चांगला निघाला. आधी पिक्चर बघितला मग स्टोरी बद्द्ल बरीच चर्चा ऎकली म्हणून पुस्तक वाचले. पिक्चर अर्थात चांगला आहे. मला वाटते की स्टॊरी बद्दल जी काही चर्चा झाली ती एक पब्लिसिटीचा भाग असावा.

या सिनेमात पंच लाइन्स खूप छान आहेत आणि त्या हसताना बर्‍याच वेळा निघून जातात. हा सिनेमा तरूण व बाकीच्या वयाच्या प्रेक्षकांना आवडण्याचे कारण म्हणजे प्रत्येक जण कुठेतरी त्यात स्वतःला रिलेट करू शकतो. फोटोग्राफी उत्तम. विशेषतः हेलिकॉप्टरचे शॉट्स उल्लेखनीय. शेवट्ची १५ मिनिटे तर लडाखचे सुंदर चित्रण. एवढ्या हाय अल्टिट्यूड वर जाउन चित्रण करणे सोपे नाही. लेकचे चित्रिकरण छान आहे. सिनेमामुळे अशा सुंदर गोष्टी लाखॊ लोकांपर्यंत पोचतात. लडाख अजून हिंदी सिनेमात कमी दिसते. आपल्याकडची सुंदर ठिकाणॆ अजून जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोचली तर पर्यटन खात्याला त्याचा नक्की फायदा होईल.

आमिर खान दिसतो कॉलेज गोइंग. त्याने छोट्या छोट्या गोष्टीतून आपले कॅरॅक्टर छान उभे केले आहे. कपडे, लकबी. लहान पणचा आमिर खान पण चांगला शोधला आहे. जावेद जाफरी मात्र वाया गेला आहे. तो खूप चांगले काम करू शकतो. कॉलेज मध्ये भाषण करणार्‍या मुलाची एक्स्प्रेशन्स फार मस्त आहेत.त्याला शब्दांचे अर्थ माहित नसल्याची एक्स्प्रेशन्स त्याने छान दाखवली आहेत. बरीचशी मुले ज्यांना हिंदी येत नाही ती नुसती पाठांतर करतात आणि मार्क्स मिळवतात. मी याचा सॊदीत शाळॆत शिकवताना अनुभव घेतला आहे त्यामुळे हा प्रसंग मला पटला. तसेच जुजराती पदार्थावरील कॉमेटस ही पटल्या आम्ही पण घरी नेहेमी म्हणायचो काय ही नावे पदार्थांची..थेपला, हांडवा, ढोकळा....

डिलिव्हरीच्या प्रसंगाऎवजी दुसरा कुठला प्रसंग घेतला असता तर चागले वाटले असते. तो अर्धा तास जरा जादा वाटला.(बोअर झाला) एखादे गाणे कमी केले असते तरी चालले असते. पण शेवटी डायरेक्टर म्हणेल ती पूर्व दिशा...

आजकाल म्हणे हा सिनेमा बघून आत्मह्त्यांचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी मुलांना स्पर्धेत उतरायला जसे शिकवावे तसे अपयशाला सामोरे जायला ही शिकवावे म्हणजे ही वेळ येणार नाही. स्वप्न बघायची तर भरपूर मेहेनत करायची तयारी हवी. पहिल्या झटक्यात स्वप्ने सहसा खरी होत नाहीत. असो.

एकंदरीने बर्‍याच दिवसांनी एक करमणूक करणारा, हसवणारा, अतिरेकी नसलेला, बंदूक नसलेला सिनेमा बघायला मिळाला. तुम्हालाही आवडेल. शेवट्च्या शॉटसाठी शक्यतोवर मोठ्या पडद्यावर पहा.

Monday, December 21, 2009

अवतार-एक ३ डी फिल्म

लोकांना आकर्षित करायचे तर काहीतरी वेगळे हटके करण्याची या सिनेमावाल्यांची चढाऒढ लागलेली असते. कधी गोष्टीत नाविन्य, कधी नट नटी खास , कधी गाणी छान तर कधी लोकेशनच्या नावावर गर्दी खेचली जाते. फॅंटसी असलेले चित्रपट पण नेहेमी चांगले चालतात. मला नेहेमी वाटते जे सध्या शक्य नाही ते कल्पनेने उभे करण्यात माणसाला खूप मजा येते. बरे कुठेही कशीही भरारी मारा - एकदा फॅंटसी म्हणल्यावर लॉजिक वगॆरे दूर असते. सध्या असाच एक सिनेमा आला आहे आणि मंडळीनी त्याला, त्याच्या स्पेशल इफेक्ट्स ला पसंती दिली आहे. अवतार बद्द्ल तुम्ही नेट वर, पेपरात सगळीकडे वाचले असेलच. मला स्वतःला असे सिनेमे बघायला आवडत नाही पण त्यामागचे तंत्र मत्र नक्कीच आवडते.

काल माझ्या लेकिने हा सिनेमा पाहिला आणि तिला आवडला. स्पेशल इफेक्ट्स छान आहेत. निळा रंग खूप वापरला आहे (मला सावरिया आठवला). दुसर्‍या प्लॅनेट वर वस्ती, वेगळी माणसे आणि जाता जाता एखादा संदेश. बोलता बोलता ती म्हणाली, "आम्हाला गॉगल्स दिले होते". म्हणजे हा ३ डी वाला सिनेमा आहे तर! मला हे माहित नव्हते. मी आतापर्यंत २-३ वेळा असे छोटे सिनेमे किंवा डिस्ने मधल्या फिल्म्स बघितल्या आहेत. असे सिनेमे आपल्याला त्याचा एक भाग बनवून घे्तात. आपण ३ डी गोष्टी समोर पडद्यावर बघतो आणि नकळत त्याचा घटक बनतो. आणि हो गॉगल्स काढून पाहिले तर एकदम ब्लर पिक्चर दिसते. गॉगल घालून बघा असे सांगितले की माझ्यासारखे लोक नक्कीच काढून एकदा तरी बघणार. नको म्हटले कि ती गोष्ट का करावीशी वाटते माहित नाही. बरे वयानुसार ही गोष्ट काही कमी होत नाही बरका..

थोडीशी याबद्दल माहिती वाचली आणि अरे, इतके दिवस हे आपल्या लक्षात कसे आले नाही असे वाटले. आपले दोन्ही डोळॆ एकच गोष्ट वेगवेगळ्या ऍगल वरून, अंतरावरून बघतात. आपला मेंदू यातील अंतर ऍंगल यांचा अभ्यास करून आपल्याला व्यवस्थित ३ डायमेनशनल चित्र दाखवतो. आता या प्रकारच्या सिनेमात २ वेगवेगळे प्रोजेक्टर्स एकच चित्र थोड्या वेगळ्या ऍगलने दाखवतात. त्यामुळे नुसत्या डोळ्याने पाहिले तर ब्लर दिसते. गॉगल असे बनवलेले असतात की दोन्ही डोळॆ वेगवेगळ्या प्रतिमा बघत्तात आणि प्रत्येक डोळा एकच प्रतिमा कॅप्चर करू शकतो. म्हणजे मेंदूला नेहेमीप्रमाणे दोन प्रतिमा वेगवेगळ्या अंतरावरून मिळतात व त्याचे नेहेमीप्रमाणे काम चालते. आपल्याला ३ डायमेन्शनचा अनुभव येतो.

आता म्हणे पुढे जाउन अशी थिएटर्स बनवणार आहेत की ज्यात गॉगल्स घालावे लागणार नाहीत. थोड्याच दिवसात आपण घरबसल्या असे सिनेमे बघू शकू कारण सायंटिस्ट ऑलरेडी यावर काम करत आहेत.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात...आजकालच्या नवीन नवीन गोष्टी पाहिल्या की मला वाटते हॊस ही शोधाची जननी आहे असा त्यात बदल करावा लागेल.कधी कधी वाटते माणसाला आहे त्यापेक्षा पुढचे मिळवण्याची हॊस नसती तर हे काही घडले नसते. आपण कदाचित अजून ब्लॅक ऍड व्हाइट पिक्चर्स बघत असतो.