Monday, June 1, 2009

माझ्या साहसकथा

माझ्या साहसकथा....

आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात. पण जमेल का नाही असे साराखे वाटत रहाते. मनात थोडी भिती वाटत असते, पण उत्सुकता गप्प बसून देत नाही. मला पोहायला अगदी जेमतेम येते...न के बराबर त्यामुळे माझी बरीच साहसे ही अर्थातच पाण्याशी निगडीत. या गोष्टीतला ’साहस’ हा भाग तसा सापेक्षच. माझ्यापेक्षा वयाने लहान मंडळी या गोष्टी अगदी सहज करत असतात.

अंदमानच्या सहली मध्ये स्नॉर्कलींग हा प्रकार पहिल्यांदा पाहिला व केला. समुद्राच्या पोटात अगदी उथळ व शांत पाण्यात काही ठराविक ठिकाणी पाण्याखाली ही रंगीत दुनिया दिसते. आतापर्यंत फ्लोरिडा, हवाई इथेही कोरल्स पाहिली पण अंदमानच्या कोरलच्या रंगाची सर कुठे नाही. नुसते पाण्याला डोळे लावले की आत एवढा खजिना दिसेल याची अगदी कल्पना येत नाही. कोरल्स बघण्यासाठी आधी एका मोटर बोटने बरेच आतवर नेले. हा प्रवास खूप छान होता. पाण्याचा रंग सुंदर हिरवा निळसर. काठाजवळ तर खालचा तळ दिसत होता इतके स्वच्छ पाणी होते. नंतर एका छोट्या बोटीने अजून थोडे अंतर नेले व प्रत्येकाला मास्क दिले. हा मास्क घालून तोंडाने हवा घ्यायची असते, वाटते की पटकन जमेल पण आपल्याला नाकाने हवा घ्यायची एवढी सवय झालेली असते की आपण नकळत नाकाने श्वास घेतो व थोडी खार्‍या पाण्याची चव घेतो. मला एका कातकरी माणसाने टायरच्या सहाय्याने पुढे नेण्याची तयारी दाखवली पण हे जमेल का नाही असे वाटत होते. "तुम्ही एकदा पाण्याला डोळे लावून तर पहा" या आग्रहाला मी बळी पडले व पाण्याला डोळे लावले. खालचे सुंदर रंगीत मासे व रंगबिरंगी कोरल्स पाहून मी नकळत त्या माणसावर भरोसा टाकून बरीच पुढे गेले. केशरी रंगाच्या कोरल्स चा इथे साठा आहे. पिवळे, जांभळे केशरी ठिपकेवाले काळे पांढरे पट्टे असलेले असे अनेक मासे बघितले. फारसे कमर्शियल असे हे ठिकाण नसल्याने अजून हा साठा शिल्लक आहे. इथे अगदी उथळ पाण्यात व आतवरही कोरल्स आहेत त्यामुळे त्याला धक्का न लावता ती बघा असे सारखे सांगितले जाते. ही अडाणी मंडळी ह साठा चांगला जपत आहेत. मधेच एकदा मागे वळून पाहिले असता पोहत खूप पुढे आल्याचे लक्षात आले पण आता भिती कमी झाली होती. थोडेसे साहस जर त्या दिवशी केले नसते तर मी केवढ्या आनंदाला मुकले असते.....

अमेरिकेत आल्यापासून व्हाईट वॉटर राफ्टींग हा शब्द फार वेळा कानावरून गेला. खळाळत्या पाण्यात जाणार्‍या त्या बोटी पाहिल्या आणि आपणही एकदा हा अनुभव घ्यावा असे वाटू लागले. कोलोरॅडो स्प्रिंग्सहून जवळच एका नदीवर आम्ही हा अनुभव घेतला. आम्हाला एका बसने नदीच्या एका बाजूला नेले. तिथून ट्रीप सुरू होणार होती. जाताना गाईड ने’ ’संभाव्य धोके’ यावर बरीच माहिती दिली जरा जास्तच..ऎकून वाटायला लागले की इतकी भिती का दाखवतात? पण ती सगळी माहिती देणे त्याना आवश्यक होते. मे महिना असला तरी पाणी गार होते म्हणून स्पेशल सूटस चढवले. त्यावर लाईफ़ जॅकेट अशी तयारी झाली. प्रत्यक्ष बोटीत बसेपर्यंत मला वाटत होते की पाण्यात पडायची वेळ आली तरी बोटीला घट्ट धरून ठेवायचे पण प्रत्यक्षात उलटेच होते. पडायची वेळ आली तर पटकन बोट सोडून बाजूला व्हायचे. प्रत्येक बोटीत ६ जण व एक गाईड होता. त्याला पाण्यातल्या रॅपिडस ची पूर्ण माहिती होती. तो बरोबर बोटीला दिशा देउन बोट पुढे कढत होता. सुरूवातीला नेहेमीप्रमाणे धाकधूक वाटत होती पण एकदा सुरूवात झाल्यावर मजा वाटली. दोन्ही बाजूला छान डोंगर मध्ये रस्ता व शेजारी नदी असा सुंदर प्रवास होता. अधून मधून रिमझिम पाऊसही होता.गाईड ने सूचना केली की आम्ही वल्ही मारत होतो पण त्याला विषेश अर्थ नव्हता तोच मेन काम करत होता. एकदोनदा त्या खळ्खळ्णार्‍या पाण्यावरून जाताना बॊट उलट्णार असे वाट्ले पण वाचलो. आमच्या ५ पॆकी १ बोट वाटेत आडवी झाली पण कुणाला फारसे लागले नाही. रॅपिडस वरून जाताना बोट जोरात जाते, आपण भिजतो पण खूप मजा येते. आम्ही ईंटरमिजिएट लेव्हल घेतली होती त्यामुळे फार अवघड वाटले नाही. ज्या लोकांनी पूर्ण प्रवाहाचा अभ्यास करून हा खेळ चालू केला त्यांचे कॊतुक वाटल्याशिवाय रहात नाही.

२००८ मध्ये आम्ही हवाईची सफर केली. मुख्य आकर्षण होते ज्वालामुखी बघण्याचे. हा ज्वालामुखी जागृत आहे. नेमके आम्ही जाण्यापूर्वी तो थंडावला. मी रोज दोनदा तरी ईंटरनेट वरून अपडेट्स बघत असे. बरोबर आम्ही जाण्यापूर्वी १-२ दिवस आधी तो चालू झाला व मला हुश्श झाले. हा ज्वालामुखी बिग आयलंड या बेटावर आहे. तिथे व्होल्केनो पार्क, ब्लक सॅंड बीच व मॊना किया वर जाऊन ऍस्ट्रॉनामीचे टेलिस्कोप्स बघण्यात २ दिवस गेले. नुकताच ज्वालामुखी परत जागृत झाल्याने नेहेमीची जागा बदलली होती. तो बघण्याची वेळही अगदी थोडी होती. . आजूबाजूची हवा चांगली नाही म्हणून फार जवळ जाउ देत नव्हते. पण तो बघायचा तर होताच त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर राईड घ्यायचे ठरवले. माउई या शेजारच्याच बेटावरून राईड घेतली. सुरूवातीला वींड सर्फर्स, आजुबाजुला धबधबे, छोटी बेटे बघत बिग आयलंड वर आलो. आजपर्यंत लाव्हा फक्त भूगोलाच्या पुस्तकातून भेट्ला होता. त्याचे असणारे प्रचंड तपमान, बाहेर पडणारे विषारी वायू, क्षणार्धात गोष्टींचा नाश करण्याची ख्याती अशा सगळ्या गोष्टी एकदम आठवल्या. विमानातून गेल्याने खालची लाव्हा फ़िल्ड्स , लाव्हा कुठुन कसा वाहत गेला, त्यामुळे जळलेली झाडे, घरे दिसत होती. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिथे वाढलेली झाडे हे सगळे अगदी छान बघता आले. या गोष्टी जमिनीवरून बघता येत नाहीत. हा लाव्हा मोठ्या ट्यूब्सच्या मधून वहात शेवटी समुद्राला जाऊन मिळतो. त्याच्यावरून जाताना खाली आधी खूप धूर दिसतो आणि मग पाण्यात पडणारा लाव्हा दिसतो अगदी पाण्याच्या पाईप मधून पाणी वहाते तसा लाव्हा बाहेर पडत होता. सर्व जागेवर वाफेचे ढग दिसत होते. त्या वर सेफ अंतर ठेवून आमचा पायलट हेलिकॉप्टर चालवत होता. काय साईट होती! मनात खूप भिती वाटत होती. पायलट ने ३-४ फेर्‍या वेगवेगळी माहिती देत मारल्या. एकीकडे वाटत होते पटकन परत फिरावे तर दुसरीकडे वाटत होते अजून एक फेरी मारावी. निसर्गाची करामत पाहून खूप छान वाटत होते. पाण्याला जीवन म्हणतात हे खरे आहे. जिथे लाव्हा समुद्रात मिळत होता तिथे नवीन जमीन तयार होते. सतत बाहेर पडणार्‍या लाव्हा मुळे एक नवीन बेट पाण्याखाली तयार व्हायला लागले आहे. डिस्ट्रक्शन व कन्स्ट्रक्शन एकाच ठिकाणी बघण्याचा हा अदभूत योग आयुष्यात कधीही विसरणार नाही.


इलिनॉय रिव्हर कनू ट्रिप

आजपर्यंत बोटींग बरेच केले आहे. ज्या जागी गेलो तिथे बोटींग ची सोय असेल तर आम्ही जायचोच. क्रेडिट गोज टू - अर्थात माझा नवरा. अमेरिकेत आल्यावर आमच्या घराच्या मागेच एक छोटे लेक असल्याने लगेचच कनू ची खरेदी झाली. तिथे थोडी सवय झाली वल्ही मारण्याची. इथे बरेच ग्रुप्स कॉलेज मधून रिव्हर कनूला जातात असे कळले. त्यांच्याबरोबर जायचे ठरले. त्यांनी आधी एक दिवस प्राथमिक माहिती दिली. दुसर्‍या दिवशी सकाळी निघालो. ८-१० जणांचा ग्रुप होता. एक गाईड होता. सगळ्यांनी मिळून कनू लोड केल्या. २-३ गाड्या घेउन गेलो. आदल्या दिवशी पाउस पडल्याने नदीचे पाणी वाढले होते. आधी थोडी प्राथमिक माहिती देउन कनू करायला सुरूवात झाली. हवा छान होती. सुरूवातीला पाणी एकदम संथ व भराभर पुढे जाता येत होते. आपण जणू पाणी कापत जात आहोत असे वाटत होते. आजूबाजूला ७-८ बोटी सगळे उत्साही त्यामुळे मजा वाटत होती. कनू करताना दोघांनी एका वेगात वल्हवले की छान वेग येतो व मजा येते. एकमेकांना ऒव्हरटेक करणे चालले होते. १२ मॆलांचा प्रवास होता. साधारण ६ मॆलांवर जेवणाचा ब्रेक झाला. हळूहळू हाताला जाणीव व्हायला लागली होती. जेवणानंतर अचानक चित्र पालटले. बाजूला मोटर बोटस फ़िरत होत्या. त्यांच्या लाटा हळूहळू आमच्या पर्यंत पोचत होत्या. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर बोट वल्हवणे खूप अवघड झाले. लाटांमुळे बोट खूप हलत होती व जाम भिती वाटत होती. एकदा आपल्याला कळले की आता आपल्या हातात काही नाही की मग आपण जरा इतर विचार करायला लागतो. हळूहळू आमचा स्पीड कमी झाला. नवरा मनात वॆतागला पण वरकरणी मला प्रोत्साहन देत होता. वल्हवताना पूर्वी ज्या लोकांनी भर समुद्रात बोटी नेउन वेगवेगळ्या जागा शोधल्या त्यांच्याबद्दल विचार येत होते. हवाईला नुकत्याच त्यांच्या गॊष्टी ऎकल्या होत्या. दिशा शोधत, समुद्री लाटांना तोंड देत, अत्याधुनिक साधने जवळ नसताना त्यांनी कसा प्रवास केला असेल? खरोखर ग्रेट लोक होते ते. बराच वेळ झाल्यावर हात अक्षरशः थांबले. आमचा गाईड सगळ्यांकडे लक्ष ठेवत होता. हळूहळू आम्ही शेवटच्या टप्प्याला आलो व हुश्श झाले. आपण १२ मॆल कनू केले यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्यातल्याच दोघांनी ड्राईव्ह केले परत आल्यावर सगळ्या कनू धुवून पुसून जागेवर गेल्या. मी मात्र हात दुखत आहेत म्हणून शेवटचे काम चुकवले. हात न चालणे म्हणजे काय याचा अनुभव या ट्रीप मध्ये घेतला. समीर व शेतल यांना या ट्रीप साठी धन्यवाद. आता पुन्हा एकदा संथ पाण्यात कनू करायला गेले पाहिजे...लाटा नकोत.

No comments: