
हॊस बागकामाची..........
स्प्रिंग आला की मला खूप उत्साह संचारतो. सगळ्या नर्सरीज मला बोलवायला लागतात. हवामानाची लहर संभाळून बागेत माझ्या फेर्या वाढतात. गेल्या वर्षीची पेरिनिअल्स परत उगवताना पहाण्यातला आनंद आणि नवे काय लावावे याचा विचार सुरू होतो. भाज्या लावल्या जातात आणि अचानक वाढलेले गवत लक्ष वेधून घेते. मग ते काढताना कंबर मोडते. पण कुठेतरी लहानपणीची बाग आठवत असते. बागेत कुठेही हिंडा, पायाल एक दगड किंवा गवताची काडी लगणार नाही अशी स्वच्छ बाग...
माझ्या लहानपणी माझी आजी कायम बागकाम करत असे. दिवसाचे ३-४ तास तरी तिचे या कामात जात. सुरूवातीला मातीत काम करणे मला आवडत नसे पण हळूहळू पाणी घालणे, आळी साफ करणे अशी कामे आमच्या वाट्याला येउ लागली व त्यातून बहुदा माझी बागकामाची सुरूवात झाली. आजी चा एक आवडता उद्योग म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत सगळी नातवंडे जमली की त्यांना बाजूला बसवायची स्वतः मध्ये बसून पेरू, चिकू, आंबे, चिरायची व आम्हाला भरपूर खायला घालायची. आम्ही सगळे त्या खाण्याची वाट बघत असू. यात पक्षांनी टोची मारलेली फळे असत तशीच आढी लावून पिकवलेली फळेही असत. जांभूळ, आवळा, सीताफळ, रामफळ, विविध प्रकारचे आंबे, या सगळ्या चवी घरच्य़ा बागेत मिळायच्या. त्याच बागेत कंपोस्ट खत करतानाही तिला पाहिले आणि झाडांवर कलमे करतानाही. पूर्ण बागेत तिने पाट तयार करून पाणी द्यायची सोय केली होती. चार कोपर्यातले चार नळ सोडले की सगळ्या बागेत पाणी खेळत असे. नकळत आपण बघून किती गोष्टी शिकत जातो...तेव्हा कळत नाही.


झाडे लावताना नेहेमी जाणवते एका बी मध्ये केवढी शक्ती असते. आजीने जी झाडे लावली त्यांनी सगळ्या नातवंडांचे लाड पुरवले. त्यांना भरपूर फळे खायला घातली. इतके छोटे रोप किंवा एखादी बी काही दिवसात किती लोकांच्या उपयोगी पडते. इथे मी जी झाडे लावली ती ४ महिने का होईना भरपूर फुले देतात.
एक गोष्ट मात्र नक्की बाग गवताविना स्वच्छ ठेवणे हे माझ्यापुढे आव्हान असते.......

2 comments:
वर्षभरापासून मलाही बागकामाची लागण झालीय. ;)
इंग्रजीमध्ये एकाहून एक सरस बागकामावरचे ब्लॉग आहेत - भारतातल्या हवामानात ही झाडं, या वेळापत्रकाप्रमाणे येणं शक्य नाही, पण त्यातून ज्या प्रेमाने आणि शिस्तीने लोक बागकाम करताना दिसतात, ते वाचायचाही आता छंद लागलाय.
फोटो क्लेमेटिस आणि र्होडोडेड्रॉनचे का?
All the best for gardening.
Photo Clematis daffodils ani peonies
dar warshi nemane fultat he zade.
ethe khup lok classes pun kartat ani mast bagkam kartat. ya warshi Indiathi (udaypurla) kahi chan gardens pahilya
Post a Comment