Wednesday, October 3, 2012

वेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद)

आपल्या जुन्या ग्रंथात वेद, पुराणे, ब्राम्हणे, अरण्यके, उपनिषदे इ. चा सामावेश आहे. या ग्रंथात साधारण काय माहिती आहे हे बघण्याचा हा माझा प्रयत्न. फार खोलात न जाता मला जे पटले किंवा जे नाही पटले  ते शेअर करण्याचा हा प्रयत्न. अर्थात माझ्या पटण्या न पटण्याचा काही संबंध नाही.   इतक्या वर्षांपूर्वीची ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे तर ती माहित करून घ्यावी असे वाटले. या भूतलावर जेजे आपण बघतो ते सगळे या जुन्या ग्रंथात डिफाइन केले आहे असे म्हणतात. बरीच मंडळी म्हटली की कशाला वेळ घालवतेस असले वाचण्यात त्यातून काहीही फायदा नाही. हे वाचले किंवा नाही वाचले तर रोजच्या जीवनात काही फरक पडत ऩाही. पण एकदा उत्सुकता चाळवली की आपण त्या गोष्टीच्या मागे लागतोच. काही नाही तरी खूप संस्कृत शब्द जे आपण नेहेमी वापरतो त्यांचे वेगवेगळे अर्थ कळले. मजा आली. काही श्लोकांचा अर्थ कळत होता पण बरेच समजत नव्हते. ४-५ उपनिषदांबद्दल वाचले. इथे २ व पुढच्या भागात २ बद्दल काय वाटते ते लिहायचा विचार आहे. काही लोकांनी इंटरेस्टही दाखवला आणि आम्ही वाचू असे सांगितले.

 सुरूवातीला इंटरनेट वापरून वेदावर काही सर्च केले की इंद्र, अग्नि, वरूण या देवतांबद्दल माहिती मिळे. त्यांचे महत्व व पूजा यावर विशेष भर दिसतो.  निसर्गाला खूप महत्व व त्याच्या संवर्धनाबद्दल माहिती आढळते. आपल्या जीवनात पंचमहाभूतांचे महत्व आहे. त्यामुळे त्यांची पूजा करणे साहजिक वाटते. बरीच मंडळी म्हणतात की नुसता उपदेश भरला आहे या उपनिषदात. मलाही काही पुस्तके वाचताना बोअर झाले पण नंतर इतर माहिती पण मिळाली. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर साहजिकच वागण्यावर बंधने येतात व उपदेश ऐकल्यासारखे वाटते.

ईशोपनिषद - इ स पू ५५०० वर्षे साधारण काळ.  हे उपनिषद मूळ संहितेत...ग्रंथात आहे.

 आपली उत्पत्ती व मरणोत्तर काय होते यावर बरीच चर्चा आढळते.  हे दोन्ही प्रश्न अजून शास्त्रज्ञांना सतावत आहेत. आपल्या वेदात सगळीकडे आत्मा व  त्याबद्द्ल चर्चा आहे. या आत्म्याच्या पूर्णत्वाबद्दल या उपनिषदात माहिती आहे.

ओम पूर्णमदः पूर्ममिदं पूर्णात्पूर्णमुदच्यतेः
पूर्णस्य पूर्णमादायपूर्णमेवावशिष्यते आणि शांति मंत्र याबद्दल बरीच माहिती दिली आहे.

आत्मतत्व हे पूर्ण असते. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. त्यातून काही काढून घेतले तरी ते आत्मतत्व पूर्णच रहाते.वनस्पति चे बीज, एकपेशीय प्राणी या स्वतःसारखे दुसरे निर्माण करू शकतात. डी एन ए नवीन डी एन ए बनवू शकतो. अनेक वेळा निर्मिती करू शकतो. मनुष्यात व अनेक प्राण्यात मात्र स्त्री व पुरूष मिळून जे बनते त्यातील फक्त झायगोट(बीज) हा अनेक पेशी निर्माण करू शकतो. ते पूर्ण असते. ठराविक कालान्तर ही क्रिया थांबते व नंतर जे निर्माण होते (मूल) ते मात्र पूर्ण नसते.(नुसता पुरूष अथवा नुसती स्त्री ही मूलाला जन्म देउ शकत ऩाही.) अणू ही अपूर्ण आहे. अणू ज्या लहानात लहान कणापासून बनलेला आहे त्यात ब्रम्ह आहे तो परममहान पूर्ण आहे.

सायन्स चँनेलवर डार्क मँटर वर मधे एक फिल्म पाहिली.  त्यात डार्क मँटर चे जे वर्णन होते ते ऐकून आपल्या पुस्तकातून ब्रम्हाचे वर्णन वाचतो आहोत असे वाटले. रंग नाही, रूप नाही, सगळीकडे असते, त्याचा नाश करता येत नाही, सगळे ब्रम्हांड त्याने धरून ठेवले आहे वगैरे.
या उपनिषदात हेही सांगितले आहे की सर्व गतिमान गोष्टीत ईश्वराचा वास आहे. जेथे गति आहे तेथे शक्ती आहे. ईशतत्व हे अचल, मनापेक्षा वेगवान आहे. विद्या व अविद्या एकत्र कराव्यात म्हणजेच आयुष्यात अध्यात्म व भौतिकाची जोड करावी. नुसतेच एकाच्या मागे लागू नये. उपासना करावी. तन मन वाहून घेउन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा.  लगेच यश मिळत नाही. किमान एक तप तरी आराधना करून मग फळाची अपेक्षा करावी. आजकालच्या रिअँलिटी शोज च्या जमान्यात हे लोकांना कितपत पटणार माहित नाही. यासाठी शरीर चांगले ठेवणे महत्वाचे. मग नियमाने वागणे आलेच, उपदेश आलाच. जगात खरे लपविण्यासाठी पुष्कळ मार्ग असतात पण आपण नीट पडताळून गोष्टी घ्याव्यात. पैसै, संपत्ती, मोह, माया हे सगळे सत्य लपवू शकतात. तेव्हा त्याच्या आधीन होउ नये.

सूर्य हा आपला स्वामी आहे. त्यात ब्रम्हतत्व आहे,  पण तो एकटाच नाही असे अनेक सूर्य आहेत. त्याला प्रजापतीचा मुलगा म्हटले आहे. इथे अनेक ब्रम्हांडांची कल्पना मांडली आहे.  ब्रम्ह ही जी एक महान शक्ती आहे ती अनेक सूर्यांना शक्ती देते. ब्रम्हदेवाचा दिवस व रात्र असे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यात तथ्य आहे. आजकाल विश्वाचे वय शास्त्रज्ञ सांगतात. त्याचा संबंध या दिवस रात्रीशी सांगतात. वातावरणाचा जो पट्टा भोवताली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे. यालाच काही लोक विष्णूरूप म्हणतात. परवाच एक माहितीपट पाहिला ज्यात तुम्ही  वाहनातून वर जाउन वातावरणाचा पट्टा अनुभवू शकता. हा थर आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवतो.

 कठोपनिषद

नचिकेताच्या गोष्टीने या उपनिषदाची सुरूवात होते.  नचिकेताचे वडील त्याचे दान मरणाला करतात. तेव्हा नचिकेत यमाकडे जातो. त्याला यमाची भेट हाण्यास ३ दिवस थांबावे लागते, म्हणून यम त्याला वर देतो. या बदल्यात नचिकेत त्याला मरणानंतर काय होते याबद्दल प्रश्न विचारतो. यम सुरूवातीला उत्तर द्यायचे टाळून त्याला बरीच प्रलोभने दाखवतो. पण नचिकेत पिच्छा सोडत नाही.


यमाने स्वर्गाची व्याख्या केली आहे.  हा वातावरणाचा सर्वात वरचा पट्टा - त्याला द्यू लोक असेही म्हणतात. इथे आनंद आहे. मरण नाही. प्राणमय, मनोमय व विज्ञानमय देह इथे प्रवेश करतात.  हे सर्व वायुरूप असतात.

आत्मा कसा असतो - हे परत काही श्लोकात सांगितले आहे. तो बघण्यासाठी श्रेयस व प्रेयस मधील श्रेयस घ्यावे. विद्या व अविद्येचा समतोल ठेवावा. आत्मा हा अणूहून अणू असतो तसाच ब्रम्हांडाएवढाही असतो. नचिकेत अग्नीची उपासना करावी. आवश्यक तेवढ्या गोष्टी घेउन(खाणे, पिणे) उपासना करावी. जास्त हव्यास करू नये. शब्द, रूप, रस, रंग रहित असा आत्मा आहे. त्याची नेमकी जागा दाखवता न आल्याने त्याला गूढात्मा असेही म्हटले आहे.आत्मा ही एक शक्ती आहे. निर्जिव वस्तूत आत्मा आहे पण जीव नाही. सजीव वस्तूत दोन्ही असते. ओम हे परम आहे. अक्षर आहे तसेच शब्द आहे. ते ब्रम्हपद आहे. हे परम तत्व कोठून आलेले नाही ते अनादि अनंत आहेच. चिरंतन तत्व आहे. म्हणून सनातन, पुराण आहे.
आत्मज्ञानाचा अनुभव ---सूक्ष्म देहालाच आत्मज्ञान प्राप्त करून जड देहाला देता येते.  हे झालेले ज्ञान शब्दात वर्णन करता येत नाही. निर्गुण, आनंदमय अशी ही अवस्था असते. आत्मा सर्व शरीरात आहे पण त्याला शरीर नाही. आतमज्ञान नुसत्या बुद्धीने, तत्वज्ञानाने होत नाही. शुद्ध वागणूक ठेवून मन व पंचेंद्रिये शांत केली की शक्यता वाढते. प्रत्येकाला तरीही हे ज्ञान होईल असे सांगता येत नाही. ज्याला आत्मज्ञान होते तो आत्म्याबद्दल जाणतो पण तो स्वतच आत्मा झाल्याने इतरांना सांगू शकत नाही.  (या संदर्भात दीपस्तंभ मधले काही लेख वाचलेले आठवतात. त्यात बरीच चरित्रे आहेत ज्यांना आत्मज्ञान झाले होतो. त्यानीही हा अनुभव वर्णन करता येणार नाही असे म्हटले होते पण त्याचबरोबर तेजाचे दर्शन झाले असे म्हटले आहे. विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस). आत्मा शरीरात रहातो व ११ दारांनी ब्रम्हाशी मंपर्क करू शकतो. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी ती ११ दारे. परमात्मा हा शुद्ध असतो. शरीरात प्राण व अपान हे दोन वायू आहेत. प्राण  वर नेतो व अपान खाली नेतो. आत्मा, जीव व मन असे तीन नचिकेत वर्णन केले आहेत.
शरीरातील आत्मतत्व - आत्मा याला शरीराची मर्यादा असते. बाहेर जे ब्रम्ह पसरलेले असते ते अमर्याद असते. सर्व आत्मे मिळून परमात्मा बनतो. परमात्मा व ब्रम्ह मिळून परब्रम्ह होते. ब्रम्हज्ञान झाल्यावर परत जन्म नाही. मनुष्यजन्मातच हे ब्रम्हज्ञान होउ शकते म्हणून मनुष्यजन्म व त्यात केलेली कर्मे महत्वाची. स्वच्छ दर्शन फक्त मनुष्यलोकात होते. मेल्यावर पितृलोकात ब्रम्ह स्वप्नासारखे दिसते. स्पष्ट दिसत नाही व कमी समाधान मिळते. गंधर्वलोकात पाण्यातील प्रतिबिंबासारखे दिसते व ब्रम्हलोकात सावलीसारखे दिसते.

आत्मज्ञानहे चैतन्य लहरीरूपात आहे. ते कुठुन मिळते ते वर्णन काही श्लोकात केले आहे. यासाठी अश्वत्थ वृक्षाचे रूपक घेतले आहे. गीतेतला श्लोक उर्ध्वमूल अधशाख इथ आहे. वर मूळ व खाली शाखा असा हा सर्वव्यापी वृक्ष आहे. आपल्या शरीरात मेंदूतून चैतन्य सर्व पेशींपर्यंत पोचते. पृथ्वीवर सूर्याच्या मुळे शक्ती येते. मूळ नक्षत्राशी आकाशगंगेचे केंद्र आहे. तेथून ग्रह तारे यांना चैतन्य मिळते. आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत त्यांना ब्रम्हापासून चैतन्य मिळते. मला हा भाग व हे रूपक फार आवडले. कारण हे सगळे पटते.

ब्रम्ह---अनेक आकाशगंगा---प्रत्येकात लाखो ग्रह तारे----अगणित जीव सृष्टी,मनुष्य---अनेक पेशी असा हा चैतन्याचा प्रवास होतो.  या चेनमध्ये ब्रम्ह हा सर्वात मोठा अश्वत्थ, त्याखाली अनेक आकाशगंगांचे  अश्वत्थ, त्याखाली अनेक ग्रह तारे त्यापासून चैतन्य मिळवणारे अगणित जीव आणि शेवटी आपल्या शरीरातील अश्वत्थ जो मेंदूपासून चैतन्य घेतो.
गेल्या काही वर्षात आकाशगंगा व कृष्णविवरांबद्दल बराच अभ्यास होत आहे व माहिती मिळत आहे.

आपण कसे आलो - किंवा हे जग कसे तयार झाले याबद्दल पुढे माहिती दिली आहे.  सुरूवातीला एक ब्रम्हतत्व होते. आकाश आणि वायू मिळून अंभ तयार झाले. त्यानंतर मरिची(तारे) म्हणजे तेज तयार झाले. हे तेज शुद्ध आहे. शुद्ध तेज मरत नाही म्हणून ते अमर आहे. मग पाणी व पृथ्वी तयार झाले. त्यातून पुढे सजीव देह तयार झाले. मग पंचमहाभूतांच्या सहाय्याने शरीरे निर्माण झाली. मुरूवातीला जो अभू होता त्याच्यापलिकडे काय आहे ते सांगता येत नाही. मरिची मधून तारे नष्ट होणे व परत तयार होणे चालू असते, त्यातून गँस तयार होतो तोच अंभ. (हे बिग बँंग थिअरी मध्ये आपण बघतो). या क्रियेत अनेक वस्तू तयार होतात. वस्तू या अणू रेणू पासून बनतात व अणू रेणू परममहान(परमतत्वापासून) पासून बनतात. थोडक्यात या परमतत्वाला आपण अनेक रूपात पहातो. ( वी आर चिल्ड्रन आँफ स्टार्स ही डाँक्युमेंटरी हे छान एक्सप्लेन करते.) हे सगळे पाणी, तेज, अग्नि यातून निर्माण झाले.चैतन्य ही मूलभूत शक्ती आहे. सुरूवातीला जे परमतत्व होते ते हलल्यावर सगळे जग निर्माण झाले. प्रथम त्याचे दोन भाग झाले. हे भाग एकमाकांचे पूरक होते जसे गार गरम, व्यक्त अव्यक्त, उमा काली, प्रकाश अंधार इ. हे दोन भाग एकत्र केले तर शिवतत्व दिसेल पण तेव्हा हे जग नष्ट होईल.
पृथ्वीचे आयुष्य -एका कल्पात १४ मनु(४३२ कोटी सौरवर्षे) सांगितले आहेत. सध्या काहीतरी ९-१० वा मनु चालला आहे. म्हणजे प्रलयाला अजून बरीच वर्षे आहेत.  हे पुराणांमधे जास्त सांगितले आहे. त्यानंतर परत सगळे नष्ट होउन परत नव्याने सुरू होते. सध्या ब्रम्हांड प्रसरण पावत आहे. सगळे ग्रह तारे, आकाशगंगा हे एकमेकांपासून दूर जात आहेत. तरीही एकमेकांना धरून आहेत. काही ठराविक काळानंतर हे सगळे कोलँप्स होईल परत एका बिंदूत जाईल व पुन्हा नव्याने सगळे तयार होईल. अशी अाकुंचन प्रसरणाची क्रिया या ब्रम्हांडाची सतत चालू राहील.

मनुष्य बसलेला असताना  आत्मा दूर जाउ शकतो. झोपलेला असताना जड देहाशी संपर्क ठेउन बरात दूर जाउ शकतो. यावेळी त्याचे देहाशी संधान किंवा संबंध असतो.
प्राणमय देह - पृथ्वीवर हिंडतो.
मनोमय देह - हा वातावरणात कितीही उंच व गुरूत्वाकर्षणाच्या टप्पयात कुठेही जाउ शकतो.
विज्ञानमय देह - परग्रहावर जाउ शकतो.
आनंदमय देह - ग्रहमालेच्या पलीकडे जाउ शकतो.
या सगळ्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते पण आपण वरीच उदाहरणे बघतो ज्यांना असे अनुभव येतात. हे सगळे सिद्धिने प्राप्त होते.

मृत्यूनंतर काय होते याबद्दल पुढे बरेच श्लोक  स्पष्टीकरण देतात. आत्मा मरणानंतर जडशरीरातून चार कोष घेउन बाहेर पडतो व नवीन अन्नमय कोषात शिरून परत जन्म घेतो असे सांगितले आहे. देह गेल्यावर जीव आत्म्यात मिळून भोवतीच्या ब्रम्हात विलीन होतो. जीव बाहेर पडण्यासाठी १०१ वाटा असतात. त्यातील डोक्याकडून बाहेर जातो तो ब्रम्ह होतो. आपल्या पूर्वकर्मफलांचे गाठोडे आपण घेउन जातो. काही देहांचे स्वामी शरीर धारणेसाठी एखाद्या योनीत जातात तर काही स्थिर अणूंच्या मागे जाउन ब्रम्हरूप होतात. प्राण हे प्राणमय देहाशी, वासना मनोमय देहाशी, आणि कर्म विज्ञानमय देहाशी निगडीत असतात. आतिसूक्ष्म किंवा अतिमहान असे रूप घेणे शक्य असते.
मेनी मास्टर्स मानी माईंडस या पुस्तकात एका डाँ ने त्याच्या पेशंटचे अनुभव दिले आहेत. त्यातले लोकांचे अनुभव व आपल्या या उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी खूप जुळतात. आता त्यांनी आपली फिलाँसाँफी वाचून फिक्शन लिहिले का खरेच पेशंटनी पुनर्जन्माचे अनुभव सांगितले माहित नाही. मृत्यूनंतर काही लोकांना गेलेला माणूस दिसतो तो त्याच्या लकबीसकट, गुणधर्मासकट दिसतो. हा वायुमय देह असतो व तो सूक्ष्म वा मोठे रूप घेउ शकतो. साधारण ३ पिढ्या इतका वेळ परत जन्म घ्यायला लागू शकतो म्हणून श्राद्धात तीन पिढ्यांचे स्मरण करतात.

हे सगळे वाचल्यावर असे वाटले की पुनर्जन्म, त्यासाठी पाप पुण्याचा हिशोब हे सगळे फार क्लिष्ट आहे समाज सुरळीत चालावा म्हणून घातलेले हे नियम असावेत.  पण त्याच वेळेला इजिप्शिअन संस्कृतीतील याच कल्पना आठवल्या. तसेच डी एन ए मध्ये किती माहिती साठवलेली असते व ती पुढच्या पिढीत ट्रान्सफर होते हेही आठवले. माणूस हा सगळीकडे जर सारखा तर इतर धर्मात या कल्पना का नाहीत असाही प्रश्न पडतो. बघू सायन्स काही दिवसांनी याची उत्तरे देइल याची मला खात्री आहे. सध्या चाललेले अँस्ट्राँनाँमीचे संशोधन व मेंदूवर चाललेले संशोधन यातून नक्कीच काहीतरी उत्तरे मिळतील.

इतर उपनिषदे भाग ३ मध्ये....





1 comment:

Prat said...

Hi
I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!